इस्रायलच्या तुरुंगात असलेल्या भोगाव्या लागल्या 'नरक यातना,' पॅलेस्टिनी कैद्यांचा आरोप

फोटो स्रोत, Israeli Prison Service
- Author, पॉल अॅडम्स
- Role, डिप्लोमॅटिक करस्पाँडंट, जेरुसलेम
इस्रायलमधील आघाडीच्या मानवी हक्क संघटनेच्या मते इस्रायली तुरुंगात ज्या पॅलेस्टिनी नागरिकांना ठेवलं आहे त्यांची अवस्था भीषण आहे.
बीटसेलेम ने ‘वेलकम टू हेल’ नावाचा एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्यात नुकत्याच सोडलेल्या 55 कैद्यांनी त्यांची व्यथा सविस्तर मांडली आहे.
दहा महिन्यांपूर्वी गाझा युद्ध सुरू झालं तेव्हापासून आतापर्यंत तुरुंगाची परिस्थिती अधिकाधिक बिकट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांसह नुकत्याच प्रकाशित झालेल्या काही अहवालानुसार पॅलेस्टिनी कैद्यांची छळवणूक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
बीटसेलेमच्या मते त्यांच्या कथनात एकवाक्यता आहे.
“सगळ्यांनी आम्हाला वारंवार एकच गोष्ट सांगितली,” असं बीटसेलेमच्या कार्यकारी संचालक युली नोवाक म्हणाल्या.
“सततचा छळ, दैनंदिन हिंसाचार, शारीरिक आणि मानसिक हिंसाचार, अपमान, अपुरी झोप, लोकांची उपासमार झाली आहे,” नोवाक यांची निरीक्षणं टाळता येण्यासारखी नाही.
“इस्रायलची संपूर्ण व्यवस्थाच पॅलेस्टिनी लोकांसाठी छळछावणी सारखी झाली आहे,” असं ते म्हणाले.
गजबजलेले आणि घाणेरडे तुरुंग
7 ऑक्टोबर 2023 ला हमासने इस्रायलवर हल्ला केला. त्यात 1,200 इस्रायली लोकांचा आणि परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर जवळजवळ 10,000 पॅलेस्टिनी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं.
इस्रायलमधील काही तुरुंग सैन्यातर्फे चालवले जातात तर काही देशातील तुरुंग सेवेतर्फे चालवले जातात. दोन्ही तुरुंगावर या घटनेमुळे ताण आला.
तुरुंगात प्रचंड गर्दी झाली. जी कोठडी सहा लोकांसाठी तयार केली होती त्यात एक डझनापेक्षा जास्त कैद्यांना ठेवलं होतं.
बीटसेलेमच्या अहवालानुसार या तुरुंगात अतोनात गर्दी झाली. तुरुंग अतिशय गलिच्छ होते. काही कैद्यांना जमिनीवर झोपावं लागत होतं. काहींना गादी आणि ब्लँकेटसुद्धा मिळालं नाही.

या बातम्याही वाचा -
- इस्रायल-हमास संघर्ष: अमेरिकेच्या युद्धबंदी योजनेला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा पाठिंबा
- 'चमत्कारिक' रेस्क्यू ऑपरेशनमधून इस्रायलने केली हमासच्या तावडीत असलेल्या चार बंदींची सुटका
- गाझात पिण्याच्या पाण्याचे साठे आणि सांडपाण्याच्या सुविधांवर हल्ले, युद्धस्थितीत नवे संकट
- 'आमच्या तंबूजवळच्या कबरींवर कुत्री हल्ले करतात, त्यांना पाहून मुलं घाबरतात अन् मला बिलगतात'

