इस्रायल-हमास संघर्षात लहान बाळांचा कुपोषणामुळे मृत्यू, मदत पाठवणंही झालंय कठीण

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डेव्हिड ग्रिटन
- Role, बीबीसी न्यूज
गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि हमासमधील संघर्ष तीव्र झाला आहे. त्यानंतर गाझातील लहान मुलं अन्न-पाण्यावाचून मृत्युमुखी पडत आहेत. तेथील स्थिती अत्यंत गंभीर झाली असून पालक मदतीची याचना करत आहेत.
'या मुलांचं भवितव्य काय आहे? त्यांना वाचवणारा कुणी येईल की ते मरुन जातील. माझा मुलगा अली तर वारला आहे.'
अली नावाच्या चिमुकल्या बाळाचे वडील सांगत होते. अली हा पॅलेस्टिनी होता. उत्तर गाझात असलेल्या बालकांच्या एकमेव रुग्णालयात त्याचा कुपोषणाने आणि निर्जलीकरणाने मृत्यू झाला.
गाझातील बालकांचे प्राण वाचवा असं आवाहन अलीच्या वडिलांनी केलं आहे. जर या भागात मदतीचा ओघ वाढवण्यात आला नाही तर भुकबळींची संख्या वाढेल असा इशारा युनायटेड नेशन्सने दिला आहे. या पार्श्वभूमीवर अलीच्या वडिलांनी हे आवाहन केलं आहे.
"अलीचा जन्म युद्धाच्या काळात झाला. या काळात त्याच्या आईला खाण्यापिण्यासाठी काहीच मिळालं नाही. त्यामुळे त्याचं पोषण झालं नाही. म्हणून बाळाचा मृत्यू झाला," असं बाळाच्या वडिलांनी बीबीसी अरेबिकच्या गाझा लाइफ लाइन रेडिओ सर्व्हिसला सांगितले आहे.
अलीच्या वडिलांनी आपली ओळख जाहीर होऊ नये म्हणून त्यांचे नाव न वापरण्याची विनंती केली आहे.
"अलीची स्थिती दिवसेंदिवस खराब होत गेली. त्याच्यावर उपचार व्हावेत म्हणून आम्ही रुग्णालयात गेलो. पण तिथे आम्हाला मदत मिळाली नाही. सगळ्या जगाच्या नजरेदेखत अलीचा मृत्यू झाला. सगळेजण त्याच्याकडे पाहात होते आणि त्याचा मृत्यू झाला."
गाझातील बैट लाहिया शहरातील कमाल अदवान रुग्णालयात कुपोषणामुळे अलीसारख्या किमान दहा बाळांचा मृत्यू झाल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे.
गाझाच्या हमासकडून चालवल्या जाणाऱ्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की 'गेल्या एक आठवड्यात कुपोषणामुळे आणि निर्जलीकरणामुळे 18 बालकांचा मृत्यू झाला. त्यातील 15 बालके कमाल अदवान या रुग्णालयातच दगावली.'
रुग्णालयात 6 बाळांवर सध्या उपचार होत आहेत त्यांच्याबाबतही हमासने चिंता व्यक्त केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हमास आणि इस्रायलमधील युद्ध जर त्वरित थांबलं नाही आणि लवकरात लवकर मदत पोहचवता आली नाही तर अनेक बालकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती युनायटेड नेशन्सच्या युनिसेफ या संघटनेनी व्यक्त केली आहे.
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की 'आतापर्यंत 30,700 जणांचा युद्धात बळी गेला आहे. त्यातील 70 टक्के हे महिला आणि बालकं होती.'
संघर्ष सुरू झाल्यापासून 72,000 जण जखमी झाल्याचे त्यांनी पुढे सांगितले आहे.
7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर संघर्षाला सुरुवात झाली. या हल्ल्यात अंदाजे 1,200 जणांचा मृत्यू झाला आणि 253 जणांना ओलीस ठेवण्यात आले होते. त्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल हवाई आणि लष्करी कारवाई केली आहे.
अंदाजे 3 लाख लोक उत्तर गाझात अडकून पडले आहेत. या ठिकाणी अन्नटंचाई निर्माण झाल्यामुळे मोठे संकट निर्माण झाले असल्याचे वर्ल्ड फुड प्रोग्रॅम या संघटनेनी म्हटले आहे. लवकरात लवकर मदत पोहोचणे अत्यावश्यक असल्याच्या या संस्थेनी अधोरेखित केले आहे.
युनायटेड नेशन्सने जानेवारीत केलेल्या तपासात असं आढळलं आहे, की दोन वर्षाखालील बालकांमध्ये सहा पैकी किमान एक जण तीव्र कुपोषणाला सामोरं जात आहे. या बालकांपैकी किमान 3 टक्के बालकांना गंभीर धोका असून त्यांना त्वरित उपचार मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मातांची उपासमार
युद्धजन्य परिस्थितीमुळे स्तनदा मातांची क्षमतेवर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. पौष्टिक आहाराचा अभाव, स्वच्छ पाणी आणि आरोग्य विषयक सुविधांचा अभाव तसेच मानसिक अस्वस्थता आणि थकवा या गोष्टींमुळे या माता आपल्या बाळाला स्तनपान देऊ शकत नाहीत.
आईचं दूध मिळालं नसल्यामुळे किंवा त्याला पर्याय म्हणून जो आहार सांगण्यात आला आहे त्याचा अभाव या भागात असल्यामुळे लहान मुलांची प्रकृती झपाट्याने खालवते. त्यांचे शरीर सुकून जाते आणि ते कुपोषित होतात. त्यातून या लहान बाळांची किडनी खराब होते आणि परिणामी त्यांचा मृत्यू होतो.
