लोकसभा निवडणूक 2024 तारखा : महाराष्ट्रात कोणत्या दिवशी होणार मतदान?

मतदार महिला

फोटो स्रोत, Getty Images

देशभरात 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पार पडतील. 4 जूनला मतमोजणी होईल.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी (16 मार्च) लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्तांनी हे वेळापत्रक जाहीर केलं.

निवडणुका

लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील.

  • पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल.
  • दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल.
  • तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल.
  • चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल.
  • पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल.
  • सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल.
  • सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल.
निवडणूक वेळापत्रक

पहिला टप्पा, 19 एप्रिल

पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान निकोबार, जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीमध्ये एकूण 102 जागांवर मतदान होणार आहे.

दुसरा टप्पा, 26 एप्रिल

दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर अशा एकूण 89 जागांवर मतदान होईल.

तिसरा टप्पा, 7 मे

तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, दादरा नगर हवेली आणि दमनदीव मधील एकूण 94 जागांवर मतदान होणार आहे.

चौथा टप्पा, 13 मे

चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी आंध्रप्रदेश, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीरमधील एकूण 96 जागांवर मतदान होणार आहे.

पाचवा टप्पा, 20 मे

पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर आणि लडाखमधील 49 जागांवर मतदान होणार आहे.

सहावा टप्पा, 25 मे

सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी बिहार, हरियाणा, झारखंड, ओडिशा, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि दिल्ली मधील एकूण 57 जागांवर मतदान होणार आहे.

सातवा टप्पा, 1 जून

सातव्या टप्प्यात 1 जून रोजी बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पंजाब, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि चंदीगडमधील एकूण 57 जागांवर मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात कधी होणार निवडणुका?

महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.

गेल्या वेळेस राज्यात चार टप्प्यांत निवडणुका झाल्या होत्या.

निवडणुका

महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात होणार मतदान

  • पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
  • दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
  • तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
  • चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
  • पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

चार राज्यांत विधानसभा निवडणुका

चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं.

अरुणाचल प्रदेश- 19 एप्रिलला विधानसभेसाठी मतदान होईल.

ओडिसा- दोन टप्प्यांत मतदान होणार असून 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होईल.

निवडणूक आयोगाची संपूर्ण पत्रकार परिषद तुम्ही इथे पाहू शकता-

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

आयोगाच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे-

  • 97 कोटी मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील, असं राजीव कुमार यांनी सांगितलं.
  • 1.82 कोटी मतदार हे या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावतील.
  • 21 ते 31 वयोगटातील मतदारांची संख्या सुमारे 19 कोटी 70 लाख आहे.
  • 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 82 लाख असून दिव्यांग मतदारांची संख्या सुमारे 88 लाख आहे. त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
  • हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत, राजस्थानच्या वाळवंटापासून अरुणाचलच्या जंगलापर्यंत सर्व ठिकाणी मतदान केंद्र तयार आहेत.
  • 85 वर्षांवरील मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेतलं जाईल.
  • 12 डी हा अर्ज पाठवून मतदान घेतलं जाईल. ही प्रणाली देशात प्रथमच लागू होणार आहे. 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असेल तर मतदार यासाठी अर्ज करू शकतात.
  • ज्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे त्यांना तीन वेळा वर्तमानपत्रात जाहिरात द्यावी लागेल. गुन्हेगार उमेदवाराबाबत पक्षांना स्पष्टीकरण द्यावं लागेल.
  • नो युअर कँडिडेट (Know Your Candidate) या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या उमेदवारांबद्दल माहिती मिळेल.

आदर्श आचारसंहिता अस्तित्वात कशी आली?

ज्या वेळी निवडणूक जाहीर होते तेव्हापासून आचारसंहिता लागू होते. म्हणजे 16 मार्चपासून या लोकसभा निवडणुकींची आचारसंहिता लागू झाली आहे.

आदर्श आचारसंहिता म्हणजे निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांनी कसं वागावं कसं वागू नये याची मार्गदर्शक तत्त्वं.

1960 मध्ये केरळ राज्यात विधानसभेच्या निवडणुकावेळी निवडणूक आयोगाने पक्ष आणि उमेदवारांना वर्तणुकीसंदर्भात काही सूचना दिल्या. 1962मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी नोंदणीकृत पक्षांना ही मार्गदर्शक तत्त्वं पुरवण्यात आली आणि राजकीय पक्षांनी ही मार्गदर्शक तत्त्वं स्वीकारावी, अशी विनंती करण्यात आली.

मतदार

फोटो स्रोत, ANI

राजकीय पक्षांनी ही तत्त्वं स्वीकारली. या निवडणुकीत या मार्गदर्शक तत्त्वांचं बहुतांशरीत्या पालन झालं, असं दिसल्यानंतर पुढच्या निवडणुकीत म्हणजेच 1967ला पुन्हा मार्गदर्शक तत्त्वं जारी करण्यात आली, अशी माहिती PRS इंडिया या संस्थेच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

1979 मध्ये मार्गदर्शक तत्त्वांमध्ये महत्त्वाचं प्रकरण समाविष्ट करण्यात आलं. सत्तेत असलेल्या पक्षाला निवडणुकीच्या प्रचारात फायदा होऊ नये, यासंदर्भात नियमावली तयार करण्यात आली.

पक्षाच्या जाहीरनाम्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करावा, असा आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला 2013मध्ये दिला. त्याची परिणती आपल्याला 2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी पाहायला मिळाली