विम्बल्डन : महिला खेळाडू, मासिक पाळी आणि पांढरे कपडे घालण्याचा दबाव

फोटो स्रोत, Reuters
- Author, वंदना,
- Role, भारतीय भाषेच्या टीव्ही संपादक.
"विम्बल्डनमध्ये खेळणार आहे म्हटल्यावर महिला खेळाडूंना एक प्रकारचा मानसिक तणाव असतो. यात सफेद कपडे घालावे लागणार आणि त्या दोन आठवड्यात मासिक पाळी आली तर काय? हाच तो तणाव असतो."
ऑलिम्पिकमध्ये टेनिस चॅम्पियन राहिलेल्या मोनिका पुइग यांनी नुकतंच ट्विट करून हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे.
विम्बल्डन ही स्पर्धा भारतासह पूर्ण जगभरात पाहिली जाते. आणि या स्पर्धेत खेळाडूंनी पांढरे कपडे घालण्याची परंपरा तशी जुनीच आहे.
विम्बल्डनच्या नियमांनुसार, खेळाडूंचे स्कर्ट, शॉर्ट्स आणि ट्रॅकसूट सर्व पांढऱ्या रंगाचे असावेत. पांढरा म्हणजे पांढरा. यात ऑफ व्हाईट किंवा क्रीम कलर चालत नाही.
टेनिसमध्ये सफेद कपडे घालण्याचे नियम महिला विरोधी आहेत की नाहीत हा मुद्दा मोनिका पुईग यांच्या ट्विटने पुन्हा ऐरणीवर आलाय.
यावर माजी भारतीय टेनिसपटू तारुका श्रीवास्तव म्हणतात...
जरा विचार करा की, एखाद्या महिला खेळाडूची मासिक पाळी सुरू आहे. आणि तिला त्या खेळादरम्यान सफेद कपडे घालण्याचं बंधन असेल, तर साहजिकच आपल्या कपड्यांना डाग लागेल की काय याची तिला भीती असते. हाच मुद्दा धरून काही महिला खेळाडू या नियमांविरोधात आवाज उठवायला लागल्या आहेत. आणि त्यांनी लावलेला तर्क अगदी बरोबर आहे. यावर काही लोक म्हणतील की, अरे पांढरे कपडे घालणं तर विम्बल्डनची परंपरा आहे. पण एखाद्या महिलेच्या कम्फर्टपेक्षाही प्रथा परंपरा महत्वाच्या असतात का ?असा प्रश्न विचारला पाहिजे.
विम्बल्डनचा ड्रेस कोड
- खेळाडूंनी पांढरे कपडे घालणे बंधनकारक आहे.
- पांढऱ्या रंगात ऑफ व्हाइट किंवा क्रीम कलर येत नाही.
- शूज, सॉक्स, कॅप या सर्वच गोष्टी सफेद असाव्यात.
- जर घाम येऊन किंवा इतर कोणत्याही कारणामुळे अंडरवेयर्स दिसत असतील तर एक सेंटीमीटरची पट्टी वगळता त्यांचा रंग देखील पांढराच असावा.
टेनिस असो की इतर खेळ, आता अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू या पांढऱ्या ड्रेसकोडच्या नियमांवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
सिक्की रेड्डी या एक भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहेत. 2009 पासून त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करतायत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
त्या म्हणतात की, "खेळामध्ये चांगलं प्रदर्शन करायचं आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे खेळाडूला कम्फर्टेबल वाटत असेल तरच तो चांगल्या खेळाच प्रदर्शन करू शकतो. 'महिलांनी हेच कपडे घातले पाहिजेत' अशा नियमांचा परिणाम त्या महिला खेळाडूंच्या खेळावर होईल. यात योग्य आणि अयोग्य हा मुद्दा नसून ही वैयक्तिक निवडीची बाब आहे. कोणालाही या गोष्टींवरून जज केलं जाऊ नये."
मी कोणते कपडे घालते हा नंतरचा मुद्दा आहे. मूळ मुद्दा माझा परफॉर्मन्स कसा आहे. मी जे कपडे घालते त्याने माझा आत्मविश्वास वाढून माझी खेळातली कामगिरी चांगली व्हावी हा उद्देश असायला पाहिजे. आपण घातलेल्या कपड्यांवरून आपल्याला जज केलं जातंय यामुळे खेळ सोडून याच गोष्टींकडे लक्ष जातं. आणि यातून विनाकारण तणाव वाढतो.
मासिक पाळी उशिरा व्हावी म्हणून मी एक गोळी घेण्याच्या विचारात होते
मासिक पाळी हा तर असा विषय आहे की, भारत तर सोडाच पण परदेशातल्या महिला खेळाडू पण यावर व्यक्त होताना दिसत नाहीत.
