एलियन्सने पळवलंय सांगून 12 वर्षांच्या मुलीवर केला अत्याचार, पण गुन्हेगार 10 दिवसांतच सुटला

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

1970 च्या दशकात अमेरिकेतल्या आयडहो राज्यात राहाणारं एक अतिशय साधं, पापभिरू कुटुंब. आई गृहिणी, वडिलांचं फुलांचं दुकान, तीन लहान मुली आणि एक टुमदार घर. पण एका घटनेने या कुटुंबाचा पायाच हलला. या घरातल्या मोठ्या मुलीचं एलियन्सने अपहरण केलं म्हणे, एकदा नव्हे चक्क दोनदा.

तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेलेही आढळले. पुढे जे उघडकीस आलं ते धक्कादायक होतं. झालेल्या घटनेची मोठी किंमत या कुटुंबाला चुकवावी लागली. कोण होतं हे कुटुंब आणि खरं काय घडलं होतं त्यांच्या बाबतीत ही त्याचीच कथा.

पन्नासएक वर्षं जुनी कथा आज आठवण्याचं कारण म्हणजे या कुटुंबाच्या आपबितीवर सध्या एक नवीन वेबसिरीज आली आहे - 'फ्रेंड ऑफ फॅमिली'. यानिमित्ताने या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

भक्ष्याच्या शोधात असलेला शिकारी कसा सावजाच्या अवतीभोवती जाळं विणतो, तसं जाळं रॉबर्ट बर्चटोल्ड या क्रूर माणसाने एका शांत आयुष्य जगणाऱ्या ब्लोबर्ग कुटुंबाभोवती विणलं. एकेका व्यक्तीला हेरून अडकवलं, फसवलं, भावनिक, मानसिक, शारिरीक शोषण केलं आणि तरीही त्यातून तो सहीसलामत सुटला.

इतके गुन्हे करून, अमेरिकेसारख्या देशात या माणसाला काहीच शिक्षा झाली नाही.

नक्की काय होतं प्रकरण?

अमेरिकेतल्या आयडहो राज्यातलं पोकाटेलो हे लहानसं शहर. इथे ब्रोबर्ग कुटुंब राहायचं. वडिलांचं फुलं विकण्याचं लहानसं दुकान होतं, आई गृहिणी आणि तीन लहान मुली. जान, सुझन आणि कॅरन. हे लोक समाजात मिळून मिसळून वागायचे, देवभोळे होते, दर रविवारी न चुकता चर्चमध्ये जायचे. आनंदी आयुष्य जगणारं पंचकोनी कुटुंब.

यातली जान सगळ्यात मोठी, म्हणजे 9 वर्षांची होती तेव्हा त्यांच्या गावात एक नवा माणूस आला. रॉबर्ट बर्चटोल्ड.

या माणसाचंही स्वतःचं कुटुंब होतं, बायको होती, पाच मुलं होती. नित्यनियमाने हेही कुटुंब चर्चमध्ये जायचं. यांनी ब्रोबर्ग कुटुंबाशेजारीच घर घेतलं होतं.

भेटल्यावर कोणाचंही मन जिंकून घेईल असं रॉबर्टचं व्यक्तिमत्व होतं. लवकरच दोन्ही कुटुंबांची मैत्री जमली. मुलं एकत्र खेळायची. आया दुपारच्या वेळेस एकमेकींकडे जाऊन बसायच्या, वडील संध्याकाळी आपल्या व्यवसायाबद्दल बोलायचे.

सगळं छान चाललं होतं. पण कुठेतरी पाणी मुरतं होतं हे खरं. रॉबर्ट जितका उत्साही, सगळ्यांमध्ये मिसळणारा, भरपूर गप्पा मारणार, लोकांना स्वतःकडे आकर्षित करणारा होता, त्याची पत्नी गेल तितकीच घुमी आणि अबोल होती.

ज्या त्रासातून हे कुटुंब गेलं, त्यावर 2017 साली नेटफ्लिक्सची 'अॅबडक्टेड इन प्लेन साईट' ही डॉक्युमेंट्री आली आहे. यात या कुटुंबातल्या सगळ्यांच सदस्यांनी आपली आपबिती वर्णन केली आहे.

