उष्णतेची लाट म्हणजे काय? भारतातली शहरं दिवसेंदिवस गरम का होत चालली आहेत?

भारत तापमान

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"काय हे? पूर्वी असं नव्हतं. आमच्या लहानपणी इतकं गरम नव्हतं होत."

"मी पूर्वी या शहरात आलो होतो तेव्हा इतकं गरम होत नसे."

"यंदा उन्हाळा जरा जास्तच आहे."

भारतामधल्या कोणत्याही शहरात गेलात की अशी काही वाक्य ऐकायला मिळतातच. तुम्हीसुद्धा ही वाक्यं अनेकदा ऐकली असतील. पण आपण त्यावर काय प्रतिक्रिया देतो? कधी विचार केलाय का हे असं होत असावं?

हा उन्हाळा ग्लोबल वॉर्मिंगमुळेच वाढला आहे, असं मत काही जणांनी व्यक्त केलं आहे. पण असं मत व्यक्त करताना आपण आपल्या शहरांच्या बदलत्या स्थितीचा, हवेच्या दिशेचा विचार करत नाही.

शहरांची बदलती स्थिती

भारतातल्या शहरांमध्ये विविध बांधकामांमुळे गेल्या काही दशकांमध्ये मोठे बदल झाले आहेत. शहरांभोवतीची आणि शहरांमधली मोठी झाडं या बांधकांमांमुळे नष्ट झाली आहेत.

त्यापाठोपाठ डांबरी, सिमेंटचे रस्ते आणि काँक्रीटच्या इमारती, असं शहरांचं नवं रूप तयार झालं. उन्हाळ्यात एसीचा वापर सुरू झाल्यामुळे पुन्हा इमारतीतील उष्ण हवेला आधीच तापलेल्या बाहेरच्या हवेत सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली.

अर्बन हीट आयलंड

काँक्रीटच्या अतिरिक्त इमारती तसंच रस्ते यामुळे शहरांमध्ये तापमान वाढल्याचे दिसून येतं. हे तापमान आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा जास्त असल्यामुळे वाढलेल्या तापमानाचा हा शहरी प्रदेश चटकन ओळखता येतो. त्यामुळेच त्याला 'अर्बन हीट आयलंड' किंवा 'हीट आयलंड' असं म्हटलं जातं.

रस्ते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गेल्या 40 ते 50 वर्षांमध्ये आपण भारतातील शहरांचं रूप बदलून टाकलं आहे.

वाऱ्याचा वेग कमी असताना अर्बन हीट आयलंडसारखा उष्ण प्रदेश तयार झाल्याचं लगेच जाणवतं. जसजशी लोकसंख्या वाढत जाते तशी या हीट आयलंडची व्याप्ती वाढत जाते.

शहराची हद्द ओलांडून आपण थोडं बाहेर जाताच तापमान कमी झालेलं जाणवतं. याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. शहरांमधील बदलांमुळे, वाढत्या बांधकांमांमुळे वाऱ्याचा वेग कमी झाल्याचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूगोलाचे प्राध्यापक डॉ. अमित धोर्डे सांगतात.

डॉ. धोर्डे म्हणतात, "शेतीचं किंवा हिरवळीचं क्षेत्र कमी होणं तसेच डांबरी-काँक्रीट रस्त्यांमुळं शहरांमधील तापमान वाढल्याचं दिसतं. 2007 साली आम्ही केलेल्या अभ्यासामध्ये कमाल तापमान वेगाने वाढल्याचं दिसून आलं.

"युरोपमध्ये किमान तापमानात वाढ होताना दिसते. परंतु भारतात कमाल आणि किमान दोन्ही तापमानं वाढत असल्याचं लक्षात आलं आहे. त्यातही कमाल तापमान वेगाने वाढल्याचं लक्षात आलं आहे. गेल्या 40 ते 50 वर्षांत शहरांच्या बदललेल्या स्थितीमुळे तापमान वाढलेलं आढळलं."

