BBC Innovators : रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी असा सोडवला हिमालयातला पाणीप्रश्न

सोनम वांगचुक

फोटो स्रोत, Rolex/ Stefan Walker

फोटो कॅप्शन, सोनम वांगचुक
    • Author, शिवानी कोहोक
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
line

आपल्या अभिनव कल्पनांद्वारे भारताच्या दुर्गम भागांमध्ये पाणी आणि विजेचे प्रश्न सोडवणाऱ्या सोनम वांगचुक यांना यंदाचा रमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्यासह गरिब आणि बेघर झालेल्या मनोरुग्णांसाठी काम करणारे भारत वातवानी यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्याशिवाय, कंबोडियाचे युक चांग, पूर्व टिमोरच्या मारिया डे लूर्डस मार्टिन्स क्रूझ, विएतनामच्या व्हो थी ह्वांग येन आणि फिलिपिन्सचे होवार्ड डी यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

line

लडाख म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते उंच उंच पर्वत, सर्वत्र बर्फ आणि चिक्कार थंडी. पण इथं पाण्याची मोठी समस्या आहे. आणि त्यावरचं हे समाधान सुद्धा तितकंच मोठं.

समुद्रसपाटीपासून 11,000 फूट वर, जगातल्या सर्वांत थंड ठिकाणी ही मध्यरात्रीची वेळ आहे. थंडीत इथलं तापमान -30 डिग्री सेल्सियस पर्यंत जातं.

10 कार्यकर्त्यांची टीम इथं जमणार आहे. लडाखच्या या परिसरातील जलसंकटाशी सामना करण्यासाठी हे कार्यकर्ते उपाययोजना करत आहेत.

आणि त्यांचा या जलसंकटावर उपाय - एक कृत्रिम हिमनदी बनवणं.

ही हिमनदी वर्षाच्या सुरुवातीला विरघळेल आणि त्यामुळे शेती आणि गावांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण होईल, असा विश्वास या कार्यकर्त्यांना आहे.

इंजिनअर सोनम वांगचुक यांची ही कल्पना आहे.

लडाखमध्ये जन्मलेले वांगचुक यांनी इथल्या लोकांच्या पाण्यांचा प्रश्न सोडवण्यासाठीचा उपाय शोधण्यासाठी अनेक वर्षं काम केलं आहे.

व्हीडिओ कॅप्शन, मानवनिर्मित हिमनदीनं २०१३ पासून तीन दशलक्ष लिटर पाणी पुरवलं आहे.

ते म्हणतात, "स्थानिक समस्यांचं उत्तर न्यूयॉर्क किंवा नवी दिल्लीत बसून शोधतो. पण असे उपाय डोंगराळ भागात काम करणार नाहीत. मला असं वाटतं की डोंगरात राहणाऱ्या लोकांनी स्वतःच या समस्यांची उत्तरं शोधावी लागतील."

लडाखमधील ग्रामस्थांना फार कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो.

थंडीच्या दिवसांत इथले मार्ग बंद होतात आणि देशाच्या इतर भागांशी लडाखचा संपर्क तुटतो.

वांगचुक म्हणतात, "पर्यावरण बदलामुळं इथल्या समस्यांत अधिकच भर पडत आहे. जागतिक तापमानवाढीमुळं हिंदुकुश हिमालयातील हवेतील पाण्याचं संतुलन बिघडत चाललं आहे."

ते म्हणाले, "आपण जसं जसं अधिक उंचीवर जाऊ तसं तसं तिथल्या हिमनद्या घटत असल्याचं लक्षात येतं. वसंत ऋतूमध्ये इथं पाण्याचं दुर्भिक्ष असतं तर उन्हाळ्यात मात्र पूर आलेला असतो. लडाखमधील पाण्याचे प्रवाह अनियमित झाले आहेत."

line

लडाख

  • समुद्रसपाटीपासून 2700 मीटर ते 4000 मीटरवरील एक दुर्गम गाव
  • लोकसंख्या 300,000
  • थंडीच्या दिवसांतील तापमान -30 डिग्री सेल्सियस

वांगचुक लडाखमधील त्यांचे सहकारी इंजिनिअर चेवांग नॉरफेल यांच्या कामानं प्रभावित होते. नॉरफेल यांनी 4000 मीटर (13,123 फूट) आणि त्याहून अधिक उंचीवर कृत्रिम हिमनद्या बनवल्या होत्या. पण गावकऱ्यांना इतक्या उंचीवर जायचं नव्हतं.

वांगचुक म्हणतात एका पुलावरून जात असताना त्यांना ही कल्पना सुचली.

लडाख

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लडाखमध्ये ग्रामस्थांना डोंगररांगातल्या बर्फातून विरघळणाऱ्या पाण्यावर अवलंबून रहावं लागत.

