गाझात हॉस्पिटलसमोर सापडले डोकं नसलेले, त्वचा काढलेले मृतदेह, सामूहिक दफनभूमीमुळे दिसलं हृदय हेलावून टाकणारं चित्र

फोटो स्रोत, EPA
- Author, शिरीन युसूफ आणि अदनान अल बुर्श
- Role, बीबीसी न्यूज अरेबिक
इस्रायल-हमास युद्धामुळं गाझा पट्टी बेचिराख झाली आहे. हजारो पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र गाझा पट्टीतील नासर हॉस्पिटलच्या मैदानात सापडलेल्या सामूहिक कबरींमुळे तर सर्वजण विचलित झाले आहेत. याचे तीव्र आंतरराष्ट्रीय पडसाद उमटले आहेत.
गाझा पट्टीमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या गोंधळात अनेकजण त्यांच्या प्रियजनांना शोधत आहेत. नासर हॉस्पिटल कॉम्प्लेक्समध्ये त्यांना शेवटचं पाहण्यात आलं होतं किवा ते असल्याचं कळालं होतं.
हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्यांच्या कुटुंबीयांना किंवा जवळच्या लोकांना माहित आहे की त्यांचे नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्य तिथं आहेत. मात्र इस्रायली सैन्यानं या भाग ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा संपर्क तुटला आहे.
आता हॉस्पिटलच्या अंगणातून असंख्य सामुदायिक कबरी बाहेर काढल्या जात आहेत.
खान युनिसच्या मोठ्या भागात इस्रायली सैन्यानं (IDF) शेकडो पॅलेस्टिनी नागरिकांची हत्या केल्याचा आणि नंतर त्यांचे मृतदेह नासर मेडिकल कॉम्प्लेक्सच्या मैदानात आणल्याचा आरोप पॅलेस्टाईनच्या नागरी सुरक्षा दलांनी केला आहे. अर्थात ते ही गोष्ट मान्य करतात की त्यातील काही कबरी या संघर्षाआधीच खणण्यात आलेल्या असू शकतात.
इस्रायली सैन्यानं 15 ते 22 फेब्रुवारी दरम्यान नासेर हॉस्पिटलमध्ये शिरल्यानंतर या परिसराचा ताबा घेतला होता. 26 मार्च आणि 7 एप्रिल दरम्यान इस्रायली सैन्य पुन्हा एकदा या हॉस्पिटलमध्ये शिरलं होतं.
इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलं आहे की, 15 फेब्रुवारी 2024 ला इस्रायली सैन्याचे रणगाडे गाझा मधील नासेर हॉस्पिटलमध्ये शिरले होते.
इस्रायलने फेटाळले आरोप
पॅलेस्टिनी सरकार म्हणतं की, त्यांनी नासर हॉस्पिटलमधून 283 मृतदेह बाहेर काढले आहेत. यातील काही मृतदेहांचे हात बांधलेले होते. नासर हॉस्पिटलच्या प्रांगणातील कबरीमध्ये पुरण्यात आलेले लोक नक्की कसे मेले किंवा त्या कबरींमध्ये त्यांचे देह नक्की कधी पुरण्यात आले, ही बाब अद्याप स्पष्ट नाही.
वोकर टर्क हे सध्या संयुक्त राष्ट्रसंघाचे मानवाधिकार उच्चायुक्त आहेत. ते म्हणाले की, या कबरी आणि गाझामधील नासर आणि अल-शिफा हॉस्पिटलमधील विध्वंस पाहून ते हादरले आहेत. वोकर टर्क यांनी या मृत्यूंच्या स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.
इस्रायली सैन्याचं म्हणणं आहे की, त्यांनी हे मृतदेह पुरले असल्याचे आरोप निराधार आहेत.

फोटो स्रोत, EPA
हमासने ओलीस ठेवलेल्या आणि आता सुटका झालेल्या इस्रायली नागरिकांनी सांगितलं की, त्यांना ताब्यात घेतल्यानंतर दीर्घकाळासाठी नासेर हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं.
