ओलीस ठेवलेले दोन जण जिवंत असल्याचा हमासने दिला पुरावा, व्हीडिओ प्रसारित

कीथ सिगल
फोटो कॅप्शन, व्हिडिओमध्ये 64 वर्षीय कीथ सिगल झळकले.
    • Author, अॅना फोस्टरद्वारे
    • Role, बीबीसी न्यूज, जेरूसलेम

हमासनं एक व्हीडिओ प्रसिद्ध करून गाझामध्ये बंदी असलेल्या आणखी दोन बंदींच्या जीवंत असण्याचा पुरावा सादर केला आहे.

दबावाखाली चित्रित करण्यात आलेल्या या व्हीडिओची तारीख समोर आलेली नाही. पण त्यात ओमरी मिरान त्यांना 202 दिवसांपासून बंदी ठेवण्यात आल्याचं सांगत आहेत. तर कीथ सिगल यांनी याच आठवड्यात झालेल्या पासओव्हर (पेसाच) च्या सुटीचा उल्लेख केला आहे. त्यावरून ही क्लिप नुकतीच शूट करण्यात आल्याचं स्पष्ट होतं.

हमासनं 7 ऑक्टोबरला जोरदार हल्ले केल्यानंतर या बंदी बनवण्यात आलेल्यांमध्ये या दोघांचाही समावेश होता.

कुटुंबातील या सदस्यांना परत आणण्यासाठी संघर्ष करत राहणार असल्याचं, त्यांच्या नातेवाईकांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

या बंदींच्या सुटकेसाठी एक नवीन करार करावा अशी विनंतीही त्यांनी इस्रायलच्या सरकारकडं केली आहे.

इस्रायलच्या शस्त्रसंधीच्या संदर्भातील नव्या प्रस्तावाचा अभ्यास करत असल्याचं हमासनं म्हटलं आहे. नेमका त्याचवेळी हा व्हीडिओ समोर आला आहे.

मध्यस्थी करणाऱ्या इजिप्तनं थांबलेल्या चर्चांना पुन्हा वेग देण्यासाठी इस्रायलमध्ये एक शिष्टमंडळ पाठवलं होतं, अस काही माध्यमांनी म्हटलं आहे.

इस्रायलच्या उर्वरित बंदींना मुक्त करण्याबाबतचा करार झाल्यास इस्रायलकडून राफाहमध्ये सुरू असलेले हल्लेही थांबू शकतात, असं मत इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी शनिवारी व्यक्त केलं.

आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अमेरिकेचे नागरिक असलेल्या सिगल यांना त्यांच्या पत्नी अविवा यांच्यासह बंदी बनवण्यात आलं होतं. पण अविवा यांची नोव्हेंबरमध्ये शस्त्रंसंधी दरम्यान सुटका करण्यात आली होती.

"कीथ तुम्ही परत येईपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू," अशी प्रतिक्रिया त्यांच्या पत्नी अविवा यांनी एका व्हिडिओमध्ये दिली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बीबीसीबरोबर बोलताना बंदी असतानाचा अनुभव सांगितला होता.

त्यांना एका ठिकाणाहून दुसरीकडं स्थलांतरित केलं जात असताना, एका सुरुंगामध्ये सोडून देण्यात आलं होतं. कीथ आता जीवंत असेल की नाही हेही माहिती नाही, असं त्यांनी त्या मुलाखतीच्या वेळी म्हटलं होतं.

त्यांची मुलगी इलाननं म्हटलं की, "वडिलांना पाहिल्यानंतर आम्हाला सर्वांना ठामपणे असं वाटत आहे की, लवकरात लवकरत एक करार करून सर्वांना घरी परत आणायला हवं. देशाच्या नेत्यांनी हा व्हीडिओ आणि वडिलांसाठी आम्ही कशाप्रकारे मदत मागत आहोत हे पाहावं."

"तुम्ही हा व्हीडिओ पाहिला असेल, तर आम्ही दर आठवड्याला रॅली काढत आहोत आणि त्यांच्यासह सर्व बंदींसाठी लढत आहोत, याची वडिलांना जाणीव असल्याचं दिसतं," असं त्यांची दुसरी मुलगी शीरनं म्हटलं होतं.

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, GETTY IMAGES

शनिवारी सायंकाळी बंदींच्या सुटकेच्या मागणीसाठी तेल अविवमध्ये साप्ताहिक आंदोलन झालं. त्यावेळी ओमरी मिरान यांचे वडील दानी मिरान यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांचं नेतृत्व केलं.

त्यांनी अत्यंत प्रभावी असं भाषणही दिलं. त्यावेळी ते प्रचंड भावनिक झाल्याचं दिसून आलं. मुलाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर, तो जीवंत असल्याची आशा निर्माण झाल्यानं त्यांनी आनंद जाहीर केला.

पण त्यांच्या भाषणात काही राजकीय मुद्देही होते. त्यांनी थेट सरकारला सुनावलं आणि विशेषतः सरकारमधील उजव्या विचारांचे सदस्य असलेले राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतमार बेन ग्विर आणि अर्थमंत्री बेझालेल स्मोत्रिक यांचा उल्लेख करत बंदींना सोडवण्यासाठी एक सुरक्षित करार करण्याचं आवाहन केलं.

या बंदींना सोडवण्यासाठी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी व्यवहार्य अशा कराराला मंजुरी देण्याची विनंती त्यांनी केली.

