सरकार कुणाचेही असो, या कुटुंबांच्या हाती आहे महाराष्ट्रातील सत्तेच्या चाव्या

सत्ता आणि घराणे हे समीकरण नवे नाही. देशात गेल्या 75 वर्षांपासून लोकशाही आहे पण काही मोजक्या कुटुंबाकडेच सत्ता आहे अशी ओरड नेहमीच होताना दिसते. कित्येक वर्षांपासून नेहरू-गांधी हे घराणे राजकीयदृष्ट्या प्रभावशाली आहे हे आपल्याला तर माहितच आहे. पण देशातल्या विविध राज्यातही एकाच कुटुंबाकडे जास्त काळ मुख्यमंत्रिपद राहिल्याचे आपल्याला दिसते.
मुख्यमंत्रिपदच नाही तर आमदार-खासदार या पदांसाठी देखील घराणे किंवा कुटुंब ताकद असल्याचे दिसते. स्थानिक पातळीपासून ते मुख्यमंत्रिपदापर्यंत एकमेकांशी नाते असलेले लोकच राजकारणात प्रभावशाली आहेत.
एकाच कुटुंबातले अनेकजण राजकारणात सक्रिय आहेत आणि ते वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. काही घराणी तर अशी आहेत की जे जवळचे नातेवाईक आहेत पण विविध पक्षात आहेत. तर काही जण थेट एकमेकांविरोधातही असलेलेही पाहायला मिळतात.
'एकाच कुटुंबातील अनेकांना उमेदवारी मिळते,' म्हणून प्रसंगी विरोधक टीका करताना दिसतात पण 'आम्ही नेहमी गुणवत्तेच्याच आधारावर उमेदवारी देतो' असंच प्रमुख पक्षांचं म्हणणं असतं.
'आमचे सर्वांशी सलोख्याची आणि कौटुंबिक संबंध आहेत,' हे वाक्य तर अनेकदा ऐकायला मिळतं. आणि ती गोष्ट महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने पाहायला मिळते. कधीकधी राजकारणापलीकडे जाऊन देखील विविध कुटुंबात सलोख्याचे संबंध राज्यात पाहायला मिळाले आहेत.
सत्ताबदलाच्या निमित्ताने राज्यातलं राजकारण ढवळून निघालं. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी हातमिळवणी करून सत्तास्थापन केली. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने बंड केलं.
भाजपने या गटाला पाठिंबा दिला आणि एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री झाले. सत्तेच्या या सारीपाटात कोणता नेता कुठल्या पक्षात आणि कुणाच्या बाजूने आहे हे कळेनासं व्हावं अशी परिस्थिती आहे. असं असलं तरी कोण कोणत्या कुटुंबात आहे किंवा कुणाचे नाते कुणाशी आहे हे तर आपण जाणून घेऊच शकतो.
1. पवार-सुळे कुटुंबीय
पवार कुटुंबीय हे राज्यातील फर्स्ट पॉलिटिकल फॅमिली ठरू शकतं. एकाच कुटुंबातील सर्वाधिक लोक विविध पदांवर आहेत त्याच बरोबर या कुटुंबाचा समृद्ध राजकीय वारसा देखील आहे. शरद पवार हे गेल्या सहा दशकांपासून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात प्रभावशाली ठरलेले नेते आहेत आणि ते या कुटुंबाचे प्रमुख आहेत.
शरद पवार यांच्या आई शारदाबाई पवार पुणे लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे बारामतीतून खासदार आहेत. शरद पवार यांच्या सख्ख्या भगिनी सरोज पाटील या शेकापचे दिवंगत नेते आणि माजी मंत्री एन. डी. पाटील यांच्या पत्नी आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आहे. बारामतीतून विक्रमी मतांनी आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. अजित पवार यांनी राज्याचं उपमुख्यमंत्रीपद, अर्थमंत्री, जलसंपदा खात्याचं मंत्रिपद भूषवलं आहे.
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून लोकसभेसाठी रिंगणात होते. परंतु त्यांना शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पराभूत केलं. शरद पवारांचे दुसरे पुतणे राजेंद्र पवार यांचे चिरंजीव रोहित पवार अहमदनगरमधील जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत.
2019 निवडणुकीत रोहित यांनी तत्कालीन मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. भाजपचे आमदार रोहित कुल हे अजित पवारांचे आतेजावई आहेत. सुनेत्रा पवार या राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्या आत्या आहेत.
सुनेत्रा पवार या उस्मानबादमधील नेते पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. आमदार राणा जगजीतसिंह हे सुनेत्रा पवार यांचे भाचे आहेत. सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे बाळासाहेब ठाकरे यांचे भाचे आहेत.
2. मुंडे-महाजन कुटुंबीय
महाराष्ट्र राज्यात भाजपची पाळीमुळं रुजवणारी आणि भाजपचा विस्तार करणारी जोडी अशी ओळख गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची होती. हे दोघे एकमेकांचे जीवश्च कंठश्च मित्र तर होतेच पण प्रमोद महाजन यांची बहिण प्रज्ञा या ही गोपीनाथ मुंडेंच्या पत्नी होत्या.
प्रमोद महाजन यांची त्यांचे भाऊ प्रवीण महाजन यांनी हत्या केली आणि त्यानंतर प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन-राव या राजकारणात सक्रिय बनल्या. आता पूनम महाजन-राव मुंबई-उत्तर-मध्य या मतदारसंघाच्या खासदार आहेत.
खासदार पूनम महाजन या पंकजा यांच्या मामेबहीण. मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन हे पंकजा यांचे मोठे मामा.

