2 अंशाने तापमान वाढलं तर अलास्का वितळेल

ALASKA, SNOW

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, अलास्कामध्ये बर्फाच्या नद्या

पृथ्वीचं तापमान वेगाने वाढत आहे. ध्रुवीय प्रदेशातलं बर्फ मोठ्या प्रमाणावर वितळतंय आणि समुद्रकिनाऱ्याच्या जवळची गावं तसंच छोटी बेटं समुद्राच्या घशात जातील अशी भीती शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.

हा संभाव्य धोका लक्षात घेऊन काही देशांनी एकत्र येत पॅरिस करार केला. पृथ्वीचं तापमान वाढवणाऱ्या वायूंचं उत्सर्जन रोखणं हा या करारामागचा उद्देश होता.

त्यामुळे तापमान वाढ आटोक्यात आणता येईल हा होरा आहे. पण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी करारावर सही करायला नकार दिला आणि आता त्याचा परिणाम अमेरिकेतल्याच एका राज्याला भोगावा लागणार असं दिसत आहे.

ALASKA, TRUMP

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पॅरिस करारला अमेरिकेचा विरोध

अलास्का हे राज्य भौगोलिक दृष्ट्या अमेरिकेपासून दूर आहे. संयुक्त अमेरिकेतलं हे 49वं राज्य. वर्षभर इथं थंडी असते आणि हा प्रदेश बर्फाच्छादित असतो.

अलास्कामध्ये बर्फ वितळतंय

मागची कित्येक वर्षं हे बर्फ हटलेलंच नाही. त्यामुळे रस्ते बनवतानाही या बर्फावरच ते बांधले गेले. हे बर्फ कधी वितळेल आणि रस्ते नादुरुस्त होतील असं कुणाला कधी वाटलंच नव्हतं.

पण, आता परिस्थिती बदलते आहे. भयंकर थंडीच्या अवस्थेला पर्माफ्रॉस्ट असं म्हणतात. पण, अलास्का आता पर्माफ्रॉस्टपासून दूर जात आहे.

पर्माफ्रॉस्ट

पर्माफ्रॉस्ट अशी अवस्था आहे जिथे झाड बर्फात पडलं तर ते त्याच अवस्थेत राहतं. ते सडत नाही की, खराब होत नाही. हवेत बॅक्टेरिया जिवंत राहू शकत नाहीत. त्यामुळे झाडाची फांदी मोडली तर पानं, लाकूड जसंच्या तसं राहतं.

ALASKA, PURMAFROST

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अलास्कातली पर्माफ्रॉस्ट अवस्था

मागची कित्येक वर्षं अलास्का पर्माफ्रॉस्ट अवस्थेत आहे. जमिनीच्या आत कित्येक फूट खोल तुम्हाला उणे तापमान लागेल. थंडीमुळे इथली जमीन घट्ट आहे. खोदकाम जवळजवळ अशक्य.

पण, येत्या काही वर्षांत अलास्काचं तापमान बदलेल अशी भीती जाणकार व्यक्त करत आहेत. अलास्कातल्या जियोफिजिकल संस्थेचे एक शास्त्रज्ञ ब्लादिमीर रोमानोवस्की या विषयी अभ्यास करत आहेत. त्यांनी काही पुरावेही सादर केले आहेत.

रोमानोवस्की यांच्या संस्थेनं अलास्कातल्या जमिनीच्या आत यंत्रं बसवली आहेत. आणि त्यानुसार मांडलेल्या निष्कर्षानुसार, जमिनीच्या खालचं तापमानही वाढतंय.

ALASKA, PURMAFROST

फोटो स्रोत, ANTHONY RHOADS

फोटो कॅप्शन, जिओफिजिकल इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ रोमानोवस्की

रोमानोवस्की यांनी अलीकडेच यंत्रांनी मोजलेल्या तापमानाचा आढावा घेतला तेव्हा जमिनीवर वाढत असलेल्या तापमानाचा परिणाम जमिनीखालीही दिसत असल्याचं त्यांना आढळलं.

मागच्या काही वर्षांत अलास्काचं तापमान एक अंश वाढलं आहे. अलास्काच्या तापमान वाढीने धोक्याची घंटाही वाजली आहे.

