थंडी का पडते? थंडीची लाट म्हणजे काय? वाचा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
जरा ऋतू बदलला, हवा बदलली की आपल्याकडे हवापाण्याच्या गप्पा सुरु होतात. यंदा म्हणावी तशी थंडी नाही.
यंदा थंडी जरा जास्तच आहे.. अशी वाक्यं ऐकायला मिळतात किंवा उत्तर भारत गारठला, थंडीमुळे हिटरच्या मागणीत वाढ अशा बातम्या वाचायला तुम्हाला मिळतात.
पण हा हिवाळा दरवर्षी कसा येतो किंवा थंडी नेमकी कशी पडते आणि थंडीची लाट म्हणजे काय असे प्रश्न तुमच्या मनात येत असतील.
इथे आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत.

फोटो स्रोत, Getty Images
आपली पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी 24 तासांमध्ये पूर्ण करते.
त्यामुळे कोणत्याही वेळेला पृथ्वीच्या अर्ध्या भागात दिवस तर अर्ध्या भागात रात्र असते. पण ही पृथ्वी काही सरळ स्वतःभोवती फिरत नाही.
आपली पृथ्वी एका बाजूला साडेतेविस अंशांमध्ये कललेली आहे तुम्ही वाचलं असेल. ही अशी साडेतेविस अंशात कललेल्या अवस्थेतच पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते.
त्यामुळे पृथ्वीचा जो गोलार्ध सूर्याच्या जवळ असतो त्याच्यावर सूर्याची थेट किरणं पडतात आणि जो लांब असतो त्यावर तिरपी किरणं पडतात.

फोटो स्रोत, Getty Images
आता जिथं थेट किरणं पडत असतात तिथं उन्हाळा आणि जिथं तिरपी किरणं पडतात तिथं हिवाळा होतो म्हणजेच तिथल्या लोकांना थंडी वाजायला लागते.
आता आपण सूर्याची किरणं थेट पडल्यामुळे आणि तिरपी पडल्यामुळे काय फरक पडतो याचा विचार करु जेव्हा एखाद्या वस्तूवर अगदी थेट किरणं पडतात तेव्हा कमी जागेवर ऊर्जेचं केंद्रीकरण होतं आणि साहजिकच तिथलं तापमान वाढतं.
उन्हाळ्यात हेच तर होत असतं आणि जेव्हा तिच किरणं तिरपी पडतात तेव्हा ही किरणं जास्त जागा व्यापतात आणि ती उर्जा विभागली जाते. म्हणजेच उन्हाळ्याइतकी ती तीव्र नसतात.
आपल्या भारत देशाचा विचार केला तर मान्सूनचा पाऊस पडून सगळा पावसाळा संपला की आपल्याकडे हिवाळ्याला सुरुवात होते.
सूर्याची किरणं तिरकस पडू लागतात. दिवस लहान होतात आणि रात्री मोठ्या होतात.
आपल्या देशाचा बहुतांश भाग उष्ण कटिबंधात असल्यामुळे आपल्याकडे एकदम कडाक्याची थंडी पडत नाही. पण जसंजसं आपण उत्तरेला जाऊ तशी ही थंडी वाढत गेल्याचं दिसून येईल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
दक्षिणेकडेच्या राज्यांमध्ये पारा थोडासा उतरतो. पण उत्तर भारतात मात्र चांगलीच थंडी पडते.
आता आपण हिवाळ्यात जम्मू काश्मीर, हिमाचल, उत्तराखंडमध्ये बर्फ का पडतो याचं थोडक्यात उत्तर शोधू उत्तर भारतात येणाऱ्या थंडीच्या लाटेचा उगम वेस्टर्न डिस्टर्बन्समध्ये आहे.
भूमध्य समुद्रावर तयार झालेली कमी दाबाची क्षेत्र सरकत सरकत इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान अशी येत भारताजवळ येतात.
इथं आपला हिमालय पर्वत त्यांना अडवतो. मग त्या वेस्टर्न डिस्टर्बन्सना उत्तरेला जावं लागतं. पण तरीही काहीही वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालय उतरायचं ठरवतात. मग काय हे गोल गोल फिरणारं वारं उत्तर भारतातली थंड हवा आणि अरबी समुद्रावरची बाष्प असलेली दमट हवा एकत्र आणतात.
त्यामुळे हवेतल्या बाष्पाचं रुपांतर पावसाच्या पाण्यात किंवा बर्फात होतं.
त्यामुळेच उत्तर भारतातल्या जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल, उत्तराखंडमध्ये बर्फ पडतो.

फोटो स्रोत, Getty Images
आता हे वेस्टर्न डिस्टर्बन्स जर स्ट्राँग असले तर त्यांचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत दिसून येतो.
आपल्याकडे काही जिल्ह्यांमध्ये कधीकधी हिवाळ्यात एकदम तापमान उतरतं ते याचमुळे जर किमान तापमान सामान्य तापमानापेक्षा 4 अंशांनी खाली आलं तर त्याला थंडीची लाट आली म्हणतात आणि जर ते 6 अंशांनी घसरलं तर त्याला थंडीची तीव्र लाट असं म्हणतात.
आता मिळालं थंडी का पडते या प्रश्नाचं उत्तर?
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








