जालना लोकसभा निकाल : काँग्रेसच्या कल्याण काळेंकडून रावसाहेब दानवे पराभूत

फोटो स्रोत, FACEBOOK
- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठीसाठी
जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी विद्यमान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पराभूत केले आहे.
काळे यांना 6,07,897 मतं मिळाली तर दानवे यांंना 4,97, 939 मतंं मिळाली. कल्याण काळे हे एक लाख मताधिक्याने जिंकले आहेत.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) नंतर सर्वाधिक चर्चेत आणि लक्ष लागून असलेला मतदारसंघ म्हणजे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघ होता.
इथून सलग पाचवेळा खासदार राहिलेल्या दानवेंना भाजपनं पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरवलं होतं. तर काँग्रेसनं कल्याण काळे यांना उमेदवारी दिली होती.
1957 मध्ये स्वातंत्र्यसंग्रामातील आणि काँग्रेसचे नेते बद्रुद्दिन तय्यबजी यांचे नातू सैफ तय्यबजी या मतदारसंघातून निवडून आले होते. तय्यबजी हे उच्चविद्याविभूषित होते. ते गणितज्ञ, सांख्यिकीतज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ होते.
निवडून आल्यानंतर काही महिन्यातच त्यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक झाली होती आणि तेव्हा पासून हा मतदारसंघ स्थानिक नेत्यांच्याच हातात राहिला आहे.
इतिहासात डोकावून पाहिलं तर जालना मतदारसंघानं 90 च्या दशकापर्यंत काँग्रेस आणि त्यानंतरच्या काळात भाजपचं वर्चस्व अनुभवल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतं.
काँग्रेसनं या मतदारसंघातून सात खासदार दिले आहेत. त्यानंतर भाजपकडून उत्तमसिंग पवार आणि त्यानंतर सातत्यानं 25 वर्षं रावसाहेब दानवे हेच खासदार राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं.
काँग्रेसचे बाबूराव काळे, बाळासाहेब पवार आणि अंकुशराव टोपे असे मराठवाड्यातील अनेक मोठे नेते जालन्याचे खासदार राहिलेले आहेत.

उत्तमसिंग पवारांनी सलग दोन टर्म खासदारकी मिळवत हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यातून खेचला, तो नंतर काँग्रेसला परत मिळवताच आला नाही. 1999 ते 2019 अशा सलग 5 निवडणुका रावसाहेब दानवे जिंकले असून यावेळीही पक्षानं त्यांना उमेदावारी दिलेली आहे.
रावसाहेब दावने यांनी यापूर्वीच्या दोन निवडणुकांत काँग्रेसच्या विलास औताडे यांना सहज पराभूत केल्याचं दिसून आलं. पण 2009 मध्ये मात्र कल्याण काळे यांनी दानवेंना घाम फोडला होता. अगदी थोड्या फरकानं दानवे यावेळी विजयी झाले होते.
काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांचं ठळकपणे अस्तित्व दिसत असलेल्या या मतदारसंघांमध्ये जवळपास गेल्या चार दशकांत भाजपनं मतांच्या राजकारणात बाजी मारल्याचं पाहायला मिळालं आहे.
2019 ला काय घडलं
2019 च्या लोकसभा निवडणुकांचा विचार करता महाराष्ट्रात युती विरुद्ध आघाडी अशी निवडणूक लढली गेली होती. त्यावेळी भाजपचे रावसाहेब दानवे युतीचे तर काँग्रेसचे विलास औताडे आघाडीचे उमेदवार होते.
जालना लोकसभा मतदारसंघामध्ये त्यावेळी शिवसेनेत असलेले अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातला वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळालं होतं. खोतकरांनी दानवेंच्या विरोधात निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी सुरू केली होती.

अर्जुन खोतकरांनी पूर्ण शक्ती पणाला लावली. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत खोतकरांची समजूत काढली. त्यानंतर त्यांनी माघार घेतली होती.
त्यामुळं दानवेंना या निवडणुकीत सहज विजय मिळवणं सोपं गेलं होतं. रावसाहेब दानवेंनी या निवडणुकीत औताडे यांचा तब्ब्ल सव्वा तीन लाखांच्या मताधिक्यानं पराभव केला होता.
या सलग पाचव्या विजयानंतर रावसाहेब दानवे यांच्या गळ्यात पुन्हा मंत्रिपदाची माळही पडली होती. त्यामुळं दानवेंच्या रुपानं जालन्याला सतत पाच वर्षं केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळाली.

गेल्या चार वर्षांतली स्थिती
2019 च्या लोकसभा निवडणुकांनंतरच्या राजकीय घडामोडींनी राज्यात भूकंप आला असला तरी जालना मतदारसंघातील स्थितीवर त्याचा फारसा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं नाही.
विधानसभा मतदारसंघांचा विचार करता या लोकसभा मतदारसंघात जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण यांचा समावेश होतो. त्यात जालन्याचे कैलाश गोरंट्याल वगळता इतर पाचही आमदार सध्याच्या महायुतीचे आहेत.
एकूणच जालना लोकसभेचा विचार करता रावसाहेब दानवेंना थेट आव्हान देणारा चेहरा गेल्या चार वर्षांत समोर आल्याचं पाहायला मिळालेलं नाही.
त्याचवेळी गेल्या वर्षभरातील मराठा आंदोलनाचं केंद्र आंतरावाली सराटीच्या माध्यमातून जालना हेच राहिल्याचं पाहायला मिळालं. त्यातून एका नावाची प्रचंड चर्चा झाली ते म्हणजे मनोज जरांगे पाटील.
प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना जालन्यातून उमेदवारी देण्याची मागणी केली. बीडबाबतही त्यांच्या नावाची चर्चा झाली. पण जरांगेंनी निवडणूक आपला मार्ग नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं.
त्यानंतर कल्याण काळेंच्या रुपानं त्यांच्यासमोर आव्हान उभं करण्यात आलं होतं.