नाबिल या आपल्या मुलाचा शोध घेणाऱ्या एका महिलेशी बीबीसीनं संवाद साधला. त्यांचं नाव उम मुहम्मद झिदान आहे. आपल्या मुलाचे अवशेष शोधण्यासाठी त्या सामूहिक कबरींकडे गेल्या होत्या.
हातात काही गुलाबाची फुलं आणि अत्तर आणि युकॅलिप्टस तेलाच्या दोन बाटल्या घेऊन त्या अत्यंत जड पावलांनी आणि उद्धवस्त अंतकरणाने गेल्या होत्या, असं त्या सांगतात.
त्या पुढे सांगतात, फुलं आणि अत्तर वाहण्यासाठी त्या आपल्या मुलाचा मृतदेह अतिशय हताशपणे शोधत होत्या. जणूकाही त्या लग्नसमारंभात हजर राहणार होत्या. कारण युद्धापूर्वी त्यांनी आपल्या मुलाला लग्न लावून देण्याचं आणि लग्नसमारंभ अगदी थाटामाटात करण्याचं वचन दिलं होतं.
नासर हॉस्पिटलमध्ये नेमकं काय झालं याचा शोध घेण्यासाठी बीबीसीच्या फॉरेन्सिक टीमनं उपलब्ध पुरावे तपासून पाहिले.
(अमेरिका, युक्रेन, रशिया, इस्रायल, पॅलेस्टाईन यांच्यासंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा- आंतरराष्ट्रीय बातम्या)
सामूहिक कबरी असल्याचं सिद्ध
21 एप्रिलच्या या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी मृतदेह असल्याचं दिसून येतं. पॅलेस्टिनी नागरी सुरक्षा दलं कबरींचा शोध घेत असल्याचं आणि मृतदेहांची ओळख पटवत असल्याचं त्यात दिसतं आहे.
एक्सवर (पूर्वाश्रमीचं ट्विटर) केलेल्या पोस्टनुसार गाझामधील नासर मेडिकल कॉम्प्लेक्सच्या मैदानातून मृतदेह बाहेर काढण्यात आले.
कुठे आहेत कबरी?
या ठिकाणची स्थिती 25 जानेवारीला पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओशी जुळते आहे. या व्हिडिओमध्ये पॅलेस्टिनी नागरिक 70 पेक्षा अधिक मृतदेहांना नासर हॉस्पिटलच्या प्रांगणात दफन करत असल्याचं दिसतं आहे.
21 एप्रिलच्या त्या व्हिडिओमधील इमारती ओळखू येत आहेत.
एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं बीबीसीला दिलेल्या माहितीमुळं सामूहिक कबरी असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळतो आहे. या माणसानं सांगितलं की मी जमिनीत कवट्या पुरताना पाहिलं. त्यात हात, पाय आणि कुजलेले मृतदेह होते. तिथं असह्य दुर्गंधी सुटली होती.
इस्रायली सैन्यानं सामूहिक कबरी खणल्या का?
पॅलेस्टिनी नागरी सुरक्षा दलांचे प्रवक्ते महमुद बसल म्हणाले की, पहिल्या दिवशी साधारण ऐंशी मृतदेह सापडले. त्यातील तीस मृतदेहांची ओळख पटवता आली. मात्र बाकीच्या मृतदेहांची ओळख पटवता येणं शक्य नव्हतं. कारण ते वेगवेगळ्या दिवशी पुरण्यात आले होते. त्यामुळं ते कुजले होते.
