कोरोनानंतरच्या पाच वर्षांमध्ये पुरुषांचा घर कामांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे का?

लॉकडाऊनला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं घेतलेला आढावा

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रियंका जगताप
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"आधी मला पीठ मळणं आणि पोळी करणं या गोष्टी येत नव्हत्या, त्या मी कोरोनाकाळात शिकलो. आता मी त्या चांगल्याप्रकारे पोळ्या करतो. अर्थात आता मला रोज पोळी करणं शक्य नसतं, परंतु माझ्या बायकोला जेव्हा त्याची गरज असते तेव्हा मी कंटाळा न करता ती जबाबदारी उचलतो," असं एचआर मॅनेजर म्हणून काम करणारे 32 वर्षांचे सुशील मोरे सांगतात.

कोरोनाकाळात पूर्णवेळ घरात राहिल्यामुळे घरातील कामांबाबत आपला दृष्टीकोन कसा बदलत गेला यावर ते बीबीसी मराठीशी बोलत होते. आधी घरकामात अजिबात हातभार न लावणाऱ्या सुशील मोरे यांना कोरोनाकाळापासून स्वत:मध्ये खूप बदल झालाय असं वाटतं.

भारतात कोविड -19 चा पहिला रुग्ण जानेवारी 2020 मध्ये आढळून आला होता. त्यानंतर मार्च महिन्यापासून कोरोनाच्या संसर्गात वेगानं वाढ व्हायला सुरुवात झाली तशी भारतात 22 मार्च 2020 ला जनता कर्फ्यू लावण्यात आला. परंतु या साथीच्या आजाराची परिस्थिती हाताबाहेर जायला लागली.

सरकारनं या कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 24 मार्च 2020 च्या मध्यरात्रीपासून भारतात लॉकडाऊनची घोषणा केली. पहिलं लॉकडाऊन 25 मार्च ते 14 एप्रिल असं 21 दिवसांचं होतं. अशाप्रकारे विविध टप्प्यांमध्ये सुमारे 68 दिवस भारतात लॉकडाऊनपर्व सुरू होतं.

या महामारीच्या काळात सगळ्यांना नाइलाजानं घरातच रहावं लागलं. लॉकडाऊनच्या सुरुवातीला बंद असलेल्या शाळा, कॉलेज, ऑफिस हे नंतर ऑनलाइन सुरू झाले. परंतु यामुळे घरातील महिलांवर कामाचा ताण अधिक वाढला होता.

घरगुती मदतनीस येऊ शकत नसल्यामुळे घरातील अनेक महिलांवर घर सांभाळणं आणि कुटुंबाची काळजी घेण्याशिवाय नोकरी देखील सांभाळावी लागली.

घरकाम, मुलांचं संगोपन आणि घरातील वयोवृद्धांची तसेच त्यावेळी आजारी पडलेल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेण्याचा भार प्रामुख्यानं घरातील बाई माणसांवरच पडला.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

परंतु या काळात अनेक घरांमधील पुरूषांनी देखील घरगुती कामांमध्ये हातभार लावला. घरातील कामांमध्ये शक्य होईल तेवढा वाटा उचलण्याचा प्रयत्न अनेकांनी केला.

मात्र हा बदल फक्त कोरोनाकाळापुरताच मर्यादित राहिला की कोरोनानंतर या पाच वर्षांत पुरूषांचा घरातील कामांकडे बघण्याचा दृष्टीकोन खरोखरंच बदलला?

याचाच आढावा पहिल्या लॉकडाऊनला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आपण या लेखातून घेणार आहोत.

'कोरोनाकाळानं घरकामाबाबत संवेदनशील बनवलं'

याबाबत सुशील मोरे सांगतात, "मुंबईमध्ये मी ज्या चाळीत राहतो तिथं आजही सकाळी उठल्यानंतर महिलाच पाणी भरायला जातात. कोरोना येण्याआधी माझ्याही घरात माझी आई सकाळी उठून पाणी भरायला जायची."

"परंतु कोरोना काळात घरी असल्यामुळे रोज सकाळी मला पाणी भरायला जावं लागायचं. तेव्हापासून आतापर्यंत मी स्वतःहून पाणी भरायचं काम करतो."

"खरंतर कोरोनाकाळात सुरुवातीला मी नाईलाजानं घरकाम करायला लागलो. मात्र, तेव्हापासून मला घरातील कामांची गोडी लागली. घरातील छोटी छोटी कामं करण्यासोबतच मुलांचा सांभाळ कसा करायचा हेही मी शिकलो."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

"लॉकडाऊनमध्ये सुरुवातीच्या काळात मी सकाळी झोपेतून उठण्याआधी माझ्या घरातील महिलांची बरीचशी कामं करून झालेली असायची."