फोटो स्रोत, FACEBOOK
पंकजा मुंडे या 2009 साली पहिल्यांदा आमदार बनल्या. गोपीनाथ मुंडे यांचं 2014 साली अपघातात निधन झालं आणि त्यानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारस बनल्या. पंकजा यांची बहिण प्रीतम मुंडे या देखील बीडच्या खासदार आहेत.
परळी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे हे पंकजा यांचे चुलत भाऊ आहेत. दोघा-बहिण भावांनी 2019 एकमेकांविरोधात निवडणूक लढवली होती. त्यात धनंजय मुंडेंचा विजय झाला होता. धनंजय मुंडे यांचे वडील पंडितअण्णा मुंडे यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर अनेक वर्षं पकड होती.
3. ठाकरे कुटुंबीय
समाजकारण आणि राजकारणाचा समृद्ध वारसा असलेलं कुटुंब अशी ठाकरे कुटुंबीयांची ओळख आहे. प्रबोधनकार ठाकरे हे राजर्षी शाहू महाराज यांचे सहकारी होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोठे योगदान दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनात आणि आशीर्वादाने शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि राज्याच्या राजकारणात एक नवे पर्व सुरू झाले. एका संघटनेचा पुढे पक्ष बनला आणि 1995 मध्ये भाजपसोबत युती करत सत्तेत आला.
सरकार असो वा नसो बाळासाहेब ठाकरे यांचा राज्याच्या राजकारणावर प्रभाव कायम राहिला. पुढे त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे कार्याध्यक्ष बनले. बाळासाहेबांच्या निधनानंतर ते पक्षप्रमुख बनले. 2019 साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले.
बाळासाहेबांचे नातू आणि उद्धव यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे 2019 मध्ये वरळीतून निवडणूक लढवत आमदार झाले.

फोटो स्रोत, SOPA Images
महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यटन तसंच राजशिष्टाचार मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे मनसेचे नेते आहेत.
3. शिंदे कुटुंबीय
एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री होते. ठाण्यातल्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत.
शिवसेनेचे शाखाप्रमुख ते ठाणे महापालिकेत नगरसेवक ते आमदार आणि आता मुख्यमंत्री असा शिंदे यांचा राजकीय प्रवास झाला आहे.