इथली घट्ट जमीन हळूहळू भुसभुशीत होत आहे. त्यामुळे रस्ते तसंच पेट्रोल, पाणी आणि तेल वाहून नेणाऱ्या पाईपलाईन फुटत आहेत.

ALSKA, PURMAFROST

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पर्माफ्रॉस्ट अवस्था कधी बदलते

रोमानोवस्की यांच्या म्हणण्यनुसार, कुठल्याही भागात अचानक तापमान सहा अंश सेल्सिअस पेक्षा कमी झालं तर तिथल्या भौगोलिक परिस्थितीत फारसा फरक पडत नाही.

पर्माफ्रॉस्ट अवस्था का बदलली?

पण, बर्फाळ प्रदेशात उणे तापमानापेक्षा जरासं जरी तापमान खाली गेलं तर तिथली परिस्थिती बदलते आहे याचे संकेत मिळतात.

उन्हाळ्यात अलास्का भागात जमिनीच्या वरचं बर्फ थोड्याफार प्रमाणात वितळतं. पण, जमिनीच्या आत तापमान इतकी वर्षं कायम होतं.

आता परिस्थिती बदलते आहे. लवकरच इथं पर्माफ्रॉस्ट स्थिती बदलायला सुरूवात होईल असा रोमानोस्कींचा अंदाज आहे.

अलास्कामधून मिळणारे पर्यावरण विषयक संकेत नक्कीच शुभ नाहीत. कारण, तिथलं तापमान वाढलं तर हजारो लोकांना त्यांच्या राहत्या गावातून विस्थापित व्हावं लागेल.

इमारतींना तडे जातील. जमिनीच्या आत उभारलेलं पाईपलाईनचं जाळं विस्कटून जाईल.

याहून मोठा धोका रोमानोवस्की यांना दिसतो. 'सध्या तिथे झाडं किंवा पालापाचोळा सडत नाहीत. पण, तापमान वाढलं तर बर्फ वितळेल झाडं सडायला लागतील. आणि त्यातून हवेत कार्बन डाय ऑक्साईड वायूचं उत्सर्जन वाढेल. आणि परिणामी, जगाचंच तापमान वाढायला यातून हातभार लागेल.'

बदलत्या तापमानाचे परिणाम

तापमान वाढलं तर अलास्कातलं विमानतळ आणि इतर इमारतींनाही धोका पोहोचेल. भिंतींना तडे जातील.

ALASKA, SNOW. ROADS

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अलास्कामध्ये रस्त्याला पडू लागल्या भेगा

अलास्कातले एक इंजिनिअर जेफ करे यांनीही आपलं निरीक्षण मांडलं. 'रस्त्यांना भेगा पडण्याचं प्रमाण अलास्कात वाढीला लागलं आहे.

वायव्य भागात पाणी आणि सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या फुटत आहेत.'

तापमान वाढीचा सर्वाधिक फटका अलास्कामधल्या लहान खेड्यांन बसणार आहे. बर्फ वितळला तर या गावांना दुसरीकडे स्थलांतर करण्यावाचून पर्याय उरणार नाही.

त्यांच्या पुनर्वसनाचा खर्च प्रशासनाला उचलावा लागेल. शिवाय ज्या नवीन जागी ही गावं वसवली जातील, ती ठिकाणं तापमान बदलापासून कशावरून सुरक्षित असतील?

तापमान वाढीचा सर्वंकष विचार करून आगामी काळात त्याचा सामना करण्यासाठी अमेरिकन सरकारा आतापासून प्रयत्न करावे लागणार आहेत.

ALASKA, SNOW. ROADS

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तापमान वाढीचा फटका अलास्कातल्या गावांना

अमेरिकेतल्या भूगर्भशास्त्र विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, पुढच्या दहा वर्षांत अलास्कातल्या अनेक गावांना विस्थापित व्हावं लागणार आहे.

गावंच्या गावं होणार विस्थापित

300 लोकवस्ती असलेल्या गावांच्या पुनर्वनाचा खर्च जवळजवळ वीस कोटी अमेरिकन डॉलर इतका आहे. नवीन वसवलेली वस्ती पुन्हा विस्थापित होण्याचा धोका आहेच.

