अहमदनगर लोकसभा निकाल : निलेश लंकेनी बिघडवलं भाजपचं गणित, सुजय विखेंना 28 हजारांवर मतांनी हरवले

- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठीसाठी
पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार असलेल्या अहमनगर लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश लंके यांनी सुजय विखेंना पराभूत केलं आहे.
नीलेश लंकेंनी 6 लाख 24 हजार 797 मतं मिळवली तर सुजय विखे पाटील यांना 5 लाख 95 हजार 868 मते मिळाली. 28 हजार 929 मतांच्या फरकानं नीलेश लंकेंनी विजय मिळवला आहे.
अहमदनगर जिल्हा दोन लोकसभा मतदारसंघामध्ये विभागला गेला आहे. दक्षिण आणि उत्तर असे याचे विभाग आहेत. यात दक्षिण हा अहमदनगर म्हणून ओळखला जातो.
राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांमुळे कायमच या मतदारसंघाची चर्चा पाहायला मिळत असते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही शरद पवारांनी लंकेंच्या रुपानं तगडा उमेदवार दिल्यानं पुन्हा इथं विखे-पवार संघर्ष पाहायला मिळाला. त्यात पवारांच्या उमेदवारानं विजय मिळवला.
अहमदनगर मतदारसंघाचा इतिहास कसा राहिलाय?
अहमदनगरचं नाव काढलं की गडाख, विखे, थोरात, जगताप अशा घराण्यांची नावं आणि राजकारण डोळ्यासमोर उभं राहिल्याशिवाय राहत नाही. या नावांच्या भोवतीच या मतदारसंघाचा इतिहास मोठ्या प्रमाणात फिरत राहिल्याचं पाहायला मिळालं आहे.
1952 पासून ते 1996 पर्यंत हा मतदारसंघ पूर्णपणे काँग्रेसचा बालेकिल्ला होता. इतर कोणत्याही पक्षाला याठिकाणी अस्तित्व निर्माण करण्यात फारसं यश आलं नाही. यशवंतराव गडाख याठिकाणी सलग तीन वेळा खासदार राहिले.
पण 1998 मध्ये युतीत असलेल्या शिवसेनेकडून निवडणूक लढवत बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. त्यानंतर भाजकडून दिलीप गांधींनीही तीन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.
विधानसभा निहाय विचार करता याठिकाणी शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी 4 राष्ट्रवादी काँग्रेसचे तर 2 भाजपचे आमदार आहेत.

अनेक घराण्यांचं राजकीय वजन पाहता या मतदारसंघामध्ये घराणेशाही आणि त्यातून होणारे पाय खेचण्याचे प्रकार यामुळं कायम वेगळी आणि धक्कादायक समीकरणं पाहायला मिळाली आहेत.
त्यांचा राज्याच्या राजकारणावर परिणाम होतोच, पण जिल्ह्यालाही फटका बसत असल्याचं पाहायला मिळतं.
विठ्ठलराव विखे पाटील त्यानंतर बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे आणि आता सुजय विखे अशा चार पिढ्यांनी या मतदारसंघाच वर्चस्व राखलं आहे. पण आता विखेंच्या वर्चस्वाच्या विरोधात त्यांचे सर्व विरोधक एकत्र येऊन त्यांना नामोहरम करणार का हे या निवडणुकीतून समोर येणार आहे.
2019 मध्ये भाजपने भाकरी फिरवली
नरेंद्र मोदींच्या पाच वर्षांच्या सत्तेनंतर 2019 च्या निवडणुकीला सामोरं जाताना भाजपनं अनेक मतदारसंघांमध्ये भाकरी फिरवली होती. त्यापैकी एक मतदारसंघ होता अहमदनगर.
अहमदनगरमधून 2009 आणि 2014 मध्ये सलग दोन वेळा भाजपचेच दिलीप गांधी विजयी झाले होते. त्याच्या आधी 1999 मध्येही गांधी खासदार बनले होते. पण 2019 मध्ये भाजपनं त्यांना उमेदवारी नाकारली.

फोटो स्रोत, Dr Sujay Vikhe Patil/Facebook
भाजपनं 2019 मध्ये उमेदवार बदलत काँग्रेसमधून आलेल्या सुजय विखे पाटील यांना याठिकाणची उमेदवारी दिली. मतदारसंघात विखेंच्या वर्चस्वाचा त्यांना फायदा झाला. त्यामुळं संग्राम जगताप यांचं अव्हान मोडून काढत सुजय विखेंनी सुमारे तीन लाखांच्या मताधिक्यानं विजय मिळवला.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी असली तरी विखेंच्या कुटुंबातील उमेदवारामुळं अनेक मतं त्यांच्या बाजुनं वळली आणि त्यामुळं भाजपला साहजिकच फायदा झाला. गांधींच्या सतत 10 वर्षांच्या खासदारकीच्या विरोधातील नाराजीमुळं होणारं नुकसान टाळण्यात त्यामुळं भाजपला यश आलं.