बसल सांगतात की, जेव्हा इस्रायली सैन्यानं हॉस्पिटलवर हल्ला केला तेव्हा त्यांनी हॉस्पिटलच्या प्रांगणातील कबरी खणल्या होत्या. ते ओलीस ठेवण्यात आलेल्या इस्रायली नागरिकांचे मृतदेह शोधत होते. इस्रायली सैनिकांनी ते मृतदेह तपासून पुन्हा त्याच कबरींमध्ये पुरले आणि त्यांच्या शेजारीच त्या हल्ल्यात मारले गेलेल्या लोकांचे मृतदेहदेखील पुरले.

फोटो स्रोत, EPA
बीबीसीला दिलेल्या माहितीत इस्रायली सैन्यानं म्हटलं आहे की, "इस्रायली सैन्यानं पॅलेस्टिनी नागरिकांचे मृतदेह पुरल्याचे आरोप निराधार आहेत."
इस्रायली सैन्यानं पुढं म्हटलं आहे की, "नासर हॉस्पिटलच्या परिसरातील इस्रायली सैन्याच्या कारवाईच्या वेळेस, ओलीस ठेवण्यात आलेल्या इस्रायली नागरिकांचा आणि बेपत्ता झालेल्या नागरिकांचा शोध घेण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पॅलेस्टिनी नागरिकांनी नासेर हॉस्पिटलमध्ये पुरलेले मृतदेह तपासण्यात आले होते."
"मृतदेहांची ओळख पटवण्यात आल्यानंतर जे मृतदेह इस्रायली ओलिसांचे नव्हते ते पुन्हा त्याच कबरीमध्ये पुरण्यात आले होते."
पॅलेस्टिनी नागरी सुरक्षा दलांच्या प्रवक्त्याने दिलेली माहिती आणि इस्रायली सैन्यानं दिलेली माहितीशी मेळ खाते आहे, असंच दिसतं. अर्थात यातून हॉस्पिटलच्या परिसरात इस्रायली सैन्यानं हल्ला केल्यानंतर नव्याने काही कबरी खोदण्यात आल्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.
पुरण्यात आलेल्या मृतदेहांबद्दल पुरावे काय सांगतात?
पॅलेस्टिनी नागरिकांनी, हॉस्पिटलच्या स्टाफने मागील काही महिन्यांमध्ये डझनावारी लोकांना ज्या ठिकाणी दफन केले होते, त्याच ठिकाणी या सामूहिक कबरी आढळून आल्या आहेत.
पॅलेस्टिनी नागरिक पॅलेस्टिनी नागरिकांच्या मृतदेहाचं दफन करत असल्याचं एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं आहे. हा व्हिडिओ 28 जानेवारीचा आहे. यात जवळपास 30 मृतदेहांचे दफन करण्यात आलं होतं.
28 जानेवारीच्या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या जागेपासून सहा मीटर अंतरावर 3 फेब्रुवारीला आणखी काही मृतदेहांचं दफन करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, EPA
पॅलेस्टिनी सुरक्षा दलांचे प्रवक्ते महमूद बसल यांनी बीबीसीला सांगितलं की, "या हॉस्पिटलच्या परिसरात पॅलेस्टिनी नागरिकांनी त्यांचे नातेवाईक आणि इतर ओळख न पटलेल्या मृतदेहांचं दफन केलं होतं. खान युनिसला इस्रायली सैन्यांनं वेढा घातल्यानंतर लोकं मारली गेली होती."
22 जानेवारीला हमास चालवत असलेल्या गाझा आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, खान युनिसच्या पश्चिमेला डझनावारी लोकं मारले गेलेत किंवा जखमी झाले होते. मंत्रालयानं सांगितलं की बाहेर जाणं असुरक्षित होतं त्यामुळे नाईलाजाने लोकांना नासर हॉस्पिटलच्या मैदानातच 40 मृतदेहांचं दफन करावं लागलं होतं.
बीबीसीने खातरजमा केलेल्या फोटोंमध्ये नासर हॉस्पिटलवर इस्रायली सैन्यानं हल्ला केल्यानंतर ताब्यात घेतलेले लोक दिसत आहेत.
इस्रायली सैनिकांनी ताब्यात घेतलेल्या लोकांचा छळ केला याचा पुरावा काय?
एका फोटोमध्ये एक हात बांधलेला, थोडासा कुजलेला मृतदेह दिसतो. त्यातून दिसतं की तो मृतदेह इस्रायली सैन्यानं ताब्यात घेतलेल्या लोकांपैकी कोणाचातरी आहे.
बीबीसीशी बोलतांना इस्रायली सैन्यानं सांगितलं की, "ही कारवाई अतिशय शिस्तबद्धंपणे करण्यात आली होती. हॉस्पिटल, रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोणताही धोका पोचणार नाही किंवा अपाय होणार नाही हे लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली होती."
मात्र तीन वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मागील महिन्यात बीबीसीला सांगितलं की, ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा छळ करण्यात आला, त्यांना मारण्यात आलं, थंड पाण्यात बुचकळ्यात आलं आणि तासनतास गुडघ्यावर बसवून ठेवण्यात आलं.

नासर हॉस्पिटलमधील परिस्थिती पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दिलेला व्हिडिओ बीबीसीला मिळाला आहे. त्या व्हीडिओमध्ये इस्रायली सैनिक पलंग हलवत असल्याचं दिसून येतं आहे. त्यात बंदी बनण्यात आलेल्या लोकांचे होत डोक्यावर बांधलेले दिसत आहेत.
इस्रायली सैन्यानं स्वतंत्रपणे प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओद्वारे या गोष्टीची पुष्टी झाली आहे. इस्रायली सैन्यानं प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये हॉस्पिटलच्या पलंगावर लोक झोपलेले असून त्यांचे हात डोक्यावर बांधलेले दिसून येत होते. हे लोक कोण होते आणि व्हिडिओ बनवल्यानंतर त्यांचं काय झालं याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही.
24 डिसेंबर 2023 ला पोस्ट करण्यात आलेल्या आणि बीबीसीने खातरजमा केलेल्या व्हिडिओमध्ये दिसून येतं की गाझामधील बंदी बनवण्यात आलेल्या लोकांना बांधण्यात आलं होतं आणि त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती.
मृतदेहांचे गायब झालेले अवयव
गाझामधील सरकारी प्रेस कार्यालयाचे संचालक इस्माईल अल-थावाब्ता म्हणाले की, डझनावारी रुग्ण, बेपत्ता झालेले लोक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ठार करण्यापूर्वी इस्रायली सैनिकांनी नग्न केलं होतं.
ते पुढे म्हणाले, "नासर हॉस्पिटलच्या प्रांगणात आम्हाला मुंडकं नसलेले, चामडी काढलेले मृतदेह सापडले आहेत. यातील काही मृतदेहांमधून तर अवयवदेखील काढून घेण्यात आले होते." इस्माईल यांनी या प्रकरणात आंतरराष्ट्रीय तपासाची मागणी केली आहे.
नासेर हॉस्पिटलमधील पॅलेस्टिनी डॉक्टर अहमद अबू मुस्तफा यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांना हातपाय नसलेले मृतदेह आढळले आहेत. यातील एक वैद्यकीय कर्मचाऱ्याचा होता. अंगावरील युनिफॉर्ममुळे त्याची ओळख पटवता आली. त्याचे हात बांधण्यात आले होते आणि चेहरा झाकण्यात आला होता.

पॅलेस्टिनी नागरिकांचा छळ केल्याची बाब इस्रायली सैन्यानं फेटाळून लावली आहे. त्यांनी सांगितलं की, या हल्ल्यात इस्रायली सैन्यानं हॉस्पिटलमध्ये असलेले जवळपास 200 दहशतवादी ताब्यात घेतले होते. त्या दहशतवाद्यांकडे दारुगोळा होता आणि त्याचबरोबर इस्रायली ओलिसांसाठी राखून ठेवलेली औषधे होती.
