You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मासिक पाळीतल्या रक्तासाठी विवाहितेचा छळ, विकण्यासाठी हवं होतं रक्त
- Author, मानसी देशपांडे
- Role, बीबीसी मराठीसाठी, पुण्याहून
आपल्या सासरच्यांनी मासिक पाळीचे रक्त विकण्यासाठी मागितल्याचा धक्कादायक आरोप एका महिलेनं केला आहे.
पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये 28 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीमधून अघोरी प्रकाराबाबत हा धक्कादायक आरोप करण्यात आला.
या महिलेने केलेल्या फिर्यादीनुसार, पती आणि सासरच्यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्याचसोबत ऑगस्ट 2022 मध्ये तिच्या सासरच्यांनी तिचे मासिक पाळीतले रक्त विकण्यासाठी मागितले.
ते द्यायला नकार दिल्यावर त्यांनी जबरदस्ती करुन मासिक पाळीचं रक्त घेतल्याचं संबंधित महिलेच्या फिर्यादित म्हटलं आहे.
हा प्रकार बीड जिल्ह्यात घडला असून 7 मार्च 2023 रोजी या महिलेने पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरुन तिच्या सासरच्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीसंदर्भात विश्रांतवाडी पोलिसांनी अधिक माहिती दिली.
विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “28 वर्षांच्या महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे. तिचं लग्न 2019 सासवडमध्ये मध्ये झालं. तिचं माहेर विश्रांतवाडीमधलं आहे. त्यानंतर हे दांपत्य चंदननगर आणि फुरसुंगीमध्ये राहत होते. तिला तिच्या सासरच्यांकडून झालेल्या त्रासानंतर तिने 2021 मध्ये कोर्टात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केलेली होती.
ती तक्रार सुनावणी सुरु असताना सासू- सासरे आणि नवरा यांनी तिला समजावत केस मागे घ्यायला लावली. ते तिला नांदवण्यासाठी त्यांच्या मूळ गावी घेऊन गेले. त्यांचं मूळ गाव हे बीड जिल्हातलं कामखेडा आहे.”
मासिक पाळीतल्या रक्तासंदर्भातला अघोरी प्रकार तिच्या सासरी कामखेडामध्ये घडल्याचं पोलिसांनी सांगितलं.
50 हजार रुपयांना विकण्यासाठी हवं होतं रक्त
“ती तिथे राहत असताना ऑगस्ट 2022 मध्ये गणपतीच्या उत्सवादरम्यान दिराने तिला तिच्या मासिक पाळीतल्या रक्ताची आवश्यकता आहे असं सांगतिलं. यावर ती चिडली आणि असं काही हवं असेल तर तुमच्या बायकोकडून घ्या असं तिने सांगितलं. पण दिराने सांगितलं की ज्यांना मूलबाळ नाही अशा महिलेच्या मासिक पाळीतल्या रक्ताची आवश्यकता आहे. ते कुणाला तरी देऊन त्या बदल्यात त्याला 50 हजार रुपये मिळणार होते. महिलेची या प्रकाराला मान्यता नव्हती.
तिचा दीर,मावस दीर आणि बाकी आरोपींनी तिचं मासिक पाळीतलं रक्त काढून घेतल्याची तक्रार तिने पोलिसात दिली. त्याप्रमाणे तिच्या कौटुंबिक छळाबाबत आणि तिच्याशी करण्यात आलेल्या अघोरी कृत्याबाबत संबंधित कायदान्वये गुन्हा दाखल केलेला आहे,” अशी माहिती विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दत्तात्रय भापकर यांनी माध्यमांना दिली.
हा गुन्हा बीड जिल्ह्यात घडला असल्याने गुन्हा दाखल करुन तो पुणे पोलिसांकडून बीडमध्ये वर्ग करण्यात आलेला आहे. या प्रकरणी अजून कोणत्या आरोपीला अटक झालेली नसल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं.
या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाचा महिला आयोगाकडून पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं सांगितलं.
“नुकताच जागतिक महिला दिन साजरा कण्यात आला. अशा घटना पाहता महिलांवरती होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराचा लढा अजून किती बाकी आहे आणि किती लढावा लागेल असा प्रश्न पडतो. यामध्ये आयोग पाठपुरावा करेल. आरोपींवर कारवाईसाठी पाठपुरावा करेल. समाजामध्ये अशा घटना घडू नये यासाठी सातत्याने अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने जनजागृतीची मोहिम हाती घेतलली आहे,” असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
अंधश्रद्धा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
या प्रकरणाची दखल घेतल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशनात सांगितलं.
अशा अंधश्रद्धा आणि अघोरी प्रकरणांना आळा घालण्यासाठी जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सांगण्यात आलं.
“अंधश्रद्धा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. या कायद्याचे अजूनही नियम बनवले गेलेले नाहीयेत. अशा प्रकरणांची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करताना ज्यांच्यावर अत्याचार झाला आणि त्यांच्यासोबतच्या सामाजिक संघटनांना संघर्ष करावा लागतो. त्यानंतर गुन्हा नोंद करुन घेतला जातो.
कायदा पोलिसांना नीट कळत नाही. अशा अत्याचारग्रस्त महिलांना सामाजिक संस्थांची मदत घ्यावी लागते. अशा घटनांमागची दाहकता पोलिसांना कळत नाहीये. पोलिसांचे प्रशिक्षण गरजेचं आहे,” असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य आणि राज्य बुवाबाजी संघर्ष विभागाच्या पदाधिकारी नंदिनी जाधव यांनी सांगितलं.
नंदिनी यांनी म्हटलं, “या कायद्याला आता दहा वर्ष पूर्ण होतील. आम्ही नेहमी प्रबोधन करतो. यासाठी प्रशासनाची फार महत्त्वाची भूमिका आहे. त्याची नियमावली आवश्यक आहे. आता नुसती समिती बनवली आहे. पण समितीच्या लोकांना त्या माध्यमातून कामं करायला सांगतिलचं जात नाही. मग त्यासाठी जे फंडिंग मिळतं त्याचं होतं काय? ज्या कायद्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला. त्या कायद्याची नियमावली बनवू शकत नाही यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं?”
याशिवाय महिलांवर कौटुंबिक हिंसाचाराला जोडून असे जादूटोणा आणि अंधश्रद्धेतून होणारे अत्याचार सातत्याने समोर येत असल्याचं नंदिनी जाधव यांनी सांगितलं.
“कौटुबिक हिंसाचाराला जोडून अशा घटना आता मोठ्या प्रमाणात घडायला लागल्या आहेत. काही सुशिक्षित महिलाही अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचं पुढे येतं. एका गुरु म्हणवल्या जाणाऱ्या महिलेने दुसऱ्या महिलांवर अघोरी प्रकार केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. जर महिलाच महिलांच्या बाबतीत असं वागणार असतील तर कसा समाज पुढे जाणार?” असंही नंदिनी जाधव यांनी म्हटलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)