संयुक्त राष्ट्रांच्या सभेत पाकिस्तानचे पंतप्रधान भारतातील मुस्लिमांच्या परिस्थितीवर काय म्हणाले?

मागील दोन वर्ष कोव्हिड साथ असल्याकारणाने संयुक्त राष्ट्राच्या आमसभेचं दरवर्षी भरणार अधिवेशन मागच्या दोन वर्षात भरलं नव्हतं. मात्र यंदा या आमसभेचं वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आलं असून जगभरातील अनेक देशांचे नेतेमंडळी आणि सोबतच प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी झालेत.

पण यात पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेलं भाषण चर्चेत आलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी आपल्या भाषणात पाकिस्तानातील पूरपरिस्थिती, भारत, इस्रायल, पॅलेस्टाईन, इस्लामोफोबिया आणि काश्मीर या मुद्द्यांचा उल्लेख केलाय.

शाहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणाची सुरवात पाकिस्तानातील सिंध आणि बलुचिस्तान प्रांतात झालेल्या पुरापासून केली. आणि भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्यावर भर देऊन आपल्या भाषणाचा शेवट केला.

भारताविषयी बोलताना शरीफ म्हणतात की, "भारतात 20 कोटी मुस्लिम आहेत. त्यांचा जाणीवपूर्वक छळ करण्यात येत आहे. तसेच इस्लामोफोबियाच्या आडून अभियान चालवलं जातंय. मुस्लिम भेदभाव करणारे कायदे आणि धोरण राबविली जात आहेत. सोबतच हिजाब बंदी, मशिदींवरील हल्ले आणि मॉब लिंचिंग सारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

एवढंच बोलून शरीफ थांबले नाहीत. तर त्यांनी भारताविरोधात बोलणं सुरूच ठेवलं. ते म्हटले की, भारतात काही अतिरेकी गट आहेत जे मुस्लिमांचा "नरसंहार" केला पाहिजे असं म्हणतात. या घटना चिंतेत भर टाकण्यासारख्या आहेत.

ते पुढे म्हणतात की, "इस्लामफोबिया ही एक वस्तुस्थिती आहे. जेव्हा 9/11 हा प्रकार घडला त्या दिवसानंतर मुस्लिमांविषयीची भीती, संशय आणि भेदभाव यामध्ये वाढ झाली आहे."

"अशा प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केलाच पाहिजे आणि पाकिस्तानचा याला तीव्र विरोधही आहे. मात्र दहशतवादाला तर कोणता धर्म नसतो. तो रूढीवाद, गरिबी, गरज, अन्याय आणि अज्ञान या गोष्टींमधून पसरतो."

यानंतर शाहबाज शरीफ यांनी एक मुद्दा उचलून धरला. हा मुद्दा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही मांडला होता. शरीफ म्हणाले, "पाकिस्तान दहशतवादाचा बळी ठरलाय. मागील दोन दशकांत 80,000 लोकांनी दहशतवादी हल्ल्यांत आपले प्राण गमावलेत. यामुळे पाकिस्तानच आर्थिक नुकसानही झालं आहे. ते जवळपास 150 अब्ज डॉलर इतकं आहे."

शरीफ भारताविरुद्ध आणखी काय बोलले?

शाहबाज शरीफ यांनी जवळपास अर्धा तास भाषण केलं. यात त्यांनी शांती आणि काश्मीर प्रश्नावर तोडगा असे मुद्दे उपस्थित केले. ते म्हणाले की, आता आम्हाला भारतासह इतर शेजारी देशांसोबत शांतता प्रस्थापित करायची आहे. दक्षिण आशियात जर शांतता प्रस्थापित करायची असेल तर त्यासाठी काश्मीर समस्येवर तोडगा काढणं आवश्यक आहे.

ते पुढे म्हणतात, "कश्मीरचा वाद दीर्घकाळापासून सुरू आहे. यात काश्मिरी लोकांना त्यांचा त्यांचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देणं आवश्यक आहे. भारताने आजअखेर पर्यंत काश्मिरी लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय. भारताने काश्मिरी लोकांच्या विरोधात मोहीम तीव्र केलीय. यात एक्स्ट्रा जुडिशिल किलिंग्स, तुरुंगात डांबणं, कोठडीत छळ करणं आणि मृत्यू, बळाचा अंदाधुंद वापर, पॅलेट गनचा वापर करून जाणून बुजून काश्मिरी तरुणांना लक्ष्य करणं अशा गोष्टी वारंवार घडत आहेत."

याव्यतिरिक्त त्यांनी भारतावर आरोप केलेत की, भारत डेमोग्राफिक बदल करून मुस्लिमबहुल जम्मू-काश्मीरला हिंदूबहुल प्रदेश करण्याच्या प्रयत्नात आहे.

शरीफ म्हणतात, "पाकिस्तानने नेहमीच काश्मिरी लोकांना पाठिंबा दिलाय, त्यांच्या सोबत उभा राहिलाय. आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार त्यांना स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळत नाही तोपर्यंत पाकिस्तान काश्मीरसोबत उभा राहील."

या सगळ्यानंतर शाहबाज शरीफ यांनी भारताला सल्ला देत म्हटलं की, "भारताने काश्मीरच्या बाबतीत थोडा प्रामाणिकपणा दाखवावा. आणि 15 ऑगस्ट 2019 रोजी घेतलेला अवैध निर्णय मागे घेऊन शांतता आणि संवादाचा मार्ग अवलंबला पाहिजे."

पण भारताने आजवर अनेकदा सांगून झालंय की, जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि पुढेही राहील.

