'चमत्कारिक' रेस्क्यू ऑपरेशनमधून इस्रायलने केली हमासच्या तावडीत असलेल्या चार बंदींची सुटका

- Author, अॅलेक्स थिरिन आणि हयुगो बाचेगा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
इस्रायलनं हमासच्या कैदेतून त्यांच्या चार बंदींची सुटका केली आहे. या बंदींना सोडवण्यासाठी इस्रायलच्या लष्करानं खास ऑपरेशन सुरू केलं होतं.
पॅलिस्टिनी अधिकाऱ्यांच्या मते बंदींना सोडवण्यासाठी इस्रायलकडून करण्यात आलेल्या या कारवाईत अनेक नागरिक मारले गेले होते.
हमासच्या कैदेत असलेल्या या इस्रायली नागरिकांची सुटका केल्यानंतर ते शनिवारी कुटुंबीयांना भेटले.
नोआ अरगामनी ( 27), अलमोग मीर (22), अँड्रेई कोझलोव्ह (27) आणि सलोमी झीव (41) यांची शनिवारी सुटका करण्यात आली.
या सर्व इस्रायली नागरिकांचं हमासनं 7 ऑक्टोबरला नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलमधधून अपहरण केलं होतं.
इस्रायलच्या लष्करानं या बंदींना सोडवण्यासाठी जी मोहीम सुरू केली होती, ती अत्यंत ‘जोखमीची आणि गुंतागुंतीची’ होती असं सांगितलं.
या ऑपरेशनदरम्यान नुसरत परिसरात इस्रायलच्या सैनिकांचा हमासच्या सदस्यांबरोबर बराच संघर्ष झाला. इस्रायलच्या सैनिकांनीही हवाई हल्ल्याचीही मदत घेतली.
पॅलिस्टिनी अधिकाऱ्यांच्या मते या ऑपरेशनमध्ये मोठ्या संख्येनं लोक मारले गेले आहेत.
गाझामधील दोन रुग्णालयं अल-अक्सा आणि अल-अवदा रुग्णालयानं त्यांनी 70 मृतदेह मोजले आहेत असं सांगितलं.
तर अल-नुसरतमधील आश्रय छावणीच्या आसपास झालेल्या इस्रायलच्या हल्ल्यात 210 लोक मारले गेले आहेत असं, हमास प्रशासनाच्या माध्यम कार्यालयानं म्हटलं आहे.
दुसरीकडं इस्रायलच्या लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांच्या मते, हल्ल्यात 100 लोक मारले गेले असावेत.
या परिसरांमधले जे फोटो समोर येत आहेत त्यात प्रचंड बॉम्बहल्ले झाल्याचे पुरावे पाहायला मिळत आहेत. रुग्णालयांनी त्यांच्याकडं मृतदेह आणि जखमींची गर्दी झाल्याचं सांगितलं आहे. त्यात लहान मुलांचाही समावेश होता.
ही संख्या एवढी जास्त होती की, जखमींवर उपचार करण्यात त्यामुळं अडचणी निर्माण झाल्या. इतर काही फोटोंमध्ये लोक त्यांच्या नीकटवर्तीयांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळालं.
'अचूक गोपनीय माहितीच्या आधारे राबवले ऑपरेशन'
इस्रायलच्या लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी हे ऑपरेशन अत्यंत अचूक अशा गोपनीय माहितीच्या आधारे राबवण्यात आलं होतं, असं सांगितलं. त्याद्वारे बंदींना नुसरतमध्ये दोन वेग-वेगळ्या इमारतींमधून सोडवण्यात आलं.
या ऑपरेशनमध्ये इस्रायलच्या लष्कराचा एक सैनिक जखमी झाला होता. नंतर त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

फोटो स्रोत, REUTERS
सोडवण्यात आलेले सर्व बंदी सुखरूप असल्याचं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं. फोटोंमध्ये ते त्यांच्या कुटुंबीयांबरोबर भेटी घेत असल्याचं पाहायला मिळालं.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या ऑपरेशनबद्दल लष्कराचं कौतुक केलं आहे.
हे ऑपरेशन ‘अत्यंत शिताफीनं आणि धाडसानं’ राबवण्यात आलं, असं ते म्हणाले.
"आम्ही जीवंत असो वा मृत शेवटच्या बंदींपर्यंत सर्वांना सोडवू," असं ते म्हणाले.
संरक्षण मंत्री योवाव्ह गॅलेंट यांनी हे ऑपरेशन राबवणाऱ्या जवानांना हमासच्या प्रचंड गोळीबाराचा सामना करावा लागला, असं सांगितलं.
सोडवलेल्या बंदींमध्ये कुणाचा समावेश?
बंदींमध्ये नोआ अरगामनी (चिनी वंशाचे इस्रायली) यांचं 7 ऑक्टोबरला नोव्हा फेस्टिव्हलमधून अपहरण करण्यात आलं होतं. त्यांना दुचाकीवर बसवून नेलं जात असताना त्या 'मला मारू नका, मला मारू नका' असं ओरडत होत्या.
तसचं कोझलोव्ह रशियाचे असून ते 2022 मध्ये इस्रायलला आले होते. झीव हेदेखिल रशियाचे आहेत. ते दोघं फेस्टिव्हलमध्ये सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. त्याचवेळी त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं.
मीर जान अपहरणाच्या दुसऱ्या दिवशी एका मोठ्या टेक कंपनीमध्ये काम सुरू करणार होते.
बंदींच्या कुटुंबीयांच्या संघटनेनं हा चमत्कारिक विजय असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी इस्रायलच्या लष्कराचे या धाडसी ऑपरेशनसाठी आभारही मानले आहेत.

