भारतात आणून सेक्सवर्कमध्ये ढकलल्या गेलेल्या उझबेक तरुणींची कहाणी

सेक्स वर्क
    • Author, दिलनवाज पाशा आणि दीपक जसरोटिया
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, नवी दिल्ली

दक्षिण दिल्लीच्या एका रहदारीच्या रस्त्यावरून जेव्हा गाडी उझबेक दुकानासमोरून जाते, तेव्हा अफरोजाला ते रस्ते पुन्हा आठवू लागतात, जे एका अशा फ्लॅटपर्यंत जातात, जिथे कधीकाळी तिला ओलीस ठेवलं होतं.

उझबेकिस्तानच्या अंदीजानची मूळची रहिवासी असलेली अफरोजा (नाव बदलण्यात आलंय) जानेवारी 2022 मध्ये दिल्लीत पोहोचली. मानवी तस्करांनी तिला दुबई-नेपाळच्या मार्गे दिल्लीत आणलं होतं.

दिल्लीत तिला वेगवेगळ्या फ्लॅट आणि हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आणि तिच्याकडून सेक्सवर्क करवून घेण्यात आलं.

ऑगस्ट 2022 मध्ये दिल्ली पोलीस आणि ‘एम्पॉवरिंग ह्युमॅनिटी’ या अशासकीय संघटनेच्या प्रयत्नानंतर तस्करी करून आणलेल्या तरुणींना सोडवण्यात आलं.

अफरोजा तेव्हापासून स्वयंसेवी संस्थेच्या देखरेखीत राहतेय आणि तिला उझ्बेकिस्तानातून दिल्लीत आणणाऱ्या मानवी तस्करांविरोधात ती कायदेशीर कारवाई लढतेय.

अफरोजाला आता घरांचे क्रमांक आठवत नाहीत. मात्र, स्मृतींवर थोडं जोर देत, अनेक गल्ल्या-गल्ल्यांमधून जात दिल्लीच्या नेबसराय भागातील एका उंच इमारतीपाशी ती पोहोचते, जिथं तिला नेपाळहून आणल्यानंतर पहिल्यांदा ठेवण्यात आलं होतं.

डोळ्यात अश्रू होते, धाप लागल्यासारखे श्वास वेगाने सुरू झाले सुरू झाले . काही मिनिटांत डोळ्यांतील अश्रू संतापात परिवर्तीत झाले. वेगात पायऱ्या चढत अफरोजा त्या फ्लॅटपाशी जाऊन उभी राहिली, जिथे तिच्यावर अत्याचार केले गेले.

सेक्स वर्क

अफरोजा सांगतात की, “जेव्हा मला इथं आणण्यात आलं, तेव्हा इथं आधीपासूनच पाच मुली होत्या. मला उझबेकिस्तानातून दुबईत आणि तिथून नेपाळला नेण्यात आलं. नेपाळमधून रस्तेमार्गे दिल्लीत आणण्यात आलं. मी थकले होते आणि दोन दिवस मला आराम करण्यास दिले गेले.”

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

“मला शॉपिंगसाठी नेण्यात आलं. गिफ्ट आहे असं सांगून तोकडे कपडे देण्यात आले. दोन दिवसांनंतर जबरदस्तीने सेक्स वर्क करण्यास सांगण्यात आलं. या गोष्टीला विरोध केल्यानंतर मारहाण करण्यात आली.”

“माझी बॉस वेगवेगळ्या दलालांकडे मला पाठवत असे. कधी कधी तर एकाच दिवशी आठ ते नऊ ग्राहक असत. सरासरी पाच ग्राहक तर माझ्याकडे येतच. काम करण्यास विरोध केला, तर सिगारेटचे चटके दिले जात असत, मारहाण केली जात असे.”