"दोन्हीकडील लोकांचा रक्तपात होणार नाही, असं पाऊल उचलायला हवं. इस्रायलमधील सर्व लोक आणि जगातील सर्व देशांना रक्तपात आणि लोकांच्या वेदनांचा अंत हवा आहे," असंही त्यांनी म्हटलं.

विशेष म्हणजे ओमरी यांच्या वडिलांनी भाषणाच्यापूर्वी होस्टेज स्क्वेअरच्या आसपासच्या मोठ्या स्क्रीनवर बंदींचा हा व्हिडिओ दाखवला.

ही अत्यंत असामान्य अशी बाब होती. कारण असे व्हिडिओ साधारणपणे टीव्हीवर दाखवले जात नाहीत.

"हा नवा व्हिडिओ पाहता, सर्व बंदींना परत आणण्यासाठीच्या करालाला मंजुरी देण्यासाठी इस्रायली सरकारनं शक्य ते सर्वकाही करणं गरजेचं आहे," असं मत बंदींच्या कुटुंबांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या मुख्यालयानं म्हटलं.

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, GETTY IMAGES

या आठवड्याच्या सुरुवातीला जारी करण्यात आलेल्या एका व्हीडिओनंतरचा हा दुसरा व्हीडिओ म्हणजे आणखी एक पुरावा आहे. आधीच्या व्हीडिओमध्ये 23 वर्षीय इस्रायली-अमेरिकन बंदी हेर्ष गोल्डबर्ग-पोलिन होते. त्या छोट्याशा क्लिपमध्ये त्यांचा डाव्या हाताचा खालचा भाग दिसला नव्हता. 7 ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यात त्यांनी हात गमावला होता.

त्यांच्या आई आणि वडिलांनीही बंदींच्या सुटकेसाठी एक नवा करार करण्यासह अधिक प्रयत्न करण्याची विनंती केली आहे.

7 ऑक्टोबरला हमासनं गाझाच्या जवळ असलेल्या इस्रायली समुदायांवर हल्ला केला त्यावेळी किबुत्झ कफर अझामधून सिगल यांचं अपहरण करण्यात आलं होतं. तर मिरान यांना किबुत्झ निर ओझमधून बंदी बनवण्यात आलं होतं.

हमासच्या सशस्त्र शाखेच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये बोलताना 64 वर्षीय सिगल आणि 46 वर्षीय मिरान इस्रायली सरकारकडे शस्त्रसंधी आणि बंदींच्या सुटकेसाठी हमासबरोबर करार करण्याची विनंती करताना दिसत आहेत.

"मी इथं 202 दिवसांपासून हमासच्या कैदेत आहे. याठिकाणची स्थिती अत्यंत वाईट, कठिण असून इथं मोठा दारुगोळाही आहे," असं मिरान व्हीडिओमध्ये म्हणत आहेत.

त्यांच्यासह इतर सर्व बंदींच्या सुटकेसाठी हमास आणि इस्रायलमध्ये अनेक दिवसांपासून अप्रत्यक्ष चर्चा सुरू आहे. अनेक आठवड्यांच्या चर्चेनंतर त्यांना कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचण्यात यश आलेलं नाही.

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, GETTY IMAGES

यापूर्वी 40 बंदींच्या सुटकेच्या मोबदल्यात सहा आठवड्यांच्या शस्त्रसंधीचा प्रस्ताव हमासनं फेटाळून लावला होता.

कायमस्वरूपी युद्ध थांबवणं, गाझामधून इस्रायलच्या पूर्ण सैन्यानं परत जाणं आणि विस्थापित लोकांना विनाअट त्यांच्या घरी परतण्याची परवानगी या मुद्दयांचा करारामध्ये समावेश असायला हवा, यावर हमासनं जोर दिला आहे. तर हमासला गाझामधून नष्ट करुनच बंदींना सोडवावं लागणार असल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे.

इस्रायल दक्षिण गाझामधील राफामध्ये आक्रमक इराद्यांनी आगेकूच करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याठिकाणी शरण घेतलेल्या 15 लाख विस्थापिती पॅलिस्टिनींना त्यांचे संभाव्य परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आलेला असतानाही, ते अशाप्रकारचं पाऊल उचलत आहेत.

"आम्ही राफाहमध्ये मोहीम राबवण्यासाठी सर्व प्रकारची तयारी करत आहोत, कारण ते गरजेचं आहे," असं इस्रायलचे परराष्ट्र मंत्री इस्रायल काट्झ यांनी शनिवारी म्हटलं होतं.

"पण तरीही यावर तोडगा निघेल अशी मला आशा आहे."

हमासच्या हल्ल्यांमध्ये जवळपास 1,200 लोक मारले गेले असून त्यांनी सुमारे 250 जणांना बंदी बनवलं होतं. हमासच्या आरोग्य मंत्रालयाच्या मते, गाझामध्ये इस्रायलच्या प्रत्युत्तराच्या करावाईत 34000 पेक्षा अधिक पॅलिस्टिनी मारले गेल्याचा दावा त्यांनी केला आहे.

नोव्हेंबर महिन्यात एक करार झाला होता, त्यात एका आठवड्याच्या शस्त्रसंधीच्या मोबदल्यात 105 बंदींना सोडण्यात आलं होतं. त्यात प्रामुख्यानं महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. तर इस्रायलच्या तुरुंगात बंद असलेल्या सुमारे 240 पॅलिस्टिनी कैद्यांनाही सोडण्यात आलं होतं. गाझामध्ये अजूनही 133 बंदी असल्याचं म्हटलं जात आहे. त्यापैकी जवळपास 30 जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता आहे.