हवामान बदल: 'ही शेवटची धोक्याची घंटा आहे', वैज्ञानिकांनी दिला इशारा
ही "शेवटची धोक्याची घंटा" आहे - असा जागतिक तापमानवाढीसंदर्भातला इशारा वैज्ञानकांनी आज दिला.
जागतिक तापमानवाढ 1.5 डिग्री सेल्सियसच्या खाली ठेवण्याच्या उद्दिष्टापासून जग पूर्णपणे भरकटलं आहे. आणि आता जागतिक तापमानवाढीची वाटचाल 3 डिग्री सेल्सियसकडे होत असल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे.
जागतिक तापमानवाढ 1.5 डिग्री सेल्सियसच्या खाली ठेवण्याचं उद्दिष्ट गाठायचं असेल तर आपल्याला ऊर्जेच्या वापराबाबत वेगवान, दूरगामी आणि अभूतपूर्व बदल करावे लागतील, असं म्हटलं जात आहे.
या गोष्टीची खूप मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल. पण तितक्याच प्रमाणात आपल्याला संधी असल्याचं देखील म्हटलं जात आहे.
तीन वर्षांचं संशोधन आणि दक्षिण कोरियात वैज्ञानिक आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (IPCC)नं एक विशेष अहवाल सादर केला आहे. जर आपण जागतिक तापमानवाढ 1.5 डिग्री सेल्सियसने वाढू दिली तर त्याचे काय परिणाम आपल्याला भोगावे लागतील आणि जर ही मर्यादा आपण पाळली तर आपल्याला काय फायदा होईल, हे या अहवालात सांगितलं आहे.
या अहवालात 33 पानांचा सारांश दिला आहे. त्यात असं निरीक्षण आहे की जागतिक नेत्यांना तापमानवाढीपेक्षा जास्त काळजी अर्थव्यवसथेची आणि राहणीमानाची आहे. असं असलं तरी या अहवालातले काही ठळक मुद्दे विचार करण्यासारखे आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
2C हे उद्दिष्ट ठेवण्यापेक्षा 1.5C हे उद्दिष्ट ठरवणं, हे खूप अर्थानं फायद्याचं आहे. हवामान बदलाच्या परिणामासंबंधी महत्त्वपूर्ण बदल घडतील असं प्रा. जिम स्किया यांनी म्हटलं आहे. ते IPCCचे सह-अध्यक्ष आहेत.
दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर 1.5Cचं उद्दिष्ट गाठायचं असेल तर आपण ऊर्जेचा वापर कसा करतो, आपण जमीन कशी वापरतो आणि आपली वाहतूक व्यवस्था कशी असावी, याबाबत आपल्याला अमूलाग्र बदल घडवून आणावे लागतील.
"या अहवालात नोंद घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. हा अहवाल असा आहे की वैज्ञानिकांना, 'ACT NOW, IDIOTS (मूर्खांनो, आता तरी काही करा), असं लिहावंसं वाटत असेलही. पण त्यांना ही गोष्टी तथ्य आणि आकडेवारीसह मांडावी लागणार आहे," असं कैसा कोसोनेन यांनी म्हटलं आहे. कैसा या ग्रीनपीस संघटनेशी संबंधित आहेत आणि त्यांनी या वाटाघाटींचं निरीक्षण केलं आहे.
तथ्य आणि आकडेवारीचा वापर करून वैज्ञानिकांनी जगाला धोकादायक तापाची लागण झाली आहे याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला असं वाटत होतं की जर आपण 2Cचं उद्दिष्ट यशस्वीरीत्या गाठू शकलो तर हवामान बदलाचे परिणाम हे आटोक्यात राहतील.

फोटो स्रोत, AFP
पण या अहवालानं आपले डोळे उघडले आहेत. या अहवालात स्पष्टपणे सांगितलं आहे की जर तापमान 1.5Cनं वाढलं तर यामुळे पृथ्वीचं आरोग्य धोक्यात जाईल आणि 1.5ची मर्यादा आपण फक्त 12 वर्षांत ओलांडणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला आहे. म्हणजेच 2030नंतर पृथ्वीच्या तापमानात 1.5C वाढ होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.
"आपण याखाली येऊ शकतो. पण त्यासाठी आपल्याला अत्यावश्यक बदल तातडीनं घडवावे लागतील. यासाठी खूप मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. पुढील वीस वर्षांसाठी पूर्ण जागतिक सकल उत्पन्न तसेच वस्तू आणि सेवांवर मिळणाऱ्या उत्पन्नातील 2.5 टक्के रक्कम दरवर्षी आपल्याला गुंतवावी लागेल तर हे उद्दिष्ट गाठता येईल."
"असं झालं तर आपल्याला अशी उपकरणं आणि यंत्रे लागतील जी वातावरणातल्या कार्बनला कैद करू शकतील. मग ही कार्बन आपण खोल जमिनीत साठवून ठेवू. असं घडलं तरच हे आटोक्यात येईल."
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