यात जानच्या आई मेरी अॅन ब्रोबर्ग रॉबर्ट बर्चटोल्डची पत्नी गेलबद्दल म्हणतात की, "ते नवरा बायको एकमेकांच्या अगदी विरुद्ध होते. आम्ही मैत्रिणी झालो होतो हे खरं पण गेलच्या मनात सतत काहीतरी खदखदतंय हे जाणवायचं. असं वाटायचं की ती काहीतरी दडवून ठेवतेय."

बर्चटोल्ड सकाळी सगळ्या मुलांना शाळेत सोडायला जायचं. संध्याकाळी सगळ्यांशी खेळायचा.

"पण त्याचं सगळं लक्ष जानकडे असायचं,' कॅरन (जेनची धाकटी बहीण) म्हणतात.

या डॉक्युमेंट्रीत बोलताना जान आठवून सांगतात, "आम्ही त्याला बी म्हणायला लागलो. तो मला अनेक नावांनी हाक मारायचा, पण एक नाव माझ्या डोक्यात अजूनही पक्कं आहे... डॉली."

तो जानच्या मागेमागे करतोय हे तिच्या आईवडिलांच्या लक्षात आलं होतं, त्यांना हे खटकायचं पण ते काही बोलले नाहीत.

अशीच दोन वर्षं गेली, जेन 12 वर्षांची झाली.

10 ऑक्टोबर 1974 ला सकाळी सकाळी त्याने मेरी अॅनला फोन केला आणि म्हणाला, मी जानला आज घोडेस्वारीसाठी घेऊन जातो.

जेनच्या आईने नाखुशीनेच परवानगी दिली. शाळा सुटल्यावर जेन रॉबर्टबरोबर गेली ती परत आलीच नाही.

रात्रीचे नऊ वाजले तरी मुलगी घरी येत नाही म्हटल्यावर जानचे वडील बॉब आणि आई मेरी अॅन यांनी पोलिसात जायचं ठरवलं. पण रॉबर्टची बायको गेल घरी आली आणि म्हणाली, पोलिसात जाऊ नका. रॉबर्ट नक्कीच भलतंसलतं काही करणार नाही. काहीतरी अडचण आली असेल.

ती रात्र तशीच गेली, दुसरा दिवस उजाडला. आता जानच्या आईवडिलांनी एफबीआय ऑफिसला फोन केला तर उत्तर मिळालं की वीकेंड आहे त्यामुळे हे ऑफिस बंद आहे, अत्यावश्यक काही असेल तर दुसऱ्या नंबरला फोन करा.

तिच्या पालकांना अजूनही आशा होती की काही भलतंसलतं झालं नसेल, कदाचित रॉबर्ट तिला फिरायला घेऊन गेला असेल पण सांगितलं नसेल. उगाच मोठी यंत्रणा का कामाला लावायची?

तिसराही दिवस गेला तेव्हा तिचे पालक हादरले. एफबीआयकडे त्यांनी तक्रार दिली.

40 वर्षांच्या रॉबर्ट बर्चटोल्ड या माणसाने 12 वर्षांच्या लहानग्या जान ब्रोबर्गचं अपहरण केलं होतं.

एलियन्सचा देखावा

शाळेतून निघेपर्यंत छोट्या जानला वाटत होतं की ती आज घोडेस्वारी करायला मिळणार. रॉबर्टच्या गाडीत बसल्यावर त्याने तिला एक गोळी दिली आणि म्हणाला ही गोळी घे, म्हणजे तुला घोड्यांची अॅलर्जी होणार नाही.

जान शुद्धीवर आली ती एका अंधाऱ्या खोलीत. अतिशय लहानशी अशी खोली होती, तिचे हातपाय बेडला करकचून बांधले होते आणि तिच्या कानाशी सतत एक टेप वाजत होती. त्यातून चित्रविचित्र आवाज येत होते.

थोड्या वेळात तिची शुद्ध हरपली. ती पुन्हा शुद्धीवर आली तेव्हा ते आवाज आणखी स्पष्ट झाले होते. कोणीतरी तिच्याशी बोलत होतं, पण ते म्हणत होते की ते या पृथ्वीवरचे नाहीयेत. एलियन्स आहेत.

