एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश निश्चित, रावेरची गणितं बदलणार?

एकनाथ खडसे
    • Author, नितीन सुलताने
    • Role, बीबीसी मराठीसाठी

एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. स्वत: एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. खडसेंच्या भाजप प्रवेशानं आता रावरे लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीत महायुतीचं पारड जड होण्याची शक्यता आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघातून खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे यांना भाजपनं उमेदवारी दिलीय. 2014 आणि 2019 या दोनवेळा रक्षा खडसे रावेरमधून खासदार म्हणून विजयी झाल्या आहेत. तिसऱ्यांदाही भाजपनं त्यांनाच तिकीट दिलंय.

मात्र, खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीचा हात पकडल्यानं यंदा रावेरची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वाढली होती. मात्र, तत्पूर्वीच खडसेंनी भाजपमध्ये परतण्याची घोषणा केल्यानं रावेरच्या निवडणुकीचं गणितच बदलून गेलंय.

खडसेंचा भाजप प्रवेश निश्चित

भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्याच्या चर्चांवर एकनाथ खडसे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "माननीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन मी भाजप प्रवेशाची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मी भारतीय जनता पार्टीमध्ये, माझ्या स्वगृही जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि काही दिवसांतच दिल्लीत माझा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

"भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणीमध्ये माझं काही योगदान राहिलेलं आणि गेली अनेक वर्ष मी या पक्षात राहिलेली आहे. 40-42 वर्ष त्या घरात राहिल्यानंतर स्वाभाविकपणे त्या घराविषयीचा लगाव माझ्या मनात होता. पण काही कारणांसाठी नाराजी झाली आणि या नाराजीमुळे मी या पक्षातून बाहेर पडलो. आता माझ्या नाराजीची तीव्रता कमी झाली म्हणून मी माझ्या घरामध्ये स्वतःच परत येतोय."

खडसे पुढे म्हणाले की, "माझ्या पक्षप्रवेशाबाबत नाराजी असण्याचं काही कारण नाही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका माझी नेहमीच राहिलेली आहे. गेली चाळीस वर्ष मी जळगाव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम करत आलेलो आहे आणि माझा स्वभाव असा आहे की सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्यापासून ते अगदी मोठ्या वर्गातल्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांना सांभाळून, त्याच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याची माझी भूमिका नेहमी राहिलेली आहे.

"मला तुरुंगात जाण्याचा धाक नाही कारण मी जामिनावर आहे, मला पर्मनंट जामीन मिळालेला आहे. त्यामुळे आता केस चालेल आणिकेस चालल्यानंतर निर्णय होईल. या प्रक्रियेला आठ ते दहा वर्ष लागू शकतात त्यामुळे सध्यातरी तशी स्थिती माझ्यासमोर नाही. त्यामुळे कुणीतरी उचलून तुरुंगात टाकण्याची भीती मला नाही. त्यामुळे यासंदर्भात मी निश्चिंत आहे.

"भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या हातून दिल्लीत माझा पक्षप्रवेश होईल अशी माझी चर्चा झाली आहे."

नरेंद्र मोदी आणि रक्षा खडसे

फोटो स्रोत, Rakshatai Khadse

जळगाव जिल्ह्यात प्रामुख्यानं दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. एक म्हणजे जळगाव आणि दुसरा रावेर लोकसभा मतदारसंघ. परिसीमन आयोगाच्या शिफारसीनुसार, 2008 मध्ये रावेर या मतदारसंघाची निर्मिती झाली आहे.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातून भाजपनं खासदार रक्षा खडसे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. तर विरोधी महाविकास आघाडीचा चेहरा मात्र अद्याप स्पष्ट झालेला दिसत नाही.

जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वैर हे कोणापासूनही लपून राहिलेलं नाही.

त्यामुळं रक्षा खडसे मैदानात असल्या तरी लोकसभेचा हा सामना महाजन विरुद्ध खडसे असा रंगणार याची शक्यता आहे.

मतदारसंघाचा इतिहास

रावेर लोकसभा मतदारसंघ हा जळगाव मतदारसंघातून निर्मिती करण्यात आलेला मतदारसंघं आहे. परिसीमन आयोगानं 2008 मध्ये या मतदारसंघाची निर्मिती केली.

नव्यानं निर्माण करण्यात आलेल्या या मतदारसंघात जळगावमधील चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर आणि मुक्ताईनगर या पाच तर बुलडाण्यातील मलकापूर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला.

रक्षा खडसे, गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, रक्षा खडसे, गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे

मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून म्हणजे 2009 पासून इथं भाजपचाच खासदार राहिलेला आहे. 2009 मध्ये हरिभाऊ जावळे तर 2014 आणि 2019 मध्ये एकनाथ खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसे इथून खासदार बनल्या.

त्यापूर्वी जळगाव मतदारसंघात समावेश असताना इथं सुरुवातीला काँग्रेसचंही वर्चस्व पाहायला मिळालं. पण 1998 मध्ये उल्हास पाटलांनंतर इथं काँग्रेसला विजय मिळवण्यात यश आलेलं नाही.

तसं पाहता या मतदारसंघामध्ये गेल्या 25 वर्षांमध्ये भाजपचंच वर्चस्व पाहायला मिळालेलं आहे. तेव्हा खडसेंची शक्तीही भाजपच्या मागे होती. त्यामुळं या निवडणुकीत त्याचा काही परिणाम होणार का? हेही स्पष्ट होणार आहे.

2019 मध्ये काय घडलं?

रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये 2019 मध्ये भाजपनं 2014 च्या विजयानंतर पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली होती.

