इस्रायलचे लोक मृत सैनिकांचे शुक्राणू का जतन करत आहेत? मृतदेहातून स्पर्म्स कसे काढतात?

- Author, मिशेल शुवाल आणि आयेशा खैराल्लाह
- Role, बीबीसी अरेबिक
हमास बरोबर गाझा पट्टीत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये एक वेगळाच मुद्दा चर्चेत आहे.
इस्रायलमध्ये अशा आई-वडिलांची संख्या वाढते आहे जे आपल्या मरण पावलेल्या सैनिक मुलाच्या शुक्राणूंचं (स्पर्म) सुरक्षितपणे जतन करू इच्छितात.
मरण पावलेल्यांच्या शुक्राणूंचा वापर करण्यासंदर्भात इस्रायलमध्ये काही नियम होते. मात्र मागील वर्षी सात ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर अभूतपूर्व हल्ला केला. त्या हल्ल्यानंतर शुक्राणू सांभाळून ठेवण्यासंदर्भातील नियमांना शिथिल करण्यात आलं आहे.
याच्या अंमलबजावणीची कायदेशीर प्रक्रिया देखील लांबलचक आहे. त्यामुळे सैनिकांच्या कुटुंबीयांमध्ये त्याबद्दल नाराजी आणि असंतोष आहे.
अवी हारुश यांचा 20 वर्षांचा मुलगा रीफ या वर्षी 6 एप्रिलला गाझा पट्टीत सुरू असलेल्या लढाईत मारला गेला. आपल्या मुलाची आठवण आल्यावर अवी हारुश यांचा कंठ दाटून येतो.
रीफ मारला गेल्यानंतर सैन्याचे अधिकारी अवी हारुश यांच्या घरी आले होते. त्यांनी अवी यांच्यासमोर एक पर्याय ठेवला होता. त्यांच्याकडे इतका वेळ होता की रीफच्या शुक्राणू (स्पर्म) सांभाळून ठेवता येतील.

सैन्याच्या अधिकाऱ्यांनी रीफच्या कुटुंबीयांनी ते यासाठी तयार आहेत का हे विचारलं होतं.
हे ऐकल्यानंतर रीफचे वडील अवी हारुश लगेच तयार झाले.
ते म्हणाले, "रीफ त्याचं आयुष्य मनसोक्त जगला. तो गेल्यानं आमच्या कुटुंबाचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं, मात्र तरीही आम्ही आयुष्याचा सामना करत जगत आहोत. रीफला मुलं आवडायची. त्याला स्वत:ची मुलं हवी होती, याबद्दल काहीही शंका नाही."

मृत सैनिकांच्या वडिलांच्या आयुष्याचं ध्येय
रीफचं लग्न झालेलं नव्हतं. त्याची प्रेयसी देखील नव्हती. त्यामुळे साहजिकच त्याच्या शुक्राणूंचा वापर करण्यासंदर्भात अडचणी होत्या.
रीफचे वडील अवी यांनी आपल्या मुलाची कहाणी सांगितली. त्यानंतर अनेक महिला पुढे आल्या. त्यांनी रीफच्या बाळाला जन्म देण्याचा प्रस्ताव दिला.
अवी सांगतात की रीफच्या बाळाला जन्म देणं हेच आता 'त्यांच्या आयुष्याचं मिशन' आहे.
मागील वर्षी सात ऑक्टोबरला हमासनं इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलनं केलेल्या कारवाईत मोठी जीवितहानी झाली. यात इस्रायलचे सैनिक देखील मारले गेले. आता अनेक अशी कुटुंबं आहेत ज्यांना आपल्या मुलांच्या शुक्राणूंना सुरक्षितपणे सांभाळून ठेवायचं आहे.