बीबीसी 5 रेडियो लाईव्हशी बोलताना जान म्हणाल्या होत्या, "मला खात्री पटली की माझं एलियन्सने अपहरण केलं आहे."

"मी एकटी आहे, माझ्या घरचे आसपास नाहीत, मी कुठे आहे यासगळ्यापेक्षा मला त्या आवाजाची भीती वाटत होती. फार भयानक वातावरण होतं ते."

त्या आवाजांनी त्यांचं नाव झेटा आणि झेथ्रा आहे असं सांगितलं. जानला त्यांनी सांगितलं की ती अर्धी मानव आणि अर्धी एलियन आहे. तिची आई तिची खरीखुरी आई आहे, पण तिचे बायलॉजिकल वडील बॉब ब्रोबर्ग नाही तर एलियन आहेत.

बीबीसी 5 रेडियो लाईव्हशी बोलताना जान म्हणतात की त्यांनी मला पटवून दिलं होतं, माझं आयुष्य आता त्या एलियन्सच्या हातात आहे. माझंच काय, माझ्या बहिणींचं, माझ्या आईवडिलांचं सगळ्यांचंच आयुष्य त्यांच्या हातात आहे.

ते मला 'फिमेल कम्पॅनियन' म्हणत होते, जान म्हणतात.

"त्यांनी मला सांगितलं का या मोटारहोमच्या (कॅराव्हॅन, सर्व साधनयुक्त मोठी ट्रकसारखी गाडी) पुढच्या भागात जा. तिथे मेल कम्पॅनियन असेल. तुला त्याच्या मदतीने एका बाळाला जन्म द्यायचा आहे. तू त्या बाळाला जन्म दिला तरच या पृथ्वीचा नाश होण्यापासून वाचेल."

जान पुढच्या भागात आली तेव्हा तिला बर्चटोल्ड दिसला. तिला बरं वाटलं की कोणीतरी आपल्या ओळखीचं इथे आहे.

बर्चटोल्ड एका खुर्चीत पडला होता आणि त्याचे डोळे बंद होते, त्याच्या डोक्यातून रक्त वाहात होतं. जानने त्याला मोठ्या मोठ्यांनी हाका मारल्या, त्याने आपण शुद्धीवर आलो असं भासवलं आणि त्यानेही तिला तीच कथा सांगितली की कसं आपलं अपहरण एलियन्सने केलंय आणि कसं आपल्याला एक मिशन दिलंय.

आता जानचा या गोष्टीवर पूर्णच विश्वास बसला.

जान आणि रॉबर्ट बर्चटोल्ड तेव्हा अमेरिकेत नव्हते. रॉबर्टने जानला घेऊन मेक्सिको गाठलं होतं.

दुसऱ्या दिवशी जानच्या कानापाशी पुन्हा ते आवाज घुमायला लागले. आता ते आवाज सांगत होते की जर तू मिशन पूर्ण केलं नाही, म्हणजे या माणसासोबत मुलाला जन्म दिला नाहीस, तर तुझ्या जागी तुझी धाकटी बहीण सुझनला आणू. तुला मारून टाकू, तुझ्या वडिलांना मारून टाकू.

जान म्हणतात, "माझा थरकाप उडाला होता. मला माझ्या धाकट्या बहिणी, आईवडील सगळे दिसायला लागले. मी मनाशी ठरवलं की एलियन जे सांगतील ते करायचं."

रॉबर्टने जानचं लैंगिक शोषण करायला सुरूवात केली.

जान 'अॅबडक्टेड इन प्लेन साईट' या डॉक्युमेंट्रीत म्हणतात, "बलात्काराचं जसं वर्णन केलं जातं, तसा हिंसक बलात्कार नव्हता तो. रॉबर्ट माझी काळजीही घ्यायचा, पण त्याने जे माझ्यासोबत केलं, एका 12 वर्षांच्या लहान मुलीला फसवून केलं, तो बलात्कारच होता."

आई वडिलांना ब्लॅकमेल

बर्चटोल्ड खुनशी होता. त्याला माहिती होतं की जानला मिळवायचं असेल तर त्याच्या मार्गात तिचे आईवडील अडसर आहेत. तो अडसर दूर करायला हवा. आणि त्याची तजवीज त्याने दोन वर्षं आधीपासूनच करायला सुरूवात केली होती.

