'मी माझ्या जवळच्या 200 जणांना या युद्धात गमावलं', गाझा युद्धात बीबीसी रिपोर्टरला अश्रू अनावर

- Author, अदनान एल-बुर्श
- Role, बीबीसी अरेबिक
जवळपास तीन महिने अदनान एल-बुर्श यांनी गाझा पट्टीतील युद्धाचं वार्तांकन केलं. पत्रकार म्हणून काम करत असताना त्यांना एका तंबूत राहावं लागलं. ते दिवसातून फक्त एकदाच जेवू शकायचे आणि आपली पत्नी आणि पाच मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू होता.
या युद्धाचं वार्तांकन करण्यासाठी आपलं सर्वस्व क्षमता पणाला लावताना किती त्रासदायक अनुभवांना सामोरं जावं लागलं, याविषयी अदनान यांनी लिहिलं आहे.
(सूचना : या लेखातील माहिती आणि छायाचित्रे वाचकांना विचलित करू शकतात.)
गेल्या सहा महिन्यातील सर्वांत वाईट क्षणांपैकी एक म्हणजे ती रात्र, जेव्हा आम्ही सर्वजण रस्त्यावर झोपलो होतो.
दक्षिण गाझामधील खान युनिसमधील कडक थंडीत एकमेकांना बिलगून झोपलेल्या माझ्या पत्नी आणि मुलांच्या चेहऱ्याकडे मी पाहिलं आणि मला अगदी असहाय्य वाटलं.
माझी 19 वर्षांची जुळी मुलं झाकिया आणि बातौल फरशीवर झोपले होते. त्यांच्याशेजारी माझी 14 वर्षांची मुलगी युमना, माझा 8 वर्षांचा मुलगा मोहम्मद, सर्वांत लहान 5 वर्षांची मुलगी राझन आणि माझी पत्नी झायनाब होती.
पॅलेस्टिनी रेड क्रिसेंट सोसायटीच्या मुख्यालयाबाहेर आम्ही विश्रांती घेण्याचा, झोपण्याचा प्रयत्न करत होततो. पण रात्रभर तोफगोळ्यांचे आवाज येत होते, ड्रोन्स डोक्यावर भिरभिरत होते.
आम्ही एक फ्लॅट भाड्यानं घेतला होता. पण त्या दिवशी सकाळी आमच्या घर मालकानं मला फोन करून सांगितलं की त्या इमारतीवर बॉम्बहल्ला करणार असल्याचा इशारा इस्रायली सैन्यानं त्याला दिला आहे. मी तेव्हा कामावर होतो, मग माझ्या कुटुंबानंच बॅग भरल्या आणि तिथून बाहेर पडले.
आम्ही सर्व रेड क्रिसेंट मुख्यालयाजवळ भेटलो. निर्वासित लोकांनी तिथं आधीच गर्दी केलेली होती. मी आणि माझा भाऊ रात्रभर खोक्यांवर बसून आपण काय करायला हवं याची चर्चा करत होतो.

सगळ्यांना सुरक्षित राहायचं असेल तर उत्तर गाझा सोडून दक्षिणेला जाण्याचे इस्रायली सैन्याने सांगितलं होतं. त्यामुळे 13 ऑक्टोबरला जबालिया या शहरातलं आमचं घरं सोडून आम्ही निघालो. आमच्या बहुतांश वस्तू, सामान आम्ही तिथंच सोडलं होतं.
आणि आता आम्हाला इथून हलण्यास सांगितल्यानंतर बॉम्बहल्ल्यातून आम्ही थोडक्यात बचावलो होतो. कुठल्याही गोष्टीचा सारसार विचार करणंही तेव्हा अशक्य होतं. माझ्या कुटुंबाचं मी रक्षण करू शकत नाही याचा मला राग आला, अपमानास्पद वाटलं आणि त्याचबरोबर भीतीदेखील वाटली.
अखेर माझं कुटुंब मध्य गाझामध्ये नुसैरात इथल्या एका फ्लॅटमध्ये राहण्यास गेलं. तर मी खान युनिस मधील नासेर हॉस्पिटलच्या प्रांगणात बीबीसीच्या टीमबरोबर एक तंबूमध्ये राहून काम करत होतो. काही दिवसांनंतर मी माझ्या कुटुंबाला जायचो.
इंटरनेट आणि फोन सेवा काही वेळा बंद असल्यामुळं संपर्क साधणं कठीण होत होतं. एकदा तर माझ्या कुटुंबाशी माझं चार-पाच दिवस बोलणंच झालं नव्हतं.
खान युनिसमधील बीबीसी टीममध्ये आम्ही सात जण होतो. आम्ही दिवसातून फक्त एकवेळ जेवायचो. कधी अन्न उपलब्ध असतानाही खात नव्हतो कारण तिथं टॉयलेटची सुविधाच उपलब्ध नव्हती.

