गरोदर असताना सेक्स चांगलं की वाईट? गरोदर असताना सेक्स करावं का?

गरोदर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

पाळीदरम्यान तसेच गरोदर असताना सेक्स करावे का? कोणत्या महिन्यात करावे अशा प्रकारचे प्रश्न अनेकदा विचारले जातात.

याबाबत वेगवेगळी मतंही मांडली जातात. त्यामुळे बहुतांशवेळा लोकांचा गोंधळ उडतो.

गर्भधारणा झाल्यानंतर महिलेच्या केवळ शरीरातच नव्हे तर मानसिक स्थितीतही मोठा बदल झालेला असतो. मातृत्वाची चाहूल आणि शारीरिक बदलांचे मनावर होणारे पडसाद यामुळे तिची मानसिक अवस्था पूर्णपणे बदलून गेलेली असते.

बदललेली भावनिक गरज, तिची पूर्तता न होणे याचा तिच्यावर आणि गर्भावरही परिणाम होण्याची शक्यता असते. मात्र असे कोणतेही नैसर्गिक बदल पुरुषामध्ये होत नसतात.

त्याच्या लैंगिक इच्छेत बदल होत नाही. दोघांच्या मानसिक अवस्थेतील आणि लैंगिक इच्छेतील बदल यामुळे जोडप्यामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असते.

समग्र कामजीवन या पुस्तकाचे लेखक डॉ. राजन भोसले लिहितात, 'गरोदरपणात स्त्रीमधली संभोगाची प्रेरणा जरी कमी झालेली असली तरी हळुवार अशी शारीरिक जवळीक करणं, प्रणय करणं, हे तिला हवं असतं. म्हणूनच या काळात पती-पत्नीने अवश्य प्रणय करावा, प्रणय करता करता जर दोघांच्या इच्छा प्रबळ होत गेल्या तर संभोग करायलासुद्धा हरकत नाही. आपण पत्नीवर संभोग लादत तर नाही याचं भान ठेवणं मात्र गरजेचं असतं.'

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये आणि शेवटच्या तीन महिन्यांमध्ये सेक्स करू नये असा सल्ला बहुतांश डॉक्टर देतात.

संसर्गाचा धोका

मुंबईच्या केईम रुग्णालयातील डॉ. कामाक्षी भाटे याचं कारण सांगतात.

गरोदर असताना सेक्स चांगलं की वाईट?

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. भाटे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, "गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे सेक्स टाळावे असं सांगितलं जातं.

"तर शेवटच्या तीन महिन्यांमध्ये सेक्स केल्यामुळे रक्तस्राव होण्याची तसेच मुदतीआधी प्रसुती होण्याची शक्यता असते. त्यामुळे असा सल्ला दिला जातो," डॉ. भाटे सांगतात.

मधल्या तीन महिन्यांध्येही सेक्स कधी करायचं याचा निर्णय दोघांवरही अवलंबून आहे असं डॉ. भाटे सांगतात.

पुण्यामध्ये कार्यरत असणारे लैंगिक रोगतज्ज्ञ आणि 'हॅलो सेक्शुअॅलिटी' पुस्तकाचे लेखक डॉ. प्रसन्न गद्रे यांनीही बीबीसी मराठीला याबाबत माहिती दिली.

मधल्या तिमाहीत सेक्स करण्याचा निर्णय जोडप्याने विचार करुनच घेतला पाहिजे असं ते सांगतात.

ते म्हणाले, "गरोदरकाळात पहिल्या तीन महिन्यात गर्भधारणा नुकतीच झाली असल्याने सर्व बदल पूर्णपणे झालेले नसतात, त्या अवस्थेत सेक्स केल्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. गर्भपाताची वेळही येऊ शकते. शेवटच्या तीन महिन्यांमध्ये सेक्स केल्यामुळे मुदतपूर्व प्रसुतीचा धोका असतो."

गरोदरपणात सेक्स करताना दोघांनी योग्य स्थिती, आसनाचा विचार करुनच संबंध ठेवले पाहिजेत, जेणेकरुन पोटावर ताण येणार नाही असं डॉ. गद्रे सांगतात.

गरोदर असताना सेक्स चांगलं की वाईट?