रक्षा खडसेंच्या विरोधात काँग्रेसनं उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली. पण एकनाथ खडसेंचा प्रचंड प्रभाव असलेल्या मतदारसंघात त्यांना रक्षा खडसेंचा पराभव करणं शक्य झालं नाही.

एकनाथ खडसे

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, एकनाथ खडसे

रक्षा खडसे यांनी निवडणुकीत डॉ. उल्हास पाटील यांचा तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला होता.

2019 च्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता तेव्हाही एकनाथ खडसे यांची पक्षावर नाराजी असल्याच्या चर्चा होत्या. पण रक्षा खडसे यांना उमेदवारी असल्यानं त्यावेळी नाराजी स्पष्टपणे दिसून आली नव्हती. परिणामी खडसेंना असलेल्या पाठिंब्याचा फायदा रक्षा खडसे आणि पर्यायानं भाजपलाही झालाच असं दिसून आलं.

एकाच कुटुंबात दोन पक्ष

राज्याप्रमाणेच गेल्या चार वर्षांमध्ये जळगाव जिल्ह्यातील राजकारणातही अनेक भूकंप आल्याचं पाहायला मिळालं आहे. शिवसेनेतील फुटीचा जिल्ह्यातील राजकारणावर परिणाम झाला. पण सर्वाधिक चर्चा झाली ती खडसेंच्या निर्णयानं.

खडसेंना विधानसभा निवडणुकीत डावलण्यात आलं. त्याचबरोबर खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांचा विधानसभा निवडणुकीत बालेकिल्ल्यात पराभव झाला. त्या पराभवानंही खडसेंची नाराजी वाढली. त्यानंतर खडसेंवर लागलेले आरोप, त्यांची चौकशी यामुळं त्यांची कटुता आणखीच वाढत गेली.

पक्षाच्या विरोधातील त्यांची नाराजी वाढत गेली आणि अखेर एकनाथ खडसेंनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला. राष्ट्रवादीतील फुटीनंतरही ते शरद पवारांसोबतच राहिले आहेत.

त्यांच्या सूनबाई आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे मात्र भाजपबरोबरच राहिल्या. त्यामुळं एकाच कुटुंबातील दोन सदस्य सत्ताधारी आणि विरोधी पक्षात असल्याचं चित्र तयार झालं.

गिरीश महाजन

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, गिरीश महाजन

मतदारसंघात गिरीश महाजन यांनी चांगलाच जम बसवल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं भाजपला हा मतदारसंघ राखण्याचा विश्वास आहे. तसंच याठिकाणी मोठं आव्हान वाटणारे काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांना पक्षात आणण्यात भाजपला यश आलं आहे.

डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांच्या कन्या केतकी पाटील यांच्यासाठीदेखिल चांगलीच तयारी सुरू केली होती. पण ते आव्हान भाजपनं युक्तीनं मोडून काढलं आहे.

एकूणच ठाकरे गटातील विष्णू बंगाळे, सुनील बंगाळे आणि शरद पवार गटाच्या रवींद्र भैय्या पाटील यांच्याशिवाय दुसरे चेहरे सध्या तरी विरोधात दिसत नसल्याचं चित्र आहे. पण एक चर्चा रोहिणी खडसेंच्या नावाचीही होती.

निर्णायक मुद्दे कोणते?

एकनाथ खडसेंनी लोकसभा निवडणूक लढवावी असा शरद पवारांचा आग्रह होता. खडसेंकडून सुरुवातीला त्याबाबत उत्साहदेखील दाखवण्यात आला होता.

भाजप रक्षा खडसेंऐवजी उमेदवार बदलणार अशा शक्यता असल्यानं कदाचित खडसे उत्साही असतील. पण भाजपनं रक्षा खसडेंची उमेदवारी जाहीर करत चेकमेट करणारी चाल खेळली. त्यामुळं खडसेंनी आजारपणाचं कारण देत निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलंय.

खडसेंनी त्यांच्या कन्या रोहिणी खडसेही निवडणुकीत उतरणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळं बारामतीप्रमाणं नणंद भावजयी आमने-सामने येण्याच्या शक्यताही फेटाळल्या गेल्या आहेत. त्यामुळं आता हा मुद्दा निकाली निघाल्यानं उमेदवार कोण याचीच चर्चा सुरु आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, getty images

केळी हे या भागातील प्रमुख पीक आहे. त्यामुळं केळीचा भाव, केळीच्या पिकविम्याचा मुद्दा आणि केळी प्रक्रिया उद्योगांकडं दुर्लक्ष हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. मतदारसंघातील सर्वाधिक मतदार ग्रामीण भागातला असल्यानं हा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरू शकतो.

त्याचबरोबर लेवा पाटील समाजाची मतंदेखील या मतदारसंघात महत्त्वाची ठरतात. या समाजाचा एकनाथ खडसेंचा पाठिंबा होता. पण आता हा समाज विखुरला असल्याचं अभ्यासकांचं निरीक्षण आहे. त्यामुळं या निवडणुकीत मतदानाचा ट्रेंडही महत्त्वाचा ठरणार आहे.

एकूणच या मतदारसंघामध्ये एकनाथ खडसे यांचा प्रभाव असल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्यावेळी ते भाजपबरोबर होते तर आता विरोधात आहेत. उमेदवार सूनबाई असल्यानं हा विरोध मतांमध्ये दिसणार का? असा प्रश्न उपस्थित होतो.

त्याचबरोबर खडसे विरोधात असले तरी त्यांचे राजकीय वैरी गिरीश महाजन यांनी मात्र मतदारसंघावर पकड मिळवल्याचं दिसतंय. त्यामुळं हे दोघं थेटपणे लोकसभेच्या रिंगणात नसले तरी ही लढतही खडसे विरुद्ध महाजन या अस्तित्वासाठीची असणार हे स्पष्टच आहे.