अवी यांचं कुटुंब देखील अशाच कुटुंबांपैकी एक आहे. हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात जवळपास 1,200 लोक मारले गेले होते. तर जवळपास 251 इस्रायली नागरिकांना हमासनं ओलीस ठेवलं होतं.
हमासला प्रत्युत्तर देताना इस्रायली सैन्यानं गाझा पट्टीवर हल्ला चढवला होता. हमासच्या आरोग्य मंत्रालयानुसार इस्रायली सैन्याच्या कारवाईत आतापर्यंत 39,000 पेक्षा अधिक पॅलेस्टिनी लोक मारले गेले आहेत.

या बातम्याही वाचा -
- इस्रायल-हमास संघर्ष: अमेरिकेच्या युद्धबंदी योजनेला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा पाठिंबा
- 'चमत्कारिक' रेस्क्यू ऑपरेशनमधून इस्रायलने केली हमासच्या तावडीत असलेल्या चार बंदींची सुटका
- गाझात पिण्याच्या पाण्याचे साठे आणि सांडपाण्याच्या सुविधांवर हल्ले, युद्धस्थितीत नवे संकट
- 'आमच्या तंबूजवळच्या कबरींवर कुत्री हल्ले करतात, त्यांना पाहून मुलं घाबरतात अन् मला बिलगतात'

शुक्राणूंचं जतन करू इच्छिणाऱ्यांच्या संख्येत वाढ
इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयानुसार मागील वर्षीच्या सात ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्रायलमधील जवळपास 170 तरुणांच्या शुक्राणूंचे जतन करण्यात आले आहे.
यामध्ये सैनिक आणि सर्वसामान्य नागरिक, दोघांचाही समावेश आहे. एक वर्षा आधीच्या अशा तरुणांच्या संख्येशी तुलना करता यात 15 पटींनी वाढ झाली आहे.

या प्रक्रियेत मृत जवानाच्या अंडाशयाला एक चीर देऊन त्यातून पेशींचा एक छोटा भाग काढला जातो. त्यामधून शुक्राणूंच्या जिवंत पेशींना प्रयोगशाळेत वेगळं करून त्या गोठवल्या जाऊ शकतात.
मृत्यू झाल्यानंतर 24 तासांच्या आत जर या पेशी काढण्यात आल्या तर भविष्यात त्यांचा वापर करून यश मिळण्याची शक्यता सर्वांत अधिक असते. तशा या पेशी 72 तासांपर्यंत जिवंत राहतात.
ऑक्टोबरमध्ये इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयानं या प्रक्रियेसाठी असलेल्या न्यायालयाच्या आदेशासंदर्भात सूट दिली होती.
मुलाच्या मृत्यूचं दु:ख
आपल्या सैनिक मुलाच्या शुक्राणूंना सांभाळून ठेवणारे रेचेल आणि याकोव कोहेन हे पहिले इस्रायली आई-वडील आहेत. इस्रायली सैन्यानुसार त्यांचा मुलगा केविन 2002 मध्ये गाझा पट्टीत पॅलेस्टिनी स्नायपरकडून मारला गेला होता.
केविनच्या शुक्राणूंचा वापर करून रेचेल आणि याकोव कोहोन यांना एक नात मिळाली. तिचं नाव ओशेर आहे.
केविनच्या मृत्यूनंतर रेचेल वर दु:खाचा डोंगर कोसळला. त्या म्हणतात, "मी त्याचं कपाट उघडलं. मी त्याचा सुंगध शोधत होते. त्याच्या बुटांचासुद्धा मी वास घेतला. केविनचा फोटो जणूकाही माझ्याशी बोलत होता. त्याला बाळ होईल याची खातरजमा करण्यास केविननं मला सांगितलं."
रेचेल पुढे सांगतात, "त्यांना खूपच विरोध सहन करावा लागला. मात्र एका ऐतिहासिक कायदेशीर निकालानंतर त्यांचा मार्ग सोपा झाला. या निकालामुळे त्यांना आपल्या मुलाच्या बाळासाठी संभाव्य आईच्या शोधात जाहिरात देता आली."
रेचेल यांनी अशी जाहिरात दिल्यानंतर अनेक महिलांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यातच एक होती, इरिट. आपल्या कुटुंबाचं खासगीपणं जपण्यासाठी इरिट स्वत:चं पूर्ण नाव सांगत नाही, ओळख लपवते.

