हे आहेत हमासचे प्रमुख नेते, जाणून घ्या त्यांच्या कार्यपद्धतीविषयी

डावीकडून: मारवान इसा, खालिद मेशाल, महमूद झहर, येहिया सिनवार, इस्माईल हानिये, मोहम्मद देईफ
फोटो कॅप्शन, डावीकडून: मारवान इसा, खालिद मेशाल, महमूद झहर, येहिया सिनवार, इस्माईल हानिये, मोहम्मद देईफ
    • Author, लिना अल्शावाबकेह
    • Role, बीबीसी न्यूज

गाझामधून हमासनं इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वांत महत्त्वाकांक्षी आणि भयानक हल्ला करून इस्रायलला मोठा धक्का दिला होता. हा हल्ला इतक्या मोठ्या प्रमाणात आणि अनपेक्षित स्वरूपात होता की इस्रायलची संरक्षण प्रणाली देखील त्याला फारसं थोपवू शकली नाही. तेव्हापासून इस्रायलला हादरवणाऱ्या या जबरदस्त हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण होता याबद्दलचे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

गाझा पट्टीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पॅलेस्टिनी गटातील अनेक प्रमुख आणि महत्त्वाचे नेते तसे फारसे समोर न येत नाहीत. त्यांचं बरचसं वास्तव्य गुप्त स्वरूपात असतं. इस्रायल महत्त्वाच्या पॅलेस्टिनी नेत्यांची हत्या करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतं. त्यामुळे इतर अनेक पॅलेस्टिनी नेत्यांचं बरचसं आयुष्य इस्रायलच्या हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करण्यात गेलं आहे.

हमासचे प्रमुख नेते कोण आहेत, त्यांची कार्यपद्धती कशी आहे. इस्रायलविरोधातल्या युद्धाचं संचलन ते कसे करत आहेत याची माहिती देणारा हा लेख.

इस्माईल हानिये

31 जुलै 2024 ला इराणमध्ये इस्माईल हानिये यांच्या मृत्यूबद्दल पुष्टी होईपर्यत त्यांना हमासचा मुख्य नेता मानलं जात होतं.

1980च्या दशकाच्या उत्तरार्धात पॅलेस्टाईनमध्ये झालेल्या चळवळीतील ते एक प्रमुख सदस्य होते. 1989 मध्ये इस्लायलनं पहिला पॅलेस्टिनी उठाव मोडून काढताना त्यांना तीन वर्षांसाठी तुरुंगात टाकलं होतं.

त्यानंतर 1992 मध्ये इस्माईल हानिये यांना हमासच्या अनेक नेत्यांसह इस्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांच्या सीमेवरील निर्मनुष्य जागेत म्हणजे नो-मॅन्स-लॅंडमध्ये हद्दपार करण्यात आलं होतं.

हानिये यांना हमासचे मुख्य नेते मानलं जातं

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, हानिये यांना हमासचे मुख्य नेते मानलं जातं

एक वर्षभरासाठी हद्दपार राहिल्यानंतर ते गाझामध्ये परतले होते. 1997 मध्ये हमासच्या धार्मिक नेत्याच्या कार्यालयाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

या नियुक्तीमुळे संघटनेमधील त्याचं स्थान भक्कम झालं होतं.

2006 मध्ये हमासनं राष्ट्रीय निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी इस्माईल हानिये यांची पॅलेस्टाइनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती.

मात्र ते फार काळ या पदावर राहू शकले नाहीत. एका आठवड्याच्या भयानक हिंसाचारानंतर हमासनं महमूद अब्बास यांच्या फताह पार्टीची गाझा पट्टीतून हकालपट्टी केली. त्यानंतर इस्माईल हानिये यांना देखील पदावरून हटवण्यात आलं.

हानिये यांनी आपल्याला पदावरून दूर करणं ही असंवैधानिक गोष्ट असल्याचं म्हणत आपली हकालपट्टी नाकारली. "पॅलेस्टिनी लोकांसाठी असलेल्या राष्ट्रीय जबाबदाऱ्या पार पाडणं त्याचं सरकार सोडणार नाही," असं सांगत हानिये यांनी गाझा पट्टीतील आपली राजवट सुरू ठेवली.

2017 मध्ये हानिये यांची हमासच्या राजकीय ब्युरोच्या प्रमुखपदी निवड झाली.

मात्र 2018 मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानं हानिये यांना दहशतवादी म्हणून घोषित केलं. त्यानंतर मागील अनेक वर्षांपासून हानिये कतारमध्ये वास्तव्यास होते.

याहया सिनवार

याहया सिनवार यांचा जन्म 1962 मध्ये झाला. गाझा पट्टीतील हमासच्या चळवळीचे ते नेते आहेत.

