इस्रायलच्या हल्ल्यात माझी 3 मुलं आणि 4 नातवंडं मारली गेली- हमास नेत्याची माहिती

फोटो स्रोत, Reuters
- Author, विकी वोंग
- Role, बीबीसी न्यूज
इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धात सतत घडणाऱ्या नवनवीन घडामोडीमुळं परिस्थिती तणावग्रस्त आहे. यामुळं फक्त याच परिसरात नाही तर जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या भागात युद्धबंदी होऊन शांतता निर्माण व्हावी यासाठी जगभरातून दबाव येतो आहे. त्यासाठी कैरो मध्ये इस्त्रायल आणि हमासमध्ये बोलणी सुरू आहेत.
त्यातच इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचे नेते इस्माईल हनियेह यांची मुलं आणि नातवंड मारली गेल्याचं वृत्त आलं आहे.
हमासचे राजकीय नेते इस्माईल हनियेह यांनी त्यांची तीन मुलं आणि चार नातवंडं गाझावर झालेल्या हवाई हल्ल्यात मारली गेल्याचं सांगितलं आहे.
हमासशी निगडीत प्रसारमाध्यमानं सांगितलं की गाझा शहरातील अल-शांती कॅम्पजवळ ज्या कारमध्ये हनियेह यांची मुलं प्रवास करत होती त्या कारवर हवाई हल्ला झाला होता.
हनियेह म्हणाले की युद्धबंदी साठी होणाऱ्या वाटाघाटींमधील हमासच्या मागण्यांवर या घटनेचा कोणताही परिणाम होणार नाही.
इस्त्रायलच्या लष्करानं सांगितलं की हनियेह यांची मुलं हमासच्या लष्करी शाखेचे सदस्य होते. मात्र हनियेह यांनी ही बाब फेटाळली आहे.
ईदच्या सणानिमित्त असणाऱ्या सुट्टीचा पहिला दिवस कुटुंबासमवेत साजरा करण्यासाठी हनियेह यांची मुलं जात होती.
हनियेह यांनी अल जझीराला सांगितलं की या युद्धकाळात त्यांची तीन मुलं, हाझीम, अमीर आणि मुहम्मद गाझामध्येच राहत होती.
हमासने नंतर दिलेल्या वक्तव्यात म्हटलं की हनियेह यांची चार नातवंडं मोना, अमाल, खालिद आणि रझानदेखील या हल्ल्यात मारली गेली आहेत. या हल्ल्याला त्यांनी ''दगाबाज आणि भ्याड'' हल्ला असं म्हटलं आहे.
हनियेह यांनी काय म्हटलं?
हनियेह यांनी सांगितलं की ते कतारची राजधानी असलेल्या दोहा येथे उपचारासाठी नेण्यात आलेल्या जखमी पॅलिस्टिनी लोकांची भेट घेण्यासाठी जात असताना त्यांना ही बातमी मिळाली. दोहा इथंच हनियेह यांचं वास्तव्य आहे.
युद्धबंदीसाठीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असताना आणि हमासकडून त्यावर उत्तर देण्याआधीच माझ्या मुलांवर हल्ला करून हमासवर दबाव आणला जाऊ शकतो असं शस्त्रूला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत, असं इस्माईल हनियेह यांनी अल जझीराला सांगितलं.
हमासच्या टेलिग्राम चॅनेल वर देण्यात आलेल्या कॉमेंट्समध्ये इस्माईल हनियेह यांनी परमेश्वराने हा सन्मान केल्याबद्दल त्याचे आभार मानले. त्यांची मुलं आणि नातवंडं शहीद झाल्याचं त्यांनी म्हटलं.
इस्त्रायलच्या लष्करानं म्हटलं की ''त्यांनी मध्य गाझा पट्टीतील हमासच्या तीन लष्करी हस्तकांना संपवलं आहे.''
पुढं लष्करानं म्हटलं की ती इस्माईल हनियेह यांची मुलं होती. मात्र इस्त्रायलच्या लष्कराच्या प्रसिद्धीपत्रकात हनियेह यांच्या नातवंडाच्या मृत्यूचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
आपली मुलं हमासच्या सशस्त्र शाखेचा भाग असल्याच्या गोष्टीचा इस्माईल हनियेह यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी गुरूवारी बोलताना इन्कार केला आहे.

फोटो स्रोत, Reuters
इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढतो आहे. त्याच पार्श्वभूमीवर कैरो इथं होत असलेल्या वाटाघाटीच्या ताज्या फेरीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सीआयए या अमेरिकन गुप्तचर संस्थेचे प्रमुख विलियम्स बर्न्स यांना पाठवलं आहे.
वाटाघाटीसाठी समोर आलेल्या ताज्या प्रस्तावाचा आढावा घेत असल्याचा हमासनं म्हटलं आहे. या प्रस्तावात गाझामधील इस्त्रायलच्या 40 ओलिसांना सोडण्याची अट आहे. त्याबदल्यात इस्त्रायलच्या तुरुंगातील 900 पॅलेस्टिनींना सोडलं जाणार आहे.
बहुतांश लोक हनियेह यांना हमासचे सर्वोच्च नेते मानतात आणि 1980 पासून ते पॅलिस्टिनी चळवळीचं महत्त्वाचे सदस्य आहेत. 2017 मध्ये हमासच्या राजकीय शाखेच्या अध्यक्षपदी त्यांनी निवड झाली होती. तर 2018 मध्ये अमेरिकेने त्यांना दहशतवादी म्हणून घोषीत केलं होतं.
या युद्धात हनियेह कुटुंबातील सदस्य मारले जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी फेब्रुवारी महिन्यात त्यांचा आणखी एक मुलगा मारला गेला होता. तर ऑक्टोबरमध्ये त्यांचा भाऊ आणि पुतण्या मारला गेला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात त्यांचा एक नातू मारला गेला होता.
7 ऑक्टोबरला हमासच्या सशस्त्र तुकडीनं इस्त्रायल वर केलेल्या हल्ल्यात 1,200 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 250 जणांना ओलिस ठेवण्यात आलं होतं.
इस्त्रायलच्या म्हणण्यानुसार अजूनही गाझामध्ये 130 इस्त्रायली नागरिकांना ओलीस ठेवण्यात आलं असून त्यातील 34 जणांचा मृत्यू झाला आहे.
ऑक्टोबरमध्ये हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्त्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत
गाझातील 33,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातील बहुतांश सर्वसामान्य नागरिक होते, असं हमासच्या आरोग्य खात्याचं म्हणणं आहे.