फोटो स्रोत, REUTERS
त्याचवेळी हमासच्या ताब्यातून अजूनही 120 बंदींना परत आणायचं असल्याची आठवणही त्यांनी इस्रायलच्या लष्कराला करून दिली.
तसंच जीवंत असलेल्या बंदींचं योग्यप्रकारे पुनर्वसन आणि मृतांचे अंत्यविधी करायचे असल्याचंही ते म्हणाले.
इस्रायलमध्ये एकीकडं बंदींच्या सुटकेमुळं जल्लोष सुरू आहे. त्याचवेळी ज्या भागामध्ये ही मोहीम राबवण्यात आली, त्या भागातील मृत्यू, मृतदेह आणि विध्वंसाचे फोटो समोर येत आहेत.
बीबीसी व्हेरिफायच्या माहितीनुसार, इस्रायलनं सेंट्रल गाझामध्ये अनेक ठिकाणांवर हल्ले केले असल्याचं समोर आलं आहे.
पण सर्वात मोठा हल्ला नुसरतवर झाला आहे. लष्कराने सोडवलेल्या बंदींना याठिकाणीच ठेवण्यात आलं होतं.
अल-अक्सा रुग्णालयाकडून जारी करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये रुग्णालयाच्या फरसीवर जखमी पडलेले दिसत आहेत. त्याचबरोबर मोठ्या संख्येनं जखमी रुग्णालयात येत आहेत.
या वर्दळ असलेल्या भागातील जवळपास 400 जण जखमी असल्याचं हमासच्या सरकारी माध्यमानं म्हटलं आहे.
जगभरातील नेत्यांनी काय म्हटले?
पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष मेहमूद अब्बास यांनी याबाबत संयुक्त राष्ट्रांचं अधिवेशन तातडीनं बोलण्याची विनंती केली आहे.
त्यांच्या मते, या सत्रात अल-नुसरत आणि आसपासच्या परिसरात ‘इस्रायलच्या लष्कराकडून सुरू असलेल्या नरसंहारावर’ चर्चा व्हायला असावी.
युरोपियन युनियनच्या परराष्ट्र प्रकरणांचं प्रतिनिधी जोसफ बोराल यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली. "गाझामधून आणखी एका नरसंहाराची धक्कादायक माहिती येत आहे. आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो. हे लगेचच थांबायला हवे."

फोटो स्रोत, GETTY IMAGES
इस्रायल आणि हमास यांच्यात शस्त्रसंधी आणि बंदींना सोडवण्यासाठी कराराचे प्रयत्न सुरू असताना बंधकांना सोडवण्यासाठीचं हे ऑपरेशन राबवण्यात आलं.
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी कराराची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती करण्यात आली होती. पण कट्टरतावादी लोकांच्या मते, बंदींना सोडवण्यासाठी लष्करी कारवाई हा एकमेव मार्ग आहे.
शनिवारी राबवण्यात आलेलं ऑपरेशन इस्रायलच्या सर्वांत यशस्वी ऑपरेशनपैकी एक असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं दबावात असलेल्या नेतन्याहूंसाठी पुढची समीकरणं सोपी झाल्याचं म्हटलं जात आहे.
यादरम्यान, इस्रायलचे युद्धमंत्री बॅनी गांझ यांनी शनिवारी प्रेस कॉन्फरन्स रद्द केली होती.
गांझ राजीनामा देणार अशी चर्चा होती. नेतन्याहूंनी आठ जूनपर्यंत गाझासंदर्भातील युद्धानंतरच्या योजनेला मंजुरी दिली नाही तर राजीनामा देण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
इस्रायल अटी लादू शकत नाही - हमास
दरम्यान, नुसरत छावणीच्या जवळच्या परिसरातून बंदींना सोडवण्याच्या वृत्ताचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रो आणि जर्मन चान्सलर ओलाफ सोल्ज यांनी स्वागत केलं आहे.
तर नुसरतमध्ये इस्रायलच्या कारवाईचं उत्तर देताना हमासचे राजकीय नेते इस्माइल हानिया यांनी इस्रायल हमासवर अटी लादू शकत नाही, असं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
पॅलिस्टिनींच्या सुरक्षेबाबत खात्री होत नाही, तोपर्यंत हमास शस्त्रसंधीसाठी तयार होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
गेल्यावर्षी 7 ऑक्टोबरला हमासच्या हल्ल्यात 1200 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 251 जणांना बंदी बनवण्यात आलं होतं.
या बंदींपैकी 116 जण अजूनही पॅलिस्टाईनमध्ये कैदेत आहेत. लष्करानं 41 जणांचा मृत्यू झाल्याचंही म्हटलं आहे.
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या करारानुसार हमासनं एका आठवड्याच्या शस्त्रसंधीच्या मोबदल्यात 105 बंदींना सोडलं होतं. इस्रायलच्या तुरुंगात अजूनही 240 पॅलिस्टिनी कैदेत आहेत.
शनिवारी हमास संचालित आरोग्य मंत्रालयानं गाझामध्ये मृत्यू होणाऱ्यांचा आकडा 36,801 वर पोहोचला आहे.











