Heat Wave: पुणे ते नागपूर, महाराष्ट्रात उष्णतेची लाट का आलीये?

फोटो स्रोत, BBC/Surabhi Shirpurkar
- Author, हलिमाबी कुरेशी आणि सुरभी शिरपूरकर
- Role, बीबीसी मराठीसाठी पुणे आणि नागपूरहून
दरवर्षी एप्रिल-मे महिने लागले की चर्चांपासून वृत्तपत्रांच्या हेडलाइन्सपर्यंत तापमानाचा आकडा हा सर्वत्र चर्चेचा विषय असतो. यंदा तर देशात राजकीय गरमागरमी सुरू असतानाच लोकांना निसर्गाचे चटके बसत आहेत.
एकेकाळी ब्रिटिशांनी 'थंड हवेचं ठिकाण' म्हणून घोषित केलेल्या पुणे शहराच तापमान 28 एप्रिल रोजी 43 अंश सेल्सिअस नोंदवल गेलं. तुलनेने थंड असलेलं नाशिकही मागच्या आठवड्यात 42.7 अंश सेल्सिअस वर पोहोचलं होतं.
दुसऱ्या टोकाला गेलंत की विदर्भ आणि उन्हाळा हे शब्द अगदी समानार्थी असल्यासारखे वापरले जातात.
यावर्षीही विदर्भात तीव्र उन्हाळा आहे. त्यातल्या त्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट किंवा हीट वेव्ह वगैरे आलीये म्हणे, म्हणजे पारा आणखीनच वाढू लागला आहे.
आधी पंख्याने भागणाऱ्या पुण्यात आता कूलरची गरज भासू लागली आहे, आणि जिथे कूलरमध्येच अख्खा उन्हाळा निघून जायचा त्या नागपुरात आता एसीशिवाय राहणं असह्य झालं आहे. वातावरणातला हा गोंधळ कशामुळे? नेमकं चाललंय तरी काय हे?
उष्णतेची लाट म्हणजे काय?
उष्णतेची लाट साधारण मार्च महिन्याच्या सुरुवातीला येते आणि जून महिन्यापर्यंत असते. जेव्हा एखाद्या प्रदेशातलं तापमान सामान्य तापमानापेक्षा 4.5 डिग्रीने जास्त असतं, तेव्हा तिथे उष्णतेची लाट आल्याचं म्हणतात.
नागपूर प्रादेशिक वेधशाळेतील वैज्ञानिक अरुण गोडे सांगतात की जर मैदानी भागात कमाल तापमान 40 अंशापेक्षा जास्त असेल, किनारी भागात 37 अंशापेक्षा जास्त असेल आणि डोंगराळ भागात कमाल तापमान 30 अंशापेक्षा असेल तर उष्णतेची लाट आहे, असं समजलं जातं.
"एखाद्या भागात तापमान 45 अंशापेक्षा जास्त असेल तर 'उष्णतेची लाट' आणि 47 अंशापेक्षा जास्त असल्यास उष्णतेची 'तीव्र लाट' असल्याचं जाहीर करण्यात येतं. सलग दोन दिवस ही परिस्थिती असल्यास उष्णतेची लाट असल्याचं दुसऱ्या दिवशी जाहीर केलं जातं," त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, BBC/Surabhi Shirpurkar
लाट कशी असते, हे सामान्य व्यक्तीला समजण्यासाठी तीन रंगांचा वापर केला जातो. पिवळा रंग म्हणजे 'लक्षवेधी' इशारा, नारंगी रंग म्हणजे 'सतर्कतेचा' इशारा आणि लाल रंग म्हणजे लोकांसाठी दक्षता घेण्याचा इशारा आणि प्रशासनाने योग्य ती पावलं उचलण्याचा इशारा असतो, असंही गोडे पुढे सांगतात.
पुणे एकेकाळची 'नो फॅन' सिटी
30 एप्रिल 1897 रोजी पुण्याचं तापमान 43.3 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं होतं. त्यामुळे गेल्या आठवड्यातील तापमान गेल्या 122 वर्षांतील सर्वोच्च तापमानाच्या जवळ जाणारं होतं. भारतीय हवामान खात्याचे माजी संचालक रंजन केळकर यांच्यानुसार पुणे शहराचा बदललेला 'विंड पॅटर्न' (वारे वाहण्याच्या दिशांचा पॅटर्न) याला कारणीभूत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"पूर्वी पुण्यात इतकी वनसंपदा होती की वृक्ष राजीतून घरं डोकावताना दिसायची. ब्रिटिशांनी तर पुण्याला 'नो फॅन सिटी' जाहीर केलं होत," असं पर्यावरण अभ्यासक आणि ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ एस. डी. महाजन सांगतात.
काळानुसार शहर अमर्याद वाढलं. आताची लोकसंख्या 40 लाखांवर पोहोचली आहे. वाहनांची वाढती संख्या आणि कार्बन डायऑक्साइडचं उत्सर्जन, यामुळे पुण्यातलं तापमान वाढत असल्याचं महाजन सांगतात.
ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम?
तापमानातली वाढ-घट आणि वातावरणाची एकंदरच स्थिती ही वाऱ्यांच्या दिशांवरून ठरते. उत्तरेकडून वारे वाहू लागले तेव्हा तापमान थंड असतं.
"वारे जर राजस्थानच्या वाळवंटाकडून आले तर ते कोरडे आणि उष्ण असतात, त्यामुळे तापमानात वाढ होते. जर बंगालच्या उपसागराकडून वारे आले तर वातावरण दमट होतं, त्यामुळे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो. त्यामुळे सध्याची तापमान वाढ ही ग्लोबल वॉर्मिंगचा परिपाक नसून लोकल विंड पॅटर्न बदलण्याचा परिणाम आहे," असं रंजन केळकर सांगतात.
पण जागतिक तापमानवाढीचा विदर्भातल्या हीट वेव्हवर नक्की काय परिणाम झाला, हे स्पष्ट नसल्याचं गोडे सांगतात.
"जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीच्या तापमानात एक डिग्रीने वाढ झाली असली तरी विदर्भात उष्णतेची लाट अनंत काळापासून आहे. त्यामुळे या उष्णतेच्या लाटेचा जागतिक तापमान वाढीशी तसा थेट संबंध नाही," असं हवामान विभागातील वैज्ञानिक जे. आर. प्रसाद यांनी सांगितलं.
उष्णतेच्या लाटेचा लोकांवर काय परिणाम?
उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. अस्थमा, हृदयरोग, रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांना उष्माघाताचा जोरदार फटका बसू शकतो. दम्याच्या रुग्णांची वाढण्याची शक्यताही असते.
उष्णतेच्या लाटेचा अवधी दहा ते पंधरा दिवसांपेक्षा जास्त असेल तर झाडांनाही पाणी मिळत नाही आणि त्यामुळे झाडं नष्ट होण्याची शक्यता बळावते.
'देशी वृक्ष कुलंटचं काम करतात'
पुण्यातले जैवविविधतेचे अभ्यासक डॉ सचिन पुणेकर हे जनजागृतीपर अनेक उपक्रम राबवतात. सततचे अतिक्रमण आणि टोलेजंग इमारतींमुळे उष्ण वाऱ्याला बाहेर जायला रस्ता राहत नाही. त्यामुळे शहराचं तापमान वाढत असल्याचं डॉ पुणेकर सांगतात.
"शहरात वृक्ष लागवड करताना देशी वृक्ष लागवड करण गरजेचं आहे. देशी स्थानिकवृक्ष हे भौगोलिक स्थितीनुसार उत्क्रांत झालेले असतात आणि हे वृक्ष कूलंट म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असतात," असं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
"आजकाल आगंतुक म्हणजेच एक्झॉटिक वनस्पतींचं प्रमाण आपल्या शहरांमध्ये वाढतंय. आपल्या सगळ्यांना आवडणारा गुलमोहर जरी आकर्षक वाटत असला तरी तो वृक्ष देशी नाही. त्याची फक्त फुलं आपल्याला उन्हाळ्यात दिसतात. त्याच बरोबर ग्लिरीसिडीया या वनस्पतीच्या वाढत्या प्रमाणामुळे उन्हाळयात आच्छादन उरत नाही नाही, कारण उन्हाळयात या वनस्पतीची पानगळ होऊन केवळ फांद्यांच्याच उरतात. उलट कडुनिंब, आंबा, चिंच, वड अशा देशी वृक्षांची उन्हाळयात मोठी सावली असते. त्यामुळे देशी वृक्ष लागवड खूप महत्त्वाची आहे," असंही डॉ पुणेकर सांगतात.
उष्णतेच्या लाटेपासून स्वतःला कसं वाचवाल?
पारा वाढतच असला तरी कामं काही थांबत नाही. मग अशात करायचं काय?
- उष्णतेची लाट असताना दुपारी 12 ते 4 या काळात घराच्या बाहेर जाणं टाळावं. अगदी अत्यावश्यक असल्यास घराबाहेर पडावं.
- निघताना गडद रंगाचे कपडे घालू नये. टोपी, गॉगल, रुमाल यांचा वापर करावा. कानाला गरम वारं लागणार नाही याची दक्षता घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.
- भरपूर पाणी प्या आणि सोबतही पुरेसं पाणी ठेवा.
- उन्हातून थेट कुलर किंवा एसीत जाणं टाळावं.
- रस्त्यावरचा फळांचा ज्यूस पिणं टाळावं.

फोटो स्रोत, BBC/Surabhi Shirpurkar
घराच्या छतावर शक्यतो फरशा बसवाव्यात. घराचा रंग पांढरा असेल तर उत्तम, कारण पांढऱ्या रंगावरून उष्णता मोठ्या प्रमाणात परावर्तित होते.
अधिकाधिक वृक्षारोपण करणे हा तापमानवाढ रोखण्याच्या, किंबहुना त्याची गती कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहेच.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