ब्रिटनची हैदर वॉटसन ही मिक्सड प्रकारात विम्बल्डन चॅम्पियन राहिली आहे. बीबीसी स्पोर्टशी बोलताना ती म्हणते की, "मासिक पाळीच्या वेळी पांढरे कपडे घालण्याच्या मुद्द्यावर आम्हा खेळाडूंमध्ये चर्चा होते. पण ही चर्चा मीडियासमोर करता येत नाही. एकदा तर विम्बल्डन दरम्यान मासिक पाळी येऊ नये म्हणून मी गोळी घ्यायच्या विचारात होते. यावरून तुम्हाला समजलंच असेल की महिला खेळाडू कोणत्या प्रकारचा विचार करत असतील."
विम्बल्डनचा इतिहास
- जुलै 1877 मध्ये पहिली स्पर्धा पार पडली.
- तेव्हा महिलांना खेळण्याची परवानगी नव्हती.
- महिला सिंगल्स सामने 1884 मध्ये सुरू झाले.
- मॉड वॉटसन तिच्या बहिणीला हरवून पहिली महिला चॅम्पियन बनली
- 1913 - महिला डबल्स आणि मिक्सड डबल्सची सुरुवात
महिलांसाठी टॉयलेट ब्रेक
पांढरे कपडे आणि पाळीचे डाग लागण्याची भीती याच समस्या आहेत असं नाही. तर महिला खेळाडूंशी संबंधित इतर समस्यांवर चर्चा होत आहे. विम्बल्डनसारख्या कोणत्याही क्रीडा स्पर्धेत सामन्यादरम्यान टॉयलेट ब्रेक घेणे नॉर्मल गोष्ट आहे.
मात्र काही महिला खेळाडूंच्या मते, पुरुष खेळाडू आणि महिला खेळाडूंना एकसारखे नियम नसावेत, नाहीतर याचा खेळावर परिणाम होतो.

फोटो स्रोत, Getty Images
आता यात काही तज्ञांच मत आहे की, पुरुष खेळाडू असो वा महिला खेळाडू, टेनिस ग्रँड स्लॅम मॅचमध्ये जेवढे टॉयलेट ब्रेक्स आहेत त्यातले पण कमी करायला हवेत. कारण खेळाडू या ब्रेकचा वापर अतिरिक्त वेळ मिळवण्यासाठी करताना दिसतात.
मात्र यावर टेनिसपटू असलेल्या तारुका यांचं मत काहीसं वेगळं आहे.
तारुका म्हणतात, "समजा एखाद्या महिला खेळाडूचा मॅचच्या दिवशीच पाळीचा पहिला दिवस आहे तर तिला तीच सॅनिटरी पॅड बदलण्याइतपत तरी वेळ हवा की नको. त्या महिला खेळाडूला अख्खा सेट खेळून होईपर्यंत पॅड बदलण्यासाठी वाट पाहावी लागते. कारण टॉयलेट ब्रेक तर मर्यादित असतो. अशात महिलांची स्थिती अजूनच खराब होते. महिलांच्या गरजा पुरुषांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे विम्बल्डनच्या नियमांमध्ये बदल करणं गरजेचं आहे."
पुरुषांपेक्षा महिला खेळाडूंच्या गरजा वेगळ्या
नियमांनुसार, मॅच सुरू असताना महिला खेळाडूला तीन मिनिटांपर्यंत टॉयलेट ब्रेक घेण्याची फक्त एक संधी असते. किंवा मग तिला जर पॅड किंवा कपडे बदलायचे असल्यास पाच मिनिट वेळ मिळतो. ग्रँडस्लॅमच्या नियमांनुसार महिला खेळाडूने जास्त वेळ घेतल्यास शिक्षा होऊ शकते.

फोटो स्रोत, Getty Images
समजा एखाद्या महिला खेळाडूला पाळीमुळे दुसरा टॉयलेट ब्रेक हवा असेल तर तिला अंपायरची परवानगी घ्यावी लागेल आणि तेही सर्वांसमोर. त्यावेळी अंपायरचा मायक्रोफोन चालू असेल किंवा कॅमेरा चालू असेल. आता हे बोलणं एखाद्या महिला खेळाडूला अनकम्फर्टेबल वाटू शकतं.
'टेनिस कोर्टवर मी पुरुष असते तर..'
फक्त ड्रेस कोड आणि ब्रेकचं नाही तर विविध खेळांमधील महिला खेळाडू देखील मासिक पाळी दरम्यान येणाऱ्या अडचणींबद्दल बोलतायत. यादरम्यान त्यांच्या खेळावर कसा परिणाम होतो याविषयी त्या सांगतात.
2022 ची फ्रेंच ओपन मॅच सगळ्यांनाच आठवायला पाहिजे. 19 वर्षांची टेनिसपटू यांग चिनविनची टेनिस कोर्टवर जगातल्या नंबर वन खेळाडूविरुद्ध मॅच सुरू होती. आणि यादरम्यान तिला पिरियड्स क्रॅम्प आले. मॅचमध्ये पराभूत झालेल्या चिनविनने शेवटी सांगितलं की, सामना सुरू असताना तिला पाळी आली होती.

