'शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही फोडली नाही,' हे सांगण्याची वेळ अमित शाह यांच्यावर का आली?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
'‘’उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणतात भाजपनं आमचा पक्ष फोडला. पण, मी आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर स्पष्ट करायला आलोय की आम्ही ना शिवसेना फोडली ना राष्ट्रवादी. उद्धव ठाकरेंच्या पुत्रप्रेमापोटी शिवसेना, तर शरद पवारांच्या पुत्रीप्रेमापोटी राष्ट्रवादी पक्ष फुटला.’’
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी पक्ष फोडण्याबद्दल हे स्पष्टीकरण दिलंय.
पण, याउलट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आम्हीच फोडले अशी कबुलीच दिली होती.
17 मार्च 2024 ला मुंबईतल्या हॉटेल फोर सिजनमध्ये ‘काँग्रेस न होती तो क्या होता?’ या पुस्तकाचं प्रकाशन होतं.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मी पुन्हा येईन असं म्हणालो होतो. त्याला अडीच वर्ष लागले. पण, अडीच वर्षानंतर दोन पक्ष फोडून आलो आणि दोन सहकारी सोबत घेऊन आलो’
ही पहिलीच वेळ नाही की देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडण्याबद्दल असं वक्तव्य केलं. याआधीही एक वर्षापूर्वी मुंबईत ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’ झालं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यात फडणवीस म्हणाले होते, आमच्यासोबत बेईमानी होत असेल तर आम्ही त्याचं उत्तर देऊ. उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता. एकनाथ शिंदेही सरकारमधून बाहेर पडायला तयार होते. आम्हाला आमचा बदला घ्यायचा होता. मला या गोष्टीचा आनंद आहे की जी बेईमानी माझ्यासोबत झाली होती त्याचा मी बदला घेतला. होय, मी बदला घेतला.’’
अमित शाह यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे काय म्हणाले हे पाहूयात.
‘’अमित शाह यांच्या पुत्रप्रेमामुळे भारत विश्वचषक सामना हरला. मी तसं पुत्रप्रेम दाखवलं नाही. अमित शाह यांचं पक्षात नेमकं स्थान काय आहे? शाह आणि त्यांचे चेलेचपाटे काय बोलतात त्यात एकवाक्यता ठेवली पाहिजे. तुम्ही सांगता आम्ही पक्ष पोडले नाहीत.
पण, देवेंद्र फडणवीस मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो बोलतात. अमित शाह यांची लाज त्यांचे चेलेचपाटे काढत आहेत’’ असं उत्तर उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना दिलं.

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्र भाजपची सूत्रं हलवणारे देवेंद्र फडणवीस पक्ष फोडण्याबद्दल एक नाहीतर दोनवेळा कबुली देतात. त्यानंतर अमित शाह लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात येऊन पक्षफुटीबद्दल स्पष्टीकरण देतात.
अमित शाह यांना महाराष्ट्रात येऊन आम्ही पक्ष फोडले नाही असं का सांगावं लागलं? पक्षफुटीचा मुद्दा या निवडणुकीत भाजपसाठी अडचणीचा ठरतोय का? याचीच चर्चा या लेखात करुयात.
दोन्ही पक्ष भाजपने फोडले हे कसं रुजलं?
एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्तेत गेले त्यावेळी त्यांनी विधीमंडळ अधिवेशनात बोलताना फडणवीसांसोबतच्या भेटीचे काही गुपितं सांगितलं होतं. मी आणि देवेंद्र फडणवीस कधी भेटायचो हे आमच्याही लोकांना माहिती नव्हतं.
सगळे झोपल्यावर मी फडणवीसांना भेटायला जात होतो आणि सगळे उठायच्या आत मी परत येत होतो, असा खुलासा एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केला होता.
त्यानंतर अमृता फडणवीसांनी देखील या वक्तव्याला दुजोरा दिला. यात देवेंद्र फडणवीस हुडी आणि मोठा गॉगल घालून रात्री बाहेर पडायचे, असं अमृता म्हणाल्या होत्या.
भाजपनं पक्ष फोडला, असं विरोधक आधीपासूनच बिंबवत होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: शिवसेना, राष्ट्रवादी दोन्ही पक्ष फोडल्याची कबुली दिली.
अमित शहांना महाराष्ट्राला स्पष्टीकरण का द्यावं लागलं?
