उद्धव ठाकरेंनी 'मविआ'त 100 पेक्षा कमी जागांवर लढणं हे त्यांच्या फायद्याचं की तोट्याचं?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत.
    • Author, विनायक होगाडे
    • Role, बीबीसी मराठी

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी '85-85-85' चा फॉर्म्यूला मान्य केला असल्याचं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.

याचा अर्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) प्रत्येकी किमान 85 जागा लढवणार असल्याचे निश्चित झालं आहे. यानुसार, महाविकास आघाडीतील 255 जागांचा तिढा सुटला असून उर्वरित 33 जागांपैकी 18 जागा या छोट्या मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत.

तर अद्यापही तिढा न सुटलेल्या 15 जागा आपापसात वाटून घेतल्या जातील, असं बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं आहे.

जर असं घडलं आणि असंच घडण्याची अधिक शक्यता निर्माण झालेली असताना शिवसेनेनं इतक्या कमी जागांवर लढणं हे महाविकास आघाडीमध्ये नेमकं कुणाच्या फायद्याचं आहे?

एकेकाळी 200 च्या वर जागा लढवणारी शिवसेना आता 100 च्या खाली जागांवर निवडणूक लढवणार आहे.

जागावाटपावरुन संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये धुसफूस झाल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आलं होतं. शिवाय, एकूणच जागांचा तिढा सुटण्यापूर्वी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट शंभर किंवा त्याहून अधिक जागा लढवेल, असा दावा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.

मात्र, अंतिम जागावाटपामध्ये उर्वरित 15 जागांपैकी शिवसेनेच्या वाट्याला आणखी 10 जागा येतील, असं गृहित धरलं तरी शिवसेनेच्या एकूण उमेवादारांची संख्या ही 95 च्या वर जात नाही.

या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरेंसाठी महाविकास आघाडीमध्ये 100 पेक्षा कमी जागांवर लढणं हे त्यांच्या फायद्याचं आहे की तोट्याचं, या गोष्टीचं विश्लेषण करणं यथार्थ ठरेल.

राजकीय गणितांचीही फेरमांडणी करणारी सर्वार्थाने 'वेगळी' निवडणूक

2022 साली शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि पक्षाची दोन शकलं झाली. सध्या विभाजित शिवसेनेचे 'एकनाथ शिंदे' आणि 'उद्धव ठाकरे' असे दोन गट एकमेकांविरोधातील आघाड्यांमध्ये लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचीही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळेच, 2024 ची महाराष्ट्र विधानसभेची ही निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरणार आहे.

तीन-तीन पक्षांच्या दोन मोठ्या आघाड्या, तिसरी आघाडी आणि मनसे, वंचित बहुजन आघाडीसारखे इतर अनेक पक्ष या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत आणि जागावाटपाचा गोंधळ अद्यापही सुरुच आहे.

कोट कार्ड

पारंपरिकरित्या सर्व प्रकारची गृहितकं मोडित काढणारी ही निवडणूक असल्याने राजकीय गणितांचीही फेरमांडणी होताना दिसत आहे, अशी मांडणी 'लेट्सअप'चे संपादक योगेश कुटे यांनी केली.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, "शिवसेना आणि काँग्रेस यांची विधानसभेसाठी निवडणूकपूर्व अशी युती पहिल्यांदाच झालेली आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या कामाची स्टाईल वेगवेगळी आहे. संजय राऊत आणि नाना पटोले यांची काम करण्याची पद्धतही वेगळी असल्याने दोन्ही पक्षांतील हा फरक दिसून येतो. ते पहिल्यांदाच युतीमध्ये लढत असल्याने अशी ताणाताणी अपेक्षितच होती."

शिवसेनेनं याआधीच्या निवडणुकांमध्ये किती जागा लढवल्या?

शिवसेनेपुरता विचार करायचा झाल्यास, सध्या महायुतीतील एकनाथ शिंदे गटाने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी 'गुवाहाटी बंडा'तील साथीदार कायम ठेवले आहेत.

दुसऱ्या बाजूला, महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट किमान 85 जागा लढवणार असल्याचे निश्चित आहे. यामध्ये आणखी जास्तीतजास्त 10 जागांची भर पडू शकते, त्याहून अधिक जागांची शक्यता कमी आहे. असे घडल्यास शिवसेना (उद्धव ठाकरे) गट 95 जागांच्या आसपासच निवडणूक लढवेल.