'मज्द' या हमासच्या सुरक्षा सेवा किंवा दलाचे ते संस्थापक आहेत. या व्यवस्थेकडून अंतर्गत सुरक्षा विषयक बाबींचं व्यवस्थापन केलं जातं, इस्लायलच्या संशयित हेरांची चौकशी केली जाते. त्याचबरोबर इस्रायलचे गुप्तहेर आणि सुरक्षा अधिकारी यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम देखील मज्द कडून केलं जातं.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
फोटो कॅप्शन, बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

सिनवार यांना तीन वेळा अटक करण्यात आली आहे. 1988 मध्ये तिसऱ्यांदा अटक करण्यात आल्यानंतर त्यांना चार जन्मठेपांच्या तुरुंगवासची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

सप्टेंबर 2015 मध्ये अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत सिनवार यांचा समावेश केला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सप्टेंबर 2015 मध्ये अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत सिनवार यांचा समावेश केला होता.

मात्र हमासच्या कैदेत पाच वर्षांहून अधिक काळ असलेल्या आपल्या सैनिकाच्या बदल्यात इस्रायलनं 1,027 पॅलेस्टिनी आणि अरब कैद्यांची सुटका केली होती. यामध्ये सिनवार यांचा देखील समावेश होता.

त्यानंतर सिनवार हमासच्या प्रमुख नेतेपदावर परत आले. 2017 मध्ये त्यांची नियुक्ती गाझापट्टीतील हमासच्या राजकीय ब्युरोच्या प्रमुखपदी करण्यात आली.

2015 मध्ये अमेरिकेने सिनवार यांचा समावेश 'आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यां'च्या काळ्या यादीत केला.

मोहम्मद देईफ

मोहम्मद देईफ इझ अल-दिन अल-कासम ब्रिगेड्सचं (Izz al-Din al-Qassam Brigades) नेतृत्व करतात. ही हमासची लष्करी शाखा आहे.

ते फारसे समोर येत नाहीत, गुप्तपणे राहतात. पॅलेस्टिनींना ते मास्टरमाईंड (सूत्रधार) म्हणून परिचित आहेत आणि इस्लायली त्यांना द कॅट विथ नाईन लाईव्हज म्हणून ओळखतात.

1989 मध्ये इस्रायलनं त्यांना तुरुंगात टाकलं होतं. त्यानंतर त्यांनी इस्रायली सैनिकांना पकडण्याच्या किंवा कैदेत ठेवण्याच्या उद्देशानं 'अल-कासम ब्रिगेड्स'ची स्थापना केली.

हत्येच्या प्रयत्नातून बचावण्याच्या क्षमतेमुळे देईफ हे गाझामध्ये जवळपास दंतकथाच बनले आहेत.

फोटो स्रोत, Media Sources

फोटो कॅप्शन, हत्येच्या प्रयत्नातून बचावण्याच्या क्षमतेमुळे देईफ हे गाझामध्ये जवळपास दंतकथाच बनले आहेत.

सुटका झाल्यानंतर मोहम्मद यांनी एक अतिशय महत्त्वाचं काम केलं. गाझा पट्टीतून इस्रायलमध्ये हमासच्या सैनिकांना जातं यावं यासाठी बोगदे बांधण्यासाठी त्यांनी इंजिनीअरला मदत केली. यामुळे हमासच्या सदस्यांना इस्रायलमध्ये शिरणं सोपं झालं.

(गाझावरील ताज्या हल्ल्यांमध्ये हमासच्या जमिनीखालील या बोगद्यांचं जाळं संपवण्याचा देखील इस्रायलचा प्रयत्न आहे)

मोहम्मद देईफ यांच्या या सर्व कारवायांमुळे ते इस्रायलला हव्या असणाऱ्या (मोस्ट वाँटेड) सर्वांत महत्त्वाच्या लोकांपैकी एक आहेत. 1996 मध्ये बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांनी इस्रायल हादरलं होतं. या बॉम्बस्फोटात अनेक इस्रायली नागरिक मारले गेले होते.

या बॉम्बस्फोटाचं नियोजन आणि देखरेख करण्याचा आरोप मोहम्मद यांच्यावर आहे. त्याचबरोबर 1990च्या दशकाच्या मध्यात तीन इस्रायली सैनिकांना पकडून त्यांना ठार करण्यामध्ये मोहम्मद यांचा सहभाग असल्याचा देखील आरोप आहे.

लाल रेष
लाल रेष

2000 मध्ये इस्रायलनं त्यांना तुरुंगात टाकलं होतं. मात्र दुसऱ्या पॅलेस्टिनी उठावाच्या वेळेस ते तिथून पळून गेले.

