पृथ्वीचा श्वास कोंडला; हवेतील कार्बन डायऑक्साईडमध्ये उच्चांकी वाढ

फोटो स्रोत, SteveAllenPhoto
- Author, मॅट मॅकग्रा
- Role, पर्यावरण प्रतिनिधी
पृथ्वीच्या हवामानात कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणानं 2016मध्ये आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली आहे, अशी माहिती जागतिक हवामान संघटनेनं (वर्ल्ड मेटोरॉलॉजिक आर्गनायझेशन म्हणजेच WMO) दिली आहे.
गेल्या वर्षी झालेली वाढ ही गेल्या 10 वर्षांमधली सरासरीच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, असंही WMOनं म्हटलं आहे.
वेगवेगळ्या प्रकारचा मानवी हस्तक्षेप आणि त्या जोडीनं अल निनोचा परिणाम यामुळे कार्बन डायऑक्साईडच्या पातळीत 2016मध्ये 8 लाख वर्षांत झाली नाही एवढी वाढ झाली, असं संशोधकांनी म्हटलं आहे.
जागतिक पातळीवर तापमान नियंत्रणासाठीचं उद्दिष्ट गाठणं यामुळे कठीण बनल असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.
WMOनं या वर्षीचं ग्रीनहाऊस बुलेटिन प्रसिद्ध केलं असून 51 देशांतून घेतलेल्या आकडेवारीचा यात समावेश करण्यात आला आहे.
तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड यांचा अभ्यास यात करण्यात आला आहे.
महासागर आणि बायोस्फीअर अशा 'सिंक'ने शोषून घेतल्यानंतर पर्यावरणात जे उरलं आहे, त्याची दखल या अभ्यासात घेतली आहे.
2016 मधील कार्बन डायऑक्साईडचं हवेतलं प्रमाण 403.3 पार्ट्स पर मिलियन (पीपीएम) इतकं होतं. हे प्रमाण 2015ला 400 पीपीएम इतकं होतं.
WMOच्या ग्लोबल अॅटमॉस्फीअर वॉच प्रोग्रॅमचे प्रमुख डॉ. ओक्साना तारसोवा यांनी बीबीसी न्यूजशी बोलताना सांगतिलं, "या नेटवर्कची स्थापना झाल्यापासून गेल्या 30 वर्षांत झालेली ही सर्वांत मोठी वाढ आहे."