2014 च्या विधानसभा निवडणुकांचा अपवाद वगळल्यास 1990 सालापासून शिवसेना आणि भाजप युती करून निवडणुका लढवत होते.

1990 पासूनच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपसोबतच्या महायुतीतून लढणाऱ्या एकसंध शिवसेनेची आकडेवारी पाहता सध्याची आकडेवारी निश्चितच कमी आहे.

1990 ते 2009 पर्यंत विधानसभांच्या सर्व निवडणुकांमध्ये जागावाटप पाहता अप्रत्यक्षपणे शिवसेना 'मोठ्या भावा'च्या भूमिकेत राहिली.

2022 साली शिवसेनेमध्ये फूट पडली आणि एकनाथ शिंदेंनी पक्षावर दावा ठोकला.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, 2022 साली शिवसेनेमध्ये फूट पडली आणि एकनाथ शिंदेंनी पक्षावर दावा ठोकला.

1990 च्या निवडणुकीत शिवसेनेनं 183 तर भाजपनं 105 जागा लढवल्या होत्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत युतीचा जागावाटपाचा हाच फॉर्म्युला 1995 च्या निवडणुकीतही तसाच ठेवण्यात आला.

1999 साली शिवसेनेनं 171 मधून मित्रपक्षांना 10 जागा सोडल्या होत्या. 2004 साली शिवसेनेनं मित्रपक्षांना 8, तर भाजपनं 6 जागा सोडल्या होत्या. तर 2009 साली शिवसेनेनं मित्रपक्षांना 9 जागा सोडल्या होत्या.

2014 साली भाजप आणि शिवसेनेनं युतीच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वबळाचा नारा दिला आणि 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरले.

तेव्हा शिवसेनेनं 282 तर भाजपनं स्वबळावर 260 जागा लढवल्या. त्यावेळी भाजपनं 122 तर शिवसेनेनं 62 जागा जिंकल्या होत्या.

2019 साली तत्कालीन महायुतीतील एकसंध शिवसेनेने 124 तर भाजपने इतर मित्रपक्षांसह 164 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी शिवसेनेनं 56 तर भाजपनं 105 जागा जिंकल्या होत्या.

लाल रेष
लाल रेष

शंभरहून कमी जागांवर लढणं हे उद्धव ठाकरेंच्या फायद्याचं की तोट्याचं?

'शंभरहून अधिक जागा लढू' असा दावा करणारी शिवसेना त्याहून कमी जागांवर निवडणूक लढण्यासाठी तयार झाली आहे.

यावर भाजपनं टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, "मोठा भाऊ बनायला निघालेली शिवसेना आता 'रामा गडी' बनून राहिली आहे. भाजपने इतकं सन्मानानं वागवून सुद्धा ज्या शिवसेनेनं साध्या छोट्या गोष्टीसाठी तडजोड करायला नकार दिला आणि 'आम्ही मोठा भाऊ' करत ज्यांच्या कडेवर जाऊन बसले, त्यांनी यांना घरचा 'रामा गडी' करुन टाकलं आहे."

दुसऱ्या बाजूला, 'जास्त जागा लढवल्या तर जास्त जिंकता येतील वा स्ट्राईक रेट चांगलाच मिळतो' असं नाही, असं विश्लेषण योगेश कुटे करतात. ते म्हणतात की, "संजय राऊत यांचं शंभरहून अधिक जागा लढवण्याबाबतचं स्टेटमेंट हे ताणण्याची भाषा होती, ती तोडण्याची भाषा नव्हती, हे स्पष्टपणे दिसून येत होतं.

सध्या उद्धव ठाकरे यांचा गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटासोबत महाविकास आघाडीमध्ये आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सध्या उद्धव ठाकरे यांचा गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटासोबत महाविकास आघाडीमध्ये आहे.