पीट वेल्श या केसवरचे मुख्य एजंट होते, ते नेटफिक्सच्या डॉक्युमेंट्रीत म्हणतात, "त्याने सापळा रचला होता आणि जानचे आईवडील त्यात अलगद सापडले."

तो लोकांच्या भावनांशी खेळण्यात, त्यांना जे हवंय ते ऐकवून त्यांच्याकडून आपल्याला जे हवंय ते करून घेण्यात पारंगत होता. एक प्रकारचा पपेट मास्टर होता.

जान बीबीसीच्या इंटरव्ह्यूत बोलताना म्हणतात, "त्याने माझं अपहरण करण्याआधी पूर्ण प्लॅन केला होता, की वेळ पडलीच तर माझ्या आईवडिलांना कसं अडकवायचं ते. एकतर त्याने सुरुवातीला माझ्या आईवडिलांना सांगितलं की तो लहान असताना त्याचंही शोषण झालं होतं. त्यासाठी तो थेरेपी घेत होता आणि त्याच्या थेरेपीचा भाग म्हणून त्याला लहान मुलींशेजारी काही रेकॉर्ड्स ऐकत झोपायला सांगितलं होतं. तो रोज रात्री थोडावेळ जानशेजारी झोपायचा."

डॉक्युमेंटरीतही या थेरेपीचा उल्लेख आहे आणि यावरून अनेक प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. लोकांनी जानच्या आई-वडिलांवर ठपका ठेवला की असं त्यांनी करूच कसं दिलं. याबद्दलही जान बीबीसीशी बोलतात.

"लक्षात घ्या, हा 1970 चा काळ होता. तोवर बाललैंगिक शोषणाचे कायदे अस्तित्वात आले नव्हते. पालकांना असं काही असतं याबद्दल नीट माहिती नव्हती. दुसरं म्हणजे हा माणूस आमच्या घरातला होता. त्याच्यावर माझ्या पालकांचा इतका विश्वास होता की जर त्यांना काही झालं असतं तर ते लिहून गेले असते की आमची मुलं बर्चटोल्ड दांपत्य सांभाळेल. आजही मावशी किंवा काका मुलांना गोष्टी सांगत त्यांच्या शेजारी झोपत नाहीत? मुद्दा माझे आईवडील मूर्ख होते की नाही हा नाही, त्याने माझ्या आईवडिलांच्या विश्वासाचा, प्रेमाचा, माझ्या विश्वासाचा विश्वासघात केला."

जानच्या आई म्हणतात की बर्चटोल्डने आमच्या मुलीचं अपहरण केलं होतं की पीट वेल्श यांनी ठासून ठासून सांगितलं तेव्हा कुठे आम्हाला पटलं.

जानच्या अपहरणानंतर पहिले काही आठवडे तिला कळत नव्हतं की आपण कुठे आहोत, काय करतोय. तिला बहुतांश वेळा गुंगीचं औषधं दिलेलं असायचं.

तिचं अपहरण केल्यानंतर 35 दिवसांनी बर्चटोल्डने त्याच्या भावाला फोन केला आणि सांगितलं की मेरी अॅनला म्हणा मला जानशी लग्न करायची लेखी परवानगी दे. म्हणजे आम्हाला अमेरिकेत परत येता येईल.

त्यावेळी रॉबर्ट जानला घेऊन मेक्सिकोत राहात होता आणि तिथल्या कायद्यानुसार म्हणे त्यांनी लग्न केलं होतं. मेक्सिकोत त्यावेळी मुलीचं लग्नाचं किमान वय 12 वर्षं होतं आणि जान 12 वर्षांची होती.

तिच्या घरच्यांनी या गोष्टीला संमती द्यायचा प्रश्नच नव्हता. एफबीआयने त्याचा माग काढून, पाळत ठेवून त्याचा पत्ता शोधला आणि मेक्सिकन पोलिसांना संपर्क केला.

मेक्सिकन पोलिसांनी धाड टाकून रॉबर्ट बर्चटोल्डला अटक केली आणि जानला ताब्यात घेतलं. काही दिवसातच त्याला अमेरिकेत आणलं गेलं. अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि तिचं अपहरण या गुन्ह्यासाठी तिथल्या कायद्यानुसार तो कमीत कमी 30 वर्षं तुरूंगात जाणं अपेक्षित होतं.