पण, आता अमित शाह यांनी या गोष्टी फेटाळून लावल्या आहेत. अमित शाहांना महाराष्ट्रात येऊन स्पष्टीकरण का द्यावं लागलं? याबद्दल रत्नागिरीतील लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत हे तीन मुद्दे सांगतात,
‘’पहिला म्हणजे भाजपमध्ये पक्षांतर्गत कुरबुरी आहेत. सगळ्यांना सोबत घेणं भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना अजिबात आवडलं नाही. बाहेरच्या नेत्यांना पक्षात येऊन त्यांना संधी दिली जाते. मग आम्ही दुसऱ्यांच्या पालख्या वाहायच्या का? अशी भावना भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे पक्षातल्या कार्यकर्त्यांना मेसेज देण्यासाठी अमित शाहांना स्पष्टीकरण द्यावं लागलं.
दुसरं म्हणजे भाजपच्या प्रतिमेला तडा जातोय का अशी परिस्थिती आहे. अडवाणी, वाजपेयींच्या काळात ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी भाजपची ओळख होती. पण, आता ‘पार्टी विथ वॉशिंग मशिन’ अशी प्रतिमा तयार झाली. भाजपसोबत गेले की भ्रष्टाचारी नेता वाशिंग मशिनमध्ये स्वच्छ होतो, असा प्रचार विरोधकांकडून सुरू आहे. सर्वसामान्य जनता देखील याबद्दल बोलताना दिसतेय. त्यामुळे अमित शाह यांना स्पष्टीकरण देणं भाग पाडलं."

फोटो स्रोत, Getty Images
तिसरा मुद्दा म्हणजे, सामान्य व्यक्तीला जमिनीर पक्ष फोडणं पसंत पडलेलं नाही. फोडाफोडी करून सत्ता मिळवणं हे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला आवडलं नाही.
स्थानिक पातळीवर काय परिस्थिती आहे, मतदार काय विचार करतो याचा फिडबॅक भाजपला नक्की मिळाला असणार. त्यामुळे निवडणुकीत फटका बसू नये यासाठी अमित शाह व्हाईट वॉश करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, त्याला फार उशिर झाला. यामुळे भाजपचं बहुमत अत्यंत कमी होईल असं नाही. पण, निवडणुकीत काही प्रमाणात फटका बसेल असं दिसतं.’’
हिंदुस्तान टाइम्सचे पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार योगेश जोशींना हा सहानुभूतीचा मुद्दा वाटतो.
ते सांगतात, ‘’भाजपनं पक्ष फोडला हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून वारंवार सांगितलं जातंय. शरद पवारांनी एखादी गोष्ट पटवून सांगितली की ती लोकांना लगेच पटते. त्यामुळे पवारांना सहानुभूती मिळताना दिसतेय. आम्ही पक्ष फोडला हे भाजपला खुलेआम सांगणं परवडणारं नाही. असं सांगितलं तर त्याचा उलट फायदा विरोधकांना होऊ शकतो हे अमित शाह ओळखून आहेत. शरद पवारांना, उद्धव ठाकरेंना कुठलीही सहानुभूती मिळू नये यासाठी अमित शाह असं स्पष्टीकरण द्यावं लागलं असेल.’’
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूती मिळू नये यासाठी अमित शाहांनी स्पष्टीकरण दिलं असं नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने यांना वाटतं.
पण, ते याठिकाणी सर्वसामान्य जनतेला काय वाटतं याबद्दलही सांगतात.
‘’भाजप कार्यकर्त्यांसोबतच महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेलाही फोडोफोडीचं राजकारण आवडलेलं नाही. सत्तेत येण्यासाठी पक्ष फोडला आणि त्यासाठी पैशांचा वापर झाला हा आरोप भाजपवर आहे. सत्तेसाठी काहीही असं भाजपचं धोरण आहे का स्थानिक पातळीवरचं चित्र दिसतं. याचा सामना भाजपला करावा लागतोय. त्यामुळे कदाचित अमित शाह यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं असेल.’’
भाजपचे मतदार अजित पवारांना मतदान करतील का?
एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार भाजपसोबत महायुतीत गेले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना सांगावं लागलं होतं, की एकनाथ शिंदे यांच्यासोबतची युती ही नैसर्गिक युती आहे आणि अजित पवार यांच्यासोबतची युती ही व्यावहारीक तडजोड आहे.