संजय राऊत यांचा हा दावा आग्रहासाठी होता. जेव्हा सगळे जागावाटपासाठी बसले, तेव्हा त्यांनी तो आग्रह मागे घेतलेला दिसून आला आहे. दुसरी गोष्ट अशी की, याआधी जेव्हा भाजप-शिवसेना युती होती तेव्हा शिवसेना 160 पेक्षा अधिक जागांवर लढत असली तरीही शिवसेनेचा सर्वोत्तम स्कोअर हा काही 74 च्या वर कधीही गेलेला नाहीये.

1995 साली बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेल्या झंझावातात या सर्वोच्च जागा मिळाल्या होत्या. त्यामुळं, जास्त जागा लढवल्या तर जास्त जिंकता येतील वा स्ट्राईक रेट चांगलाच मिळेल, असं काही नाही."

'दिव्य मराठी'चे ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश पवार यांना हा निर्णय उद्धव ठाकरेंच्या फायद्याचाच आहे, असं वाटतं.

ते म्हणतात की, "जास्त जागा लढून कमी जागा निवडून आणण्यापेक्षा कमी जागा लढून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न कधीही चांगला. शरद पवारांनीही याच प्रकारे निवडक आणि विजय मिळेल अशाच जागांवर उमेदवार दिले आहेत."

ग्राफिक्स

या बातम्याही वाचा:

ग्राफिक्स

भाजपची टीका, शिवसेनेचं प्रत्युत्तर

महाविकास आघाडीतील जागावाटपावरुन होणाऱ्या रस्सीखेचाबाबत भाजपने बोचरी टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना महाविकास आघाडीला 'माकड आणि दोन बोके' या गोष्टींची उपमा दिली.

शरद पवारांनी शिवसेनेला वापरुन आपला फायदा करुन घेतल्याचा दावा ते करतात. "संजय राऊत आमचा शंभरचा स्ट्राईक रेट असेल, असं म्हणतात. मात्र, जागाच शंभरच्या वर मिळालेल्या नसताना तो कुठून शंभर असेल? त्यामुळे, अतिअहंकारामुळे नुकसान शंभर टक्के शिवसेनेचंच होणार आहे," अजित चव्हाण म्हणतात.

"या सगळ्यात पक्ष फुटून सुद्धा शरद पवारांचाच फायदा होणार आहे. सर्वस्व गमावल्यानंतर सुद्धा आपला स्ट्राईक रेट कसा उत्तम राहील, याची काळजी घेत, इतर पक्षांमधील माणसं आपल्या बाजूने घेत राष्ट्रवादी काँग्रेसने बोक्याप्रमाणे जागावाटप केलं आहे. धूर्त शरद पवार आणि चलाख काँग्रेसनं 'उबाठा' गटाचा मामा बनवला आहे", असं ते पुढं म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शिवसेना), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (भाजप) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) हे सत्ताधारी महायुतीचे घटक आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शिवसेना), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (भाजप) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) हे सत्ताधारी महायुतीचे घटक आहेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी भाजपच्या या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी महायुतीतील एकनाथ शिंदे गटाची अवस्था काय आहे, असा प्रतिप्रश्न बीबीसी मराठीशी बोलताना उपस्थित केला.

महायुतीतील शिंदे गटाला मिळालेल्या जागांवरुन भाजप आणि शिंदे गटावर टीका करताना ते म्हणाले की, "शंभरहून अधिक जागा लढायला मिळाव्यात, अशी इच्छा असणं यात गैर काय? अशी इच्छा तर प्रत्येक पक्षाची राहणारच ना?"

कमी जागा लढण्याचा फटका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसणार का, या प्रश्नावर ते म्हणाले की, "आधीच्या आघाड्यांमध्ये दोनच पक्ष लढत होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता तीन पक्ष एका आघाडीमध्ये लढत आहेत. त्यामुळं आधीची 'खरी' शिवसेना 125 च्या आसपास लढत होती. मात्र, सध्या भाजपसोबत असलेली एकनाथ शिंदेंची 'खोटी' शिवसेना तर 80 च्या आसपासच जागा लढत आहे, हा प्रश्न कुणी विचारत का नाहीये? जर ते 120 वर आणि आम्ही कमी जागांवर लढत असतो तर गोष्ट वेगळी होती."

कमी जागांवर लढावं लागण्याची अवस्था एकट्या उद्धव ठाकरे गटाची नसून सगळ्याच प्रमुख पक्षांची झाल्याचा मुद्दा जयप्रकाश पवार मांडतात.

