You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Menstrual Hygiene Day: कपड्यांना मागे रक्ताचा डाग पडतो तेव्हा...
- Author, समृद्धा भांबुरे
- Role, बीबीसी मराठी
"मी 11 वर्षांची होते. शाळेत जाण्यासाठी बसमध्ये बसले होते आणि अचानक माझ्या पोटात खूप दुखू लागलं. ते नेहमी सारखंच दुखणं नव्हतं. मला पोटात असह्य कळा येत होत्या, गळून गेल्यासारखं वाटतं होतं.''
''मी शाळेत गेल्यावर शिक्षिकेला पोटात खूप दुखत असल्याचं सांगितलं. त्यांनी मला पोटदुखीचं औषध दिलं. औषध घेतल्यावर मी वर्गात जाऊन बसले. मधल्या सुट्टीच्या अगोदर पीटीचा तास होता. मैदानावर जाण्यासाठी मी उठले आणि माझ्या मागे बसलेल्या मुला-मुलींमध्ये कुजबूज सुरू झाली''
"माझ्या कपड्यांवर रक्ताचे डाग लागले होते. ती कुजबूज, त्या नजरा, ते हसणं आणि माझं रडणं हा सगळा प्रसंग मला आजही तसाच लक्षात आहे."
डोंबिवलीत राहणारी अनुजा तिला पहिल्यांदा मासिक पाळी आली, त्यावेळचा हा किस्सा सांगत होती.
"माझ्या आयुष्यातला अत्यंत वाईट दिवस म्हणता येईल तो. काही मुलं माझ्याकडे बघून हसत होती. काही जणांची कुजबूज सुरू होती. मला काही कळेना नेमकं काय झालं आहे?"
"इतक्यात एका मैत्रिणीनं मला कानात सांगितलं की, तुझ्या कपड्यावर रक्ताचे डाग आहेत. ते डाग बघून मला धक्काच बसला. मला जखम झाली नव्हती, पण रक्ताचे डाग दिसत होते. मला रडूच कोसळलं."
"माझ्या एक शिक्षिका कागदात काही तरी गुंडाळून घेऊन आल्या आणि मला वॉशरूममध्ये घेऊन गेल्या. त्यांनी कागदात गुंडाळून आणलेला एक पॅड माझ्या हातात दिला आणि मला पाळी आल्याचं त्यांनी सांगितलं."
सॅनिटरी पॅड कसं वापरायचं हे अनुजाला माहीत नव्हतं. शेवटी त्यांनीच तिला मदत केली.
"मासिक पाळी' म्हणजे काय, मुलींना मासिक पाळी का येते, हे त्यांनी मला समजावून सांगितलं. पण रक्ताचे डाग बघून बसलेला मानसिक धक्का आणि पोटातील वेदना यामुळे त्या काय बोलत होत्या हे मला नीटसं आठवत नाही. पण, 'आता तू वयात आलीस' हे त्यांचं वाक्य मला स्पष्ट आठवतंय."
#पाळीविषयीबोलूया या बीबीसी मराठीच्या विशेष लेखमालिकेतला हा लेख आहे. पाळीविषयीचे समज-गैरसमज यावर चर्चा घडवणं, पाळीदरम्यानच्या आरोग्य समस्यांचा वेध घेणं, हा या लेखमालेचा उद्देश आहे.आज जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवसानमित्त हा लेख पुन्हा शेयर करत आहोत.
पहिल्या पाळीचे प्रसंग अनेकींच्या आयुष्यात असे अचानक येतात. सॅनिटरी नॅपकीनच्या निमित्तानं आता कुठे मासिक पाळीवर हळूहळू बोललं जाऊ लागलंय.
आजही अनेकजणी गावात पाळी आली की 'अडचण आली', 'महिना आला', 'बाजूला बसवणं' असे शब्द वापरतात. शहरात चम्स, पिरिअड, एमसी असे शब्द तर कधी गंमत म्हणून 'मावशी आली' असे शब्द बोलण्यात असतात.
मासिक पाळी हा स्त्रीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असला तरी त्याबद्दची कुजबूज पाळी जाईस्तोवर तशीच असते. अगदी मेडिकलच्या दुकानातूनही सॅनिटरी नॅपकिन खरेदी केल्यावर ते कागदाच्या आवरणात गुंडाळून, काळ्या प्लास्टिक बॅगमध्ये दिलं जातं.
अनुजा सांगते, "पहिल्या प्रसंगानंतर पुढे मासिक पाळी ही लाजिरवाणी बाब आहे, अशी भावना अधिकच घट्ट होत गेली.'' अनुजासारख्या अनेकींच्या मनात पाळीतल्या रक्ताच्या डागानं भीतीचं घर केलं आहे.
