You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अॅशली वडस्वर्थः ‘7 वर्षं ऑनलाईन मित्र असलेल्यावर विश्वास ठेवला आणि त्याने तिचा खून केला’
- Author, लॉरेन्स कॉवली आणि झोयी ओब्रायन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जॅक सिपल आणि अॅशली वडस्वर्थ अनेक वर्षं आधुनिक पत्रमित्र होते. त्यांच्यातलं 7242 किलोमीटरचं अंतर इंटरनेटने कमी केलं होतं.
19 वर्षांच्या अॅशलीने सिपलबरोबर राहाण्यासाठी आपला कॅनडा देश सोडला आणि ती यूकेत आली. पण काही काळातच त्याने तिचा खून केला. नक्की काय घडलं?
"तिच्या शेवटच्या क्षणांविषयी विचार करताना प्रचंड त्रास होतो. ती किती घाबरलेली असेल, तिचे शेवटचे शब्द काय होते? तिने शेवटी आमचं नाव घेतलं का?" अॅशलीच्या आई ख्रिस्टी गेंड्रोन म्हणतात.
"मला कधीच कळणार नाही," त्या म्हणतात. "एक तर गेली हे जग सोडून, आणि दुसरा जिवंत आहे पण तो कधीच खरं सांगणार नाही कदाचित."
गेल्या नोव्हेंबर महिन्यात अॅशली कॅनडातल्या व्हर्ननमधून यूकेत आली होती. ती 23 वर्षांच्या सिपलबरोबर त्याच्या एका बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहात होती.
यावर्षी 1 फेब्रुवारीला पोलिसांना तिचा मृतदेह आढळला. तिचा गळा आवळला गेला होता आणि छातीत अनेकदा भोसकलं गेलं होतं. सिपल तिच्या मृतदेहाशेजारी बसलेला आढळला.
त्याने अॅशलीच्या खूनाची कबूली दिली. त्याला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. त्याला कमीत कमी 23 वर्षं आणि 6 महिने तुरुंगात काढावे लागतील.
अॅशलीच्या स्वभावाचं वर्णन करताना तिच्या आई म्हणतात, ती उत्साहाचा खळखळता झरा होती. "ती धाडसी होती, तिला खेळ खेळायला आवडायचं, ती कायम बाहेर असायची."
लहान असताना अॅशलीला घोडेस्वारी, स्किईंग आणि बोटींग करणं आवडायचं.
मग ती 12 वर्षांची असताना तिची जॅक सिपलशी ऑनलाईन ओळख झाली.
पुढची सात वर्षं हे दोघं फेसबुकवर गप्पा मारायचे.
"ते काही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नव्हते. ते अधूनमधून एकमेकांशी गप्पा मारायचे. जसे ते मोठे झाले तसं त्याने इतर मुलींना डेट करायला सुरुवात केली आणि नंतर त्यांचं बोलणं कमी झालं," ख्रिस्टी म्हणतात.
अॅशली आणि सिपल एकमेकांना कधी भेटले नव्हते तरी तिच्या घरच्यांना तो माहिती होता. ते दोघं अनेकदा व्हीडिओ कॉलवर एकमेकांशी बोलत असायचे. कधीकधी घरातलेही त्याच्याशी एखादा शब्द बोलायचे.
वयाच्या 18 व्या वर्षी अॅशलीने मॉर्मन पंथ स्वीकारला आणि मग तिने सिपलबरोबर यूकेत राहाण्याचा निर्णय घेतला.
तिच्या आईला तिच्या या निर्णयाबद्दल काळजी वाटली. पण तिला थांबवणं अशक्य होतं.
तिची आई म्हणते, "तिला जो मुलगा भेटायचा ती त्याची तुलना जॅकशी करायची. मला वाटलं होऊन होऊन काय होईल? ती तिकडे जाईल, त्यांचं पटणार नाही, ती परत येईल."
"ती कधीच परत येणार नाही हा विचारच डोक्यात आला नाही."
अॅशली तिकडे गेल्यावर काही महिन्यात तिला सिपलचं वागणं खटकायला लागलं. तिने तिच्या घरी आणि तिच्या चर्चमध्ये याबद्दल काळजीही व्यक्त केली.
ती घरी परत येणारच होती, पण तिचं विमान तिकीट ज्या तारखेचं होतं त्याच्या फक्त दोन दिवस आधी सिपलने तिचा खून केला.