ते म्हणाले की, "भाजपही नेहमीपेक्षा कमी जागा लढवतो आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचीही हीच अवस्था आहे. आपापल्या आघाड्या टिकवून ठेवण्यासाठी सगळ्यांनाच नमतं घ्यावं लागण्याची स्थिती आहे."

लोकसभा निवडणुकीतील कामगिरी आणि 'स्ट्राईक रेट'चा मुद्दा

सध्या भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामुळे, दोन्ही आघाड्यांची तुलना केल्यास शंभरहून अधिक जागा लढवणारा भाजप हा कदाचित एकटाच पक्ष ठरेल.

सध्याच्या विधानसभा निवडणुकीबाबत 'स्ट्राईक रेट'चा मुद्दा वारंवार चर्चेत येतो. कोणत्या पक्षाचा स्ट्राईक रेट सर्वांत जास्त असेल, याच्या चर्चाही होताना दिसतात.

एखाद्या पक्षाने निवडणुकीमध्ये लढवलेल्या एकूण जागांपैकी किती जागांवर विजय प्राप्त केला याच्या प्रमाणाची टक्केवारी म्हणजे त्या पक्षाचा त्या निवडणुकीतील ‘स्ट्राईक रेट’ होय.

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 मतदारसंघांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत झाली. त्यामध्ये महाविकास आघाडीला 30 जागा, तर महायुतीला 17 जागा मिळाल्या.

महाविकास आघाडीकडून लढणाऱ्या उद्धव ठाकरे गटाने सर्वाधिक म्हणजेच 21 जागा लढवून 9 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने 17 जागा लढवून 13 जागांवर विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने 10 जागा लढवून 8 जागा जिंकल्या.

अर्थातच, या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा विचार करता, शिवसेनेच्या तुलनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वाधिक ठरला. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावर होईल, असं म्हटलं जात होतं.

आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला. ते वरळी मतदारसंघातून लढत आहेत.
फोटो कॅप्शन, आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला. ते वरळी मतदारसंघातून लढत आहेत.

निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याबाबत शिवसेना उत्सुक होती. आपला चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी असावा, ही उद्धव ठाकरेंची इच्छाही लपून राहिली नाही.

याबाबत बोलताना योगेश कुटे म्हणाले की, "एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडाचा राजकीय बदला शिवसेनेला घ्यायचा आहे. त्यासाठी ते मुख्यमंत्रिपदासाठी इतके आतुर झाले आहेत. त्यासाठी त्यांचा आग्रह असा होता की, आपल्याला जागा जास्त मिळाव्यात."

लढण्यासाठी जास्त जागा मिळाव्यात, अशी शिवसेनेची अपेक्षाही स्वाभाविक होती, असं जयप्रकाश पवार म्हणतात. मात्र, त्यासोबतच 'ग्राऊंड रियालिटी'चा मुद्दाही ते उपस्थित करतात. "आगामी काळात मुंबई प्रांतातील महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये, शिवसेना कशी ताकदवान आहे, हे दाखवायलाही त्यांना हे शक्तिप्रदर्शन आवश्यक होतं."

मात्र, तरीही शंभरहून कमी जागांवर निवडणूक लढवण्यासाठी तयार होणं हा शिवसेनेचा शहाणपणाच असल्याचा मुद्दा योगेश कुटे स्पष्ट करतात. ही गोष्ट महाविकास आघाडीच्या फायद्याची असल्याची मांडणी करताना ते म्हणाले की, "आता लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचंही बळ वाढलेलं आहे. त्यामुळे, या तिघांची त्या अर्थाने समान शक्ती आहे.

एकतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्हीही पक्ष फुटलेले आहेत. त्यांचे दोन-तृतीयांशहून अधिक आमदार निघून गेलेले आहेत. त्यामुळे, तिन्ही पक्षांच्या एकूण ताकदीमध्ये फारसा काही फरक नाही. अशा प्रकारचं जागावाटप महाविकास आघाडीसाठी गरजेचेचंच होतं. उद्धव ठाकरे जर 'मोठा भाऊ' म्हणून हट्टाला पेटून राहिले असते तर महाविकास आघाडी झालीच नसती, असं मत त्यांनी मांडलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)