हमासने हल्ला केल्यानंतर काही कैद्यांना लगेच ताब्यात घेण्यात आलं. इस्रायलने हल्ले तीव्र केल्यावर काहींना ताब्यात घेण्यात आलं किंवा इस्रायलमध्ये किंवा वेस्ट बँक येथे अटक करण्यात आली. काही कैद्यांवर कोणतेही दोषारोप न ठेवता त्यांना सोडून देण्यात आलं.
फिरास हसन यांना ऑक्टोबरमध्ये आधीच अटक करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणामुळे ताब्यात घेण्याचं कारण त्यांना देण्यात आलं. याच कारणासाठी अनेक पॅलेस्टिनी लोकांना अटक करण्यात आली. त्यानुसार कोणत्याही आरोपाखाली कमी अधिक प्रमाणात पण अमर्याद काळासाठी ताब्यात घेण्यात आलं.
इस्रायलच्या मते या धोरणाचा अवलंब करणं आवश्यक होतं आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला धरूनच होतं.
7 ऑक्टोबरनंतर परिस्थिती कशी बदलली हे आपल्या डोळ्यांनी बदलल्याचं त्यांनी पाहिलं आहे.
“आमचं आयुष्य पूर्णपणे बदललं.” आम्ही टुकू मध्ये भेटलो तेव्हा त्याने मला सांगितलं, बेथेलेमच्या दक्षिण भागातील वेस्टबँक भागात गावात हे गाव आहे.
'माझ्या मते ती एक त्सुनामी होती'
नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीपासूनच हसन यांची तुरुंगवारी सुरू झाली होती. पॅलेस्टेनियन इस्लामिक जिहादचे सदस्य असल्याच्या आरोपाखाली त्यांना दोनदा अटक करण्यात आली.
ही संस्था इस्रायलकडून आणि काही पाश्चिमात्य देशांकडून एक कट्टरतावादी संघटना म्हणून घोषित करण्यात आली आहे.
या संस्थेचा भाग असल्याचं सांगताना ते कोणत्याच प्रकारची लपवाछपव करत नाही. ‘मी सक्रिय होतो,’ असं ते सांगतात.
तुरुंगातल्या खडतर आयुष्याची त्यांना कल्पना होती. पण 7 ऑक्टोबर नंतर दोन दिवसांनी जे झालं त्याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती.
“आम्हाला कमीत कमी 20 अधिकाऱ्यांनी काठ्या, लाठ्या, बंदुकांनी भयंकर मारहाण केली. आमचे हात मागे बांधले, आमच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती आणि अमानुष मारहाण केली. माझ्या चेहऱ्यावरून रक्त येत होतं. ते मला 50 मिनिटं मारत होते. मी त्यांना डोळ्यावर बांधलेल्या पट्टीच्या खालून बघितलं. आम्हाला मारहाण करत असल्याचा ते व्हीडिओ तयार करत होतो,” फिरास हसन सांगतात.

हसन यांना शेवटी एप्रिलमध्ये कोणताही आरोप निश्चित न करता सोडून देण्यात आलं. त्यावेळी त्यांचं वजन 20 किलोने कमी झालं होतं.
त्यांना ज्या दिवशी सोडण्यात आलं त्या दिवशीच्या व्हीडिओत हसन यांची कृश शरीरयष्टी दिसून येते.
“मी 13 वर्षं तुरुंगात घालवली आहेत. मात्र असा अनुभव कधीही घेतला नाही,” असे बीटसेलेमच्या संशोधकांना त्यांनी सांगितलं.
गाझा येथील पॅलेस्टिनीच नाही तर वेस्ट बँकमधील लोकांना सुद्धा इस्रायलच्या तुरुंगात छळाला सामोरं जावं लागलं.
सारी खुरिया हे इस्रायलमध्ये राहणारे अरब वकील आहे. ते इस्रायलचे नागरिक आहे. त्यांच्याबरोबरही असाच प्रकार झाल्याचं त्यांनी सांगितलं.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तर इस्रायलच्या मेगिदो तुरुंगात त्यांना डांबण्यात आलं होतं. हमासच्या कृत्याचं त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उदात्तीकरण केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या आरोपाचं तातडीने खंडन करण्यात आलं होतं.
मात्र तुरुंगाच्या अनुभवाने ते खचून गेले. “त्यांचं डोकं फिरलं होतं.” तुरुंगातल्या अनुभवावर ते बोलत होते.
'आत कोणताच कायदा किंवा सुव्यवस्था नव्हती'
खुरिया सांगतात की त्यांचा अतिशय वाईट छळ नाही झाला. पण इतरांचा जो छळ झाला त्यामुळे ते हादरून गेले.
“ते लोकांना उगाच मारत होते. कैदी लोक किंचाळत होते. आम्ही काही केलेलं नाही, आम्हाला मारू नका असं ते म्हणत होते,” खुरिया सांगत होते.
इतर कैद्यांशी बोलल्यावर त्यांना कळलं की ते जे काही पाहताहेत ते सामान्य नाही.
“7 ऑक्टोबरच्या आधी फार चांगली वागणूक द्यायचे अशातला भाग नाही. मात्र त्यानंतर चित्रच बदललं.”
टोरा बोरा नावाची एक कोठडी आहे. तिथे त्यांना काही काळ एकांतवासाची शिक्षा देण्यात आली होती. अफगाणिस्तानच्या गुहेवरून हे नाव देण्यात आलं आहे. खुरिया सांगतात की एका कैद्याला बेदम मारहाण करण्यात आली. तो कैदी वैद्यकीय मदत मिळावी म्हणून किंचाळताना मला ऐकू येत होतं. खुरिया यांच्या मते डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो मेला.
गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांनी सादर केलेल्या एका अहवालानुसार इस्रायल प्रिझन सर्व्हिस (IPS) आणि अन्य तुरुंग संघटनांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 7 ऑक्टोबर ते 15 मे या कालात इस्रायलच्या ताब्यात असलेल्या 17 पॅलेस्टिनी कैद्यांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायलच्या मिलिट्री वकिलांनी 26 मे ला सांगितलं की ते लष्कराच्या ताब्यात असलेल्या 35 गाझा सैनिकांच्या मृत्यूची चौकशी करत आहेत.