"मग नंतर नंतर मी विचार करायचो की जर मी ही सकाळी त्यांच्यासोबत उठलो असतो तर काही कामं मी सुद्धा वाटून घेतली असती. त्यामुळे नंतर मी थोड्याफार प्रमाणात घरातील कामं वाटून घ्यायला सुरूवात केली."

त्यांच्या मते, लॉकडाऊनपूर्वी आम्ही पुरूष कधी पूर्ण वेळ घरात राहिलो नव्हतो. मात्र कोरोनाकाळात सगळ्यांनाच घरात राहावं लागलं. त्यामुळे 24 तासांत घरामध्ये काय काय करावं लागतं हे पुरूषांनी देखील अनुभवलं.

घरातील सगळ्या कामांसोबत ऑफिस आणि मुलं महिला कशा सांभाळतात हे आम्ही पुरूषांनी खुप चांगल्याप्रकारे पाहिलं.

कोरोनाकाळात घरात खुप जास्त वेळ घालवल्यानंतर कळलं की घरातलं कोणतंच काम हे महिलांचं किंवा पुरूषांचं नसतं तर ते दोघांचं असतं, असं सुशील यांना वाटतं.

ग्राफिक्स

तर सामाजिक क्षेत्रात काम करणारे 55 वर्षीय शरद बराटे यांचा याबाबतचा स्वतःचा अनुभव आणि आसपासच्या लोकांबाबतचं निरीक्षण पुरूषांच्या मानसिकतेचा अभ्यास करायला अजून जास्त मदत करतं.

ते सांगतात, "लॉकडाऊनपूर्वी आमच्या घरातील सर्व कामं मी आणि माझ्या पत्नीनं वाटून घेतली होती. मात्र तेव्हा मी त्या कामांबाबतीत अजिबात संवेदनशील नव्हतो.

परंतु कोरोनाकाळानं मला घरातील कामांबाबत खुप संवेदनशील बनवलं. त्यामुळे नंतर मी माझ्या घरातील सगळ्या महिलांना माझ्याकडून जास्तीत जास्त मदत कशी होईल याचा प्रयत्न करायलो लागलो.

आता माझ्या काही मित्रांनीही त्यांच्या घरात कोरोनाकाळानंतर अशाप्रकारे कामं करायची पद्धत सुरू केली आहे."

लॉकडाऊनला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं घेतलेला आढावा

फोटो स्रोत, Getty Images

त्यांच्या मते कोरोनाकाळानंतर काही पुरूषांच्या मानसिकतेत घरातील कामांबाबत सकारात्मक बदल झालाय. "मात्र हा बदल अधिक मोठ्या प्रमाणावर झालाय असं मी ठामपणे म्हणणार नाही. कारण माझे काही मित्र असेही आहेत ज्यांनी कोरोनाकाळानंतर त्यांच्या घरातील महिलांवरील कामाचा ताण अधिकच वाढवला आहे.

माझ्या स्वतःच्या निरिक्षणावरून मी हे नक्कीच सांगू शकतो की माझ्या ओळखीतले काही पुरूष हे घरातील कामांच्या बाबत अधिक संवेदनशील झालेत, तर काही अधिकच असंवेदनशील झालेत." असंही शरद बराटे पुढं सांगतात.

'मात्र काही लोकं खुप नावं ठेवतात'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तर सुशील मोरे सांगतात की मी घरात कामं करतो म्हणून ओळखीतले काही लोक हसतात, चेष्टा देखील करतात. त्याचा त्यांना सुरूवातीच्या काळात त्रास व्हायचा. ते सांगतात "काही लोकं खुप नावं ठेवतात. काय बायकांची कामं करतोय असं म्हणतात. आधी थोडं वेगळं वाटायचं पण आता लोकांच्या अशा बोलण्याचं काही वाटत नाही."

सुशील यांनाही त्यांच्या काही मित्रांमध्ये आणि शेजारी राहणाऱ्या पुरूषांमध्ये सकारात्मक बदल झालेला जाणवतो. ते सांगतात, "खरंतर कोरोना काळापासून माझे काही मित्र सुद्धा मला बदलेले दिसतात. जसं की माझे काही मित्र जेवल्यानंतर स्वतःचं ताटही उचलत नव्हते. आता ते ताट उचलायला लागलेत, ते धुवून ठेवायला लागलेत.

