अमेरिकेची शस्त्रे वापरून इस्रायलने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केल्याची शक्यता, अमेरिकेचाच अहवाल

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, टॉम बेटमन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

इस्रायलनं गाझावर केलेल्या हल्ल्याचा अहवाल अमेरिकन कॉंग्रेसमध्ये सादर झाला आहे. या अहवालात इस्रायलकडून गाझा पट्टीत करण्यात येत असलेल्या हल्ल्यांबाबत मानवतावादी कार्य आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचवेळी इस्त्रायलची बाजूदेखील मांडण्यात आली आहे. या अहवालातील नेमके कोणते मुद्दे मांडण्यात आले आहेत ते पाहुया.

इस्रायल-हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मोठं वक्तव्य केलं आहे. गाझातील युद्धादरम्यान आंतरराष्ट्रीय मानवतावादी नियमांचं उल्लंघन करताना इस्रायलने काही वेळा अमेरिकेनं इस्रायलला पुरवलेल्या शस्त्रांचा वापर केलेला असू शकतो, असं अमेरिकेनं म्हटलं आहे.

इस्रायलनं ज्या जबाबदारीनं ही शस्त्रं वापरायला हवी होती, त्यापेक्षा विसंगतरित्या वापरली असावीत, असं याचं मुल्यांकन योग्य ठरेल, असं अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानं म्हटलं आहे.

मात्र त्याचवेळी अमेरिकेकडे याबाबत पूर्ण माहिती असून इस्रायलला असलेला शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरूच राहील, असंही अमेरिकेनं म्हटलं आहे.

शुक्रवारी अमेरिकन कॉंग्रेससमोर या संबंधीचा अहवाल सादर करण्यात आला.

ग्राफिक्स

इस्रायलसह इतर सहा देशांनी अमेरिकेनं पुरवठा केलेल्या शस्त्रांचा युद्धात कशा पद्धतीनं वापर केला, याचा आढावा घेण्याचा आदेश व्हाईट हाऊसनं दिला आहे.

त्याबाबतच्या अहवालात इस्रायलनं गाझामध्ये केलेल्या काही कारवायांवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. पण आक्षेप मांडत असतानाही, इस्रायलच्या सैन्यानं (IDF)गाझामध्ये हल्ला करताना आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केल्याचं मात्र, या अहवालात स्पष्टपणे सांगणं टाळलं आहे.

इस्रायलला गाझामध्ये हमासशी लढताना अत्यंत कठिण लष्करी आव्हानाचा सामना करावा लागतो, असं त्यात म्हटलं आहे.

अमेरिकेनं पुरवलेल्या शस्त्रास्त्रांचा वापर कायदेशीररित्या करण्याचं इस्रायलनं दिलेलं आव्हान विश्वासार्ह होतं, असा उल्लेखही त्यात होता.

हमास नागरी पायाभूत सुविधांचा वापर युद्धासाठी तर नागरिकांचा वापर मानवी ढालीसारखा करत आहे. त्यामुळं प्रत्यक्ष युद्धभूमीवर चूक आणि बरोबर यात फरक करणं कठिण ठरतं, असंही अहवालात नोंदवलेलं आहे.

या अहवालानुसार, इस्त्रायल प्रामुख्यानं अमेरिकेकडून पुरवठा केल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांवर अवलंबून आहे. त्यामुळं इस्रायलनं त्यांचा वापर मानवतावादी कायद्यासंदर्भातील जबाबदारीशी विसंगतरित्या किंवा कमी प्रमाणात मानवी हानी होण्यासाठी केला असावा.

"लष्करी कारवायांमध्ये कमीत कमी नागरी हानी व्हावी यासाठीचं योग्य ज्ञान, अनुभव आणि साधनं इस्त्रायलकडं आहेत. पण प्रत्यक्षात युद्धभूमीवर झालेली मोठी मानवी हानी पाहता, इस्त्रायलच्या लष्करानं मानवी हानी कमी व्हावी यासाठी पूर्ण प्रयत्न केले की नाही,असे प्रश्न उपस्थित होतात," असंही अहवालात म्हटलं आहे.

संयुक्त राष्ट्र आणि मानवतावादी संघटनांनी नागरी हानी कमी करण्यासंदर्भातील इस्रायलचे प्रयत्न 'सातत्य नसलेले, अकार्यक्षम आणि अपुरे' असल्याचं म्हटलं आहे, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

युद्धाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये गाझामध्ये मानवतावादी मदत वाढवण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना इस्त्रायलनं पूर्ण सहकार्य केलं नसलयाचंही अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला आढळलं आहे. पण आता ही परिस्थिती बदलल्याचं परराष्ट्र खात्यानं सांगितलं.

"अमेरिकेकडून होणाऱ्या मदतीच्या आणि साहित्याचा पुरवठा करण्यात इस्रायल सरकार अगदीच अडवणूक करत आहे," अशीही परिस्थिती नसल्याचं अहवालात म्हटलं आहे.

हा अशा प्रकारचा पहिलाच अहवाल असून, अमेरिका इस्रायलच्या कारवायांचा आढावा घेत राहणार असल्याचं, अहवाल तयार करणाऱ्यांमध्ये समावेश असलेले अमेरिकेचे तुर्कीतील माजी राजदूत डेव्हिड सॅटरफिल्ड यांनी बीबीसीला सांगितलं.

जगानं अशाप्रकारच्या संघर्ष क्वचितच पाहिला आहे. आम्ही अगदी रोखठोकपणे समोर आलेल्या सर्व घटकांचा यात समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे.

इस्त्रायलनं गाझामधील राफाहवर हल्ला केला तर विशिष्ट प्रकारचे बॉम्ब आणि तोफगोळ्यांचा इस्रायलला होणारा पुरवठा रोखण्याची धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीररित्या दिली. त्यानंतर काही दिवसांनी हा अहवाल सादर करण्यात आला. राफा हे गाझामधील हमासची शक्ती असलेलं शेवटचं ठिकाण आहे. इथं दहा लाखांहून अधिक पॅलिस्टिनी नागरीक पोहोचले आहेत.

हा अहवाल जाहीर होण्याच्या आधीच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्यानाहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची राफावर हल्ला न करण्याची धमकी फेटाळून लावली होती. गरज पडली तर इस्रायल एकटा लढेल, असं नेतन्याहू म्हणाले होते.

सततचे बॉम्बहल्ले आणि निवासी वस्त्यांजवळ आलेले टँक या पार्श्वभूमीवर सोमवारपासून 80,000 हून अधिक पॅलिस्टिनी नागरिकांनी राफामधून पलायन केल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे.

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

कारवाईच्या सुरूवातीलाच इस्रायली सैन्यानं इजिप्तला लागून असलेल्या राफा सीमेवर ताबा मिळवला आणि ती बंद केली आहे. तर संयुक्त राष्ट्रांनी त्यांचे कर्मचारी आणि त्यांच्या ट्रक पुन्हा सीमा खुल्या केलेल्या केरेम शालोमपर्यंत पोहोचणं अत्यंत धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.

हमासनं 7 ऑक्टोबरला इस्रायलच्या दक्षिण भागात केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत इस्रायलनं गाझामध्ये लष्करी कारवाई केली. हमासच्या हल्ल्यात जवळपास 1,200 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 252 इस्रायली नागरिकांना बंदी बनवून नेण्यात आलं होतं. त्यानंतर इस्रायलनं गाझावर केलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यत 34,900 पेक्षा अधिक पॅलिस्टिनींचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती गाझातील हमासद्वारे संचालित आरोग्य खात्यानं दिली आहे.