खुरिया यांना काही काळानंतर त्यांच्यावर कोणताही आरोप न लावता सोडून दिल्यानंतरही तुरुंगात त्यांनी नक्की काय अनुभवलं याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
“मी इस्रायली आहे. मी वकील आहे. मी तुरुंगाच्या बाहेरचं जग पाहिलं आहे. आता मी आत आहे, आता मी वेगळं जग पाहतोय.”
त्यांचा नागरिकत्वावरचा, कायद्यावरचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे. “त्या अनुभवानंतर मी कोसळून गेलो,” ते सांगतात.
लोकांनी केलेल्या या दाव्याबद्दल बीबीसीने प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. लष्कराने या आरोपांचं खंडन केलं.
'तुरुंगात असताना अयोग्य वागणूक किंवा तुरुंगातील परिस्थिती याबद्दलच्या तक्रारी आम्ही लष्करात तक्रार निवार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडे दिल्या जातात. ते लोक योग्य ती कारवाई करतात', असं लष्कराने सांगितलं.
पॅलेस्टिनी कैद्यांनी केलेल्या दाव्याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही असे त्यांनी सांगितले. आमच्या माहितीप्रमाणे असं काही झालं नाही असं ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय कायद्यातील तरतूदीप्रमाणे इस्रायलने 7 ऑक्टोबर पासून ‘इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस’ या संघटनेला पॅलेस्टिनी कैद्यांना भेटण्यास परवानगी नाकारली आहे.
ही परवानगी का नाकारली याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र त्याचवेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यन्याहू यांनी गाझा मधील इस्रायलच्या कैद्यांना भेटता न आल्याची याच संस्थेकडे वारंवार तक्रार केली होती.
‘असोसिएशन ऑफ सिविल राइट्स इन इस्रायल’ या संस्थेने सरकारवर जाणून आंतरराष्ट्रीय कायदा मोडत असल्याचा आरोप लावला.

गेल्या आठवड्यात पॅलेस्टिनी कैद्यांना दिलेल्या वागणुकीमुळे जनतेमध्ये संतापाची भावना पसरली.
कडव्या उजव्या विचारसरणीच्या लोकांनी ज्यात इस्रायलच्या खासदारांचाही समावेश होता. त्यांनी सैनिकांची अटक थांबवण्याचा प्रयत्न केला. या सैनिकांवर गाझा येथील कैद्यांवर डे तीमन मिलिटरी बेस येथे पॅलेस्टिनी कैद्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.
जे लोक हे आंदोलन करत होते ते इस्रायलचे संरक्षण मंत्री इतमार बेन वीर यांचे समर्थक होते. तेच इस्रायलच्या तुरुंगसेवेचे प्रमुख आहेत.
त्यांच्या देखरेखीखाली पॅलेस्टिनी कैद्यांची अवस्था आणखी बिकट झाल्याचे संरक्षण मंत्र्यांनी वारंवार गर्वाने सांगितलं आहे.
“आम्ही ही सगळी परिस्थिती बदलली याचा आम्हाला अभिमान वाटतो,” असं त्यांनी इस्रायलमधील संसदेच्या अधिवेशनात सांगितलं.

फोटो स्रोत, CHANNEL 4
आता या तक्रारींनंतर कारवाई करण्याची मोठी जबाबदारी संरक्षणमंत्र्याची आहे असं बीटसेलेमचं म्हणणं आहे.
“अतिशय कडव्या उजव्या विचारसरणीच्या आणि इस्रायलमधील आतापर्यंत सर्वांत जास्त कडव्या व्यक्तीच्या हातात ही सूत्रं गेली आहेत.” असं युली नोवाक यांनी आम्हाला सांगितलं.
7 ऑक्टोबरला जे झालं त्यानंतर कैद्यांना जी वागणूक मिळाली ते इस्रायलच्या नैतिक अध:पतनाचं द्योतक आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
“हा धक्का आणि ही चिंता तुमच्याबरोबर रोज राहते,” त्या म्हणतात.
“या गोष्टी आपल्याला अमानवी बनवत आहेत. यातून माणूसपण कुठेच दिसत नाहीये. हीच खरी शोकांतिका आहे.” असं त्या पुढे म्हणतात.