फोटो स्रोत, Shrikant Shinde
शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी बंड केलं. भाजप आणि शिंदे समर्थक आमदारांचा गट यांचं सरकार काही दिवसांपूर्वी स्थापन झालं. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे कल्याण मतदारसंघातून खासदार आहेत. 2014 मध्ये वैद्यकीय शिक्षण सुरू असतानाच श्रीकांत खासदार म्हणून निवडून आले. 2019 मध्येही त्यांनी निवडणुकीत बाजी मारली.
5. खडसे कुटुंबीय
खान्देशात भाजपचा विस्तार करणे आणि भाजपचा एक बहुजन चेहरा अशी एकनाथ खडसे यांची ओळख होती. पक्षांतर्गत वाद विकोपाला गेल्यानंतर खडसेंनी भाजपला रामराम ठोकला आणि ते राष्ट्रवादीत गेले.
एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर मतदारसंघातून सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले. एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती पण त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
6. फडणवीस कुटुंबीय
देवेंद्र फडणवीस यांचे कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असलेलं कुटुंब होतं. देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधरपंत फडणवीस हे नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून विधान परिषदेवर निवडून जात. त्यांचे अकाली निधन झाले.
तेव्हा देवेंद्र फडणवीस 17 वर्षांचे होते. देवेंद्र फडणवीस हे वडिलांच्या निधनानंतर चार वर्षांनी नगरसेवक बनले, महापौर बनले. पुढे आमदार, विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री देखील बनले.
फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस माजी आमदार आणि माजी मंत्री होत्या. 1990 ते 2004 या काळात त्या सलग चार वेळा चंद्रपूर जिल्ह्यातील सावली मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. पुढे या मतदारसंघाचे पुनर्रचनेत विघटन झाले.

फोटो स्रोत, Devendra Fadanvis
7.तटकरे कुटुंबीय
सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. शरद पवारांचे जुने सहकारी आणि कोकणचा राष्ट्रवादीचा चेहरा अशी त्यांची ओळख आहे. त्यांची कन्या आदिती तटकरे या आमदार आहेत.
2019 मध्ये श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून येऊन पहिल्यांदाच आमदार झालेल्या अदिती तटकरे यांनी सात खात्यांचं राज्यमंत्रीपद हाताळलं.
सुनील यांचे चिरंजीव आणि आदिती यांचे बंधू अनिकेत तटकरे हे विधान परिषदेचे आमदार आहेत.

फोटो स्रोत, Aditi Tatkare
8. प्रणिती शिंदे- सुशिलकुमार शिंदे
एका सामान्य कुटुंबातून येऊन सुशिल कुमार शिंदे हे राजकारणात एक एक पद मिळवत गेले. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि पुढे देशाचे गृहमंत्री अशी पदं त्यांनी भूषवली. त्यांचा राजकीय वारसा पुढे त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांनी पुढे नेला. सध्या त्या आमदार आहेत. जाई-जुई या संस्थेमार्फत त्यांनी महिलांचे संघटन उभे केले.

फोटो स्रोत, Getty Images
9.राणे कुटुंबीय
कोकणाचे राजकारण हे राणे कुटुंबीयांच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच आहे असेच म्हणावे लागेल. राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या नारायण राणे यांचा राजकीय प्रवास शिवसेना, स्वाभिमानी पक्ष, काँग्रेस आणि आता भाजप असा राहिला आहे.

