आदित्य ठाकरेंचा वरळीतून अर्ज, ठाकरे गटाचं शक्तिप्रदर्शन

आदित्य

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आता ऐन रंगात आली आहे.

तीन-तीन पक्षांच्या दोन मोठ्या आघाड्या, तिसऱ्या आघाडीचं आव्हान आणि आणखीही काही स्वतंत्रपणे लढणारे पक्ष सध्या मैदानात उतरले आहेत.

सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांशी आमने-सामने लढणार असले तरीही जागावाटपावरुनही दोन्ही मुख्य आघाड्यांवरुन प्रचंड रस्सीखेच सुरू आहे.

काही जागांचा तिढा सुटला आहे तर काहींचा अद्याप सुटणे बाकी आहे. अद्याप तरी भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा काही पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

त्यामुळे, उमेदवारी पक्की झालेले अनेक जण आज आपला निवडणुकीचा अर्ज भरणार आहेत. दिवसभरात निवडणुकीच्या आखाड्यातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला इथे वाचायला मिळतील.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

वरळी विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी नामांकन दाखल झालाय. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठया प्रमाणात शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते.

यावेळी महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोठं शक्तिप्रदर्शन वाजता,गाजत जयघोषात करण्यात आलं.

यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, आमदार सुनील शिंदे, आमदार सचिन अहिर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी उपमहापौर शुभांगी वरळीकर आदी यावेळी उपस्थित होते.

हे उमेदवार भरणार आपला अर्ज

आज (24 ऑक्टोबर) विविध पक्षांमधील महत्त्वाचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे.

त्यामध्ये प्रामुख्याने कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उभे असलेले भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील, सांगली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ, तिवसा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे उमेदवार रोहित पवार यांचा समावेश आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

अनुजा सुनील केदार यांनी सावनेर कळमेश्वर विधानसभा निवडणुकीचा नामांकन अर्ज सावनेर तहसील कार्यालय येथे दाखल केला. अनुजा केदार या माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी आहेत. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, गोविंदा ठाकरे पंचायत समिती सभापती, बाबा पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कळमेश्वर , रवींद्र चिखले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर, अनिल राय उपाध्यक्ष नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी हे उपस्थित होते.

30 वर्ष आमदार असलेल्या सुनील केदार यांना जिल्हा बँक घोटाळ्यात शिक्षा झाली होती. त्यानंतर त्यांची आमदारकी रद्द झाली होती. तसेच त्यांना निवडणूक लढवायला पण बंदी घातली होती. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांच्या पत्नी अनुजा केदार यांनी अर्ज दाखल केला आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.