कमाल अदवान या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या डॉ. सामिया अब्देल जलील यांनी गाझा लाइफनलाइनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "एक तान्ही मुलगी आणि तिची मोठी बहीण यांचा दोन दिवसांतच मृत्यू झाला."
"पूर्ण अतिदक्षता विभागातच दुधाचा तुटवडा आहे. दूध मिळणं हे फक्त त्या तान्ह्या मुलीसाठीच नाही तर पूर्ण विभागालाच मिळालं नाही. अगदी थोडं दूध न मिळाल्यामुळे त्या तान्हुलीचा मृत्यू झाला," सामिया अब्देल जलील सांगतात.
रुग्णालयात आलेलं चार महिन्यांचं सलाह समरा नावाचं बाळ खूप आजारी आहे. डॉ. जलील आणि त्यांची टीम या बाळाचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याकडे असलेल्या तुटपुंज्या साधनांच्या आधारे आटोकाट प्रयत्न करत आहेत.
माझ्या काळजाचं पाणी पाणी होतं
त्या बाळाच्या आईने सांगितलं की "हे बाळ मुदतीआधीच जन्मलं आणि त्याचं निर्जलीकरण झालं. त्या बाळाला किडनीचा त्रास सुरू झाला आणि त्याची लघवी साठून राहिल्याचं आमच्या लक्षात आलं. हे अतिशय वेदनादायी आहे आणि यामुळे पोटफुगी होती"
"बाळाला होणारा त्रास पाहून माझ्या काळजाचं पाणी पाणी होतं. हे पाहणंदेखील कठीण आहे की तुमचं बाळ सतत रडत आहे आणि त्याला सू देखील करता येत नाहीये आणि डॉक्टरदेखील त्या बाळाची काहीच मदत करू शकत नाहीत," असं त्या बाळाच्या आईने सांगितलं.
"त्या बाळाला उपचार मिळावेत आणि इतर सर्व गोष्टी मिळणे हा त्याचा अधिकार आहे. त्या निष्पाप जीवाला त्याच्या आयुष्याचा सुरुवातीला या गोष्टी मिळण्याचा नैसर्गिक अधिकार आहे," असं त्या बाळाच्या आईने म्हटले.
"बाळाची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत चाललीये. त्याला लवकरात लवकर उपचार मिळण्याची गरज आहे. मला वाटतं जे पण लोक माझं म्हणणं ऐकत आहेत त्यांना माझी विनंती आहे की माझ्या बाळाला वाचवण्यासाठी मदत करा," असं त्या आईने म्हटलं.
कमाल अदवान या रुग्णालयाचे संचालक डॉ. अहमद अल काहलोत म्हणाले की "हमासच्या आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांच्या मृत्यूबद्दल जी माहिती दिली आहे, त्यातून या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात येऊ शकत नाही. हा प्रश्न त्याहून अधिक गंभीर आहे."
कुपोषणामुळे बालकांचे मृत्यू होत आहेत ते मोजण्या दोन आठवड्यांपूर्वीपासून सुरुवात झाली आहे. खरी संख्या ही त्याहून अधिक आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानॉम घेब्रेयेसूस यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, "जागतिक आरोग्य संघटनेनी इंधनाचा आणि आवश्यक आरोग्य साधनांचा पुरवठा कमाल अदवान रुग्णालयाने आणि आणखी एका रुग्णालयाला केला आहे. जबालिया भागातील अल आवदा रुग्णालयाला त्यांनी भेट दिली होती," त्यानंतर त्यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली.
पण त्याचवेळी त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की "जी मदत पाठवण्यात आली आहे ती पुरेशी असू शकत नाही. जितका पुरवठा होणं आवश्यक होतं त्या प्रमाणात ही मदत अल्पच आहे."
"आम्ही इस्रायलला आवाहन करतो की नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित होणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी. नागरिकांना प्रामुख्याने लहान मुलांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची आवश्यकता आहे. पण या सर्व गोष्टीहून महत्त्वाची एक गोष्ट आहे, ती गोष्ट या रुग्णांना प्राधान्याने मिळणं आवश्यक आहे ती गोष्ट म्हणजे शांती आणि स्थैर्य," असं घेब्रेयेसूस म्हणाले.
गाझातील भागात मदत पोहोचावी यासाठी पाश्चिमात्य देशांकडून इस्रायलवर दबाव टाकण्यात येत आहे.
मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की 'गाझामध्ये जास्तीत जास्त मदत पोहोचली पाहिजे... कुठलंही कारण खपवून घेतलं जाणार नाही. अगदी कुठलंही.'
असं असलं तरी वर्ल्ड फुड प्रोग्राम या संस्थेनी मंगळवारी सांगितलं की "गेल्या पंधरा दिवसात पहिल्यांदा गाझात अन्न आणि औषधांचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण इस्रायली सैनिकांनी तो हाणून पाडला.
युनायटेड नेशन्सशी संलग्नित असलेल्या या संस्थेने सांगितलं की "पुरवठा असलेल्या 14 वाहनांचा ताफा इस्रायली सैनिकांनी परत पाठवला आणि ती वाहनं परत येताना लोकांनी त्या वाहनांची लूट केली. याबाबत बीबीसीने इस्रायली लष्कराची बाजून जाणून घेण्याचा प्रयत्न केला."
यावर इस्रायली संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे की "गाझातील नागरिकांना आवश्यक ती मदत पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर हमासच्या ताब्यात असलेले ओलीस सोडवून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत."
"गाझाला हमासपासून मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे," असं मंत्रालयाने स्पष्ट केलं.