भारतीय शहरं आणि तापमान यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मानसी देसाई अभ्यास करत आहेत. त्यांनाही शहरातील तापमानवाढीमागे अर्बन हीट आयलंडचं कारण वाटतं. त्या सांगतात, "तापमानवाढीचं ग्लोबल वॉर्मिंग हे एक महत्त्वाचं कारण आहेच, पण शहरांचा अभ्यास केल्यास जमिनीच्या वापरात झालेल्या बदलाचं कारणही तितकंच महत्त्वाचं असल्याचं दिसतं. डांबरी, सिमेंटचे रस्ते तसेच काँक्रीटसारख्या बांधकामाच्या साहित्यामुळे उष्णता शोषून ती दुपारच्या वेळेस आणि रात्रीच्यावेळेस उत्सर्जित केली जाते.

"तसंच नव्याने वाढणाऱ्या शहरांमध्येही तापमान वाढत असल्याचं दिसून येतं. गेल्या 2 दशकांमध्ये नव्यानं वाढणाऱ्या शहरांचं तापमान आधीपासून वसलेल्या मेट्रोपॉलिटन सिटीच्या तापमानापेक्षा अधिक गतीनं वाढत असल्याचं अभ्यासात लक्षात आलं आहे."

ग्लोबल वॉर्मिंगचा शहरांवर होणारा परिणाम

काही लोक नागपूर, चंद्रपूर, आग्रा, झाशी तसेच मध्य प्रदेशातील शहरांमध्ये एप्रिल महिन्याच्या अखेरीस वाढलेल्या तापमानाचा संबंध थेट ग्लोबल वॉर्मिंगशी जोडत आहेत. परंतु भारतीय हवामाना खात्याचे माजी संचालक डॉ. रंजन केळकर यांच्यामते केवळ ग्लोबल वॉर्मिंगवर याचं खापर फोडणं योग्य नाही.

तापमान

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसीशी बोलताना ते सांगतात, "1893 सालीही तापमानाने उच्चांक गाठला होता. किंवा 'अमूक ठिकाणी तापमानाने 100 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं', अशी बातमी वाचायला मिळते. जर 100 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं, असं ऐकायला मिळतं याचा अर्थ 100 वर्षांपूर्वीही तापमान वाढलेलं होतं, हे निश्चित. त्यामुळे याचा संबंध ग्लोबल वॉर्मिंगशी सारखं जोडणं अयोग्य आहे."

...म्हणून महाबळेश्वरचंही तापमान वाढलंय

डॉ. केळकर सांगतात, तापमानाचा विचार करताना हवेच्या दिशेकडेही लक्ष दिलं पाहिजे. राजस्थानमधून येणारं वारं गरम असतं. त्यामुळे हे ही उष्णतेची लाट जशी येते तशी वाऱ्याची दिशा बदलल्यावर जातेही. बंगालच्या उपसागरात आलेल्या फणी चक्रीवादळामुळे उत्तर भारत आणि मध्यभारतातील वातावरणात बदल झाल्याचं दिसून आलं. अनेक ठिकाणी पाऊस पडल्याचंही आपल्याला दिसून आलं आहे.

शहरांमधील आणि वाऱ्याच्या दिशेत आलेल्या अडथळ्यांबाबत बोलताना डॉ. केळकर मुंबई आणि पुण्याचं उदाहरण देतात. "एकेकाळी मुंबईचे समुद्रातील वारे पुण्यापर्यंत यायचे. परंतु आता दोन्ही शहरांच्यामधल्या भागात मोठी शहरे वसली आहेत. तिथे काँक्रीटच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे वाऱ्याचा वेग आणि दिशा बदलली आहे.