भाजप कार्यकर्त्यांना संदेश देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचं हे विधान होतं असं बोललं गेलं. निवडणूक लागल्यानंतरही अजित पवारांवरून भाजपच्या काही नेत्यांमध्ये प्रत्यक्ष नाराजी दिसली. हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांना केलेला विरोध आपण पाहिला.
दुसरीकडे उत्तमराव जानकर यांचीही मनधरणी फडणवीसांना करावी लागतेय. काही नेत्यांना लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा असूनसुद्धा त्यांना तडजोड करावी लागली.
अजित पवार भाजपसोबत महायुतीत येणं हे भाजपच्या मतदारांना रुचलेलं नाही का? भाजपची मतं अजित पवारांच्या उमेदवाराला जातील का?

फोटो स्रोत, Getty Images
याबद्दल योगेश जोशी सांगतात, ‘’भाजपच्या पारंपरिक मतदारांमध्ये संमिश्र भावना दिसतात. भाजपसोबत जुळलेल्या मतदारांनी ही पक्षाची गरज असल्याचं मान्य केलंय. पण, संघाशी संबंधित असलेल्या भाजपच्या मतदारांना अजित पवारांना सोबत घेणं रुचलेलं नाही.
इतके वर्ष ज्यांच्याविरोधात राजकारण केलं, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच लोकांना सोबत घेतो हे त्यांना आवडेललं नाही. एकनाथ शिंदेंना सोबत घेतल्यानंतर भाजपकडे निवडणूक जिंकण्यासाठी आकडा होता मग अजित पवारांना सोबत घ्यायची गरज होती का, असा मतप्रवाह भाजपच्या नेत्यांमध्ये दिसतो.
या निवडणुकीत भाजपचा कार्यकर्ता महायुतीच्या उमेदवाराचं काम करताना दिसतोय. पण, संघाशी संबंधित असलेला भाजपचा कार्यकर्ता सक्रीय दिसत नाही. त्यांच्यामध्ये नाराजी दिसते. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं म्हणून हा मतदार मतदान करेल. पण, कदाचित विधानसभेत याउलट चित्र दिसेल.’’
2019 ला पक्षांतर, आता पक्षफुटीचा मुद्दा प्रभावी ठरेल?
2019 ला मोठ्या प्रमाणात पक्षांतर झालं होतं. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेत्यांचं भाजपमध्ये इनकमिंग झालं होतं. त्यानंतर लोकसभेसारखीच विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या बाजूने हवा होती. यावेळी राष्ट्रवादी, काँग्रेसच्या इतक्या जागा येतील असं वाटलं नव्हतं.
पण, प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीचा निकाल आला तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला अपेक्षपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी पक्षांतराचा मुद्दा महत्वाचा होता. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षफुटीचा मुद्दा महत्वाचा ठरेल का?
‘’2019 ला विधानसभा निवडणुकीच्या आधी हवा भाजपच्या बाजूनं होती. पण, निवडणुका जवळ आल्या तेव्हा आपल्या समाजाचा नेता एकट पडलाय, असं चित्र मराठा समाजात निर्माण झालं. तसेच मराठा समाजाचा भाजपवर रोष होताच. त्याचा फटका बसला. त्यामुळे नेत्यांनी पवारांची साथ सोडली तरी त्याचा फायदा पवारांना झाला. पण, आता तर घरच्यांनी पक्ष फोडला. त्यामुळे सुप्रिया सुळे भाजपनं पक्ष फोडल्याचं वारंवार सांगतात. दुसरीकडे फडणवीस हा काका-पुतण्यांमधला वाद नाहीतर राहुल गांधी विरुद्ध मोदी अशी लढाई असल्याचं सांगतात.
पण, पक्ष भाजपनं फोडला हे शरद पवार मतदारांना पटवून देताना दिसतात. 2019 ला पक्षांतराचा परिणाम दिसला तसा 2024 च्या या लोकसभा निवडणुकीत पक्षफुटीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण असे पार्टनर सोबत आल्यानं भाजपमध्ये अंतर्गत खूप समस्या आहेत. इतकी गर्दी झाल्यानं भाजपच्या निष्ठावान नेत्यांच्या असलेल्या महत्वकांक्षेचं करायचं काय? असा प्रश्न पक्ष म्हणून भाजपसमोर आहे,’’ असं योगेश जोशींना वाटतं.