इरिट सुद्धा एकटीच होती.
ती म्हणते की एक मानसशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यानं त्यांची चांगली तपासणी केली.
त्यानंतर न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर तिच्यावर गर्भधारणेसाठी उपचार सुरू झाले.
इरिट सांगते, "काही लोकांनी सांगितलं की आपण निसर्गाच्या कामात हस्तक्षेप करत आहोत. मात्र मला असं वाटत नाही. ज्या बाळाला आपले वडील माहीत असतात आणि जे बाळ शुक्राणू दान केल्यामुळे जन्माला येतो, त्या दोघांमध्ये फरक असतो."
ओशेरला माहीत आहे की तिचे वडील (केविन) सैन्यात होते आणि लढाईत मारले गेले होते. तिची खोली डॉल्फिननं सजवण्यात आली आहे. खोलीत सर्वत्र डॉल्फिन आहेत. ओशेरला हे देखील माहीत आहे की तिच्या वडिलांना डॉल्फिन आवडायचे.
ती म्हणते, "मला माहीत आहे की त्यांचे शुक्राणू काढण्यात आले होते आणि मला जन्म देण्यासाठी एक सर्वोत्तम आईचा शोध घेण्यात आला."
इरिट सांगते, ओशेरला आजी-आजोबा, काका आणि दोन्ही बाजूनं भावंडं सुद्धा मिळाली आहेत.
ती म्हणते की ओशेरचं संगोपन इतर सर्वसाधारण मुलांप्रमाणेच केलं जातं आहे. जेणेकरून असं वाटू नये की ती फक्त एक जिवंत आठवण आहे.
आई-वडिलांसाठी महत्त्वाचा मुद्दा
डॉक्टर इटाई गट, शामीर मेडिकल सेंटरमध्ये स्पर्म बँकेचे संचालक आहेत. त्याचं म्हणणं आहे की मुलाच्या शुक्राणूंचं सुरक्षितपणे जतन करून ठेवणं ही गोष्ट त्याच्या आई-वडिलांसाठी खूप महत्त्वाची आहे.
ते म्हणतात, "भविष्यात प्रजननाची शक्यता सुरक्षित ठेवण्याची ही शेवटची संधी असते."
ते सांगतात, सांस्कृतिकदृष्ट्या यात खूप महत्त्वाचा बदल झाला आहे. समाज आता या गोष्टीचा स्वीकार करू लागला आहे. मात्र सध्याच्या नियमांमुळे सिंगल व्यक्तीच्या बाबतीत संघर्षाची स्थिती निर्माण केली आहे.
डॉक्टर गट म्हणतात की 'अनेक वेळा शुक्राणूंचा वापर करून प्रजनन करण्यास परवानगी दिल्याचे स्पष्ट दस्तावेज नसतात.'
अशा परिस्थितीत ज्या कुटुंबांनी आपल्या मुलाचे शुक्राणू सांभाळून ठेवले आहेत आणि ज्यांना प्रजननासाठी त्या शुक्राणूंचा वापर करायचा नाही अशा कुटुंबांसमोरील अडचणी आणखी वाढतात.