पांढऱ्या कपड्यांवर रक्ताचा डाग
सविता तायडे हॉस्पिटलमध्ये नर्स आहेत. "मी नाईट शिफ्टला होते. माझ्यासोबत एक पुरुष सहकारी होता. आमची नाईट शिफ्ट तर १२ तासांची असते. त्यात दोघंच नाईटला असल्यामुळे खूपचं बिझी शेड्यूल असतं. इतकं की आम्हाला कधी-कधी वॉशरूममध्ये जायला देखील वेळ मिळत नाही."
"त्या रात्रीही असंच झालं. मी नेहमीप्रमाणे कामात अडकले होते, आणि वॉशरूमला जायलाही वेळ नव्हता. अशात माझ्या मागे रक्ताचा डाग लागला."
"माझ्या पुरुष सहकाऱ्यानं मला येऊन सांगितलं की- मॅडम, तुमच्यामागे डाग लागला आहे. तुम्ही चेंज करून या. मला काय बोलावं सुचत नव्हतं. मी त्यांना थँक्यू म्हटलं आणि तिथून निघून गेले. पण नंतर कित्येक महिने ते समोर असताना मला फारच अवघडल्यासारखं वाटायचं.''
"आमचा युनिफॉर्म हा पांढरा, गुलाबी किंवा आकाशी असतो. त्यामुळे त्यावर लागलेले डाग तर लगेचच दिसतात. नर्स म्हणून काम करताना आम्हाला या सगळ्या गोष्टींकडे खूप लक्षं द्यावं लागतं."
सविता वैद्यकीय क्षेत्रात काम करत असूनही ही परिस्थिती. सविता तायडे पुढे सांगतात, "पण डाग पडल्याचा प्रसंग जर दुसऱ्या क्षेत्रात असताना घडला असता, तर मला मेल्याहून मेल्यासारखं झालं असतं."
डाग पडण्याची इतकी भीती असताना क्वचितच काहीजणी त्यावर मात करु शकतात.
वेगवेगळ्या व्यवसायात काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये खास करून ऑफिसबाहेर काम करणाऱ्या आणि फिरतीवर असणाऱ्या स्त्रियांवर पाळीच्या दिवसांत बाका प्रसंगही ओढावू शकतो.
'मी लाज टाकली'
किंजल दमानी यांना सतत फिरतीवर रहावं लागतं. त्या एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे.
नवनवीन ठिकाणी भटकंती करायची. तिकडच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायची, तिकडची संस्कृती, खाद्य संस्कृती, असा संपूर्ण प्रवास आपल्या कॅमेरात कैद करून त्यावर व्हीडिओ ब्लॉग तयार करायचे, असं फोटोग्राफर कम ब्लॉगर किंजल यांच्या कामाचं स्वरूप.
"एका शूटसाठी मी माझ्या सहकाऱ्यांसह पहाटे लवकर मुंबईहून गोव्यासाठी निघाले. वाटेत कोल्हापूर आणि कर्नाटकच्या दरम्यान एक घाट लागतो. नेहमीप्रमाणे आम्ही पूर्ण तयारीनं जात होतो. पण प्रवासादरम्यानच, माझं पोट दुखू लागलं. मला अस्वस्थ वाटतं होतं, खूप मूड-स्विंग्स होत होते. पाळीचा पहिला दिवस होता."
"मला पहिल्या दिवशी खूप रक्तस्त्राव होतो. त्यामुळे मला कसंही करून पॅड बदलायचं होतं. वाटेत थांबण्याची वाट पाहात होते. तेवढ्यात आम्हाला वनरक्षक विभागाचं ऑफिस दिसलं. आम्ही त्यांच्याकडे वॉशरूम वापरण्याची परवानगी मागितली. पण त्यांनी आमचं काहीच न ऐकता ती नाकारली. मी त्यांना सांगतलं की मला त्रास होतोय, प्लीज मला वॉशरूम वापरू द्या तरीही त्यांनी नाही ऐकलं."
"शेवटी नाईलाजानं त्यांना सांगावं लागलं की, कपड्यांना डाग लागला आहे. आणि मला पॅड चेंज करायचं आहे. तेव्हा कुठे त्यांनी माझं ऐकून मला वॉशरूम वापरायला दिलं. पण हा प्रसंग असा होता की मला एरव्ही वाटणारी लाज सोडून जे आहे ते सांगावं लागलं."