पण प्रत्यक्षात तो फक्त 10 दिवस तुरूंगात होता. असं कसं शक्य झालं? सगळे पुरावे, कायदे सगळं असताना बर्चटोल्ड सुटला कसा?

याची आखणी त्याने जानचं अपहरण करण्याआधी दोन वर्षं केली होती. वेल्श यांनी म्हटल्याप्रमाणे तिच्या आईवडिलांना जाळ्यात अडकवून.

त्याने धमकी दिली की माझ्यावरचे गुन्हे मागे घ्या, लिहून द्या की जान माझ्याबरोबर स्वखुशीने आली होती आणि तिच्यावर मी कोणत्याही प्रकारचा अत्याचार केला नाही, नाहीतर मी सगळ्यांना सांगेन की तुम्हा दोघांचे माझ्याशी लैंगिक संबंध होते आणि तुम्ही मला जान शेजारी रोज झोपण्याची परवानगीही दिली होती.

या प्रकरणात नाही म्हटलं तरी थोडं तथ्य होतं, पण त्याने ती मोडून तोडून लोकांसमोर मांडायची धमकी दिली.

याबद्दल बोलताना जानचे वडील भावूक होतात. नेटफ्लिक्सच्या डॉक्युमेंट्रीत ते तो किस्सा सांगतात.

"रॉबर्ट एकदा माझ्याकडे आला आणि मला म्हणाला मी संसारात वैतागलो आहे, चल आपण चक्कर मारायला जाऊ. मग त्याने संपूर्ण रस्ताभर त्याची बायको कशी वाईट आहे, तिला कसा संसारात रस नाही, मी कसा गेला वर्षभर सेक्स केला नाही याची कहाणी ऐकवली. तो असंही म्हणाला, चल आपण दोघं घटस्फोट घेऊ, फिरायला जाऊ, वेगवेगळ्या बायका पटवू आणि मजा करू."

"मी हसत या गप्पा ऐकत होतो. संसारी पुरुषाच्या आयुष्यात असे प्रसंग येतातच. आम्ही गप्पा मारत असताना माझ्या लक्षात आलं की तो उत्तेजित झालाय, त्याचं लिंग ताठ झालंय. रॉबर्ट मला म्हणाला मला हस्तमैथुन करायला मदत कर. मी त्याला हसतच उडवून लावलं, पण तो आग्रह करायला लागला. म्हणे हे सगळं आपण लहान असताना आपले भाऊ, चुलत भाऊ यांच्यासोबत केलं आहेच की. काय वेगळं आहे. त्या ओघात मी त्याला मदत केली हे खरं."

जान बीबीसीशी आपल्या वडिलांविषयी बोलताना म्हणतात, "याबद्दल त्यांनी कधीच स्वतःला माफ केलं नाही. त्यांना सतत वाटायचं की असं घडलं नसतं तर ते रॉबर्टला धडा शिकवू शकले असते. त्यांना आयुष्यभर हा सल होता. आता ते गेलेत, मला आता तरी वाटतं की त्यांनी स्वतःला माफ केलं असेल, त्यांच्या आत्म्याला शांती लाभली असेल."

तो प्रसंग ध्यानात ठेवून त्याने जानच्या वडिलांना धमकी दिली की मी जगजाहीर करेन की तू समलैंगिक आहेस.

दुसरीकडे त्याने जेनच्या आईला मेरी अॅनलाही आपल्या जाळ्यात ओढलं होतं. जानच्या अपहरणाआधी बर्चटोल्ड आणि जानची आई यांच्यातही शारिरीक जवळीक झाली होती.

बदनामीच्या भीतीने जानच्या आईवडिलांनी आरोप मागे घेतले, पण तरीही पोलिसांनी बर्चटोल्डवर खटला चालवायचं ठरवलं.

पण झालं काय की आता त्यांच्याकडे साक्षीदारच नव्हते, मुळात पीडितेच्या आईवडिलांनीच साक्ष द्यायला नकार दिला.