अफरोजा सांगते की, “दिल्लीत पोहोचल्यानंतर दोन दिवस आराम केला आणि त्यानंतर एक दिवसही मला शांत बसू दिलं गेलं नाही. कधी कुठल्या फ्लॅटमध्ये ठेवण्यात आलं, तर कधी हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं.”

मानवी तस्कर नोकरीचं आमिष दाखवून दरवर्षी शेकडो मुलींना नेपाळमार्गे भारतात आणतात आणि त्यांना सेक्स वर्कमध्ये ढकलतात. अनेक मुलींना वैद्यकीय व्हिसा आणि पर्यटक व्हिसावर आणलं जातं.

कोर्टात दिलेल्या जबाबानुसार, अफरोजाशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधला गेला होता आणि दुबईत नोकरीची ऑफर देण्यात आली होती. मानवी तस्कारांना अफरोजाच्या आजारी आई आणि कुटुंबाच्या आर्थिक हालाखीच्या स्थितीबाबत माहिती होती.

सेक्सवर्कच्या बेकायदेशीर गोष्टी अफराजोसारख्या महिलांचा ‘नियमित पुरवठा’ आणि शोषण करणारे दलाल, मानवी तस्करांच्या संघटित नेटवर्कद्वारे चालतात.

मानवी तस्करीच्या विरोधात काम करणारे हेमंत शर्मा म्हणतात की, “भारतात अवैधरित्या प्रवेश करूनही आणि व्हिसा संपल्यानंतरही ते पोलिस आणि तपास यंत्रणांच्या नजरेपासून दूर कसे राहतात हा मोठा प्रश्न आहे?”

मध्य आशियातून तस्करीद्वारे भारतात आलेल्या मुलींसमोर एक मोठं आव्हान असतं की, त्यांना भारतातील स्थानिक भाषा कळत नाहीत, तसंच इथं त्यांच्या ओळखीचं कुणीच नसतं.

“तस्कर या मुलींचे पासपोर्ट काढून घेतात आणि त्यांना पोलीस कारवाईची भीती दाखवतात. अशावेळी या मुलींकडे तस्करांचं ऐकण्यापलिकडे आणि स्वीकार करण्यापलिकडे कोणताच रस्ता नसतो,” असं एम्पॉवरिंग ह्युमॅनिटीचे अध्यक्ष हेमंत शर्मा म्हणतात.

मानवी तस्करीला बळी पडलेल्या ज्या मुलींशी बीबीसीनं बातचित केली, त्या मुली दावा करतात की, त्यांचं पासपोर्ट हिसकावून घेतले गेले आणि तुरुंगात पाठवण्याची भीती दाखवण्यात आली.

अफरोजा
फोटो कॅप्शन, दिल्लीतल्या या इमारतीत अफरोजाला ठेवण्यात आलं होतं...

ऑगस्ट 2022 मध्ये दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर अफरोजाला भारतात आणणारी मानवी तस्कर अजीजा शेर, जी अनेक नावांनी ओळखली जाते, ती फरार झाली होती.

दिल्ली पोलिसांनी मोठ्या मोहिमेनंतर मूळची तुर्कमेनिस्तानची राहणार अजीजा शेर आणि तिचा अफगाणिस्तानातील पती शेरगेत अफगानला गोव्यातून अटक केली.

पोलिसांच्या चौकशीत अजीजाची वेगवेगळ्या नावांनी बनलेले भारतीय ओळखपत्रं आणि बँक खाती समोर आली.

पूर्व दिल्लीच्या डीसीपी अमृता गुलुगोथ म्हणतात की, “अजीजा घोषित गुन्हेगार आहे. दिल्ली पोलीस तिला पकडण्यासाठी वर्षभरापासून प्रयत्न करत होते. आमच्या पथकाला टेक्निकल सर्व्हेलन्स आणि ह्युमन इंटेलिजियन्समार्फत कळलं की, अजीजा गोव्यात आहे. त्यानंतर एका ऑपरेशनद्वारे तिला अटक करण्यात आली.”

