IPL : पांढरा गालिचा अंथरून पिच तयार केलं, खोटी IPL भरवली, कोट्यवधींची अफरातफर केली

स्पर्धेतलं एक दृश्य
    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

एका पडीक जमिनीवर शेंडा-बुडखा नसणारी, लुटूपुटूची वाटणारी क्रिकेट मॅच चालू आहे.

या व्हीडिओला आवाज नाहीये. स्क्रीनच्या खाली एक निळी पट्टी दिसतेय, त्यावर बॅटिंग करणाऱ्या टीमचा स्कोर दिसतोय. व्हीडिओत दोन बॅट्समन, तर खाली पट्टीवर या रनरेटने किती स्कोर होऊ शकतो ती शक्यता आणि बॉलिंगची आकडेवारीही दिसतेय.

तिथे लिहिलंय की गांधीनगर चॅलेंजर्सनी 151 रन केलेत आणि ते उदिष्ट आता चेन्नई फायटर्सला गाठायचं आहे.

ग्राऊंड मातकट आहे, क्रिकेटचं पीच असतं तिथे तर चक्क एक पांढरटसर गालिचा खिळे ठोकून बसवला आहे. कधी कधी जोरदार शॉट मारला जातो पण आपल्याला बॉल बाऊंड्री बाहेर जाताना दिसत नाही. बॅट्समन आपले हळूहळू, कंटाळा आल्यागत पळत एखाद-दोन रन काढतात.

या खेळाडूंपेक्षा अंपायरलाच जास्त उत्साह आहे, असं दिसतंय. वाईड आणि नो बॉलचा सिग्नल द्यायला तो उत्साहात हातवारे करतो. बॉलरला बहुतेक खेळ शांततेत चालू द्यावा असं वाटतंय. कारण बॅट्समन क्रीझच्या बाहेर भरकटत गेला तरी तो त्याला रनआऊट करायच्या फंदात पडत नाही.

एक तरूण मुलगा ग्राऊंडवर धावत येतो. त्याच्या हातात आईसबॉक्स आहे असं वाटतं. खेळाडू ड्रिंक्स ब्रेक घेतात. कोणत्याच खेळाडूचा क्लोजअप दिसत नाही. फारसे फिल्डरही दिसत नाहीत आणि प्रेक्षक तर दिसतच नाहीत.

कुठल्या तरी स्थानिक T-20 मॅचचा व्हीडिओ आहे असं वाटतं.

पण फरक इतकाच आहे की ही खरी मॅच नाही, 'खोटी' मॅच आहे. गुजरातची काही बेरोजगार माणसं आणि रशियातल्या जुगाऱ्यांनी मिळून रचलेला हा बनाव होता.

एका टीपवरून गुजरातमधल्या मेहसाणातल्या पोलिसांनी काही दिवसांपूर्वी चार लोकांना अटक केली. हे लोक या T-20 मॅचचा देखावा करत होते आणि टेलिग्राम अॅपवरून रशियातल्या तीन शहरांमधल्या जुगाऱ्यांशी व्यवहार करत होते.

गुजरात पोलिसांनी अटक केलेले आरोपी
फोटो कॅप्शन, गुजरात पोलिसांनी अटक केलेले आरोपी

या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी भावेश राठोड यांनी म्हटलं की, "या चारपैकी एकाने रशियातल्या पबमध्ये काम केलं होतं. त्याचे तिथे काही कॉन्टॅक्ट होते आणि त्याने या लोकांना क्रिकेटवर बेटिंग करण्यासाठी उत्तेजन दिलं."

भारतात आयपीएल मॅचेस होतात हे तर सर्वश्रुत आहेच. आता तर तामिळनाडूसारख्या काही राज्यांनी आयपीएलच्या धर्तीवर स्वतःच्या T-20 मॅचेसच्या स्पर्धा आणल्या आहेत.

स्थानिक पातळीवरही देशात अशा अनेक स्पर्धा होत असतात.

भारतीय कायद्यानुसार घोड्यांची शर्यत वगळता कुठल्याही खेळावर सट्टा लावता येत नाही, पण क्रिकेटवर अनधिकृतपणे प्रचंड प्रमाणात सट्टा लागतो.

जॉय भट्टाचार्य एका आयपीएल टीमचे माजी संचालक आहेत. त्यांच्यामते मेहसाणात जो प्रकार समोर आला तशा 'खोट्या' स्पर्धा फक्त आणि फक्त सट्ट्याच्या उद्देशाने आयोजित केल्या जातात.

"याचे आयोजक या खेळांचं सोशल मीडियावर लाईव्ह प्रक्षेपण दाखवतात. अंपायर सरळ सरळ खेळाडूंना काय करायचं ते सांगतात. पूर्ण खोट्या स्पर्धा असतात या."

गुजरातमधल्याच मोहालीपूरमध्ये 9 सामने खेळून झाल्यानंतर मेहसाणातल्या या खोट्या स्पर्धेचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी या आरोपींची तपासणी केली असता त्यांना क्रिकेट किट, कॅमेरा, कॉमेंट्रीचा फिल यावा म्हणून आणलेले स्पीकर्स असं साहित्य मिळालं.

या स्पर्धेला आयोजकांनी 'हिटर्स-20' असं नाव दिलं होतं. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांच्या नावाने त्यात जवळपास सहा 'टीम' होत्या. या मॅचमध्ये खेळायला स्थानिकांनाच पैसे दिले होते. तेच तेच लोक वेगवेगळ्या राज्यांच्या टीममध्ये खेळायचे.

दोन अंपायर होते, दोन आयोजक. यातला एक आयोजक कॉमेंट्री करायचा आणि एका प्रसिद्ध भारतीय कॉमेंट्रेटरची नक्कल करायचा.

या मॅच युट्यूबवर लाईव्ह दाखवल्या जायच्या आणि त्यासाठी दोन हाय डेफिनेशन कॅमेरे वापरले जायचे. या स्पर्धेच्या युट्यूब चॅनलला फक्त 255 सबस्क्रायबर्स होते. रशियन जुगारी यावर टेलिग्रामव्दारे सट्टा लावायचे.

रशियातले बरेचसे जुगारी मॉस्को, वोरोनेझ आणि त्वेर या शहरांमधले होते. या खेळांना अजून खरंखुरं बनवण्यासाठी या आजोयकांनी इंटरनेटवरून प्रेक्षकांच्या टाळ्या, शिट्ट्यांचे आवाज डाऊनलोड केले होते आणि ते ग्राऊंडजवळ ठेवलेल्या स्पीकर्सवरून वाजायचे. त्यामुळे खरंच स्पर्धा चालू आहे असं वाटायचं.

गुजरात पोलिसांनी जप्त केलेलं सामान

अंपायर्स आयोजकांशी बोलण्यासाठी वॉकी-टॉकी वापरायचे. आजोयक टेलिग्रामवरून सट्टा लावणाऱ्या जुगाऱ्यांशी संपर्क साधायचे. अंपायर मॅचचे निकाल बदलण्यासाठी खेळाडूंनाही सूचना द्यायचे.

यातल्या तथाकथित खेळाडूंना एका मