गाझा युद्धाचे 6 महिने, 13 हजार मुलांचा मृत्यू; आतापर्यंत काय काय घडलं?

गाझा युद्ध

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सोहा इब्राहिम
    • Role, बीबीसी अरेबिक

गाझामध्ये ताबडतोब युद्धबंदी करण्यात यावी आणि सर्व ओलिसांची बिनशर्त सुटका करावी असा ठराव युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये गेल्या महिन्यात मंजूर करण्यात आला होता. पण गाझामध्ये गेले 6 महिन्यांपासून सुरू असलेला बॉम्बवर्षाव थांबण्याची चिन्हं नाहीत, तर दुसरीकडे बळी आणि जखमींचा आकडा वाढत चाललाय.

या युद्धामुळे गाझा पट्टीतील पायाभूत सुविधा, इमारती जवळपास उद्ध्वस्त झाल्यात आणि परिणामी रहिवाशांना दक्षिणेकडच्या राफा शहरात स्थलांतरित व्हावं लागलंय.

या भागामध्ये येत्या काही काळात भीषण अन्नदुर्भिक्ष्य भासण्याची शक्यता असल्याचा इशारा गेल्या महिन्यात युनायटेड नेशन्सने दिला होता.

7 ऑक्टोबर 2023 ला हमासने अचानक हल्ला केला ज्यामध्ये इस्रायलच्या आकडेवारीनुसार 1200 लोक - मुख्यतः सामान्य नागरिक मारले गेले.

गाझा युद्ध

युके, अमेरिका आणि युरोपियन युनियनने हमासला दहशतवादी संघटना ठरवलंय.

7 ऑक्टोबरच्या हल्ल्याच्यावेळी 253 जणांना ओलीस धरलं गेले. यापैकी जवळपास 130 बंधक गाझामध्ये ठेवण्यात आल्याचा अंदाज आहे तर 34 जणांचा मृत्यू झाल्याचं इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

इतर इस्रायली लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या पहिल्या हल्ल्यापासून आतापर्यंत 600 इस्रायली सैनिकांना मृत्यू झाला असून ऑक्टोबर अखेरीस जमिनीवरील हल्ल्याची कारवाई सुरू झाल्यापासून 256 जण मारले गेले आहेत.

युद्धाच्या 175व्या दिवसापर्यंत 32, 623 जण मारले गेले तर 75,092 पेक्षा अधिक जखमी झाल्याचं युनायटेड नेशन्सच्या कोऑर्डिनेशन ऑफ ह्युमानिटेरियन अफेअर्सने म्हटलंय.

गाझा युद्ध

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गाझा पट्टीतलं खान युनिस शहर

तर युद्धाच्या 178व्या दिवसापर्यंत किमान 32,916 जण मारले गेले - यापैकी बहुतांश महिला आणि लहान मुलं होती असं गाझा पट्टीच्या हमासच्या आरोग्य खात्याने म्हटलंय.

युनायटेड नेशन्सने 1 मार्चला प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार गाझामध्ये इस्रायली सैन्यामुळे आतापर्यंत 9,000 महिलांचा मृत्यू झालाय. पण हा आकडाही प्रत्यक्ष मृत्यूंपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे कारण ढिगाऱ्यांखाली अजूनही अनेक मृतदेह आहेत.

गाझा युद्धामुळे आतापर्यंत 13 हजारांपेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झाल्याचं युनायटेड नेशन्सच्या युनिसेफने म्हटलंय.

पॅलेस्टाईन आरोग्य खात्याने दिलेली आकडेवारी कितपत योग्य आहे याविषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी शंका व्यक्त केली होती, पण ही आकडेवारी विश्वासार्ह असल्याचं WHO ने म्हटलं होतं.

भीषण अन्न टंचाई

या गाझापट्टीतील 23 लाख लोकांवर स्वतःचं घर सोडून पळ काढण्याची पाळी आलीय. सध्या सुरू असलेलं युद्ध, त्यामुळे उद्ध्वस्त झालेली घरं आणि परिसर, अन्न - पाणी - इंधन - वीज या सगळ्यांचा तुटवडा या अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागतंय.

गाझामध्ये 'Famine' म्हणजेच भीषण अन्न दुर्भिक्ष्य निर्माण होण्याचा इशारा इंटिग्रेटेड फूड सिक्युरिटी फेज क्लासिफिकेशन - IPC या नेटवर्कने दिलाय.

हा गट सरकारं, युनायटेड नेशन्स आणि मदत पुरवणाऱ्या विविध संघटना या सर्वांना कोणत्या भागात उपासमारीची समस्या किती मोठी आहे याविषयीची आकडेवारी आणि विश्लेषण पुरवतो.

"गाझा पट्टीतील निम्मी लोकसंख्या (11.1 लाख) ही भीषण अन्न दुर्भिक्ष्याला सामोरी जाईल," असं त्यांनी म्हटलंय.

तर ही माहिती योग्य नसून युनायटेड नेशन्सच्या समित्या दररोज येणारी मदत योग्य रीतीने वितरीत करण्यात अपयशी ठरल्याचं इस्रायलने म्हटलंय.

गाझा युद्ध
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"कोणत्याही वेळी पाहिलं तरी, करीम शलोम क्रॉसिंगच्या गाझाच्या बाजूला मदत पुरवणारे शेकडो ट्रक अडवलेले दिसतात. इस्रायली अधिकाऱ्यांनी सर्व तपासणी केल्यानंतरही असं होतं. गाझामधल्या युद्धाचे नागरिकांवर काय दुष्परिणाम होत आहेत, याची इस्रायलला जाणीव आहे."

असं इस्रायली संरक्षण खात्याच्या सिव्हिल अफेअर्स को-ऑर्डिनेशन युनिटने म्हटलंय. वेस्ट बँक आणि गाझा या भागांमधल्या नागरी धोरणं ठरवणं या इस्रायली गटाच्या अखत्यारित आहे. इस्रायल गाझातल्या लोकांची जाणूनबुजून उपासमार करत असल्याचे आरोपही इस्रायलने फेटाळून लावले आहे.

गाझामध्ये जाणारी क्रॉसिंग्स खुली करत या भागात मदतीचा ओघ वाढवावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. इथे युद्धाच्या पूर्वी दररोज किमान 500 ट्रक मदत साहित्य घेऊन येत असत, असं UN ने म्हटलंय.

मार्च महिन्यात दररोज सरासरी 161 ट्रक या भागात मदत घेऊन येऊ शकल्याचं UNRWA - युनायटेड नेशन्सच्या पॅलेस्टाईन निर्वासितांसाठीच्या समितीने म्हटलंय. ही समिती गाझामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर मदत कार्य करते.

तर गाझा पट्टीत मानवतावादी दृष्टीकोनातून केली जाणारी किती मदत येऊ शकते यावर कोणतेही निर्बंध नसल्याचं इस्रायलने म्हटलंय.

पत्रकार आणि मदत कार्य करणाऱ्यांचे मृत्यू

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्ट्स (IFJ)च्या आकडेवारीनुसार या युद्धात आतापर्यंत 99 पॅलेस्टिनी पत्रकार आणि माध्यम कर्मचारी, 4 इस्रायली आणि 3 लेबनीज पत्रकार मारले गेले आहेत.

यासोबत 16 पत्रकार जखमी झाले असून, 4 बेपत्ता आहेत आणि गाझातल्या युद्धाचं वार्तांकन करणाऱ्या 25 पत्रकारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे.

गाझा युद्ध

इस्रायलच्या लष्करासोबतच राहायचं कबूल करत इतर अटी मान्य केल्या तरच पत्रकारांना गाझामध्ये शिरता येतं. या पत्रकारांना इस्रायलच्या सैन्यासोबतच असावं लागतं आणि बातम्या छापण्याच्या आधी त्या दाखवून तपासून घ्याव्या लागतात.

गाझामध्ये मदत कार्य करणाऱ्या 196 जणांचा ऑक्टोबरपासून मृत्यू झाल्याचं अमेरिकेच्या मदतीने चालवण्यात येणाऱ्या एड वर्कर सिक्युरेटी डेटाबेसने म्हटलंय. मदतकार्य करणाऱ्या लोकांबद्दलच्या घटना - गुन्हे यावर ही संस्था लक्ष ठेवते.

जमिनीवरून हल्ल्याची भीती

गाझापट्टीच्या दक्षिणेकडे असणाऱ्या राफावर जमिनी हल्ला - Ground Operation सुरू करण्याची धमकी इस्रायल गेले काही आठवडे देत आहे.

गाझा युद्ध

इजिप्तजवळच्या सीमेवरील हे राफा क्रॉसिंग सध्या बंद आहे. पण गाझा पट्टीत सुरू असलेलं युद्ध आणि कधीतरी या क्रॉसिंगद्वारे आपल्याला बाहेर पडता येईल या आशेने या भागात 15 लाख पॅलेस्टाईन निर्वासित गोळा झाले आहेत.

राफामध्ये इस्रायली सैन्याने असा मोठा हल्ला केला तर त्याचे मानवी आयुष्यावर किती भीषण परिणाम होतील याची कल्पनाही करता येणार नाही, अशी भीती संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गाझामधील ओलिसांची सुटका करावी आणि लवकर निवडणुका घ्याव्यात यासाठी आता इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावरील दबाव वाढतोय. हजारो इस्रायली नागरिकांनी यासाठी जेरुसलेमच्या रस्त्यावर निदर्शनं केली.

युद्धानंतरची ही पहिलीच इतकी मोठी निदर्शनं होती. नेतन्याहू यांच्या सरकारने ज्याप्रकारे ही युद्ध परिस्थिती हाताळली याबद्दल आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. सोबतच ओलिसांची सुटका करण्यामध्ये सरकारला अपयश आल्याचं म्हणत सरकारवर टीका केली.