या मोहिमेतील मयुर विहार पोलीस ठाण्याचे सहाय्यक एसएचओ प्रमोद कुमार आणि त्यांच्या टीमने 200 हून अधिक फोन नंबर ट्रॅक केले आणि अखेर अजीजापर्यंत दिल्ली पोलीस पोहोचू शकले. या मानवी तस्करांना पकडण्यासाठी ह्युमन इंटेलिजियन्स म्हणजेच गुप्तहेर नेटवर्कचीही मदत घ्यावी लागली.

अफरोजा अजीजाची काही एकटीच बळी नव्हती, तर तिच्यासारख्या अनेकांनी अजीजाच्या जाळ्यातून दिल्ली पोलिसांनी सोडवलंय.

तहमीना सुद्धा अशांपैकीच एक. 2020 मध्ये दिल्ली आलेली तहमीना सुद्धा नोकरीच्या आमिषाला बळी पडत दिल्लीत पोहोचली. मात्र, इथे तिलाही सेक्सवर्कमध्ये ढकलण्यात आलं.

तहमीना (नाव बदलेलं आहे) म्हणते, “जेव्हा सेक्स वर्कसाठी मी नकार दिला, तेव्हा मला मारहाण करण्यात आली. माझ्या मारहाणीचे व्हीडिओही बनवण्यात आले. त्या भीतीतून मी अजूनही बाहेर आली नाहीय.”

तहमीनाचा एक व्हीडिओ दिल्ली पोलिसांच्या चौकशीचा भाग आहे. या व्हीडिओत तहमीनाला अमानुष मारहाण होताना दिसतेय. ऑगस्ट 2022 च्या पूर्वीचा हा व्हीडिओ असून, पोलीस चौकशीत हा व्हीडिओ समोर आला.

या व्हीडिओला दुजोरा देत तहमीना म्हणते की, “अजीजाच्या जाळ्यात मी अडकली होती. एक चांगला ग्राहक माझ्याकडे आला आणि मला यातून बाहेर काढण्यासाठी त्याला विनवणी केली. मला मदत करण्यासाठी तो अजीजापर्यंत पोहोचला होता. त्यानंतर मला मारहाण करण्यात आली आणि व्हीडिओ बनवण्यात आला. माझ्या मारहाणीचा व्हीडिओ बाकी मुलींना दाखवून त्यांनाही घाबरवण्यात आलं.”

तहमीनावर सध्या गुरुग्रामच्या कोर्टात फॉरेनर्स अॅक्टनुसार (विना व्हिसा भारतात राहण्याच्या आरोपात) खटला सुरू आहे. तिच्या दाव्यानुसार, हा खटला एका दलालाने तिच्यावर भरला, जेणेकरून ती भारतात अडकून राहील.

अजीजाच्या अटकेनंतर तहमीनाला काहीसा दिलासा मिळालाय. यापूर्वी ती कायम भीतीच्या छायेत असायची.

तहमीना म्हणते की, “ती मला कायम घाबरवत राहायची. मला इतकं घाबरवलं गेलं की, मी अजूनही घाबरते. मला मारहाण केल्याचा व्हीडिओ व्हायरल केला गेला. मला कर्जबाजारी करून ठेवलंय.”

सेक्सवर्कमुळे तहमीनाची तब्येत खालावलीय. परिणामी तिला गर्भाशयाची शस्त्रक्रिया करावी लागली. तहमीना म्हणते, जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती, तिथेही तिला एकटीला सोडण्या आलं. पूर्णपणे बरी होण्यापूर्वीच तिला पुन्हा काम करण्यास भाग पाडलं गेलं.

अमृता गुलुगोथ
फोटो कॅप्शन, पूर्व दिल्लीचे डीसीपी अमृता गुलुगोथ

तहमीना आणि अफरोजासारख्या मुलींना एका दिवसात सहा ते नऊ ग्राहकांकडे जबरदस्तीने पाठवलं जात असे.

