हवामान बदल : 2019मध्ये म्हणून होत आहे तापमानात वाढ

हवामान

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मॅट मॅकग्रा
    • Role, पर्यावरण प्रतिनिधी

2019मध्ये वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण सर्वोच्च पातळी गाठेल, अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

मानवी कृतींतून निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जंगलांत शोषला जातो. त्यामुळे जंगलांना नैसर्गिक 'कार्बन सिंक'ही म्हटलं जातं. पण यावर्षी पॅसिफिक परिसरातील अधिक उष्ण हवामानामुळे वनस्पतींची वाढ कमी होईल आणि त्या कमी प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषतील, असं संशोधकांना वाटतं.

त्यामुळे 2018शी तुलना करता 2019मध्ये वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढेल, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

हवाई येथील मौना लो वेधशाळा 1958पासून वातावरणातील रासायानिक घटकांचा अभ्यास करत आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा हा अभ्यास सुरू झाला तेव्हा हवेतील कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणात जंगलतोड आणि खनिज तेलांच्या ज्वलनामुळे 30टक्के इतकी वाढ झाल्याचं दिसून आलं.

उन्हाळ्यात वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होतं कारण या काळात वनस्पती अधिक कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. तर थंडीत पानगळीमुळे झाडं कमी कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं.

पण जेव्हा तापमान सर्वसाधारण स्थितीपेक्षा अधिक कोरडं आणि उष्ण असतं तेव्हा झाडांची वाढ कमी होते आणि ते कमी कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. जेव्हा जेव्हा El Niño ची स्थिती निर्माण होते, तेव्हा पॅसिफिक परिसरात वाढणारी उष्णता इतरत्रही पसरते.

वेधशाळेतील संशोधक डॉ. ख्रिस जोन्स म्हणाले, "समुद्राचा पृष्ठभाग उबदार असेल आणि ती परिस्थिती काही महिने सुरू राहील. याचा परिणाम वनस्पतींवर दिसू लागेल. जगभरात या उष्णतेचे वेगवेगळे परिणाम दिसून येतात. काही ठिकाणी अधिक उष्णता आणि कोरडं वातावरण निर्माण होतं. तर वर्षावनांची वाढ घटल्याचं दिसून येईल."

2019मध्ये वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 411ppm इतकं राहील, असं संशोधकांना वाटतं. 2013मध्ये कार्बन डायऑक्साईडच्या पातळीने पहिल्यांदा 400ppm ची पातळी ओलांडली होती.

संशोधक म्हणतात, की दीर्घकालीन अभ्यास लक्षात घेतला तर कार्बन डायऑक्साईडची पातळी सातत्याने वाढत असल्याचं दिसतं.

जोन्स म्हणाले, "20व्या शतकात दरवर्षी कार्बन डायऑक्साईडची पातळी सतत वाढत आहे. संपूर्ण शतकात हा ट्रेंड दिसतो आणि तो सतत वाढत चालला आहे. या वर्षांत आतापर्यंतच्या सर्वाधिक कार्बन डायऑक्साईडची नोंद होईल."

इतर संशोधकांनी हे संशोधन काळजी करण्यासारखं आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

एलनिनो

फोटो स्रोत, NOAA/SCIENCE PHOTO LIBRARY

ब्रिटिश अंटार्टिक सर्व्हेतील संशोधक डॉ. अॅना जोन्स म्हणाल्या, "आपण ऊर्जेसाठी खनिज तेलांवर अवलंबून आहोत, त्याचा हा परिणाम आहे. कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची पृथ्वीची क्षमताही विचारात घ्यावी लागेल. पण कार्बन डायऑक्साईडची सतत होणारी वाढ जागतिक तापमान वाढ 1.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या उद्देश मात्र सीमित होत आहे. कार्बन डायऑक्साईड कमी झालं पाहिजे, तर त्यात उलट वाढ होतानाच दिसत आहे."

पण कार्बन डायऑक्साईडमध्ये होणारी वाढ म्हणजेच तापमान वाढ असं शास्त्रज्ञ मानत नाहीत, कारण त्यामध्ये इतरही नैसर्गिक घटक कारणीभूत ठरतात.

गेल्या चार वर्षांत या वेधशाळेने व्यक्त केलेले अंदाज अचूक ठरले असल्यानं भविष्यात विविध देशांना त्यांचं उत्सर्जन मर्यादेत ठेवण्यात त्याचा उपयोग होईल, असं संशोधकांना वाटतं.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)