रोमानोवस्की यांनी दिलेली आकडेवारी चक्रावून टाकणारी आहे. '70 गावांची यादी तयार आहे ज्यांना नवीन जागी स्थलांतर करावंच लागेल.

पण, नवीन ठिकाणी ही गावं 25-30 वर्षं राहू शकतील याची खात्री कुणीही देऊ शकत नाही.'

सरकारी अधिकारी विल्यम श्नाबेल यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला आहे. 'नवीन शहरं वसवणं सोपं नाही आहे. तिथेही पर्माफ्रॉस्टचा धोका असणारच.

रस्ते, इमारती, वीज यावर पैसा खर्च होणार. शिवाय नवीन गाव वसवण्यासाठी झाडं नष्ट करावी लागणार. म्हणजे पुन्हा निसर्गाची हानी. तापमान आणखी वाढणार'

ALASKA, PURMAFROST

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ...तर अर्ध्याच्या वर बर्फ वितळेल

अलास्कामध्ये जमिनीवरचं तापमान दोन अंशांनी जरी वाढलं तरी निम्मा बर्फ वितळेल. जमीन भुसभुशीत होईल. बॅक्टेरिया सक्रिय होतील. त्यामुळे कार्बन वायू हवेत मिसळायचं प्रमाण वाढेल.

अलास्कावर काय होईल परिणाम?

हवेत विषारी वायू मिसळतील. महत्त्वाचं म्हणजे तापमान आणखी वाढेल. रोमनोवस्की यांच्या म्हणण्यानुसार, 2100 पर्यंत अलास्कामध्ये जमिनीच्या आत पाच मीटरपर्यंत तापमान वाढलेलं असेल. आतापर्यंत दबलेला कार्बन त्यामुळे बाहेर येईल. हवेत कार्बन डाय ऑक्साईड आणि मिथेन वायू मिसळेल.

जाणकारांच्या मते, आतापासून 5 कोटी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीचं तापमान अचानक वाढलं होतं, तेव्हा कार्बन डाय ऑक्साईड वायूचं उत्सर्जन हे त्या मागचं मोठं कारण होतं.

अलास्कामध्येही कार्बन उत्सर्जन वाढलं तर परिस्थिती तिप्पट वाईट होईल.

ALASKA, PERMAFROST

फोटो स्रोत, ANTHONY RHOADES

फोटो कॅप्शन, पर्माफ्रॉस्ट प्रयोगशाळा नेमकं काय करते?

पर्माफ्रॉस्टमुळे मनुष्य जीवनच धोक्यात येणार आहे. तापमान वाढ झाली तर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, पुन्हा पूर्ववत करण्यासाठी एका मनुष्य पिढी इतका वेळ लागेल. त्यामुळे तापमान वाढ रोखणं हा एकमेव उपाय त्यासाठी आहे.

आपल्यावर काय परिणाम होईल?

एकट्या पॅरिस करारातल्या अटींमुळे ते साध्य होणार नाही. तापमान वाढीचा थेट परिणाम मानव जातीवरही होणार आहे.

डेनाली नॅशनल पार्कमध्ये काम करणाऱ्या एना मूअर यांनी एक रंजक गोष्ट सांगितली. 'अलास्का भागात आढळणारे विशिष्ट प्रकारचे ससे इथल्या हवामानाप्रमाणे रंग बदलतात. पूर्वी बर्फात त्यांचा रंग सफेद असायचा आणि उन्हाळ्यात तो भूरा व्हायचा. पण, आता तसं दिसत नाही.'

ALASKA, PERMAFROST

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सशांचा रंगही बदलला

तापमान वाढीचा परिणाम वन्यजीवांवर होतो आहे हे स्पष्टच आहे. पण, या परिणामांपासून त्याचं रक्षण करण्यासाठी कुणी प्रयत्न करताना दिसत नाही.

अलास्का आणि एकूणच अमेरिकेतले लोक आता तापवान वाढीबद्दल सजग झाले आहेत. पण, जेव्हा जग या गोष्टीचा विचार करेल तेव्हाच परिणाम दिसेल.

कारण, आता जे अलास्काला भोगावं लागत आहे, तेच उद्या तुमच्याबाबतीत होणार आहे.

(बीबीसी फ्युचरच्या प्रतिनिधी सारा गॉदर्जी यांच्या वृत्तलेखाचा संपादित अंश)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)