बीबीसीने तस्कर आणि दलालांच्या नोंदवह्यांची ती पानं पाहिली, जी पानं आता आरोपपत्राचे भाग आहेत. यात मुलींकडून करवून घेण्यात आलेली कामं आणि रोजच्या लाखोंच्या कमाईचे हिशेब आहेत.

या मुली सांगतात की, या कमाईतला भाग त्यांना मिळत नसेच, उलट तस्कार आणि दलाल त्यांच्यावर खोटे कर्ज त्यांच्यावर वाढवत राहत.

“कुणीही मुलगी कितीही काम करो, ती बॉस आणि दलाल यांच्या कर्जातून बाहेर पडूच शकत नव्हती. सर्वात आधी भारतात आणण्याचा खर्च वसूल केला जात असे, मग खोट्या केसेस दाखल करून कायद्याची फी वसूल करण्याच्या नावाखाली कर्ज वाढवलं जात असे. या जाळ्यात मुली अडकून राहतात,” असं तहमीना सांगते.

अफरोजाचेही असेच अनुभव आहेत. ती म्हणते की, “माझी आई आजारी होती, मला पैशांची गरज होती. मात्र, मला एक रुपयाही दिला गेला नाही. मी 9 महिने बॉसच्या ताब्यात राहिली आणि या दरम्यान मला एकही रुपया दिला गेला नाही. नेहमी सांगत राहिले की, तुझ्यावर कर्ज आहे.”

अफरोजाने ऑगस्ट 2022 मध्ये पळून जाऊन उझबेकिस्तानच्या दूतावासात पोहोचून मदत घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिथं पोहोचण्यापूर्वीच दूतावासाबाहेरून तिला बंदुकीच्या धाकावर बाजूला नेण्यात आलं. दिल्लीतील चाणक्यपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

तिच्या शरीरावर ब्लेड आणि सिगारेटने जाळल्याच्या खुणा दाखवत अफरोजा म्हणते, “मी पैसे मागितले, तेव्हा मला अशा शिक्षा देण्यात आल्या.”

पोलीस निरीक्षक प्रमोद वर्मा
फोटो कॅप्शन, पोलीस निरीक्षक प्रमोद वर्मा

मानवी तस्करांनी अफरोजाला नेपाळमार्गे जेव्हा दिल्लीत आणलं, तेव्हा तहमीना आधीच तस्करांच्या ताब्यात होती.

तहमीना सांगते, “माझी बॉस वेगवेगळ्या ठिकाणांहून मुलींना नोकरीचं आश्वासन देऊन संपर्क करायची. मी मनात आणूनही अफरोजासारख्या मुलींना सावध करू शकत नव्हती. कारण तसा कोणताच मार्ग माझ्याकडे नव्हता. त्यात जुन्या मुलींना नव्या मुलींपासून वेगळं ठेवलं जात असे.”

बीबीसीने दिल्लीतील अशा भागांनाही भेट दिली, जिथे या मुलींना सेक्स वर्क करण्यास भाग पाडले जात होते. पोलिसांच्या कारवाईनंतर सेक्स वर्क या भागातील कमी झालं असलं, तरी पूर्णपणे बंद झालेलं नाही.

पूर्व दिल्लीच्या डीसीपी अमृता गुलुगोथ म्हणतात, "या मानवी तस्करांच्या अटकेमुळे नोकरीच्या नावाखाली मुलींना भारतात आणून त्यांचे पासपोर्ट हिसकावून त्यांना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या नेटवर्कमधील एक धागा नक्कीच तुटेल."

या कारवाईचा परिणाम परदेशातून मुलींना भारतात आणून इथे सेक्स वर्क करायला लावणाऱ्यांच्या नेटवर्कवर नक्कीच होईल.