'अॅशली गेली, तिला जॅकने मारलं'
केन वडस्वर्थ, अॅशलीचे वडील सांगतात, "मी 1 फेब्रुवारी (2022) ला सकाळी उठलो. माझ्या मुलीचा, हेलीचा फोन आला होता. 'माझी बहीण मेली. अॅशली गेली, तिला जॅकने मारलं' असं ती फोनवर म्हणत होती."
मग त्यांनी हेलीशी बोलणं थांबवून कॅनडा पोलिसांना फोन केला आणि सांगितलं की माझी मुलगी इंग्लंडमध्ये आहे आणि आम्हाला भीती वाटतेय की तिचा मृत्यू झाला आहे.
"तुमचं हृदय पिळवटून निघतं. मी डॉक्टरकडे गेलो आणि म्हणालो की मला छातीत खूप दुखतंय. ते म्हणाले तुम्हाला खूप दुःख झालंय म्हणून असं होतंय."
ते पुढे म्हणतात, "तुमची लहानशी मुलगी अशी अचानक जाते, ते दुःख वर्णन करायला शब्द पुरेसे नाहीयेत. ती एका बबलगम कँडीसारखी होती. उत्साहाने फसफसत असायची. तिच्या मनात जे असायचं ते सांगायला कधी घाबरायची नाही. आम्ही तिला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं आणि तिने ते वापरलं."
अॅशलीचे आईवडील तिचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी यूकेला आले.
"तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस होता," ते म्हणतात.
'त्याच्या भूतकाळाबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं"
सिपलचं म्हणणं आहे की त्याने अॅशलीचा खून केला कारण ती कॅनडाला परत जायचं म्हणत होती आणि याचा त्याला राग आला.
1 फेब्रुवारीला साधारण सकाळी 8 वाजता शेजाऱ्यांना अॅशलीचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. तिथे राहाणाऱ्या एका बाईंचा दरवाजा ती जोरजोरात वाजवत होती. त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांना ती घाबरलेली दिसून आली.
तिने सांगितलं की सिपलने तिला मारहाण केली आहे आणि त्यांच्या पाळलेल्या मांजरीला भिंतीवर जोरात फेकलं.
तिने म्हटलं की ती नग्न स्त्रियांचे फोटो पाहात असताना सिपलने पाहिलं. त्याने तिचा फोन फोडला, तिला लेस्बियन म्हणाला आणि मग तिला मारहाण केली.
ती असंही म्हणाली की तिला भीती वाटतेय सिपल तिला मारून टाकेल.
या शेजारच्या बाई तिला घेऊन सिपलशी बोलायला गेला तेव्हा तो शांतपणे बसलेला दिसला. त्याने अॅशलीची माफी मागितली आणि मग या बाई त्यांच्या कामासाठी बाहेर गेल्या.
दुपारी अॅशलीने तिच्या चर्चमधल्या मित्रमैत्रिणींना बरेचसे मेसेज पाठवले. त्यात लिहिलं होतं की इमर्जन्सी आहे आणि तिला मदतीची गरज आहे.
काही तासांनी पुन्हा तिचे मेसेज आले की सगळं ठीक आहे. हे मेसेज सिपलने पाठवले होते.
नक्की काय घडतंय याची काळजी वाटल्याने अॅशलीचे चर्चमधले मित्र जेमी अॅशवर्थ आणि टायलर बोर्डन सिपल आणि ती राहात असलेल्या घरी गेले. त्यांनी दार वाजवलं पण काहीही उत्तर न आल्यामुळे त्यांनी पोलिसांना बोलावलं.
पोलिसांना त्यांच्या फ्लॅटमध्ये अॅशलीचा मृतदेह आढळला. सिपलने तिचा गळा आवळून तसंच तिला छातीत भोसकून खून केला होता. यानंतर तो तिच्या शेजारीच बसून होता आणि त्याने त्याच्या बहिणीला, नादीयाला, व्हीडिओ कॉल केला.
पोलीस दुपारी 4 च्या सुमारास घरात शिरले तेव्हा तो त्यांना व्हीडिओ कॉलवरच बोलताना दिसला.
सिपलची पार्श्वभूमी गुन्हेगारी होती. त्याच्यावर 2014 पासून ऑनलाईन फसवणूक, मारहाण असे अनेक गुन्हे दाखल होते.