"पुण्यात 50 वर्षांपूर्वी आम्हाला पंख्याची गरज वाटत नसे, पण आता वाऱ्याची दिशा, वेग बदलून टाकल्यावर शहरं गरम झाली. आता महाबळेश्वर पाचगणीसारख्या थंड हवेच्या ठिकाणीही तापमान वाढल्याचं दिसून येतं," डॉ. केळकर सांगतात.

शहरांची रचना, वाढती वस्ती यामुळे वाऱ्याची दिशा आपण बदलली आणि आता कृत्रिम मार्गांनी उन्हाळ्यावर मात करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शहरांची रचना, वाढती वस्ती यामुळे वाऱ्याची दिशा आपण बदलली आणि आता कृत्रिम मार्गांनी उन्हाळ्यावर मात करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.

तापमानाची नोंद कशी करता यावरही अनेकदा तापमानाचा आकडा अवलंबून असतो, असं डॉ. केळकर म्हणतात. "एकेकाळी पुण्यातल्या सिमला हाऊसच्या मनोऱ्यावर जाऊन तापमान नोंदवलं जायचं. पण त्यामुळे योग्य रीडिंग येत नसल्याचं इंग्रजांच्या लक्षात आलं. त्यानंतर ते जमिनीवर नोंद घेऊ लागले. आता तापमान जमिनीपासून 4 फूट उंचीवर खोक्यात ठेवलेल्या थर्मामीटरने घेतलं जातं. त्यावर थेट ऊन पडू दिलं जात नाही. या खोक्याला हवेसाठी फटी ठेवलेल्या असतात."

तापमान कुठे नोंदवावं हे सांगताना ते म्हणाले, "एकेकाळी सिमला हाऊस हे पुणे शहराच्या बाहेर होतं. तिथं आजिबात वर्दळ नव्हती. पण कालांतरानं या परिसरामध्ये इतकी वर्दळ वाढली की सर्व परिसराचं रूप पालटून गेलं. त्यामुळे तिथं तापमानाची योग्य नोंद होणं शक्य नव्हतं.

"त्यामुळे गेली काही वर्षं पुण्याच्या कृषी महाविद्यालयाच्या शेतजमिनीत घेतलं जातं. आता तिथे जवळून मेट्रो जाणार असल्यामुळं ती जागाही हलवावी लागेल. आजूबाजूच्या परिस्थितीचा या नोंदींवर परिणाम होत असल्यामुळं तापमानाची योग्य नोंद होणंही गरजेचं आहे," असं त्यांनी सांगितलं.

लोकांच्या बदलत्या सवयी

उन्हाळा तसंच हंगामांमधील बदलांमध्ये होणारे अपघात, मृत्यू यावरही आपल्याकडे भरपूर चर्चा होते. उष्माघाताचे अमूक बळी, वीज पडून बळी अशा बातम्या येतात. याबाबत थोडेफार आपणही दोषी आहोत, असं डॉ. केळकर सांगतात.

बदलत्या हंगामानुसार आपण आहार-विहार, पोशाखात काही बदल केले पाहिजेत. ते न झाल्यामुळे अशा घटना घडतात, असं त्यांचं मत आहे.

तापमान

फोटो स्रोत, Getty Images

"राजस्थानमध्ये उन्हाळ्यात नेहमीच तापमान 45च्या वर गेलेलं असतं, पण तिथे डोक्याला पागोटं असल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत. सर्वत्र पिण्याचं पाणी ठेवलं जातं. घराबाहेर पडताना पाणी पिऊन पडतात किंवा लोकांना आग्रहानं पाणी पाजतात. त्यांनी उन्हाळ्यानुसार समाजव्यवस्थेत बदल केले. ते शिकण्यासारखे आहेत.

"उत्तर भारतात धुळीची वादळं तसंच गडगडाटी वादळं आल्यावर घराबाहेर पडणार असाल तर तुम्हाला नक्की धोका असेल. त्यामुळे त्याचा विचार करून बाहेर पडायला हवं," असं ते सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)