'मॅडम, मागे डाग लागलाय'
"मी एकदा अहमदाबादमध्ये एका कॉन्फरन्ससाठी बसलेले होते. या कॉन्फरन्ससाठी आम्हाला सलग सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बसावं लागणार होतं. मी लाईट कलरचा युनिफॉर्म घातला होता. आणि त्याच दरम्यान मला पाळी सुरू झाली," मंजिता वनझारे यांनी बीबीसी गुजरातीला डागाची गोष्ट सांगितली. त्या अहमदाबाद शहराच्या पहिल्या महिला सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
एकाच जागी बसून त्यांच्या कपड्यांनाच नाही तर खुर्चीलाही रक्ताचे डाग लागले. "माझ्यासाठी तो प्रसंग खूपच लाजिरवाणा होता. कारण त्यावेळी मी एकटीच महिला अधिकारी तिथं उपस्थित होते. बाकी सगळे पुरुषच. मला स्वत:चीच लाज वाटू लागली. कारण लहानपणापासून ही गोष्ट अत्यंत वाईट असल्याचं सगळ्यांनी आपल्या डोक्यात भरवलेलं असतं ना, ते खूप घाण दिसणार होतं."
कार्यक्रमानंतर वरिष्ठांना सॅल्यूट ठोकण्याचं कर्तव्य मंजिता यांना काही केल्या पार पाडायचं होतं. "माझा आत्मविश्वास खूप चांगला आहे, पण तरीही मला उभं राहण्याची लाज वाटत होती. शेवटी मात्र मी ठरवलं, कोणी माझ्यावर हसलं तरी चालेल, मी इतरांप्रमाणे आमच्या वरिष्ठांना सेल्यूट केलं. मला माहीत होतं, मी बाहेर पडल्याशिवाय कोणीही तिथून हलणार नाही, म्हणून मी तिथून चालू लागले."
"आमच्या दलातले जवळपास ४० जणं माझ्या मागे चालत होते. त्यांना सर्वांना माझ्या युनिफॉर्मवरचा तो डाग दिसत होता. त्यावेळी मी हे सगळं स्वीकारून पुढे जाण्याची स्वत:शी गाठ बांधली होती. मी काही बहाण्यानं तिथून जाऊ शकले असते, पण मी तसं केलं नाही.''
"माझ्या बॉडीगार्ड कमांडोनेही मला येऊन सांगितलं की, मॅडम तुमच्या मागे डाग लागलाय. पण मी त्याला सांगू शकले की- 'असू दे, हे नैसर्गिक आहे,' मी जसं स्वीकारलंय तसं लोकांनीही ते स्वीकारायला हवं."
पाळीविषयीचा टॅबू मोडण्यासाठी एक अभियान काही वर्षांपूर्वी चांगलंच गाजलं. लेखिका आणि कॅम्पेनर रूपी कौर यांनी इन्स्टाग्रामवर 2015 मध्ये 'पीरियड' नावानं अभियान छेडलं.
पाळीच्या रक्ताचे काही फोटो त्यांनी पोस्ट केले. इन्स्टाग्रामने ते फोटो काढून टाकले. पण त्याला विरोध करत 'इन्स्टाग्रामचे विचार पुरुषी मानसिकतेचे प्रतिक असल्याचं' त्यांनी ठणकावून सांगितलं. त्यानंतर इन्स्टाग्रामने त्यांचे फोटो पुन्हा प्रसिद्ध केले. रुपी यांच्या फोटो सीरिजला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला.
समाजात पाळीविषयी असणारे जे समज आहेत त्याचं प्रतिबिंब अनेकदा जाहिरातीत दिसतं. 'उन दिनो के लिये' असं सागणाऱ्या जाहिराती पाळीच्या दिवसातही डागाची भीती न बाळगता बिनधास्त राहा, असा संदेश देत असतात.
तुम्हाला 'चेक चेक' नावाची जाहिरात आठवत असेल. त्यात शाळेतल्या विद्यार्थिनी आपल्या शिक्षिकेकडे पाळीच्या डागाबद्दल तक्रार करताना दाखवल्या आहेत. दर तासाला सारखं मागे डाग तर नाही लागला याची भीती त्यांना असते. त्यामुळे त्यांना अभ्यासावर लक्षं केंद्रीत करता येत नाही.
डागाच्या या भीतीवर मात करण्याचं आव्हान सोपं नाही. मासिक पाळीच्या दिवसांत आजही आपल्या समाजात 'पांढरे कपडे घालू नका, फार खेळू नका, मंदिरात जाऊ नका, असे एक ना अनेक निर्बंध घातले जातात. पाळी ही जशी नैसर्गिक गोष्ट आहे तसं डाग लागणंही नैसर्गिकच आहे, हे मान्य करण्याची मानसिकता हळूहळू तयार होतेय. त्यासाठी जसं पाळीविषयी बोलुया तसंच डागाच्या भीतीविषयीही!!!
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)