त्याच्या आधीच्या गर्लफ्रेंडनेही त्याच्याविरोधात अनेकदा कोंडून ठेवणे, मारहाण, जबरदस्तीने एखादी गोष्ट करायला लावणे अशा तक्रारी केल्या होत्या.
पण जेव्हा कोर्टात खटला उभा राहिला तेव्हा ते सुनावणीला हजर राहिली नाही, त्यामुळे सरकारी वकिलांना काही पुरावे सादर करता आले नाहीत.
सिपलला तुरुंगवास होण्याऐवजी फक्त त्याच्या आधीच्या पार्टनरपासून लांब राहण्याची आणि तिला कोणत्याही प्रकारे संपर्क न करण्याची सूचना देण्यात आली.
"त्याच्या भूतकाळाबदद्ल आम्हाला काहीच माहिती नव्हतं. तिला लांडग्यापुढे फेकलं असं वाटतंय आता मला," तिचे वडील म्हणतात.
पण आता अॅशलीच्या आईवडिलांना वाटतं की तिच्या उदाहरणातून इतरांनी शिकावं.
"जर गोष्टी चुकत असतील तर कोणाचं ऐकू नका, भले ते सांगत असतील की आपल्यात सगळं ठीक आहे," ख्रिस्टी म्हणतात.
"जर तुम्हाला माहितेय की तुमची मुलगी, मैत्रीण, काकू, मावशी, आई किंवा तुमची मुलगी अशा प्रकारच्या छळाला सामोरी जातेय तर ताबडतोब पोलिसात तक्रार करा. मध्ये पडा, शांत बसू नका."
ख्रिस्टी पुढे म्हणतात, "मुलींनो तुम्ही ज्या माणसाला डेट करणार आहात त्याची पूर्ण माहिती घ्या, खबरदारी घ्या, जागरूक राहा."
'ती आमचा एक भाग होती'
अॅशलीचा तिची मोठी बहीण हेली आणि तिची भाची पेस्लीवर खूप जीव होता. "त्या दोघी तिच्यासाठी सगळं काही होत्या," तिची आई ख्रिस्टी म्हणतात.
"आम्हा चौघांचा आधारस्तंभ होती ती. सगळ्यांत कणखर, सगळ्यांत धाडसी आणि सर्वाधिक ऊर्जा असणारी. ती आम्हाला एकत्र बांधून ठेवायची. एकत्र बऱ्याच गोष्टी करायला लावायची. तिच्या जाण्याने वाटतंय की शरीराचा एखादा अवयवच कोणीतरी तोडला आहे."
त्यांना ते संभाषण आठवतच नाही जेव्हा त्यांना सांगण्यात आलं की अॅशलीचा मृत्यू झालाय. त्यांना फक्त इतकंच आठवतं की त्या फोन हातात धरूनच जमिनीवर कोसळल्या.
"मला सारखं वाटत होतं की त्यांची काहीतरी चूक होतेय," त्या म्हणतात.
त्यांना इतका धक्का बसला होता की आसपास काय घडतंय हे त्यांना कळतंच नव्हतं.
तिच्या मृत्यूनंतर मी प्रचंड अस्वस्थ होते, मला दुःखातून सावरता येत नव्हतं. तिच्या अंत्ययात्रेला घालण्यासाठी जेव्हा कपडे निवडायची वेळ आली तेव्हा मी कोलमडून गेले.
अॅशलीचे आईवडील सिपलला शिक्षा सुनावण्याआधी यूकेला गेले होते.
"त्याला शिक्षा होणार हे चांगलंच आहे. पण यूकेतही कॅनडासारखंच जन्मठेप म्हणजे 25 वर्षं. तो फक्त 25 वर्षं जेलमध्ये राहील," ख्रिस्टी म्हणतात.
"पण ती काही परत येणार नाही."
ख्रिस्टी म्हणतात की हेली आणि त्या आता अॅशलीचे व्हीडिओ बघत बसतात. तिने उत्साहाने खूप व्हीडिओ बनवले होते.
"आम्ही हसतो आणि आम्ही रडतो. हे सोपं नाहीये, पण आता अॅशलीच्या इतक्याच आठवणी आमच्याकडे शिल्लक आहे. दुसरं काही नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)