विम्बल्डनची फायनल खेळणारा खेळाडू जेव्हा निर्घृण खुनी बनला..

विम्बल्डन

फोटो स्रोत, DEA / BIBLIOTECA AMBROSIANA

    • Author, शेन हॅरिसन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, डब्लिन

विम्बल्डनमध्ये टेनिसचा खेळ म्हणजे शुभ्र पांढऱ्या कपड्यातले खेळाडू आणि आईस्क्रीम वगैरे खात प्रेक्षक गॅलरीत बसलेले रसिक.

टेनिसचा आनंद घेणाऱ्यांमध्ये काही वाईट लोकही झाले असतील. मात्र, विम्बल्डनमधील टेनिसची फायनल खेळणाऱ्या खेळाडूने 1879 साली जे केलं, त्याहून वाईट तर काहीच घडलं नसेल.

आपल्या कृतीमुळे बदनाम झालेली व्यक्ती म्हणजे दुसरी-तिसरी कुणी नसून, वियर थॉमस सेंट लिजर गोल्ड होय.

गोल्ड सर्वोत्तम टेनिस खेळाडू होते आणि त्यांचं बॅकहँड मारक होता. त्यांनी 1879 मध्ये विम्बल्डनच्या फायनलमध्ये स्थान पटकावलं होतं. मात्र, रेव्हरंड जॉन थोर्नीक्रॉफ्ट हार्टलीकडून त्यांना पराभव पत्कारावा लागला होता.

अनेकांना वाटत होतं की, गोल्डच फायनल जिंकतील. मात्र, सामन्यापूर्वीच्या रात्री जास्त मद्यपान केल्यानं त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी सामन्यावर झाला. त्यामुळे त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांच्या कारकीर्दीलाही उतरती कळा लागली.

नंतर नंतर तर ते जुगाराच्या आहारी गेले. खूप मद्यप्राशन करून, अफूचंही सेवन करू लागले होते.

1891 साली त्यांनी मॅडम मेरी जिरॉडीनसोबत लग्न केला. जिरॉडीनच्या आधीच्या दोन पतींचं निधन झालं होतं. तीसुद्धा स्वतःच्याच व्यसनांशी लढा देत होती.

स्वत:ला सर आणि लेडी म्हणवून घेणारं हे दाम्पत्य लग्नानंतर दक्षिण फ्रान्समध्ये शिफ्ट झालं होतं. त्यापूर्वी ते मोंटे कार्लोच्या जुगारअड्ड्यांवर वेळ घालवत असत.

जुगारामुळे नुकसान

जेव्हा कॅसिनोच्या रुलट टेबलावर गोल्ड आपल्याकडील सर्व पैसा गमावून बसले, तेव्हा या दाम्पत्यानं एम्मा लेविन या डॅनिश विधवा महिलेकडून कर्ज घेतलं होतं.

1907 साली त्यांनी 40 पाऊंड कर्ज घेतलं. ही रक्कम त्यावेळी खूप मोठी होती. हे कर्जही ते असेच गमावून बसले.

या कर्जावरूनच गोल्ड दाम्पत्याचा एम्माची मैत्रीण मॅडम कॅसलज्जीसोबत भांडण झालं. गोल्ड दाम्पत्यानं एम्माचे पैसे परत करावे, असं मॅडम कॅसलज्जीचं म्हणणं होतं.

या प्रकारामुळे एम्मानं मोंटे कार्लो सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, जाण्यापूर्वी तिला गोल्डला भेटायचं होतं.

याच भेटीदरम्यान गोल्ड दाम्पत्य आणि एम्मा लेविन यांच्यात जीवघेणी झटापट झाली. कारण या प्रकाराची पुढे जेव्हा पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा भिंतींवर आणि फर्निचरवर रक्ताचे डाग होते.

एम्मा लेविन खूप वेळ परतली नाही, तेव्हा मॅडम कॅसलज्जीने पोलिसांना फोन करून, तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली.

पोलिसांना चौकशीदरम्यान घटनास्थळी रक्ताने माखलेलं कट्यार आणि कत्तलखान्यात वापरला जाणारा चाकू सापडला होता.

निर्घृण हत्या

या दरम्यान गोल्ड दाम्पत्य मार्सिलेच्या दिशेनं निघाले होते. त्यांच्याकडे एक मोठी सुटकेस आणि एक हँडबॅग होती.

सुटकेस आणि हँडबॅग त्यांना लंडनला पोहोचवायच्या होत्या. मात्र, हमालाला त्यातून घाण वास येत होता. शिवाय, या बॅगमधून रक्त गळत असल्यासारखंही वाटत होतं.

कुणी विचारल्यास गोल्ड सांगत की, सुटकेसमध्ये मेलेल्या कोंबड्या आहेत. मात्र, हमाल त्याच्याशी सहमत होत नव्हते. त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आलं.

पोलिसांना या सुटकेसमध्ये एम्मा लेविन यांच्या शरीराचे तुकडे सापडले.

त्यानंतर गोल्ड दाम्पत्याला टेनिस कोर्टाऐवजी कायद्याच्या कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या.

गोल्डनं आत्महत्या केली, तर पत्नीचा टाययफॉईडनं मृत्यू

गोल्ड आणि त्यांची पत्नीवर लेविन हत्येचा खटला चालला. यात दोघांनाही दोषी ठरवण्यात आलं आणि शिक्षा सुनावण्यात आली.

गोल्ड यांच्या पत्नीला मृत्यूदंडाशी शिक्षा सुनावण्यात आली. खरंतर तिचा शीर शरीरापासून वेगळं करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, हे काम करण्यासाठी कुणी जल्लाद उपलब्ध नव्हता. त्यामुळे तिची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली.

पुढे 1914 मध्ये टायफॉईडनं तिचा मृत्यू झाला.

गोल्डलाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना फ्रेंच गयानाच्या कुख्यात डेव्हिल आयलंडमध्ये ठेवण्यात आलं होतं.

तिथं अल्कोहोल आणि अफूच्या विथड्रॉवल सिम्प्टम्सशी त्यांनं झुंज दिली. त्याला रात्रीचे भयंकर स्वप्न पडत.

मानसिक स्थिती बिघडल्यानं 1909 मध्ये त्यानं आत्महत्या केली. त्यावेळी त्याचं वय 55 वर्षे होते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)