फोटो स्रोत, Hindustan Times
नारायण राणे यांनी महसूल, औद्योगिक खात्यांचा कार्यभार सांभाळला. नारायण राणे सध्या केंद्रात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे मंत्री आहेत. नितेश हे कणकवली मतदारसंघाचे आमदार आहेत.
10.माने कुटुंबीय
शिवसेनेचे हातकणंगले येथील खासदार धैर्यशील माने हे काँग्रेसचे माजी खासदार राजाराम माने यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदार निवेदता माने यांचे पुत्र आहेत. राजाराम माने तब्बल पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

फोटो स्रोत, FACEBOOK
11.बोर्डीकर कुटुंबीय
रामप्रसाद बोर्डीकर हे परभणीतील काँग्रेसचे माजी आमदार आहेत. दोन दशकांहून अधिक काळ जिंतूर मतदारसंघावर पकड होती. सध्या त्यांची कन्या मेघना बोर्डीकर-साकोरे या जिंतूर मतदारसंघात इथून भाजपच्या आमदार आहेत.

फोटो स्रोत, Amol Langar/BBC
12.काळे कुटुंबीय
अहमदनगरमधील कोपरगावचे विद्यमान आमदार आणि शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे हे माजी आमदार अशोकराव काळे यांचे पुत्र आहेत. माजी खासदार शंकरराव काळे हे त्यांचे आजोबा.
13.गडाख कुटुंबीय
ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे आमदार शंकरराव गडाख हे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे पुत्र आहेत.
14.नार्वेकर-नाईक निंबाळकर
विधानसभेचे नवे अध्यक्ष. शिवसेना ते भाजप व्हाया राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. कायद्याचा अभ्यास असणाऱ्या नार्वेकर यांचे वडीलही राजकारणात होते. राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई.

फोटो स्रोत, Facebook/Rahul Narvekar
15.प्रताप सरनाईक-रणजीत पाटील
भाजपचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या कन्या या प्रताप सरनाईक यांचे पूर्वेश सरनाईक यांच्या पत्नी आहेत.
16.प्राजक्त तनपुरे-जयंत पाटील
राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांचे भाचे आहेत.
17.थोरात-तांबे
विधान परिषदेतील आमदार सुधीर तांबे यांच्या पत्नी संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे या माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी आहेत. युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे हे थोरात यांचे सख्खे भाचे.
18.राधाकृष्ण विखे पाटील- सुजय विखे पाटील
भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील हे भाजपचे खासदार आहेत. राधाकृष्ण यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील हे काँग्रेसचे माजी खासदार होते.
19.कर्डिले- जगताप
राष्ट्रवादीचे आमदार अरुणकाका जगताप यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप हे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई.
20.ऋतुराज पाटील- सतेज पाटील
काँग्रेसचे कोल्हापुरातील आमदार ऋतुराज पाटील हे काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार सतेज पाटील यांच्या भावाचा मुलगा.
21. सातारा आणि कोल्हापूरचे छत्रपती घराणे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा वारसा असलेली दोन सत्तास्थानं महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. एक म्हणजे सातारा आणि दुसरे कोल्हापूर.
संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे वंशज आहेत. संभाजीराजे छत्रपती हे राष्ट्रपतींद्वारे निर्वाचित खासदार होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी राज्यभर दौरे केले होते.
साताऱ्याच्या छत्रपती घराण्याने देखील आपल्या नावाचा ठसा राज्याच्या राजकारणावर उमटवला आहे. साताऱ्याच्या राजकारणात एकेकाळी दबदबा असलेले प्रतापसिंह राजे भोसले आणि कल्पना राजे भोसले यांचे पुत्र उदयन राजे भोसले हे सध्या भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत.
तर साताऱ्याचे आमदार आणि खासदार अशी दोन्ही पदे भूषवलेली अभयसिंह राजे भोसले हे प्रतापसिंह यांचे बंधू होते. प्रतापसिंह आणि अभयसिंह हे राजकीय प्रतिस्पर्धी होते. अभयसिंह यांच्याविरोधात उदयनराजे यांच्या आई कल्पना राजेंनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात अभयसिंह विजयी झाले होते.
अभयसिंह यांचे पुत्र शिवेंद्रराजे भोसले हे भाजपचे आमदार आहेत.