फोटो स्रोत, AFP
ती म्हटली होती की, "मी टेनिस कोर्टवर पुरुष असते आणि मॅच संपल्यानंतर यांग चिनविन झाले असते तर" तीच हे विधान बरच काही सांगून जातं.
फक्त टेनिसच नाही तर इतरही खेळांमधल्या महिलांना अडचणी येतात.
वेटलिफ्टर मीराबाई चानूने गेल्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं आणि तिला 2021 साठी BBC स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर म्हणूनही गौरवण्यात आलं. मीराबाईने त्यावेळी झालेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, ऑलिम्पिक सामन्याच्या एक दिवस आधी तिला मासिक पाळी आली होती. ऑलिम्पिक सारख्या सामन्यासाठी तिने स्वतःला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार केलं होतं.
महिला खेळाडूंच्या कम्फर्टपेक्षा परंपरा महत्वाच्या आहेत का?
'द टेलिग्राफ' या वृत्तपत्राने गेल्या वर्षी भारत-इंग्लंड महिला क्रिकेट सीरिजचा रिपोर्ट छापला होता.
रिपोर्टनुसार, "भारत आणि इंग्लंड यांच्यातील या मॅचमध्ये इंग्लंडच्या टेस्ट टीममधल्या जवळपास निम्म्या महिला खेळाडूंना आणि एका भारतीय खेळाडूला मासिक पाळी आली होती. इंग्लंडची खेळाडू टॅमी ब्युमॉन्टच्या पाळीचा पहिलाच दिवस होता. तिला अशी भीती होती की, टेस्ट मॅचच्या दरम्यान सफेद कपड्यांवर डाग लागायला नको. सारखं सारखं टॉयलेटमध्ये जावं लागलं तर काय करायचं. टीव्हीवर लाईव्ह कव्हरेज सुरू असताना तिच्या कपड्यांवर डाग पडले तर. तिच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये तिला या सगळ्यावर विचार करायचा नव्हता."
2020 मध्ये बीबीसीच्या वूमन स्पोर्ट सर्वेक्षणानुसार, 60 टक्के महिला खेळाडूंनी सांगितलं होत की, मासिक पाळी दरम्यान त्यांच्या कामगिरीवर परिणाम होतो तर 40 टक्के खेळाडूंनी सांगितलं होतं की त्यांना त्यांच्या प्रशिक्षकाशी याबद्दल बोलता येत नाही.
स्पोर्ट्सवेअर कंपन्या महिलांसाठी काय करतात?
स्पोर्टवेअर कंपन्या यावर काम करतायत. आदिदास सारखी कंपनी महिला खेळाडूंसाठी पीरियड-प्रूफ कपडे उपलब्ध करून देते.
त्यांच्या वेबसाइटवर लिहिलेल्या माहितीनुसार, अशा कपड्यांमध्ये शोषक थर आणि लीकप्रूफ मेम्बरेन वापरलं जातं जेणेकरून डाग लागू नयेत. बीबीसी स्पोर्ट्सशी झालेल्या संभाषणात आदिदासच्या प्रवक्त्याने सांगितलं की, आमची कंपनी महिलांच्या विशेष गरजा लक्षात घेऊ उत्पादने बनवत आहे.
विम्बल्डनची प्रतिक्रिया
विम्बल्डनबद्दलच बोलायचं तर महिला खेळाडूंचे प्रश्न तर खूप आहेत पण सर्वच खेळाडूंना यावर मोकळेपणान बोलता येत नाही. आता हे मुद्दे चर्चेला येत नाहीत, कारण काही ठिकाणी यावर आजही बोलणं निषिद्ध मानलं जातं. तर काही ठिकाणी मासिक पाळींसाठी सबब निर्माण केल्याचा आरोप महिलांवर होतो.
मात्र, विम्बल्डनने आपल्या वतीने या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. "महिलांच्या आरोग्याला प्राधान्य दिलं जाईल आणि महिला खेळाडूंना त्यांच्या वैयक्तिक गरजांनुसार सुविधा पुरविल्या जातील याची आम्ही खातरजमा करू. विम्बल्डनमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घेणं आमची जबाबदारी आहे."
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिस खेळलेल्या तरुका श्रीवास्तव या संपूर्ण वादाचा सारांश खालीलप्रमाणे मांडतात, "काही लोक म्हणतील की, अरे सफेद कपडे घालणं तर विम्बल्डनची परंपरा आहे. पण टेनिस कोर्टवर खेळणाऱ्या एखाद्या महिलेच्या कम्फर्टपेक्षाही प्रथा परंपरा महत्वाच्या असतात का ?"
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