भारताचं म्हणणं आहे की, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद, हिंसाचाराला खतपाणी घालणं बंद करणार नाही तोपर्यंत भारताचे पाकिस्तानसोबतचे संबंध सामान्य होणार नाहीत.

भारताने दिलं प्रत्युत्तर...

शरीफ यांच्या भाषणानंतर राइट टू रिप्लाय या अधिकारांतर्गत भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं. संयुक्त राष्ट्रातील भारतीय मिशनचे फर्स्ट सेक्रेटरी मिजिटो विनिटो यांनी भारताच्या वतीने उत्तर दिलं.

ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांच्या या आमसभेचा प्लॅटफॉर्म वापरून पाकिस्तानने भारतावर खोटे नाटे आरोप केलेत. आणि अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आपल्या देशातील गैरकृत्य झाकण्यासाठी त्यांनी भारताविरुद्ध मोहीम उघडली आणि ती कशी बरोबर आहे याचं प्रमाण दिलं. एखाद्या देशाला जर आपल्या शेजारील राष्ट्रांसोबत शांतता प्रस्थापित करायची असेल तर ते त्या देशात दहशतवादी कारवायांना खतपाणी देत नाहीत. किंबहुना मुंबईत जो दहशतवादी हल्ला झाला त्याची योजना आखणाऱ्यांना आश्रयही देणार नाही. जेव्हा आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव वाढतो तेव्हा ते अशा लोकांना आश्रय दिल्याचं मान्य करतात."

"जर भारतीय उपखंडात शांतता, सुरक्षा आणि प्रगती करायची असेल तर सीमापार दहशतवाद संपवावा लागेल, आंतरराष्ट्रीय समुदाय आणि आपल्या लोकांसोबत खरेपणाने वागावं लागेल, अल्पसंख्याकांचा छळ थांबवावा लागेल. आणि आम्हाला या आमसभेच्या आधीपासूनच या गोष्टी माहीत आहेत."

शाहबाज शरीफ आणखी काय म्हणाले?

मला असं वाटतंय की, दोन्ही देशांकडे खूप मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांचा साठा आहे पण युद्ध हा पर्याय नाहीये ही गोष्ट भारताने समजून घेतली पाहिजे.

शांततापूर्ण संवादानेच या समस्या सोडवता येऊ शकतात. यामुळे येणाऱ्या काळात जगात शांतता प्रस्थापित होईल.

आम्ही आमच्या भारतीय समकक्षांना सांगू इच्छितो की, तुम्ही खाली बसून बोला जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढ्यांना त्रास होणार नाही, आपल्यासाठी भविष्याचा मार्ग खुला राहील. आपल्या देशात जे काही दुःख आहे ते दूर करण्यासाठी आपण आपल्या संसाधनांचा योग्य वापर करू शकू.

1947 नंतर आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानात तीन युद्धे झाली. या युद्धाची परिणीती दोन्ही बाजूंनी गरिबी, दारिद्र्य आणि बेरोजगारी वाढली. आपण शेजारी आहोत आणि कायम राहू. आमची इच्छा आहे की, आपण एकमेकांशी न भांडता शांततापूर्ण मार्गाने जगुया.

भारत असो वा पाकिस्तान, आपण आपली संसाधने शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी न वापरता जलद आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी वापरली पाहिजेत. यातून लाखो लोकांना गरिबी आणि उपासमारीच्या दलदलीतून बाहेर काढता येईल. आणि पाकिस्तानसाठी या गोष्टी प्राधान्यक्रमात आहेत.

मागचे 40 दिवस पाकिस्तानात गंभीर पूर परिस्थिती आहे. सलग 40 रात्री पुराचा कहर सुरूच आहे. मागच्या शतकातले सर्व विक्रम या पावसाने मोडीत काढलेत.

जवळपास 3.3 कोटी लोक या पूरपरिस्थितीच्या प्रभावात आलेत. यात महिला आणि मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 6.5 लाख महिलांची बाळंतपण तंबूत झाली आहेत.

हवामान बदलाचं रौद्र रूप पाकिस्तानने याआधी कधीही पाहिलं नव्हतं. यामुळे पाकिस्तानची परिस्थिती कायमची बदलली आहे.

या हवामान बदलाची किंमत एकट्या पाकिस्तानने का चुकवावी?

पाकिस्तानात रंगली भाषणाची चर्चा

संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनात शाहबाज शरीफ यांनी दिलेल्या भाषणाची चर्चा पाकिस्तानातील सोशल मीडियावर रंगली.

शाहबाज शरीफ यांच्या समर्थकांनी त्यांच्या भाषणाचं कौतुक केलं. तर माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी त्यांच्या भाषणावर टीका केली.

इम्रान खान यांच्या पार्टीच्या महिला विंगच्या अध्यक्षा कंवल शौजाब यांनी एक फोटो ट्विट केलाय. यात मागच्या वेळी इम्रान खान यांनी भाषण केले असताना सभागृहाचा फोटो तर यावेळी शाहबाज शरीफ यांच्या भाषणादरम्यानच्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो आहेत.

कंवल ट्विट मध्ये लिहितात, "मुस्लिम उम्मतचा खरा नेता जेव्हा बोलतो, तेव्हा जगातले राजे महाराजे कान देऊन ऐकतात."

अनस हाफिज यांनी ट्विट केलंय की, "इम्रान खान यांनी अशाप्रकारे काश्मीरचा मुद्दा जगासमोर मांडला होता."

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतावर आरोप केल्यानंतर आता भारताच्या बाजूनेही प्रतिक्रिया आली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर शनिवारी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भाषण करतील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)