याच काळात अल जझिराचा ब्युरो प्रमुख आणि माझा मित्र वाएल अल-दाहदोह याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.
ज्या घरात त्याचं कुटुंब राहत होतं त्यावर इस्रायली हवाई हल्ला झाला. या हल्ल्यात त्याची पत्नी, किशोरवयीन मुलगा, सात वर्षांची मुलगी आणि एक वर्षांचा नातू यांचा मृत्यू झाला.
इस्रायली सैन्य म्हणतं की नागरी जीवितहानी टाळण्यासाठी ते शक्य तितकी काळजी घेतात आणि हा हल्ला त्यांनी त्या परिसरातील हमासच्या दहशतवादी तळावर निशाणा साधण्यासाठी केला होता.
20 वर्षांपासून तो माझा मित्र आहे. मध्य गाझामध्ये आपल्या मुलांच्या कफनात गुंडाळलेल्या मृतदेहांना कवटाळत असलेला माझ्या मित्राचा व्हीडिओ मी पाहिला. मला वाटलं त्याक्षणी मी त्याच्यासोबत असायला हवं होतं.
या बातमीबरोबरच इतर मित्रांच्या, नातेवाईकांच्या आणि शेजाऱ्यांच्या मृत्यूच्या बातम्या येऊन धडकल्या. माझं हृदय पिळवटून निघालं. माझ्या जवळचे, ओळखीतले अशी जवळपास 200 माणसं मी या युद्धात गमावली आहेत.
त्यादिवशी लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना मी कॅमऱ्यावर रडलो. त्या रात्री मला मध्येच जाग आली तेव्हाही माझ्या डोळ्यातून अश्रू पाझरत होते. वाएलचा चेहरा माझ्या डोळयासमोरून जात नव्हता.

मी 15 वर्षांपासून गाझामधील संघर्षाचं वार्तांकन केलं आहे. मात्र पहिल्यांदाच परिस्थिती एवढ्या भीषण स्तराला पोहोचली आहे. मग तो इस्रायलवर झालेला अभूतपूर्व हल्ला असो वा त्यानंतरची प्रचंड जीवितहानी असो.
7 ऑक्टोबरला सकाळी 6:15 ला प्रचंड स्फोटांच्या आवाजाने आणि माझ्या मुलांच्या ओरडण्याच्या आवाजाने जागा झालो. मी छतावर गेलो आणि पाहिलं की गाझामधून इस्रायलवर रॉकेट्सचा मारा केला जातो आहे.
हमासने इस्रायलवर हल्ला करताना सीमेवरील कुंपण तोडलं आहे आणि या हल्ल्यात जवळपास 1,200 लोकांचा मृत्यू झाला असून 250 जणांना ओलीस ठेवलं आहे, हे आम्हाला जेव्हा कळलं, तेव्हाच लक्षात आलं होतं की इस्रायलही आता असं प्रत्युत्तर देईल, ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल.
या युद्धात गाझामध्ये 34,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचं हमासच्या आरोग्य मंत्रालयाची माहिती सांगते. गाझामध्ये मरण्याचा आणि जखमी होण्याचा धोका नेहमीच असतो.
युद्धाला दोन दिवस झाल्यानंतर अन्नाचा साठा करण्यासाठी मी जाबालियामधील आमच्या स्थानिक बाजाराकडे धाव घेतली. बाजारात गर्दी होती कारण इतर लोकदेखील तेच करत होते.
मी बाजारातून बाहेर पडल्यानंतर फक्त 10 मिनिटांतच त्या परिसरावर तुफानी बॉम्बहल्ला झाला. त्या सर्व परिसराचा विध्वंस झाला. काही मिनिटांपूर्वीच ज्या मोठ्या किराणा दुकानात मी सामानाची खरेदी केली होती तेसुद्धा नष्ट झालं होतं.
तिथल्या दुकानांच्या मालकांचे चेहरे माझ्या लक्षात होते. त्यातील बहुतांश जण मृत्यूमुखी पडले होते.