1997-1998 साली अल निनोच्या काळात झालेली वाढ ही सर्वाधिक म्हणजे 2.7 पीपीएम इतकी होती. आताची वाढ 3.3 पीपीएम इतकी आहे. गेल्या 10 वर्षांत सरासरीच्या 50 टक्क्यांपेक्षा ही वाढ जास्त आहे, असं त्यांनी सांगितलं.
अल निनोचाही वाटा
अल निनो हवामानातील कार्बनवर प्रभाव टाकतो. अल निनोमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे वनस्पतींकडून शोषल्या जाणाऱ्या कार्बन डायऑक्साईडवरही त्याचा परिणाम होतो.
मानवी हस्तक्षेपांमुळे होणारं उत्सर्जन कमी होत असल्याचं काही अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. पण, तारसोवा यांच्यानुसार हवामानात असलेला एकूण कार्बन डायऑक्साईड जास्त महत्त्वाचा आहे, कारण तो वातावरणाच्या वरच्या भागात आणि बरीच वर्षं सक्रीय असतो.
हिमयुगाच्या अखेरीस वातावरणात जितका कार्बन डायऑक्साईड होता त्याची तुलना करता गेल्या 70 वर्षांत वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 100 पटीनं वाढलं आहे.
हवामानातील कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे पृथ्वीच्या हवामानात अंदाजही व्यक्त करता येणार नाहीत, असे बदल संभवण्याची शक्यता आहे. त्यामुळं तीव्र स्वरूपाचे पर्यावरणीय आणि आर्थिक अडथळे निर्माण होऊ शकतात, असं या अभ्यासात म्हटलं आहे.
तसंच 1990पासून रेडिओअॅटिव्ह फोर्सिंगमध्ये 40 टक्के वाढ झाली आहे. सर्वप्रकारच्या ग्रीनहाऊस गॅसेसचा परिणाम म्हणून तापमान वाढलं आहे. तारसोवा म्हणतात, जीऑलॉजिक्समध्ये सांगायचं झालं तर हे मोठ्या प्रमाणात उष्णता हवामानात सोडण्यासारखं आहे.
असे मोठे बदल होण्यासाठी आता 10,000 वर्षं लागणार नाहीत, हे बदल अधिक वेगानं होतील आणि अशा परिस्थितीत 'सिस्टीम'ची आपल्याला माहिती नाही. हेच काळजी करण्यासारखं आहे, असं त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, ANTHONY DUBBER
तज्ज्ञांच्या मतांनुसार, पृथ्वीनं अशा प्रकारे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 30 ते 50 लाख वर्षांपूर्वी अनुभवलं होतं. त्यावेळी हवामान 2-3 अंशानं जास्त ऊबदार होतं आणि ग्रीनलॅंड, पश्चिम अंटार्क्टिकमधील बर्फ वितळल्यानं समुद्राची पातळी 10 ते 20 मीटरनी जास्त होती.
हवामानावर काम करणारे इतर तज्ज्ञ WMO चे हे निष्कर्ष काळजी करण्यासारखे असल्याचं मान्य करतात.
2015 ते 2016 या कालावधीत कार्बन डायऑक्साईडमध्ये झालेली 3 पीपीएम वाढ ही फारच जास्त म्हणजे 1990-2000 या कालावधीत झालेल्या वाढीच्या दुप्पट आहे, असं मत रॉयल हॉलोवे युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधील प्राध्यापक युआन निस्बेट यांनी बीबीसी न्यूजशी बोलताना म्हटलं.
आपण तातडीनं पॅरिस करार अंगीकारला पाहिजे आणि जीवाश्म इंधनांचा त्याग केला पाहिजे. आपण अपारंपरिक उर्जासाधनांचा वापर सुरू केलेला असला तरी हवेत त्याचा परिणाम परावर्तित होताना दिसत नाही.
मिथेनची स्थिती काळजी करण्यासारखी
दुसरा काळजीचा विषय म्हणजे हवामानात वाढणारं मिथेनचं प्रमाण होय. मिथेनची हवामनातील वाढसुद्धा गेल्या दहा वर्षांच्या सरासरीपेक्षा जास्त आहे.
प्रा. मिस्बेट म्हणाले, "मिथेनमुळे तापमान वाढतं आणि त्यामुळे पुन्हा नैसर्गिक साधनांपासून अधिक मिथेन उत्सर्जित होतो, हे एक दुष्टचक्र असतं."

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "उष्ण आणि समशितोष्ण कटिबंधीय प्रदेशांत ही वाढ जास्त आहे. मिथेनमधील कार्बन आयसोटोपचा अभ्यास केला असता ही वाढ जीवाश्म इंधनामुळे होत नसल्याचं लक्षात येतं."
ते म्हणाले, "मिथेन नेमकं का वाढत आहे, ते समजत नाही. हवामानातील बदलाचा हा फीडबॅक असेल. नक्कीच काळजी करण्यासारखा हा विषय आहे."
हवामानासंदर्भातील या नव्या आकड्यांचा पॅरिस कराराने ठरवलेल्या उद्दिष्टांवर नकारात्मक परिणाम होईल, असं तज्ज्ञांना वाटतं.
"आकडे खोटे बोलत नाहीत. आपण आताही फारच जास्त उत्सर्जन करत आहोत आणि हे बदललं पाहिजे," असं यूएन एन्व्हायरन्मेंटचे प्रमुख एरिक सोल्हीम यांनी म्हटलं आहे.
परिस्थितीचं गांभीर्य नव्यानं समजून घ्यायची गरज
"या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपल्याकडे बरेच उपाय आहेत. पण आपल्याला खरी गरज आहे, ती जागतिक राजकीय इच्छाशक्तीची आणि परिस्थितीचं गांभीर्य नव्यानं समजून घेण्याची." असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, WMO
बॉन येथे होत असलेल्या यूएनच्या हवामान बदल परिषदेच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेला या करारातून बाहेर काढण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी या परिषदेत पॅरिस कराराच्या अटी आणि नियम ठरणं अपेक्षित आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