डॉक्टर गट म्हणतात, "आपण प्रजननाबद्दल बोलत आहोत. या प्रक्रियेतून आपण एका मुलाला किंवा मुलीला जन्म देणार आहोत....आपल्याला हे माहीत आहे की वडिलांशिवाय तो अनाथ असणार आहे."
ते म्हणतात, बहुतांशवेळा मृत व्यक्तीला त्याच्या शुक्राणूंद्वारे जन्माला येणाऱ्या बाळाच्या आईबद्दल माहीत नसतं. बाळाचं शिक्षण आणि भविष्याशी निगडित सर्व बाबींचे निर्णय त्याच्या आईलाच घ्यावे लागणार असतात.
डॉक्टर गट या मुद्द्याबाबत सांगतात, मृत व्यक्तीकडून प्रजननासंदर्भात स्पष्ट परवानगी देण्यात आलेली नसेल तर त्याचे आई-वडील त्याचे शुक्राणू सांभाळून ठेवण्यास विरोध करायचे. मात्र सध्या युद्धात मारले गेलेल्या सैनिकांच्या आई-वडिलांना भेटल्यानंतर त्यांचं मत बदललं आहे.
ते म्हणतात, "ही गोष्ट त्यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे ही बाब माझ्या लक्षात आली. अनेकदा मृत सैनिकाच्या आई-वडिलांना यातून मोठा दिलासा मिळतो."
इस्रायली समाजातील वेगवेगळी मतं आणि कायदेशीर अडचणी
युवाल शेर्लो हे तेल अवीव मध्ये ज्यू मूल्याचं, धारणांचं समर्थन करणारे एक प्रसिद्ध रबाय (Rabi) आहेत. रबाय म्हणजे धर्मगुरू किंवा धार्मिक नेते. त्यांचं देखील म्हणणं आहे की मृत व्यक्तीची परवानगी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
यासंदर्भात ते दोन महत्त्वाच्या ज्यू तत्त्वांचा सुद्धा उल्लेख करतात. या तत्वांमध्ये कोणत्याही व्यक्तीचा वारसा सुरू राहण्याबद्दल आणि संपूर्ण मृतदेहाचं दफन करण्याबद्दल सांगण्यात आलं आहे.
काही धर्मगुरुंचं असंदेखील मत आहे की कुटुंब वाढवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या मृतदेहातून पेशी काढून घेण्यास काहीही हरकत नाही. मात्र काही रबाय या संपूर्ण प्रक्रियेच्या विरोधात आहेत.
2003 मध्ये अॅटर्नी जनरल यांनी प्रकाशित केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये यासंदर्भातील नियम देण्यात आलेले आहेत. मात्र त्यांना कायदेशीर आधार नाही.
इस्रायलच्या संसदेनं या मुद्द्याबाबत अधिक स्पष्ट आणि व्यापक नियमांचा समावेश असलेल्या विधेयकाचा मसुदा तयार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही.
या प्रक्रियेबद्दल चांगली माहिती असणाऱ्या लोकांनी बीबीसीला सांगितलं की मृत व्यक्तीच्या परवानगीबाबत मतभेद आहेत.

याशिवाय युद्धात मारले गेलेल्या सैनिकाच्या मुलांना जे लाभ, सुविधा मिळतात त्या या प्रक्रियेतून जन्मलेल्या बाळाला मिळणार की नाही याबद्दल देखील मतभेद आहेत.
इस्रायलमधील प्रसारमाध्यमांमध्ये याबाबत बातम्या देखील आल्या आहेत की शुक्राणूंचा वापर करून बाळ जन्माला घालावे की नाही याबद्दल मारले गेलेल्या सैनिकाची विधवा आणि त्याच्या आई-वडिलांमध्ये मतभेद आहेत.
मृत मुलाच्या शुक्राणूंवर त्याच्या आई-वडिलांचा किती अधिकार असला पाहिजे याबद्दल देखील मतभेद आहेत. विशेषकरून जर त्या मुलाची विधवा पत्नी आपल्या पतीच्या शुक्राणूंचा वापर करून बाळाला जन्म देण्यासाठी करू इच्छित नसेल तर काय करायचे त्या संदर्भात देखील मतभेद आहेत.
ज्या आई-वडिलांनी आपल्या मृत मुलाच्या शुक्राणूंना सांभाळून ठेवलं आहे, त्यांना वाटतं की याबाबतीत कायद्यासंदर्भात एकमत जरी झालं, तरी यातून फक्त परवानगीच्या मुद्द्यासंदर्भातील अडचण दूर होईल. मात्र न्यायालयात चालणाऱ्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईतून त्यांची सुटका होणार नाही.
मात्र रीफचे वडील अवी हारुश यांचा याबाबतीत ठाम निर्धार आहे. अवी म्हणतात की रीफच्या बाळाचा जन्म होईपर्यत ते स्वस्थ बसणार नाहीत.