फोटो स्रोत, FACEBOOK/SAI SAWANT
22.दिलीपराव देशमुख- अतुल भोसले
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख हे काँग्रेसचे नेते आहेत. भाजपचे नेते अतुल भोसले हे दिलीपराव देशमुखांचे जावई आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे हे दोन चिरंजीव.
धीरज हे लातूर ग्रामीणमधून तर अमित लातूर शहर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. अमित हे लातूरचे पालकमंत्री आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये अमित कॅबिनेट मंत्रिपदी होते.
23. गावित कुटुंबीय
भाजपचे आमदार विजयकुमार गावित यांची कन्या हिना गावित या नंदुरबारमधून भाजपच्या खासदार आहेत.
24. राणा दाम्पत्य
अमरावतीतून अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले रवी राणा हनुमान चालिसा पठणामुळे चर्चेत आले.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसेचं पठण करणार अशी घोषणा रवी राणा यांनी केली होती. त्यासाठी त्यांना आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांना तुरुंगवास झाला. नवनीत राणा या खासदार आहेत.

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES
25.प्रतिभा धानोरकर- बाळू धानोरकर
काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या आमदार आहेत.
26.संतोष दानवे- रावसाहेब दानवे
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे भाजपचे आमदार आहेत. रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव हे मनसेचे आमदार होते.
27.हितेंद्र आणि क्षितिज ठाकूर
पालघर जिल्ह्तील बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर हेसुद्धा आमदार आहेत.
28.सुनील राऊत-संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू. 2019 मध्ये सुनील विक्रोळी मतदारसंघातून निवडून आले. संजय राऊत काही दिवसांपूर्वी राज्यसभेचे खासदार म्हणून पुन्हा निवडून आले.
29.योगेश कदम-रामदास कदम
योगेश कदम हे दापोली मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. त्यांचे वडील रामदास कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते. रामदास कदम सलग चार वर्ष आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले.
त्यानंतर विधान परिषदेचे सदस्य. 2005 ते 2009 या कालावधीत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम पाहिलं. 2014 मध्ये पर्यावरण खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. औरंगाबादचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी चार वर्ष हाताळली. त्यानंतर नांदेडचे पालकमंत्री.
30.विश्वजीत कदम- पतंगराव कदम
काँग्रेसचे माजी मंत्री आणि भारती विद्यापीठचे संस्थापक पतंगराव कदम हे राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक होते. त्यांचे पुत्र विश्वजीत कदम हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत.
31.सुमन पाटील- आरआर पाटील
राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत. आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हे देखील आता राजकारणात आहेत.

फोटो स्रोत, FACEBOOK - ROHIT PATil
राजकारणात प्रवेश केल्या केल्याच त्यांनी कवठे महांकाळ नगर परिषदेवर विजय मिळवून दाखवला. वय कमी आहे म्हणून विरोधकांनी मला कमकुवत समजू नये असा इशारा त्यांनी निवडणुकीपूर्वी दिला होता.
32.हर्षवर्धन पाटील- निहार ठाकरे
भाजपचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचं लग्न निहार ठाकरे यांच्याशी झालं. निहार ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा मुलगा बिंदूमाधव ठाकरे यांचे पुत्र.
33.पांडुरंग फुंडकर- आकाश फुंडकर
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष पांडुरंग फुंडकर यांचे पुत्र आकाश फुंडकर हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत.
34.ना.स. फरांदे- देवयानी फरांदे
विधान परिषदेचे माजी सभापती प्राध्यापक ना.स. फरांदे हे भाजप आमदार देवयानी फरांदे यांचे सासरे.
35.यशवंत जाधव- यामिनी जाधव
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव भायखळ्यातून आमदार आहेत. त्या एकनाथ शिंदे समर्थक आमदारांपैकी एक आहेत.
36.शिंदे-थोपटे
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांचे जावई संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आमदार आहेत. सासरे-जावई अशी ही जोडी.
37.अशोक चव्हाण-अमिता चव्हाण
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीत मंत्रिपदी असणारे अशोक चव्हाण यांच्या पत्नी 2014 साली भोकर मतदारसंघातून आमदार होत्या. त्याचवेळी अशोक चव्हाण नांदेडमधून खासदार होते. अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत.