फोटो स्रोत, Adnan El-Bursh
त्या हल्ल्यामध्ये किमान 69 लोक मारले गेल्याचे अॅमनेस्टी इंटरनॅशनल सांगतं. या हल्ल्याचा तपास वॉर क्राइम म्हणजे युद्धकाळातील गुन्हा म्हणून केला पाहिजे असंही त्यांचं म्हणणं आहे.
या घटनेबद्दल बीबीसीनं विचारलेल्या प्रश्नाला इस्रायली सैन्यानं उत्तर दिलं नाही.
या सर्व युद्धकाळात इस्रायली सैन्य सातत्याने सांगत आलं आहे की ते फक्त नागरी वस्त्यांमध्ये लपून कारवाया करणाऱ्या हमासच्या अड्ड्यांवर हल्ला करत आहेत.
ते असंही सांगतात की ते या तळांवर हल्ला करताना आंतरराष्ट्रीय कायद्यातील तरतुदींचं पालन करत आहेत.
युद्धापूर्वी जाबालिया हे सुंदर, टुमटार शहर होतं. माझा जन्म तिथंच झाला. तिथं मी माझ्या कुटुंबासोबत प्रेमानं भरलेलं अतिशय समाधानी आयुष्य जगत होतो. भविष्याच्या योजना आखत होतो.
शहराच्या पूर्वकडे माझं शेत होतं. तिथं मी माझ्या हातांनी ऑलिव्ह, लिंबू आणि संत्र्यांची झाडं लावली होती. तिथलं वातावरण अतिशय शांततामय होतं. माझं काम झाल्यानंतर तिथे बसून चहा प्यायला मला आवडायचं.

फोटो स्रोत, Getty Images
ज्या दिवशी आम्ही आमची घरं आणि बीबीसीचं कार्यालय सोडून उत्तर गाझा पट्टीतून खान युनिसला जाण्याचा निर्णय घेतला, तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा क्षण होता.
एका कारमध्ये 10 पेक्षा जास्त लोक कोंबून बसलेल्या अवस्थेत माझं कुटुंब आणि मी दक्षिणेची वाट धरली. दक्षिणेकडे जाणाऱ्या या एकाच रस्त्यावर हजारो लोक पायी, वाहनांनी त्यांचं सामान घेऊन मार्गस्थ झाली होती.
हा प्रवास सुरू असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जवळच्या परिसरावर हवाई हल्ले होत होते. माझ्या कुटुंबाच्या आणि गर्दीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर गोंधळ, दु:ख आणि अनिश्चितता दिसत होती.
माझी मुलं मला सारखी विचारत होती की, "आपण कुठे जात आहोत? आपण उद्या परत येणार का?"