त्याला 45 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली, त्यातले फक्त 10 दिवस तो तुरुंगात होता, नंतर त्याला सोडून दिलं.

इकडे जानच्या कुटुंबावर मोठा आघात झाला होता. आधी जानचं अपहरण, बर्चटोल्डने केलेला विश्वासघात आणि मग ब्रोबर्ग दांपत्यांचे बिघडलेले संबंध यामुळे बॉब ब्रोबर्ग यांनी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला.

बर्चटोल्डने मेरी अॅनला फोन करून सांगितलं की तू वेगळी रहा मुलींना घेऊन. मी तुझी वाट्टेल ती मदत करायला तयार आहे. तू नवऱ्याला सोडून दे.

या काळात जानचं वागणंही बदललं होतं. बर्चटोल्डला अटक झाली तेव्हा त्याने एका मेक्सिकन गार्डला पैसे चारून थोडावेळासाठी जानला भेटायला तुरुंगात बोलावलं.

त्याने तिला घाबरवून टाकलं की एलियन्स प्रचंड चिडलेत आणि त्यांनी सांगितलं आहे की मिशन चालू राहिलं पाहिजे. याबद्दल कोणालाही काही बोलायचं नाही. नाहीतर तू संपशील, तुझ्या बहिणी संपतील, पृथ्वी संपेल. त्याने तिला हेही सांगितलं की तुला इतर कोणत्या पुरुषाने हात लावला नाही पाहिजे.

याचा जानच्या मनावर इतका परिणाम झाला की ती कुटुंबाशी फटकून राहायला लागली. सतत बर्चटोल्डकडे जायची मागणी करायला लागली.

एक हसतंखेळतं कुटुंब उद्धवस्त व्हायला आलं होतं.

पण एकेदिवशी जानच्या आई वकिलांकडे गेल्या आणि म्हणाल्या, "ते काहीही होवो, मला घटस्फोट घ्यायचा नाहीये."

बऱ्याच रडारडीनंतर ब्रोबर्ग दांपत्याने एकमेकांना माफ केलं. पण बर्चटोल्ड काही घडलं नसल्याच्या थाटात फिरत होता. तो कामासाठी दुसऱ्या शहरात गेला असला तरी वीकेंडला पोकाटेलोला यायचा, चर्चमध्ये यायचा आणि लोकही त्याच्याशी पूर्वीसारखेच गप्पा मारायचे. याकाळात तो नऊ वेळा गपचूप जानला भेटायला आला आणि दोनदा त्याने तिचं लैंगिक शोषण केलं.

दुसऱ्यांदा अपहरण

दोन वर्षं अशीच गेली. जान बिथरत चालली होती. तिला काहीही करून रॉबर्ट बर्चटोल्डशी लग्न करायचं होतं. तिने अजूनही खरा प्रकार कोणालाच सांगितला नव्हता. फक्त हट्ट धरून बसायची की मला रॉबर्टकडे जायचं आहे.

घरात भांडायची, बहिणींना त्रास द्यायची,

ती लहानगी इतकी घाबरली होती की वयाच्या 16 वर्षांपर्यंत आपल्याला रॉबर्टकडून मूल झालं नाही तर पृथ्वी नष्ट होईल यावर तिला ठाम विश्वास होता.

या काळात तो मेरी अॅनला सतत फोन करून धमक्या द्यायचा. मी जानला घेऊन जाईन, तुम्हाला ती कधीच दिसणार नाही, बऱ्या बोलाने तिला माझ्याकडे पाठवा. तिच्या आईने त्याला खडसावलं, आमच्या आयुष्यातून कायमचा चालता हो. परिणामी जान दुसऱ्यांदा गायब झाली.

10 ऑगस्ट 1976 ला तिचं पुन्हा अपहरण झालं. जानच्या बेडवर पत्र होतं, 'तुम्ही मला जे बरोबर आहे ते करू देत नाही, मग मी चुकीचं करतेय. मी रॉबर्टशिवाय निघून जातेय. जोपर्यंत तुम्ही मला मी आहे तसं स्वीकारत नाही तोवर मी परत येणार नाही.'

ब्रोबर्ग कुटुंब हादरलं, पण त्यांनी एक चूक केली. जान घरातून निघून गेल्यानंतर तब्बल दोन आठवडे पोलिसांना कळवलंच नाही.