माझ्या ओळखीतले आणि माझ्या शेजारी राहणारे बरेच पुरूष आहेत ज्यांना मी कोरोनानंतर घरातील भांडी घासताना, कपडे धुताना, स्वयंपाक घरात काम करताना पाहतो. कोणाची बायको कामासाठी बाहेर गेली असेल तर मुलं सांभाळताना देखील पाहतो."

"माझे काही मित्र असेही आहेत जे म्हणतात की कोरोनाकाळात गरज म्हणून घरातील कामं केली पण आता नाही करू शकत. परंतु तरीही मी म्हणेन की कोरोनाकाळानंतर काही पुरूषांचा घरातील कामांकडे बघण्याचा जो पारंपारिक दृष्टीकोन होता त्यात बराच बदल झालाय." असंही पुढं सांगतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

तर पश्चिम महाराष्ट्रात राहणारे चाळीशीतले आनंद थोरात सांगतात की, लॉकडाऊनपूर्वी महिलांना घरकामात आणि घरातील लहान थोरांची काळजी घेण्यात पुरूषांनी मदत करायला हवी असं वाटायचं, मात्र कोरोनाकाळापासून त्यांना ही सगळी कामं म्हणजे मदत नसून जबाबदारी वाटायला लागली.

ते सांगतात, "लॉकडाऊनपूर्वी मी चहा करणं, पाणी गरम करणं यापेक्षा फार काही करायचो नाही. मात्र लॉकडाऊनमध्ये पुर्णवेळ घरात राहून मी इतर अनेक प्रकारची कामं करायला शिकलो. यामध्ये वॉशिंग मशीनला कपडे कसे लावायचे, बाजारातून कोणत्या आणि कशा भाज्या आणायच्या, त्या साफ कशा करून ठेवायच्या अशा प्रकारच्या कामातले सगळे बारकावे शिकून घेतले. ही सगळी कामं आधी मी बायकोला मदत म्हणून करायचो परंतु आता तीच कामं माझी जबाबदारी आहे असं समजून करतो."

आयुष्याच्या आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेल्या या पुरूषांनी कोरोनाकाळात त्यांच्यात झालेला हा बदल हा स्वीकारला आहे.

पुरूषांचे कुकींग क्लास घेणाऱ्या मेधा गोखले काय म्हणतात ?

पुण्यातील मेधा गोखले या गेल्या 20 वर्षांपासून पुरुषांसाठी कुकींग क्लास घेतात. या बदलत्या जगात महिलांप्रमाणे पुरुषांनाही चांगला स्वयंपाक करता यावा या हेतूनं त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.

त्या सांगतात,"आजपर्यंत 16 ते 78 वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील लोकांना मी शिकवलं आहे. कोरोनाकाळापूर्वी आणि आताही माझ्याकडे स्वयंपाक शिकायला येणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये फार काही फरक पडलेला नाही.

घरातील पुरुष महिलांसोबत घरकामात सहभागी झाल्याचा प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

मात्र कोरोनाकाळापासून माझ्याकडे स्वयंपाक शिकायला येणाऱ्या पुरूषांना आपणही घरकामात पत्नीला आणि आईला मदत करायला हवी असं खुप प्रकर्षानं वाटायला लागलं आहे.

परंतु लॉकडाऊन संपल्यानंतर सगळं जग पुन्हा सुरू झालं. तेव्हापासून जसं पुरूषांचं पुन्हा ऑफिसला जाणं सुरू झालं तसा घरकामातील त्यांचा सहभाग देखील कमी झाला हे ही नाकारून चालणार नाही."

'नवरा आधी सारखं त्याच्या हाताखाली करायला लावत नाही'

तर गेल्या आठ वर्षांपासून पुणे शहरातील अनेक घरांमध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या दिपाली भोसले सांगतात की, " मी गेल्या आठ वर्षांमध्ये अनेक घरी कामं केली आहेत. बरीच घरं अशी आहेत ज्यांच्याकडे मी कोरोना लॉकडाऊन येण्याआधी कामाला जायचे आणि आताही जाते."

"तिथं आधी मला फक्त त्या घरातील ताई किंवा काकूच सांगायच्या की आज घरात काय काम करायचंय आणि काय जेवण बनवायचंय. त्या घरी नसतील तर फोन करून सांगायच्या. पण आता त्याच घरांमधले दादा, काका सुद्धा मला त्या सगळ्या गोष्टी सांगतात."

