'वेश्या व्यवसायासाठी माझ्या फोटोंचा फेक अकाऊंटवरुन वापर करण्यात आला'

"मी पूर्णपणे हादरले… लोक काय विचार करतील, असं मला वाटलं."
    • Author, तॅमसिन सेलबी आणि जोनाथन पिटर्स
    • Role, बीबीसी स्कॉटलँड

"मी पूर्णपणे हादरले… लोक काय विचार करतील, असं मला वाटलं."

निकोल पिटरकीनच्या एका मैत्रिणीने तिला इन्स्टाग्रामवरच्या तिच्या एका वेगळ्या सोशल मीडिया अकाउंटविषयी विचारणा केली आणि निकोलच्या पायाखालची जमीनच सरकली.

स्कॉटलँडच्या अॅबर्डिनशायरमध्ये राहणारी 20 वर्षांची निकोल रिटेल वर्कर आहे. तिला तिच्या मैत्रिणीने एका सोशल मीडिया अकाउंटची माहिती दिली. या अकाउंटवर निकोलचे फोटो होतो आणि सेक्ससाठी मुली पुरवण्याची जाहिरात त्यावरून सुरू होती.

बीबीसी स्कॉटलँडच्या The Nine Programme या कार्यक्रमात बोलताना निकोल म्हणाली, "मी ते बनावट अकाउंट बघितलं आणि हादरलेच. माझ्या घरच्यांना कळलं तर काय होईल, माझ्या शाळेतल्या मैत्रिणींना, मी ज्या ठिकाणी काम करते तिथल्या माझ्या सहकाऱ्यांना कळलं तर काय होईल, हा पहिला विचार माझ्या मनात आला."

निकोलने तिच्या खाजगी इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेले तिचे फोटो एका बनावट सोशल मीडिया प्रोफाईलमध्ये वापरले जात होते. या तोतया अकाउंटवर एका बनावट वेबसाईटची जाहिरात करण्यात आली होती आणि पैशाच्या बदल्यात निकोल यांचे खाजगी फोटो देण्यात येतील, असंही म्हटलं होतं.

निकोल सांगते, "अशा प्रकारचा व्यवसाय करणाऱ्यांविरोधात मी नाही. पण, मी स्वतः असं काही करते, असं लोकांना वाटू नये."

बनावट प्रोफाईल

आपण आपल्या साईटवर खोट्या खात्यांना परवानगी देत नाही आणि दररोज लाखो बनावट खाती ब्लॉक करत असल्याचं इन्स्टाग्रामचं म्हणणं आहे.

मात्र निकोलच्या बाबतीत जे घडलं त्यासाठी केवळ सोशल मीडिया आणि मोफत वेबसाईट सर्व्हिसचा वापर झाला. एकटी निकोलच नाही तर अनेक तरुण मुली आज अशा प्रकारच्या स्कॅमला बळी पडत आहेत.

"मी पूर्णपणे हादरले… लोक काय विचार करतील, असं मला वाटलं."

यात स्कॅम करणारे सोशल मीडियावर सहज उपलब्ध होणारे तरुणींचे फोटो शोधत असतात. मग असे फोटो डाऊनलोड करून बनावट प्रोफाईल तयार करून त्यावर पोस्ट करतात.

Wix सारख्या फ्री बेवसाईट सर्व्हिसेसच्या मदतीने एक पेज तयार केलं जातं आणि ते OnlyFans, AdmireMe अशा नावांनी सेक्स वर्क साईट म्हणून लोकांपुढे आणलं जातं. निकोलसारखे चोरलेले फोटो या वेबसाईटवर टाकून पैसे आणि यूजरची खाजगी माहिती देण्याच्या मोबदल्यात तरुणींचे अश्लील फोटो देण्याचं आश्वासन दिलं जातं. खरं तर असे अश्लील फोटो मुळात अस्तित्वातच नसतात.

हे घोटाळेबाज इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर करून खऱ्या अकाउंटवरून फोटोंची अशी तोतयागिरी करून स्वतःच्या पेजची जाहिरात करतात.

ज्यावेळी निकोल यांच्या अकाउंटवरून त्यांचे फोटो चोरून असा सगळा प्रकार करण्यात आला त्यावेळी त्यांचं इन्स्टाग्राम अकाउंट 'पब्लिक' होतं. या स्कॅमनंतर त्यांनी स्वतःचं अकाउंट 'प्रायव्हेट' केलं असलं तरी अशाप्रकारच्या घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांनी अधिकाधिक प्रयत्न करायला हवे, असं तिला वाटतं.

निकोल म्हणते, "माझी या सगळ्यातून सुटका झाल्याचा आनंद आहेच. पण, आजही मला अनोळखी लोकांचे मेसेज येतात. ते म्हणतात, मला तुझे फोटो आणि व्हिडियो पाठवलेस तर मी तुला पैसे देईन."

"याचा माझ्या मनावर वाईट परिणाम झाला आहे. तरुण मुलींचे फोटो वापरून त्यांचे बनावट प्रोफाईल बनवणारे अनेक जण आहेत. त्यामुळे कंपन्यांनी याकडे लक्ष देऊन या सगळ्या प्रकाराला आळा घातला पाहिजे."