"त्या पुलाच्या खाली बर्फ साठलं होतो. हे ठिकाण 3000 मीटरवर होतं. या परिसरातील सर्वांत कमी उंचीवरील आणि सर्वात उष्ण ठिकाण हेचं होतं," ते म्हणाले.

"हा मे महिना होता. थेट सूर्यप्रकाश पडला तर बर्फ विरघळतो. पण जर या बर्फाचं सूर्यप्रकाशापासून संरक्षण करता आलं तर फेई गावात आपल्याला बर्फ साठवून ठेवता येईल, असा विचार माझ्या मनात आला."

त्यानंतर वांगचुक आणि सेकमॉल अल्टरनेटिव्ह स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बर्फाच्या स्तूपाचे नमुने तयार करण्यास सुरुवात केली.

कसं बनतं बर्फाचं स्तूप?

बर्फाचं स्तूप बनवण्याची पद्धत सोपी आहे. सुरुवातीला पाईप जमिनीत खोलवर पुरली जाते. त्यातून बर्फाच्या पाण्याला जमिनीच्या खालच्या थरात नेलं जातं.

पाईपचं शेवटचं टोक उभं केलं जातं. उंची आणि गुरुत्वाकर्षणामधील फरकामुळे या पाईपमध्ये दाब निर्माण होतो.

बर्फाचा स्तूप

फोटो स्रोत, Sonam Wangchuk

फोटो कॅप्शन, कारंजासारख बाहेर पडणारं पाणी बर्फाच्या स्तूपाची निर्मिती करते.

यामुळं वाहणारं पाणी कारंजासारखं वर उडतं. पण तापमान शून्याखाली असल्यानं हे पाणी गोठू लागतं. हळूहळू याला पिरॅमिडसारखा आकार येतो.

"थंडीच्या दिवसांत जे पाणी वाया जाते, त्याचा आम्ही उपयोग करतो. भूमितीय आकारामुळं ते वसंत ऋतूच्या अखेरपर्यंत विरघळत नाही," असं वांगचुक म्हणाले.

वसंत ऋतूच्या शेवटच्या दिवसांमध्ये ही कृत्रिम हिमनदी विरघळण्यास सुरुवात होते. मग हे पाणी शेतीसाठी वापरलं जातं.

"याचा आकार तिबेटमधील स्तूपांसारखा असल्यानं स्थानिक लोकांना याबद्दल आपलुकीची भावना असते," असं ते म्हणाले.

बर्फाच्या या स्तूपाच्या सुरुवातीच्या यशानंतर फेयांग मठानं यात रस घेतला आणि या टीमला असे 20 स्तूप निर्माण करण्यासाठी सांगितलं. लोकांकडून 1,25,200 डॉलर इतका निधीही जमा झाला.

बर्फाच्या स्तूपाचे नियोजन करताना टीम

फोटो स्रोत, Rolex/ Stefan Walker

फोटो कॅप्शन, वसंत ऋतूनंतर या बर्फाच्या स्तूपातून पाणी विरघळू लागते. त्याचा उपयोग ग्रामस्थांना होतो

या निधीमधून 2.3 किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात आली. त्यातून खालच्या गावांपर्यंत पाणी नेण्यात आलं आहे. वागंचुक यांचा दावा आहे की ही पाईपलाईन खोऱ्यातील 50 बर्फांच्या स्तूपांना आधारभूत ठरेल.

वांगचुक सध्या स्वित्झर्लंडमधील सेंट मॉरिटझमध्ये बर्फाचा स्तूप बनवण्यासाठी मदत करत आहेत. स्वित्झर्लंडच्या वरच्या भागातील पर्वतराजींमध्ये हिमनद्या विरघळत आहेत.

सुरुवातीचे नमुने निर्माण करून त्याची चाचणी घेतल्यानंतर हा प्रकल्प इथल्या भागातही राबवला जावा, असं तिथल्या लोकांना वाटतं.

बर्फाचा स्तूप

फोटो स्रोत, Sonam Wangchuk

वांगचुक सांगतात, "बर्फाचं स्तूप बनवण्याच्या तंत्रज्ञानाच्या बदल्यात स्वित्झर्लंड त्यांचं पर्यटन क्षेत्रातील कसब फयांगमधील लोकांना शिकवतील. त्याचा लाभ या गावच्या अर्थव्यवस्थेला होईल."

सिक्कीममधील लोनार्क हिमनदीत बनवण्यात आलेल्या कृत्रिम तलावाचा स्तर कमी करण्यासाठी वांगचुक सध्या सिक्कीम सरकारसोबतही काम करत आहेत.

वांगचुक आशावादी आहेत. ते म्हणतात, "विद्यापीठांच्या माध्यमातून आम्हाला युवकांना याबद्दल मार्गदर्शन करायचं आहे. बर्फ आणि हिमनदी यांच्याशी संबंधित उद्यमींची एक पिढीच उभी राहील."

(या प्रकल्पाला बिल आणि मिलिंडा गेट्स फाऊंडेशनने पुरस्कृत केलं होतं.)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)