घरातील पुरुष महिलांसोबत घरकामात सहभागी झाल्याचा प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

पुढं त्या सांगतात, "मला दिसतं की कोरोनाकाळाच्या आधी जे दादा त्यांच्या लहान मुलांना खाऊ घालायचे नाहीत, ते आता त्यांच्या लहान मुलांना खाऊ घालतात. ते त्यांच्या लहान मुलांचं शाळेचं दप्तर भरताना दिसतात. भाज्या निवडताना आणि घरातील पसारा आवरताना दिसतात."

"कधी कधी मला सुद्धा घरात स्वच्छता करताना मदत करु लागतात. माझा स्वतःचा नवरा मला कामात जरी मदत करत नसला तरी आता आधी सारखं मला त्याच्या हाताखाली करायला नाही लावत, त्याचं तो करतो कोरोनापासून. शिवाय मी जे जेवायला बनवील ते खातो. कधी मला नाही जमलं तर हातानी करून खातो. कोरोना आला आणि थोडं चांगलं करून पण गेला."

पुरुषांच्या घरकामातील सहभागात बदल

कोरोनाकाळादरम्यान आणि कोरोनाकाळानंतर महिलांचा घरगुती कामात किती वेळ जातो, त्यांच्यावर घरकामाचा किती भार पडतो तसेच घरातील पुरूषांचा त्यांना किती हातभार लागतो यावर संशोधन आणि अभ्यास झाला आहे.

अशोका विद्यापीठातल्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका अश्विनी देशपांडे यांनी डिसेंबर 2019 ते एप्रिल 2020 या काळातल्या डेटाचा अभ्यास केला होता.

'द कोव्हिड 19 पेंडॅमिक अँड लॉकडाऊनः फर्स्ट इफेक्ट ऑन जेंडर गॅप्स इन एम्प्लॉयमेंट अँड डोमेस्टीक वर्क इन इंडिया' हा अभ्यास त्यांनी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संस्थेनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे केला होता.

ग्राफिक्स

त्यांच्या निष्कर्षानुसार लॉकडाऊनच्या काळात भारतीय स्त्री आणि पुरूष दोघांनीही घरकामासाठी जास्त वेळ दिला. अर्थातच स्त्रियांनी पुरूषांपेक्षा जास्तच काम केलं. मात्र, घरकामासाठी स्त्रियांच्या तुलनेत पुरूषांनी आधीपेक्षा जास्त वेळ दिला.

प्रा. देशपांडे आपल्या विश्लेषणात लिहितात, "याचा अर्थ घरकामात खर्ची होणाऱ्या सरासरी वेळेतला जो स्त्री-पुरूष भेद होता, तो लॉकडाऊनच्या पहिल्या महिन्यात राष्ट्रीय पातळीवर आणि राज्यांच्या पातळीवरसुद्धा बऱ्यापैकी कमी झाला होता."

CMIE ने डिसेंबर 2019 मध्ये एकूण 43,600 जणांचा सर्व्हे केला होता. त्याच लोकांचा 2020 मध्ये लॉकडाऊन लागू झाल्यानंतरच्या पहिल्या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यातही सर्व्हे करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्याकडून मिळणाऱ्या उत्तरांची तुलना करून हा अभ्यास करण्यात आला होता.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

या सर्व्हेमध्ये सहभागी झालेले 63% लोक शहरी भागातले होते. तर 36.8% लोक ग्रामीण भागातले होते. 47% महिला होत्या तर 53% पुरूष होते. यात शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे आणि नोकरी करणारे मध्यमवर्गीय अशा सर्वांचाच समावेश होता.

डिसेंबर 2019 मध्ये ज्या लोकांचा सर्व्हे करण्यात आला होता त्याच लोकांना लॉकडाऊन लागू झाल्यानंतरच्या पहिल्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये सर्व्हे करण्यात आला. त्यामुळे त्यांच्याकडून मिळणाऱ्या उत्तरांची तुलना करणं शक्य झालं.

दिल्ली विद्यापीठाच्या शिवाजी कॉलेजमधील सुमन खरबंदा यांनी केलेल्या, 'डिव्हिजन ऑफ वर्क इन कोव्हिड टाइम्सः अ स्टडी ऑफ इंडियन मिडल क्लास फॅमिलीज्' या अभ्यासानुसार, पुरूषांचा घरातील कामांमधील सहभाग हा नक्कीच वाढला आहे. मात्र अजूनही घरातील कामांत स्त्री पुरूष समानता आली असं आपण म्हणू शकत नाही.

कारण कोरोनाकाळानंतर घरातील कामांचं ओझं हे पुरूषांच्या तुलनेत पुन्हा महिलांच्याच वाट्याला जास्त प्रमाणात आलं आहे.