फोटो स्रोत, AFP
38.मंदा म्हात्रे- विवेकानंद पाटील
विवेकानंद पाटील हे पनवेलमधून शेकापचे आमदार होते. विवेकानंद पाटील यांची मुलगी मंदा म्हात्रे यांची सून आहे. मंदा म्हात्रे या भाजपच्या आमदार आहेत. 2019 साली विवेकानंद पाटील यांना अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी पराभूत केले. सध्या विवेकानंद पाटील हे कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत.
39. मोहिते पाटील कुटुंब
महाराष्ट्राचे माजी मंत्री शंकरराव मोहिते-पाटील यांचे पुत्र विजयसिंह मोहिते-पाटील हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. सध्या ते भाजपचे नेते आहेत. तर दुसरे पुत्र प्रतापसिंह मोहिते-पाटील हे सहकार राज्यमंत्री होते.
विजयसिंह मोहिते पाटील हे 2014 ते 2019 या कालावधीत माढा मतदारसंघातून लोकसभेचे खासदार होते. त्यांनी 2003 ते 2004 या कालावधीत राज्याचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलं. ग्रामविकास, पर्यटन तसंच सामाजिक बांधकाम विभाग खात्यांचे मंत्री होते. 2012 ते 2014 कालावधीसाठी ते विधानपरिषदेचे आमदार होते.
विजयसिंह यांचे पुत्र रणजीतसिंह मोहिते पाटील हे विधानपरिषदेत आमदार आहेत. 2009 ते 2012 या कालावधीत ते राज्यसभेचे खासदार होते. तर प्रतापसिंह मोहिते-पाटलांचे पुत्र धवलसिंह मोहिते-पाटील हे सध्या काँग्रेसमध्ये आहेत.
40. गोविंदराव वंजारी - अभिजीत वंजारी
2004च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण नागपूर मतदारसंघातून काँग्रेसचे गोविंदराव वंजारी हे निवडून आले. तब्बल 10 वर्षांनंतर त्यांनी भाजपकडून ही जागा हिसकावली होती. पण निवडणुकीत विजयी झाल्यानंतर काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला.
ऑक्टोबर 2004मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी असताना त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र काही वेळात ते हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले.
वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र ॲड. अभिजीत वंजारी हेसुद्धा राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी वडिलांच्या जागेवरून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शविली, पण काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारल्यावर त्यांनी अपक्ष म्हणून ही पोटनिवडणूक लढविली आणि त्यात अपयशी ठरले. अखेर ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले.
त्यानंतर त्या 2014 मध्ये पूर्व नागपुरातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली, पण त्यात भाजपच्या कृष्णा खोपडेंनी त्यांचा पराभव केला. अखेर डिसेंबर 2020मध्ये झालेल्या पदवीधर विधान परिषद निवडणुकीत अभिजीत वंजारी यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत अखेर विधिमंडळात स्थान पक्क केलं.
41. दादा भुसे - राजन विचारे
राज्याचे माजी कृषी मंत्री आणि एकनाथ शिंदे समर्थक दादा भुसे हे मालेगाव (बाह्य) या मतदारसंघातून चार वेळा आमदार बनले आहेत. दादा भुसे आणि खासदार राजन विचारे हे व्याही आहेत.
42. भुजबळ कुटुंबीय
शिवसेनेपासून आपल्या राजकारणाची सुरुवात केलेले छगन भुजबळ हे राज्यातील ओबीसी आंदोलनाचा चेहरा ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवली. छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हे आमदार होते तर छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे खासदार होते.
(या यादीत महाराष्ट्रातील कोणतं प्रभावशाली राजकीय कुटुंब नाहीये असं तुम्हाला वाटतं)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