त्यांना मीडियाची भीती होती. जानच्या आधीच्या अपहरणानंतर आणि त्यांनी बर्चटोल्डवर आरोप मागे घेतल्यानंतर त्यांना इतर राज्यातल्या लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.

जेव्हा दोन आठवड्यांनी तिच्या कुटुंबाने पीट वेल्श यांना संपर्क केला तेव्हा त्यांनी रॉबर्ट बर्चटोल्डवर पाळत ठेवली. जान त्याच्याबरोबर नव्हती हे स्पष्ट झालं, पण त्याला नक्की माहीत असणार ती कुठे आहे असं पोलिसांना वाटलं.

या काळात तो पुन्हा मेरी अॅनला फोन करून विचित्र बोलत राहायचा. "जान वेश्या झालीये, तिचे खायचे वांधे झालेय, ती ड्रग्स घ्यायला लागली आहे."

मेरी अॅनला सतत मानसिक टॉर्चर होत होतं, पण पोलिसांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही त्याचे फोन उचलत राहा. ते फोन टॅप होत होते.

जान घरातून गायब झाल्याला तीन महिने झाले होते पण तिचा पत्ता लागत नव्हता ना बर्चटोल्डच्या विरोधात काही पुरावा सापडत होता.

पण जान बेपत्ता झाली त्याच्या 102 दिवसांनी एक धागादोरा हाती आला. बर्चटोल्डने एका सार्वजनिक फोनवरून एका ठिकाणी फोन केला आणि जवळपास 15 मिनिटं कुजबुजत बोलत होता.

एफबीआयने या नंबरचा माग काढला तेव्हा कळलं की हा नंबर कॅलिफोर्नियातल्या एका कॅथलिक मुलींच्या शाळेचा आहे.

त्यांनी त्या शाळेत जान आहे का चौकशी केली पण शाळेत आधी काही माहिती दिली नाही. अशी कोणी मुलगी नाहीच म्हणे. शेवटी त्यांच्याशी अनेकदा बोलल्यानंतर तिथल्या प्रशासनाने माहिती दिली. बर्चटोल्डने जानला वेगळ्याच नावाने तिथे ठेवलं होतं.

त्याने शाळेत सांगितलं होतं की तो सीआयएचा एजंट आहे. जान त्याची मुलगी आहे. त्याच्यामागावर वाईट लोक आहेत, त्यामुळे कोणी त्याची किंवा त्याच्या मुलीची माहिती मागितली तर काही सांगू नका.

1976 च्या शेवटी रॉबर्ट बर्चटोल्डाला पुन्हा अटक झाली. जानला घरी आणण्यात आलं. ती आतून पूर्णपणे कोलमडून पडली होती तरी तिचा विश्वास रॉबर्ट बर्चटोल्डवरच होता आणि ती कुटुंबाशी फटकून वागत होती.

रॉबर्टचा तिळपापड झाला आणि त्याने गुंडांना पैसे देऊन जानच्या वडिलांचं दुकान जाळलं. पण कोर्टात हे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.

याही वेळेस तो सुटला. त्याने आपण मानसिक रुग्ण असल्याची बतावणी केली आणि कोर्टाने त्याची रवानगी मनोरुग्णांच्या हॉस्पिटलमध्ये केली. तिथून तो सहा महिन्यातच बाहेर आला.

एव्हान जान 15 वर्षांची झाली होती. तिचं अधूनमधून रॉबर्टशी बोलणं व्हायचं पण आता कमी.

जान म्हणतात, "मी मोठी झाल्याने त्याचा माझ्यातला इंटरेस्ट कमी झाला होता."

पण जानला अजूनही त्या एलियन प्रकारावर विश्वास होता. दुसऱ्या पुरुषांपासून लांब राहायचं हा नियमही ती पाळत होती. वडिलांनाही स्वतः जवळ येऊ द्यायची नाही.

अशात एका नाटकात काम करत असताना त्यातल्या तिच्या वयाच्याच शाळकरी मुलाने तिच्यासाठी आईस्क्रीम आणलं. त्याला जान आवडायची.