तेव्हापासून ते भूमिगत झाले आहेत. ते नेमके कुठे आहेत, काय करतात याबद्दल फारशी माहिती समोर नाही. त्यांची तीन फोटो ज्ञात आहेत. पहिला फोटो जुना आहे, दुसऱ्यात त्यांनी चेहरा झाकलेला आहे आणि तिसरा त्यांच्या सावलीचा आहे.

त्यांना संपवण्यासाठी इस्रायलकडून अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. मोहम्मद देईफ यांच्यावरील सर्वांत गंभीर हल्ल्याचा प्रयत्न 2002 मध्ये झाला होता. या हल्ल्यातून मोहम्मद बचावले. मात्र त्यांना एक डोळा गमवावा लागला. इस्रायलचं म्हणणं आहे की या हल्ल्यात मोहम्मद यांना एक पाय आणि एक हात देखील गमवावा लागला आहे. शिवाय त्यांना बोलण्यातसुद्धा अडचण येते आहे.

इस्रायलच्या सुरक्षा दलांनी 2014 मध्ये पुन्हा एकदा मोहम्मद यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. गाझा पट्टीवर इस्लायलनं केलेल्या हल्ल्याच्या वेळेस हा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र तो देखील अपयशी ठरला. या हल्ल्यात मोहम्मद यांची पत्नी आणि त्यांची दोन मुलं मारली गेली होती.

मारवान इसा

मारवान इसा इझ अल-दिन अल-कासम ब्रिगेड्सचे उपप्रमुख आहेत. मार्च 2024 मध्ये इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात ते मारले गेल्याचं अमेरिकेनं सांगितलं आहे. हमासनं मात्र त्यांच्या मृत्यूची पुष्टी केलेली नाही.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन म्हणाले होते की इस्रायली सुरक्षा दलांनी मारवान यांना ठार केलं आहे. त्यानंतर इस्रायली प्रसार माध्यमांनी देखील मारवान मारले गेल्याचं म्हटलं होतं. नुसरेत शरणार्थी छावणीच्या खाली असलेल्या बोगद्यांच्या संकुलावर इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात मारवान मारले गेल्याचं वृत्त त्यांनी दिलं होतं.

मारवान हे हमासचे वरिष्ठ नेते आहेत. ते शॅडो मॅन (सावलीसारखा छुपा व्यक्ती) म्हणून परिचित आहेत. मारवान हे मोहम्मद डेईफ यांचा उजवा हात असल्याचं मानलं जातं.

मारवान इसा यांनी इस्रायलवरील हल्ल्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं मानलं जातं.

फोटो स्रोत, Media sources

फोटो कॅप्शन, मारवान इसा यांनी इस्रायलवरील हल्ल्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं मानलं जातं.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मारवान यांच्या मृत्यूच्या वृत्तांपूर्वी त्यांचा समावेश इस्रायलच्या मोस्ट वाँटेड यादीत होता. 2006 मध्ये इस्रायलनं त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ते जखमी झाले होते.

पहिल्या पॅलेस्टिनी उठावाच्या वेळेस हमास बरोबरच्या त्यांच्या कारवाईमुळे इस्रायलच्या सुरक्षा दलांनी त्यांना पाच वर्ष कैदेत ठेवलं होतं.

1997 मध्ये पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली होती. मात्र 2000 मध्ये दुसऱ्या पॅलेस्टिनी उठावानंतर त्यांची मुक्तता करण्यात आली होती.

2014 आणि 2021 मध्ये गाझावर केलेल्या हल्ल्याच्या वेळेस इस्रायलच्या लढाऊ विमानांनी दोनदा मारवान याचं घर उद्ध्वस्त केलं होतं. या हल्ल्यात त्यांच्या भावाचा मृत्यू झाला होता.

मारवान यांचा वावर अतिशय गुप्त असल्यामुळे ते नेमके कसे दिसतात हे उघड नव्हतं. मात्र 2011 मध्ये कैद्यांची अदलाबदल करताना झालेल्या रिसेप्शनच्या वेळेस एक ग्रुप फोटो घेण्यात आला होता आणि त्यामध्ये मारवान देखील होते.

इस्रायलवर अचानक करण्यात आलेल्या हल्ल्यांच्या नियोजनात त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं मानलं जातं. अगदी अलीकडेच इस्रायलवर जो हल्ला झाला त्यातदेखील त्यांची भूमिका असल्याचं मानलं जातं.