'फोटोवर कुणाचंही नियंत्रण नाही'

स्कॉटलँडमध्ये यूके सेफर इंटरनेट सेंटरच्या ऑनलाईन सेफ्टी कन्सलटंट जेस मॅकबिथ यांच्या मते नवीन ऑनलाईन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कायमच सेक्श्युअल कन्टेटसंबंधीचे घोटाळे होत असतात.

त्या म्हणतात, "ज्यांचे फोटो अशा कन्टेंटसाठी वापरले जातात त्यांच्या मनावर या सगळ्या गोष्टींचा खोलवर परिणाम होत असतो. त्यांच्या फोटोचा वापर झालेला असतो आणि स्वतःच्याच फोटोंवर त्यांचं कुठलंही नियंत्रण नसतं."

अशा बनावट अकाउंटविरोधात तक्रार देऊन संबंधित खात डिलीट करण्याची सोय असली तरी ही बेकायदेशीर बाब आहे, हे सिद्ध करणं कठीण असतं, असं मॅकबिथ यांचं म्हणणं आहे.

त्या सांगतात, "एखाद्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देणं अतिशय क्लिष्ट प्रक्रिया असते."

सायबर गुन्ह्यांविरोधात कायदे असूनही हे कायदे निकोलसारख्या तरुण मुलींचं रक्षण करण्यास अपुरे पडतात, असं इंग्लंडमधल्या माजी वकील आणि सायबरसेफ स्कॉटलँड संस्थेच्या संस्थापिका अॅनाबेल टर्नर यांचं म्हणणं आहे.

एखादा यूजर अशा बनावट वेबसाईटला पैसे किंवा स्वतःची खाजगी माहिती देत असेल तर याचा अर्थ घोटाळा झाला. मात्र, यात इतरही काही गुन्हे घडले का, हे स्पष्ट नव्हतं.

त्या म्हणतात, "अशा प्रकारच्या फ्रॉडमध्ये जे पीडित असतात, उदा. या प्रकरणात निकोल नावाची तरुण मुलगी, असे पीडित बनावट प्रोफाईल ताबडतोब डिलीट करून घेतात. मात्र, त्यापुढे त्या काहीच करू शकत नाही."

"अशा प्रकारचे गुन्हे घडतात, याचं मला आश्चर्य वाटत नाही. पण, ज्या प्रमाणात ते घडतात ते काळजीत टाकणारं आहे."

'हे भंयकर आहे आणि असं कुणाबरोबरही घडू नये'

स्कॉटलँडमधल्या लुथियानच्या राहणाऱ्या 23 वर्षांच्या हिथर मॅकफारलेन सध्या मॅन्चेस्टरमधल्या एका टेक्नॉलॉजी कंपनीत नोकरी करतात. आपल्या ब्रँडची सोशल मीडियावर जाहिरात करणं, हे त्यांचं काम आहे. आपण स्वतः कधी अशा प्रकारच्या स्कॅमला बळी पडू, असं कधी वाटलंही नव्हतं, असं हिथर सांगतात.

मात्र, गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात हिथर यांना त्यांच्या मित्रांकडून अशाच एका बनावट वेबसाईटची माहिती मिळाली. त्या वेबसाईटवरही सेक्स ऑफर करण्यासाठी हिथर यांच्या फोटोचा वापर करण्यात आला होता.

त्या सांगतात, "लोकांना खरंच असं वाटलं की मीच ती वेबसाईट प्रमोट करते आणि माझ्या कुटुंबाला यातलं काहीही कळू नये, यासाठी मी वेगळं अकाउंट उघडलं असावं."

अखेर हिथर आणि त्यांच्या मित्रांनी तक्रार केल्यानंतर ते तोतया अकाउंट डिलीट करण्यात आलं.

"मी पूर्णपणे हादरले… लोक काय विचार करतील, असं मला वाटलं."

मात्र, सायबर जगात पुरेशी सुरक्षितता नसल्यामुळे असं पुन्हा कधीही घडू शकतं, अशी भीती त्यांना वाटते.

त्या म्हणतात, "मी आणि माझ्यासारख्या इतर मुलींचं शोषण करण्याची संधी या घोटाळेबाजांनी हेरली. हे खूप त्रासदायक आहे."

असे घोटाळे रोखण्यासाठी इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया कंपन्यांनी कुठलंही नवीन अकाउंट उघडण्यापूर्वी प्रयत्नपूर्वक यूजरकडून त्याची खरी ओळख, खरी माहिती मिळवायला हवी, असं हिथर यांना वाटतं.

इन्स्टाग्रामची पॅरेंट कंपनी असणाऱ्या फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, "आम्ही इन्स्टाग्रामवर ज्याची सत्यता पडताळण्यात आलेली नाही, अशा कुठल्याही अॅक्टिव्हिटीला परवानगी देत नाही आणि रोज लाखो बनावट खाती ब्लॉक करतो."

"मी पूर्णपणे हादरले… लोक काय विचार करतील, असं मला वाटलं."

ते पुढे म्हणाले, "आमच्या प्लॅटफॉर्मवरून एखाद्याची फसवणूक होत असेल तर त्या बनावट खात्याविरोधात कारवाई करण्यासाठी संबंधितांनी आमच्या in-app टूल किंवा ऑनलाईन फॉर्मच्या माध्यमातून तक्रार करावी, असं आवाहनही आम्ही करतो."

याविषयी आम्ही Wix ची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आमच्या प्रश्नाला उत्तरं दिली नाही.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)