फोटो स्रोत, Getty Images

याबाबत युनायटेड किंग्डमची आरोग्यसेवा नॅशनल हेल्थ सर्विसनं काही मार्गदर्शक नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये काय म्हटले आहे ते पाहू

एनएचएसच्या मते

  • तुमचे डॉक्टर किंवा तुमची काळजी घेणाऱ्या दाईने सांगितले नसेल तर गरोदरपणात सेक्स करायला काही हरकत नाही.
  • सेक्समुळे तुमच्या बाळाला दुखापत होणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • अर्थात या गरोदरपणाच्या काळात तुमची सेक्स करण्याची इच्छा बदलू शकते, यात काळजी करण्याची गरज नाही परंतु त्याबद्दल तुमच्या जोडीदाराशी बोलणं गरजेचं आहे.
  • कधी गरोदरपणात सेक्स करणं अत्यंत आनंदाचं वाटू शकत तर कधी ते करावेसे वाटणार नाही. प्रेम व्यक्त करण्याचे तुम्हाला दुसरे मार्ग शोधून काढावे लागतील. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलणं आवश्यक आहे.
  • जर तुमचं गरोदरपण सामान्य (नॉर्मल प्रेग्नन्सी) असेल आणि कोणत्याही प्रकारची गुंतागुंत नसेल तर सेक्स, भावनोत्कट होणं (ऑर्ग्याजम) यामुळे गर्भपात होणं, प्रसुती लवकर होणं अशा गोष्टी होत नाहीत.
  • गरोदरपणाच्या उत्तरार्धात गर्भाजवळील स्नायू ताठर होण्याची प्रक्रिया म्हणजेच ब्रॅक्ट्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन होण्याची शक्यता असते. ते स्नायू पुन्हा योग्य अवस्थेत येण्यासाठी फक्त झोपून राहिले तरी उपयोग होतो.

गरोदरपणात सेक्स कधी टाळावे?

गरोदरपणात कधी सेक्स टाळावं याबाबतही एनएचएसने काही सूचना केल्या आहेत.

एनएचएसच्या माहितीनुसार जर तुम्हाला गरोदरपणात मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत असेल तर सेक्स कधी टाळावं याबद्दल तुमचे डॉक्टर किंवा काळजी घेणाऱ्या दाई मार्गदर्शन करू शकतील.

लो प्लॅसेंटा असेल किंवा तेथे रक्तसंचय होत असेल तर अशा स्थितीत सेक्समुळे रक्तस्त्राव होऊ शकतो. असं एनएचएसने स्पष्ट केलं आहे.

गरोदर असताना सेक्स चांगलं की वाईट?

फोटो स्रोत, Getty Images

गरोदरपणाच्या कोणत्या स्थितीत सेक्स टाळावं असं एनएचएस सांगतं-

  • जर गर्भजल बाहेर पडत असेल तर. यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. (याबाबत तुमचे डॉक्टर आणि दाईचे मार्गदर्शन घ्या)
  • गर्भाशयाच्या मुखाजवळ काही समस्या उद्भवली असेल तर प्रसुती लवकर होण्याची शक्यता असते.
  • गरोदरपणाचा उत्तरार्ध सुरू असेल, तुम्हाला जुळे होणार असेल, आधीची प्रसुती मुदतपूर्व झाली असेल तर सेक्स करू नये.
गरोदर असताना सेक्स चांगलं की वाईट?

फोटो स्रोत, Getty Images

एनएचएसच्यामते बहुतांश लोकांमध्ये गरदोरपणाच्या काळात सेक्स करणं सुरक्षित असतं परंतु ते म्हणावं तितकं सोपं नसतं.

सेक्ससाठी कदाचित तुम्हाला वेगवेगळी आसनं शोधावी लागतील. एकमेकांना नव्याने शोधण्याची, एकत्र प्रयोग करण्याची ही वेळ असू शकते असं एनएचएस सांगतं.

गरोदरपणात सेक्स करताना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी एनएचएसने महिलांना काही उपाय सांगितले आहेत.

एनएचएसच्या माहितीनुसार, 'अशा स्थितीत तुम्ही एका अंगावर झोपणं योग्य. एकमेकासमोर तोंड करुन किंवा दुसरीकडे तोंड करुन. आरामदायक अनुभवासाठी उशीचा वापर करावा.'

गरोदर असताना सेक्स चांगलं की वाईट?

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. राजन भोसले आपल्या समग्र कामजीवन पुस्तकाच असेत मत मांडतात.

ते लिहितात, 'पत्नीच्या गरोदरपणात व बाळंतपणात एक नवीन जवळीक निर्माण करण्याची संधी प्रत्येक जोडप्याला मिळत असते. ही संधी दवडू नये. या काळात पती-पत्नी एका वेगळ्या प्रकारे एकमेकांच्या जवळ येऊ शकतात व ही नवीन जवळीक, हा नवा जिव्हाळा, हे नवे प्रेम भावी आयुष्यात फार मोलाची कामगिरी बजावतं.'

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)