खालिद मेशाल

खालिद मेशाल यांचा जन्म वेस्ट बँकमध्ये 1956 मध्ये झाला होता. ते हमासच्या संस्थापकांपैकी एक आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या थेट आदेशावरून मोसाद या इस्रायलच्या गुप्तहेर संघटनेनं 1997 मध्ये खालिद मेशाल यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस मेशाल जॉर्डनमध्ये वास्तव्यास होते.

मोसादचे गुप्तहेर बनावट कॅनडियन पासपोर्टचा वापर करून जॉर्डनमध्ये शिरले होते. मेशाल रस्त्यावरून पायी जात असताना या गुप्तहेरांनी त्यांच्या शरीरात एक विषारी पदार्थाचे इंजेक्शन देण्यात आले होते किंवा असं म्हटता येईल की त्यांच्या नकळत हा विषारी पदार्थ त्यांच्या शरीरात टोचण्यात आला होता.

जॉर्डनच्या अधिकाऱ्यांनी मेशाल यांच्या हत्येच्या प्रयत्नाचा छडा लावला आणि मोसादच्या दोन हेरांना अटक केली.

मेशाल हे हमासच्या संस्थापकांपैकी एक आहेत.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, मेशाल हे हमासच्या संस्थापकांपैकी एक आहेत.

जॉर्डनचे दिवंगत राजे हुसेन यांनी मेशाल यांच्या शरीरात सोडण्यात आलेल्या विषारी पदार्थावरील उताऱ्याची (औषधाची) मागणी इस्रायलच्या पंतप्रधानांकडे केली होती. सुरूवातीला तर बेंजामिन नेतन्याहू यांनी या गोष्टीला नकार दिला होता. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याकडून दबाव आल्यानंतर नेतन्याहू यांनी त्या विषावरील उतारा (औषध) दिलं होतं.

मेशाल कतारमध्ये राहतात. 2012 मध्ये पहिल्यांदा मेशाल गाझा पट्टीत गेले होते. तिथे पॅलेस्टिनी अधिकारी आणि मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी नागरिकांनी त्यांचे स्वागत केलं होतं.

मेशालचे उत्तराधिकारी म्हणून 2017 मध्ये हमासनं इस्माईल हानिये यांची राजकीय ब्युरो प्रमुख म्हणून निवड केली. मेशाल हमासच्या परदेशातील राजकीय ब्युरोचे प्रमुख झाले.

महमूद झहर

महमूद झहर यांचा जन्म 1945 मध्ये गाझामध्ये झाला होता. त्यांचे वडील पॅलेस्टिनी होते तर आई इजिप्शियन होती. त्यांना हमासच्या सर्वांत प्रमुख नेत्यांपैकी एक मानलं जातं. त्याचबरोबर ते हमासच्या चळवळीतील राजकीय नेतृत्वापैकी एक आहेत.

त्यांनी गाझातील शाळेतून शिक्षण घेतलं आणि कैरो विद्यापीठातून पुढील शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या राजकीय पदामुळे त्यांना काढून टाकेपर्यंत महमूद यांनी गाझा आणि खान युनिसमध्ये डॉक्टर म्हणून काम केलं.

1988 मध्ये हमासची स्थापना झाल्यानंतर काही महिन्यांतच महमूद झहर इस्रायलच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. 1992 मध्ये इस्रायलनं हमासशी संबंधित अनेकांची हकालपट्टी इस्रायलच्या सीमेवरील नो-मॅन्स लँड मध्ये केली होती, त्यात महमूद झहर यांचादेखील समावेश होता. तिथे ते एक वर्ष होते.

2003 मध्ये इस्रायलनं झहर यांना मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यातून ते बचावले होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2003 मध्ये इस्रायलनं झहर यांना मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यातून ते बचावले होते.

हमासने 2006 मध्ये पॅलेस्टाईनमधील सार्वत्रिक निवडणुका जिंकल्यानंतर झहर पॅलेस्टिनी सरकारमध्ये दाखल झाले. पंतप्रधान इस्माईल हानिये यांच्या नव्या सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री झाले. नंतर लवकरच हे सरकार हटवलं गेलं होतं.

इस्रायलनं 2003 मध्ये महमूद झहर यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी गाझा सिटीमधील झहर यांच्या घरावर इस्रायलनं विमानातून बॉम्ब टाकला होता. या हल्ल्यातून महमूद झहर बचावले होते. त्यांना फक्त किरकोळ जखमा झाल्या होत्या. मात्र त्यांचा मोठा मुलगा खालिद या हल्ल्यात मारला गेला होता.

महमूद यांचा दुसरा मुलगा होसम हा अल-कासम ब्रिगेड्सचा सदस्य होता. 2008 मध्ये इस्रायलनं गाझावर केलेल्या हवाई हल्ल्यात होसम देखील मारला गेला.