आता आपण दुसऱ्या मुलाशी बोललो, तो आपल्याला आवडला हे जाणवल्यानंतर जानचा पुन्हा थरकाप उडाला आणि ती घरी येऊन रडायला ओरडायला लागली.

पण दुसऱ्या दिवशी सगळंच नॉर्मल होतं. धाकट्या बहिणीला, सुझनला कोणी एलियन घेऊन गेले नव्हते, तिचे आईवडील जिवंत होते, कॅरन आंधळी झाली नव्हती, जग नष्ट झालं नव्हतं... सगळं आहे तिथे आहे तसंच होतं.

जान म्हणतात, "तेव्हा माझ्या मनात पहिल्यांदा शंका आली की हे एलियन वगैरे सगळं खोटं तर नसेल?"

लवकरच जानचा 16 वा वाढदिवस आला. त्याही वेळेस ती प्रचंड घाबरून गेली. तिने ठरवलं आता जर मी गरोदर नसेन तर मला काहीतरी करायलाच लागेल.

"मी ठरवलं एक बंदूक आणायची. सुझनला मिशनबद्दल सांगायचं. ती ते करायला असली तर ठीक नाही तर तिला गोळी घालायची आणि स्वतःही आत्महत्या करायची," जान आपल्या 16 व्या वाढदिवसाची आठवण सांगतात.

वाढदिवस आला आणि गेला... काहीच घडलं नाही. तेव्हा जानच्या लक्षात आलं की आपल्याला सांगितलं गेलं ते सगळं खोटं होतं.

पहिल्यांदा अपहरण झाल्याच्या तीन वर्षांनी त्यांनी आईवडिलांना सगळी खरी हकीगत सांगितली. त्या संध्याकाळी या कुटुंबातला प्रत्येक सदस्य रडत होता. सत्य समोर आलं होतं.

बाललैंगिक छळाविषयी जागरूकता

पण ही हकिगत इथेच संपत नाही. यानंतर जवळपास 25 वर्षांनी जान आणि त्यांच्या आईने मिळून या घटनेवर पुस्तक लिहिलं. जान आणि मेरी अॅन ठिकठिकाणी जाऊन बाललैंगिक छळाच्या विरोधात बोलायच्या, स्वतःची आपबिती सांगायच्या. इतर महिलांना आपले लैंगिक छळाचे अनुभव सांगून त्याविरोधात आवाज उठवायची प्रेरणा द्यायच्या.

जानच कुटुंब झाल्या प्रकारातून सावरलं, त्यांनी एकमेकांना माफ केलं होतं.

पण रॉबर्ट बर्चटोल्ड शांत बसला नव्हता. त्याने दोनदा जानचं भाषण होतं तिथे तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर एकदा तिच्यावर खटला भरला. ती सगळं खोटं सांगतेय आणि तिलाच सेक्स हवा होता असं त्याने सांगितलं.

तिच्यावर हल्ला करताना त्याने तिच्या भाषणाला आलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर गाडी घातली. त्याला अटक होऊन शिक्षा होणार हे स्पष्ट झालं.

पोलिसांनी अटक करण्याच्या आदल्या दिवशी त्याने हृदयविकाराच्या गोळ्यांचं अतिसेवन करून आत्महत्या केली.

याआधी त्याला एका लहान मुलीच्या बलात्काराप्रकरणी एका वर्षाचा तुरुंगवास झाला होता.

जान यांनी पुस्तक लिहिल्यानंतर जवळपास सात-आठ महिला पुढे आल्या आणि त्यांनी म्हटलं की रॉबर्ट बर्चटोल्डने त्या लहान असताना त्यांचंही शोषण केलं होतं.

जान ब्रोबर्ग पुढे जाऊन गायक, अभिनेत्री आणि नर्तिका बनल्या. त्यांना आता एक मोठा मुलगाही आहे. जानच्या बहिणींनीही पुढे आयुष्यात सुखाने बस्तान बसवलं.

जान बीबीसीशी बोलताना म्हणतात, "मी मनात वाटणारी लाज, अपराधगंड सोडून सगळ्यांसमोर ही कहाणी मांडली कारण जगाला सत्य कळायला हवं. अनेक लहान मुलांचा असा छळ होत असेल, तर त्याबद्दल आपण एक समाज म्हणून जागरूक असायला हवं."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)