पुरूषांचा घरातील कामांमध्ये वाढलेला सहभाग हा घरात लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करणं, कधी कधी घरातील स्वच्छता करणं अशा दररोज न कराव्या लागणाऱ्या कामांपुरताच मर्यादित राहिला आहे.

या अभ्यासात असंही म्हटलंय की, ज्या महामारीनं जगाला अनेक नाविन्य पूर्ण गोष्टी करण्याची आणि त्यांच्याशी जुळवून घेण्याची सक्ती केली, ती सुद्धा पितृसत्तेच्या खोलवर रुजलेल्या पायाला मात्र हादरवू शकली नाही.

या अभ्यासात एप्रिल आणि मे साल 2021 मध्ये शहरी भागातील मध्यम वर्गातील 100 व्यक्तींचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणात 73% पुरूष तर 27% महिलांनी सहभाग घेतला होता.

त्यांना लॉकडाऊनपूर्वी, लॉकडाऊन दरम्यान आणि लॉकडाऊन नंतर घरातील आठ कामांच्या वाटपाबाबत प्रश्न विचारण्यात आले होते.

यामध्ये झाडून काढणं, फरशी पुसणं, कचरा फेकणं, स्वयंपाक करणं, भांडी धुणं, कपडे धुणं, किराणा खरेदी करणं आणि मुलांच्या शाळेसंदर्भातील कामांवर देखरेख ठेवणं ही कामे होती.

'पुरुषमंडळी निदान घरातील कामांना कमी लेखत नाहीत'

कोरो म्हणजेच 'कमिटी ऑफ रिसोर्स ओर्गनायझेशन' या संस्थेमार्फत महाराष्ट्रभर स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या मुमताज शेख यांनीही या विषयाबाबत बीबीसी मराठीशी चर्चा केली.

त्या सांगतात, "कोरोना काळानं हे अधोरेखित केलं की घरातील कामं ही फक्त स्त्रियांचीच नसून घरात राहणार्‍या पुरुषांचीही असतात.

म्हणूनच आधी कधीच घरकाम न करणाऱ्या काही पुरुषांनी कोरोनाकाळापासून घरातील कामांत पुढाकार घेऊन काम करण्यास सुरुवात तर केली आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये काही प्रमाणात सकारात्मक बदल झालाय हे नक्की.

मी सामाजिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझं अनेक वस्त्यांमध्ये येणं जाणं असतं तिथं मला हा बदल जाणवतो.

तरीही कोरोनाकाळात काही पुरूषांना घरकाम करताना, मुलांना सांभाळताना पाहून मला वाटायचं की हे फक्त तेवढ्याच काळापुरतं मर्यादित राहिल. कारण तेव्हा जबाबदारी पडल्यामुळे नाइलाजानं त्यांना ते करावं लागत होतं.

मात्र आता माझ्या ओळखीतील अनेक पुरुष तेव्हापासून घरकाम ही माझीही जबाबदारी आहे असं समजून कामं करताना मला दिसतात. किमान स्वतःची कामं तरी स्वतःच करतात एवढा बदल तर नक्कीच झालाय."

घरातील पुरुष महिलांसोबत घरकामात सहभागी झाल्याचा प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

मात्र मुमताज यांच्या मते, हा बदल मोठ्या प्रमाणावर झालेला नाही. घरातील काम ही आपली सुद्धा जबाबदारी आहे असं अजूनही अनेक पुरुषांना वाटत नाही. एकत्र कुटुंबात तर हा बदल व्हायला अजून खुप जास्त वेळ लागणार असल्याचंही त्या म्हणतात.

"मात्र, 'तुम्ही दिवसभर घरात काय करता? घरात बसूनच तर असता.' अशी अपमानास्पद वाक्यं घरातील महिलांना ऐकवणं कोरोनाकाळानंतर कमी झालेलं आहे ही समाधानाची बाब म्हणता येईल.

शिवाय आता जरी अनेक पुरुषमंडळी घरात कामं करत नसली तरी निदान घरातील कामांना कमी लेखत नाहीत. माझ्या दृष्टीनं हे ही महत्त्वाचं आहे." असंही त्या सांगतात.

कोरोनाकाळानंतर पुरुषांचा घरकामातील सहभाग वाढला आहे का? वाढला तर त्याचं प्रमाण किती आहे ? शिवाय त्यांचा त्याबाबत बदलेला दृष्टीकोन यावर येणाऱ्या काळात अजून अभ्यास होणं गरजेचं आहे असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)