आमच्याकडे असलेले व्हिडिओ आणि फोटोंचं संकलन आम्ही डॉ. हसनैन अल तय्यर या फोरेन्सिक मेडिसिन तज्ज्ञाला दाखवले. ते इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत. डॉ. तय्यर यांनी सांगितलं की व्हिडिओमध्ये दिसणारे कुजण्याच्या विविध टप्प्यांवर असणारे मृतदेह त्यांनी पाहिले. यातून त्यांचं दफन वेगवेगळ्या वेळेला झाल्याचं दिसून येत होतं.
अल-तय्यर यांच्या मते व्हिडिओ आणि फोटोमध्ये त्यांनी जे पाहिले त्या आधारे मृतदेहांवर जखमांच्या आणि कापण्याच्या ज्या खुणा दिसत होत्या, त्या अवयव काढून घेण्याच्या नसून शक्तीशाली किंवा जड शस्त्रामुळे झालेल्या दिसत होत्या.
घर किंवा कारवर झालेल्या बॉम्बहल्ल्यामध्ये मृतदेहांचे तुकडे होणे ही सर्रास आढळून येणारी बाब आहे. या हल्ल्यांमध्ये शरीराचे अवयव ढिगाऱ्यांमध्ये हरवलेले असू शकतात.
शीर नसलेला देह
सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला जातो आहे, ज्यात एक शीर नसलेला मृतदेह दिसतो आहे. अलिकडेच सामूहिक कबरींमधून मिळालेल्या मृतदेहांपैकी हा एक मृतदेह असल्याचा दावा त्यात केला जातो आहे.

फोटो स्रोत, EPA
मात्र अल-तय्यर म्हणतात, मृतदेहाची स्थिती आणि रक्त यावरून दिसतं की हा फोटो त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर एक दिवसातच घेण्यात आला आहे.
त्यामुळेच ही बाब या कल्पनेशी विसंगत आहे की, 7 एप्रिलला इस्रायली सैन्यानं माघार घेतल्यापूर्वी मारले गेलेल्या व्यक्तीचा हा मृतदेह आहे.
नासर हॉस्पिटलच्या प्रांगणातील कबरींमधून मृतदेह काढण्यासाठी खोदकाम करणाऱ्या मशीनचा (डिगर) वापर करण्यात आला होता.
संयुक्त राष्ट्रसंघाची कारवाई
संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार कार्यालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, ते सध्या पॅलेस्टिनी सरकारनं नासेर हॉस्पिटलच्या मैदानात 283 मृतदेह सापडल्याच्या आणि त्यातील 42 जणांची ओळख पटण्या संदर्भात दिलेल्या वृत्तावर काम करत आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाचे मानवाधिकार उच्चायुक्त वोकर टर्क यांनी या मृत्यूसंदर्भात स्वतंत्र, कार्यक्षम आणि पारदर्शक तपासाची मागणी केली आहे. सध्याची तणावग्रस्त स्थिती पाहता, या तपासात आंतरराष्ट्रीय तपासकर्त्यांचादेखील समावेश असला पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, "आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यानुसार हॉस्पिटल्सना खास संरक्षण देण्यात आलेले आहे. जे लोक युद्धात किंवा गैरकृत्यात सामील नाहीत अशा नागरिकांची, बंदीवानांची विशिष्ट हेतूने हत्या करणं याला युद्धकाळातील गुन्हा मानण्यात आला आहे."
अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रालयानं देखील याबाबतीत चिंता व्यक्त केली आहे. समोर आलेल्या बातम्या अतिशय विचलित करणाऱ्या आहेत, असं अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रालयानं म्हटलं आहे.
(लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडत असलेल्या विविध गोष्टींचा, आरोप प्रत्यारोपांचा आणि वाद-प्रतिवादाचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा- लोकसभा निवडणूक 2024)