आमचा फोटो अल्बम मी सोबत घ्यायला हवा होता असं मला मनापासून वाटतं. त्या अल्बममध्ये माझे लहानपणाचे फोटो, माझ्या आईवडिलांचे फोटो, माझ्या आणि माझ्या पत्नीच्या लग्नाचे फोटो होतो. माझे वडील अरबी शिकवायचे आणि त्यांच्या निधनानंतर मी माझ्या जवळ ठेवलेली काही पुस्तके मी सोबत घ्यायला हवी होती असं मला वाटतं.
नंतर माझ्या जुन्या शेजाऱ्याकडून कळालं की आमचं घर पूर्णपणे नष्ट झालं आहे आणि शेतही जळून गेलं आहे.
गाझा पट्टीत दक्षिणेकडे जाताना केलेल्या त्रासदायक आणि भीतीदायक प्रवासानंतर आणि रेड क्रिसेंट मुख्यालयाबाहेर आम्ही घालवलेल्या त्या रात्रीनंतर मी खान युनिस इथून कित्येक आठवडे माझं काम सुरू ठेवलं होतं. माझं कुटुंब अजूनही नुसैरतमध्ये होतं आणि त्यांच्यापासून वेगळं राहिल्याचा भावनिक परिणाम माझ्यावर झाला होता.
मग डिसेंबरच्या सुरूवातीला इस्रायलने गाझातील लोकांना खान युनिस सोडून दक्षिणेला, रफामध्ये जाण्यास सांगितलं.

इस्रायली सैन्यानं उत्तरेला जोडणारा मुख्य रस्ता देखील बंद केला. याच रस्त्याद्वारे मी आणि माझं कुटुंब एकमेकांना भेटू शकत होतो. त्यांच्यापर्यंत मी कसा पोहोचेन हे मला ठाऊक नव्हतं किंवा आम्ही नक्की काय करावं हे देखील मला कळत नव्हतं. रफामध्ये आधीच हजारो लोकांनी गर्दी केलेली होती आणि तिथं राहण्यासाठी क्वचितच एखादी जागा उपलब्ध होती.
कित्येक दिवस मला अस्वस्थ वाटत होतं. इस्रायली सैन्य मुख्य रस्त्यांकडे आगेकूच करत असल्याच्या बातम्या येत होत्या. गाझाच्या उत्तर आणि मध्य भागाला दक्षिण भागापासून वेगळं करणं हा त्यांचा हेतू असावा असं वाटत होतं. मी किंवा माझ्या कुटुंबीयांचा मृत्यू होईल आणि आम्ही एकमेकांना पुन्हा कधीही भेटू शकणार नाही या विचारांनी मी घाबरून गेलो होतो.
त्यावेळेस मला पहिल्यांदा असं वाटलं की आता सर्व संपलं आहे. तो कोणता दिवस होतो हेदेखील मला आठवत नाही. माझं काम थांबवून माझ्या कुटुंबाकडे परतण्याचा मी निर्णय घेतला. जर मरायचंच असेल तर आम्ही एकत्र मरू.
अखेर 11 डिसेंबरला मी माझ्या सहकाऱ्यासोबत कारने मागच्या रस्त्याने नुसैरतच्या दिशेने निघालो.
तिथं पोचल्यावर माझ्या सर्वांत धाकट्या मुलीने, राझनने चटकन येऊन मला घट्ट मिठी मारली.
आम्ही कसंबसं माझं कुटुंब रफाला हलवलं. बीबीसीची टीमही तिथं हलवण्यात आली होती. तिथून वार्तांकन सुरू ठेवलं. तिथं आम्हाला काही भयानक प्रसंगांना तोंड द्यावं लागलं.