महाराष्ट्रात फिरताना बीबीसीच्या प्रतिनिधीला पक्षफुटीबद्दल काय दिसलं?
बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. विशेषतः बीडमधल्या ऊसतोड महिला कामगार, आदिवासी महिला, विडी कामगार महिला, कोल्हापुरात इचलकरंजी कारखान्यातील महिला, सर्वसामान्य गृहिणी अशा विविध स्तरातील महिलांसोबत संवाद साधताना आलेले अनुभव दीपाली यांनी सांगितले. या जनतेच्या मनात पक्षफुटीबद्दल काय भावना आहेत?
याबद्दल दीपाली सांगतात, ‘’महायुतीबद्दल लोकांचं दोन गोष्टींमध्ये नकारात्मक मत दिसलं. पहिला मुद्दा म्हणजे केंद्र सरकारकडून शौचालय, घरकुल योजना हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवलं असं जाहिरातीतून सांगितलं जातं. पण, हे सगळं तळागाळातल्या जनतेपर्यंत प्रत्यक्षात पोहोचलेलं नाही. गोंदियातील महिलांनी सांगितलं, की गॅस सिलिंडर दिल्याचं सरकार सांगतंय. आम्ही जाहिराती बघतोय. पण, आम्हाला काहीच मिळत नाही. प्रत्येक निवडणुकीत पाणी देऊ असं आश्वासन देतात. पण, अजूनपर्यंत पाणी पोहोचलं नाही. याबद्दल लोकांच्या मनात नाराजी आहे. दुसरं म्हणजे आमच्या हाताला काम नाही, आम्ही उपाशी मरतोय याकडे कोणी लक्ष देत नाही आणि यांना पक्ष फोडायला वेळ आहे, अशा लोकांच्या भावना आहेत."
त्या पुढे सांगतात, "ज्या पद्धतीनं पक्ष फोडण्यात आले ते सामान्य जनतेला आवडलं नाही. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून भाजपनं पक्ष फोडले या महाविकास आघाडीनं केलेल्या प्रचारावर जनतेचा विश्वास बसलाय असं चित्र दिसलं. महायुतीकडे अजित पवार, एकनाथ शिंदे आले. त्यामुळे त्यांची बाजू भक्कम झाली, ते निवडणूक पूर्णपणे ओढून नेतील, असं सुरुवातीला वाटलं होतं.
पण, महाराष्ट्रात फिरल्यानंतर स्थानिक पातळीवर फोडोफोडीचं राजकारण आणि तळागाळातल्या जनतेपर्यंत न पोहोचलेल्या योजना यावरून महायुतीसाठी ही निवडणूक तितकी सोप्पी दिसत नाही. बीडमध्ये पंकजा मुंडे, सोलापुरात राम सातपुते या दोन्ही मोठ्या लढती आहेत. पण, याठिकाणीही जनतेच्या भावना तीव्र दिसतात.’’
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची Times of India ने 17 एप्रिलला मुलाखत घेतली. यात भाजपच्या नेत्यांच्या नाराजीवर त्यांनी उत्तर दिलं. महायुतीत एकामागून एक पक्षांची गर्दी झाली.
आधी एकनाथ शिंदे, नंतर अजित पवार आणि आता राज ठाकरे महायुतीत येण्याच्या मार्गावर आहेत.
या नव्या सहकाऱ्यांमुळे राजकीय संधी मिळत नसल्यानं भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी दिसतेय यावर तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला.
यावर ते म्हणाले, ‘’एखाद्याला महत्वकांक्षा असणं ठीक आहे. पण, सत्तेत येण्यासाठी युती करावी लागली हे वास्तव असून त्यासोबत जगायला शिकलं पाहिजे. युती ही निवडणुकीची गरज आहे आणि ती स्विकारायला हवी. यामुळे भाजपची मतांची टक्केवारी वाढताना दिसतेय. आधी भाजपला 16 टक्के असलेली मतांची टक्केवारी 28 टक्क्यांपर्यंत वाढली आणि आता महाराष्ट्रात 42 पर्यंत ही मतांची टक्केवारी पोहोचली. 50 टक्क्यांचा आकडा पार करायचा असेल तर नवीन मित्र बनवावे लागतील आणि तडजोड करणं गरजेचं आहे.’’











