HMPV वरुन जगभरात चिंतेचे वातावरण आहे का, चीनमध्ये सध्या काय परिस्थिती आहे?

फोटो स्रोत, EPA
चीनच्या उत्तर भागात ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस (HMPV) या विषाणूच्या संसर्गात वाढ झाल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पाच वर्षांपुर्वी चीनमध्येच कोव्हिड-19 या विषाणूचा उद्रेक झाल्याने सगळ्या जगात साथरोगानं थैमान घातलं होतं. जगभरात 70 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवते की काय अशी भीती अनेकांमध्ये दिसत आहे.
14 वर्षे आणि त्यापेक्षा कमी वय असणाऱ्यांमध्ये या विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचं चीनमधल्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, यामुळे रुग्णालयं भरून गेली आहेत हा दावा त्यांनी नाकारला आहे.
या विषाणूचे काही रुग्ण भारतातही आढळले आहेत.


एचएमपीव्ही नवा विषाणू आहे का?
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या विषाणूचा शोध सगळ्यात पहिल्यांदा 2001 मध्ये लागला होता. मात्र, त्याआधीच्या दशकापासूनच हा विषाणू अस्तित्वात असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
एचएमपीव्ही विषाणूची लागण झाल्यावर दिसणारी लक्षणं ही साध्या सर्दी तापासारखी किंवा फ्लूसारखीच असतात. खोकला, ताप, श्वास घ्यायला त्रास होणे, नाक बंद होणे अशी ही लक्षणं. काही रुग्णांमध्ये ही लक्षणं तीव्र स्वरूपात दिसतात.

फोटो स्रोत, Getty Images
या विषाणूमुळे ब्रॉन्काईटीस किंवा न्युमोनियासारखे श्वसनसंस्थेच्या वरच्या आणि खालच्या भागाचे आजार होऊ शकतात. हे आजार कोणत्याही वयाच्या व्यक्तींना होऊ शकत असले तरी बहुतेक वेळा लहान मुलं, वृद्धांना आणि रोग प्रतिकारकशक्ती कमी झालेल्या लोकांना ते होण्याची शक्यता जास्त असते.
यात आजाराची लागण झाल्यापासून ते लक्षणं दिसेपर्यंत सहा दिवसांचा काळ लागू शकतो. आजाराचे सरासरी दिवस त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. पण बहुतेकवेळा विषाणूंमुळे होणाऱ्या इतर श्वसनसंस्थेच्या आजारांइतकेच दिवस बरं व्हायला लागतात.
सीडीसीच्या आकडेवारीनुसार, समशीतोष्ण वातावरणात थंडीच्या शेवटच्या दिवसांत आणि वसंत ऋतूत हा विषाणू जास्त सक्रिय होतो.
हा आजार कसा पसरतो?
एचएमपीव्ही विषाणूचा प्रसार शक्यतो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला, खोकल्यावर किंवा शिंकल्यावर उडणाऱ्या शिंतोड्यांमधून होतो.
शिवाय, लागण झालेल्या माणसाशी फार जवळचा संबंध आले तर निरोगी व्यक्तीला विषाणूची लागण होऊ शकते. हात मिळवताना किंवा हाताला हाताचा स्पर्श झाल्यावर किंवा एचएमपीव्ही विषाणू असलेल्या पृष्ठभागाला स्पर्श झालेल्या हाताने तोंड, नाक किंवा डोळ्यांना हात लावल्यावरही विषाणुची लागण होते.
थंडीच्या दिवसांत लोक जास्त वेळ घराच्या आत काढतात तेव्हाच हा विषाणू जास्त पसरतो.

लहान मुलं आणि वृद्धांनाच जास्त धोका का?
एखाद्या व्यक्तीला अनेकदा एचएमपीव्हीची लागण होऊ शकते. मात्र, पहिल्यांदा लागण होत असेल तर जास्त त्रास होऊ शकतो असं तज्ज्ञ सांगतात.
त्यानंतर आजाराविरोधात प्रतिकारक शक्ती तयार होते आणि त्यानंतर लागण झाली तर जास्त त्रास होत नाही.
मात्र, त्यासाठी आपली एकूण रोगप्रतिकारक शक्ती चांगली असायला हवी. एचआयव्ही किंवा कर्करोगासारख्या आजारानं रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते.

फोटो स्रोत, Getty Images
लहान मुले आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळेच एचएमव्हीपीसारख्या श्वसनसंस्थेच्या आजारांचा धोका त्यांना जास्त असतो.
मात्र, एचएमव्हीपी अनेक दशकांपासून अस्तित्वात असल्याने जागतिक स्तरावरच या आजाराविरोधात पुरेशी रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
चीनमधली परिस्थिती
चीनच्या रुग्णालयात मास्क घालून फिरणाऱ्या लोकांचे फोटो आणि व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे चीनमधली रुग्णालयं रुग्णांनी भरून गेली आहेत असे अंदाज बांधण्यात येत आहेत.
काही स्थानिक वृत्तसंस्थांनी या परिस्थितीची तुलना कोव्हिडच्या सुरूवातीच्या दिवसांशी केली आहे.
थंडीच्या दिवसांत आणि वसंत ऋतुत काही श्वसनसंस्थेचे तीव्र आजार देशात पसरणार असल्याची शक्यता चीनच्या सीडीसीचे प्रमुख कान बीआयो यांनी वर्तवली आहे.
एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी 14 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांमध्ये एचएमव्हीपी विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचं सांगितलं.
मात्र, 2024 मधे श्वसनसंस्थेचे आजार झालेले एकूण लोक त्याआधीच्या वर्षापेक्षा कमी होते असंही ते म्हणाले.

फोटो स्रोत, John Ricky/Anadolu via Getty Images
सेंटर फॉर एपिडेमिक रिस्पटन्स अँड इनोव्हेशन या संस्थेचे संचालक प्राध्यापक तुलिओ डे ऑलिविऐरा यांच्या म्हणण्याप्रमाणे एचएमव्हीपी हा चीनमध्ये थंडीच्या दिवसांत पसरणाऱ्या चार विषाणुंपैकी एक आहे. इतर तीन रेस्पिरेटरी सिंसिटिअल व्हायरस (आरएसव्ही), कोव्हिड आणि इन्फ्लुएन्झा हे विषाणू आहेत.
हिवाळा ऋतू आणि हे चार विषाणू पसरत असल्याने चीनमधल्या रुग्णालयांवर काही प्रमाणात ताण येणार हे अपेक्षितच होतं असंही ओलिविऐरा पुढे म्हणतात.
अज्ञात कारणामुळे पसरणाऱ्या न्यूमोनियावर पाळत ठेवण्यासाठी देखरेख प्रणाली सुरू करत असल्याचं चीनने शुक्रवारी जाहीर केलं. हिवाळ्यात श्वसनसंस्थेच्या आजारात वाढ होत असल्याने ही प्रणाली महत्त्वाची आहे, असंही त्यांनी सांगितलं.
पाच वर्षांपुर्वी कोव्हिड-19 साथरोगाची सुरूवात होत असताना चीनची एवढी तयारी झालेली नव्हती.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