त्याचवेळी मानवी तस्करीच्या विरोधात काम करणाऱ्या संघटनांचं असं मत आहे की, अजूनही अनेक आव्हाने आहेत.

हेमंत शर्मा म्हणतात, “पहिलं आव्हान नेपाळ सीमेचं आहे, जिथून मुली भारतात आणतात. या मुली व्हिसाशिवाय दिल्लीत प्रवेश करतात आणि दिल्लीत पोहोचतात. यानंतर त्यांना दिल्ली आणि इतर मोठ्या शहरांमध्ये सेक्स वर्क करायला लावलं जातं. प्रश्न असा आहे की, हे सर्व पोलिसांच्या नजरेपासून दूर कसे राहतं?"

हेमंत शर्मा पुढे म्हणतात, “दुसरं आव्हान या मुलींच्या पुनर्वसनाचं आहे. याआधी फॉरेनर्स अॅक्टअंतर्गत मुलींना जामीन दिला जायचा आणि तिथून त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवले जात नव्हते. कायदेशीर कारवाई पूर्ण होईपर्यंत या मुली भारतात काय करतील, कुठे राहतील आणि त्यांचा खर्च कसा भागवतील याचा विचार करण्याची गरज होती."

अटक केलेल्या मानवी तस्करांच्या प्रकरणात अफरोजा साक्षीदार आहे.

हेमंत शर्मा
फोटो कॅप्शन, हेमंत शर्मा

मानवी तस्करीला बळी पडलेल्या बहुतांश मुली या फॉरेनर्स अॅक्ट अंतर्गत गुन्ह्यात गुंतलेल्या आहेत. तस्करीच्या बळी म्हणून त्यांना देश सोडण्यास बंदी नाही, परंतु फॉरेनर्स अॅक्ट अंतर्गत आरोपी बनवल्या गेल्यामुळे त्यांना खटला संपेपर्यंत देश सोडण्याची परवानगी नाही.

जे पीडित आहेत, त्यांनी अंतिम साक्ष देईपर्यंत देश सोडू नये, असं बंधनकारक आहे.

त्याचवेळी या प्रकरणातील आरोपींशी संबंधित वकील जुबैर हाश्मी यांचा दावा आहे की, पीडित मुली त्यांना हवं तेव्हा, त्यांच्या देशात परतू शकतात.

जुबैर हाश्मी म्हणतात, “या प्रकरणांमध्ये पीडितांनी त्यांच्या देशात परत न जाण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केलेली नाही. त्यांना थांबवलेले नाही.”

मात्र, हेमंत शर्मा म्हणतात, “आरोपींना शिक्षा होण्यासाठी पीडितांची साक्ष खूप महत्त्वाची आहे. आरोपींचे वकील ही साक्ष पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून पीडित या कायदेशीर लढाईला कंटाळतील.”

दुसरीकडे, अफरोजा आणि तहमीना त्यांच्या देशात परतण्याची वाट पाहत आहेत. तहमीना म्हणते, "माझ्या देशात पोहोचताच मी पहिली गोष्ट करेन की माझ्या देशाच्या मातीला माथा टेकवे आणि कधीही देश सोडणार नाही, अशी शपथ घेईन."

अफरोजा म्हणते, “मी माझ्या आईला मिठी मारून खूप वेळ रडेन. मला तिची इथे क्षणोक्षणी आठवण येते. आईला मिठी मारणं ही माझी आयुष्यातील सर्वात मोठी इच्छा आहे.”

मध्य आशियातील किती मुलींची भारतात तस्करी झाली, याची कोणतीही ठोस आकडेवारी नाही. मात्र, ही संख्या काही हजारांत असू शकते, असे मानवाधिकार कार्यकर्त्यांचं मत आहे.

(सेक्स वर्कमध्ये ढकलण्यात आलेल्या मुलींची नावं त्यांची ओळख लपवण्याच्या उद्देशानं बदलली आहेत.)

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)