डिसेंबरच्या अखेरीस मी बातमी दिली की इस्रायली सैन्यानं (IDF) जवळपास 80 मृतदेह गाझातील सरकारी यंत्रणेच्या हवाली केले आहेत. इस्रायली सैन्यानं सांगितलं की हे मृतदेह त्यांनी गाझा मधून इस्रायलमध्ये नेले होते- जेणेकरून त्यात कोणी इस्रायली ओलीस आहे की नाही हे तपासता येईल.
रफा शहराजवळ स्मशानभूमीत एक मोठा कंटेनर आला. तो कंटेनर उघडल्यानंतर प्रचंड दुर्गंधी सुटली. एप्रन आणि मास्क घातलेल्या माणसांनी निळ्या प्लास्टिक बॅगेत गुंडाळलेले ते मृतदेह जमिनीत पुरले. मृतदेह पुरण्यासाठी एक्सकॅव्हेटरच्या मदतीने सामूहिक कबर खोदण्यात आली होती.
माझ्या आयुष्यात यापूर्वी मी असं कधीही पाहिलं नव्हतं. त्या भयानक दृश्याचं वर्णन करता येणं शक्य नाही.
मग जानेवारी महिन्यात मी रफामध्ये एका हॉस्पिटलमधून रिपोर्टिंग करत असताना अनेक मृतदेह आणण्यात आले. यात वाएल अल-दाहदोहचा मोठा मुलगा हमझा याचा मृतदेहदेखील होता. हमझा स्वतःही अल जझिरासाठी पत्रकारिता करत होता.
ही बातमी वाएलला कोण देणार? आधीच कुटंबीय गमावलेल्या वाएलला ही बातमी सांगणं ही अशक्यप्राय गोष्ट होती. माझ्या एका सहकाऱ्यानं जेव्हा वाएलच्या जवळच्या व्यक्तीला ही बातमी देण्यास सांगितलं ते देखील मी ऐकू शकलो नव्हतो.

फोटो स्रोत, Getty Images
हमझा आणि त्याचा सहकारी फ्रीलान्स व्हीडिओग्राफर मुस्तफा थुराया यांनी त्या परिसरातील एका हवाई हल्ल्यानंतर तिथल्या भीषण परिस्थितीचं रिपोर्टिंग केलं होतं. त्यानंतर त्यांच्याच कारवर इस्रायलनं हवाई हल्ला केला होता. त्यात त्या दोघांचा मृत्यू झाला होता.
इस्रायली सैन्यानं आरोप केला होता की ते दोघं गाझामधून दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटनेचे सदस्य होते. त्यांच्या कुटुंबीयांनी आणि अल जझिरानं इस्रायलचे दावे फेटाळून लावले आहेत.
इस्रायली सैन्य म्हणतं की ते दोघं ड्रोनचा वापर करत होते आणि त्यामुळे इस्रायली सैनिकांना धोका होता. मात्र वॉशिंग्टन पोस्टच्या तपासानुसार ते दोघेही फक्त रिपोर्टिंग करत होते.
रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स नुसार 7 ऑक्टोबरपासून गाझामध्ये 100 पेक्षा अधिक पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश पत्रकार पॅलेस्टिनी होते.
इस्रायली सैन्य म्हणतं की "आम्ही कधीही मुद्दामहून पत्रकारांवर हल्ला केलेला नाही आणि करणार देखील नाहीत."
ते म्हणतात, हल्ला करण्यापूर्वी पत्रकारांसह नागरिकांना धोका पोहोचू नये यासाठी ते शक्य असणारी सर्व प्रकारची काळजी घेतात. मात्र युद्धक्षेत्रात राहण्याचे काही धोके असतातच.

अखेर बीबीसीच्या टीममधील सदस्यांच्या कुटुंबीयांना गाझामधून हलवण्याची परवानगी मिळाल्याची बातमी आली. चार आठवड्यानंतर आम्हीदेखील रफा क्रॉसिंग ओलांडून बाहेर पडलो. यात आम्हाला इजिप्तच्या प्रशासनानं मदत केली.
मी हा लेख कतारमधून लिहितो आहे. मात्र मला याची जाणीव आहे की मी इथं स्वच्छ हॉटेलात जेवण करत असताना जबालियातील लोक पोट भरण्यासाठी गवत आणि जनावराचं खाद्य खात आहेत. हा विचार करून माझ्या गळ्याखाली घास उतरत नाही. मला ते अन्न विषासमान वाटतं.
भविष्य धूसर आहे. गाझा माझा प्राण, माझं आयुष्य आहे. एक दिवस मला तिथं परतायचं आहे. मात्र सध्यातरी ही गोष्ट अशक्य दिसते आहे.











