पुरुषांनाही होतो स्तनाचा कर्करोग, दुर्लक्ष करू नका; कॅन्सरग्रस्त 'बाबा'ची विनंती

फोटो स्रोत, PA Real Life
- Author, आरोग्य प्रतिनिधी
- Role, बीबीसी न्यूज
कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास काय भोगावं लागू शकतं याचं 60 वर्षीय ब्रायन प्लेस जिवंत उदाहरण आहेत. दुर्दैवाने ही दुर्लक्ष करण्याची चूक आता त्यांच्या मृत्यूचं कारण बनणार आहे.
इंग्लंडमधील न्यूकॅसलचे रहिवासी असलेल्या ब्रायन प्लेस यांना स्तनाचा कर्करोग झाल्याचं निदान 2005 साली झालं.
छातीच्या डाव्या बाजूला आलेली छोटीशी गाठ कॅन्सरची असल्याचं त्यांना उशिरा उमगलं. कारण पुरूषांना स्तनाचा कर्करोग होऊ शकतो, हे ब्रायन प्लेस यांना माहितीच नव्हतं. त्यामुळे बराच काळ त्यांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं.
आजाराचं निदान झालं तोपर्यंत हा आजार वाढून कॅन्सर चौथ्या स्टेजमध्ये पोहचला होता. त्यामुळे आता त्यांचा हा आजार बरा व्हायच्या पलीकडे गेलेला आहे. आपण जी चूक केली ती इतरांनी करू नये, हीच शिकवण आता आपल्या उर्वरित आयुष्यात ब्रायन प्लेस लोकांना देत आहेत.
छातीच्या डाव्या बाजूला स्तनाजवळ ही गाठ त्यांना बऱ्याच दिवसांपासून जाणवत होती. पण पुरूषांना स्तनाचा कर्करोग होणं शक्य नाही, अशा खोट्या अर्विभावात असलेल्या ब्रायन यांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं. ते डॉक्टरांकडे लवकर गेलेच नाहीत. त्रास वाढल्यानंतर डॉक्टरांंना दाखवणं भागच होतं.
डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्याला स्तनाचा कर्करोग झाल्याचं त्यांना पहिल्यांदा कळालं तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही. कारण हा आजार फक्त महिलांंना होतो, या गैरसमजात ते आतापर्यंत आपलं आयुष्य जगत होते.
उशीर होऊन कॅन्सर जास्त पसरल्यामुळे रुग्णालयात दाखल केल्यानंतर तातडीने त्यांच्यावर Double Mastectomy ही शस्त्रक्रिया करावी लागली. या शस्त्रक्रियेत दोन्ही स्तन काढून टाकले जातात.
2010 साली कर्करोगावरील शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्ण होऊन ते कॅन्सर मुक्त रुग्ण बनून बाहेर पडले खरे पण पुढच्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात या कर्करोगाने पाठीच्या कण्यामार्गे त्यांच्या शरिरात पुन्हा प्रवेश केला.
शरीराच्या या भागात पसरलेल्या कर्करोगामुळे त्यांचा पाठीच्या कणा, नितंबावरील हाड आणि याबरोबरच यकृत देखील प्रभावित झालं आहे.
दुसऱ्यांदा डोकं वर काढलेला हा कर्करोग आता पूर्णपणे बरा होणं अशक्य आहे. चौथ्या स्टेजमध्ये पोहचलेल्या या कॅन्सरनं ब्रायन प्लेस यांचा मृत्यू होणं अटळ आहे. त्यांचं नशीब चांगलं असेल तर जास्तीत जास्त ते पुढची 5 वर्ष जिवंत राहू शकतील, ही एकमेव आशा डॉक्टरांना उरली आहे.
स्वत:ला भोगाव्या लागत असलेल्या या यातनेतूनच ब्रायन पोटतिडकीने इतर पुरूषांना सांगतात की, “कृपा करून या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. स्तनाच्या कर्करोगाचा जितका धोका स्त्रियांना आहे तितकाच तो पुरुषांनाही. त्यामुळे वेळीच सावध व्हा. हा आजार तुमचं लिंग बघून बळकावत नाही. त्यामुळे कुठलीही लक्षणं आढळल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवून घ्या. मी केलेली चूक तुम्ही करू नका आणि स्वतःला वाचवा.”

फोटो स्रोत, PA Real Life
ब्रायन प्लेस यांना कर्करोग असल्याचं निदान 2005 साली झालं. पण त्यांच्या स्तनाजवळ मागच्या 5 - 6 वर्षांपासून गाठ निर्माण झाली असावी, असं त्यांच्यावर उपचार केलेले डॉक्टर सांगतात. “आपल्याला स्तनाचा कर्करोग होऊच शकत नाही. तो तर महिलांना होणारा आजार आहे या भ्रमात राहणं पुरुषांनी आता तरी सोडायला हवं,” असं या डॉक्टरांनी बजावून सांगितलं.
एकट्या ब्रिटनमध्ये दरवर्षी साधारण 370 पुरुषांना स्तनाचा कर्करोग होत असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे.

फोटो स्रोत, PA Real Life
आपला आजार आता बरा होणार नसला याची जाणीव झाल्यानंतरही ब्रायन यांनी हार मानलेली नाही. जीवनाकडे ते अजूनही सकारात्मक दृष्टिकोनातून बघतात.
जिवंत असेपर्यंत या आजारासंबंधी सजगता पसरवण्याचं काम करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यादृष्टीने त्यांनी पाऊलही टाकलेलं आहे.
स्तनाच्या कर्करोगाशी झगडणाऱ्या पुरूषांसाठी Men’s VMU ही एक खास वेबसाईट त्यांनी सुरू केलेली आहे. हे आजार झालेले पुरूष एकमेकांशी संवाद साधून एकमेकांना आधार देतात.
आपण एकटे नाहीत याची आश्वासक जाणीव यातून पीडित पुरुषांंना होते. तसेच या आजाराचा सामना करण्यासाठी जागरूकता देखील या ऑनलाईन सपोर्ट ग्रूप द्वारे पसरवली जाते.
“स्तनाचा कर्करोग झालेल्या प्रत्येक पुरुषाची हीच कहाणी आहे. यातल्या प्रत्येकाला हा आजार प्रत्यक्षात होण्याआधी तो पुरुषाला देखील होऊ शकतो याची जाणीव देखील नव्हती. ही माहिती नसल्यामुळेच लक्षणांकडे दुर्लक्ष होऊन निदान लवकर होत नाही. हा ऑनलाईन सपोर्ट ग्रुप सुरू करण्यामागचा माझा हाच उद्देश आहे. पुरुष या बाबतीत जागरूक झाले तर आजाराचं लवकर निदान होऊन वेळीच उपचार सुरू करता येतात. वेळीच केल्या गेलेल्या उपचारातून तुम्ही पूर्णपणे स्तनाच्या कर्करोगावर मात करून एक सुखी आयुष्य जगू शकाल,” असं ब्रायन म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











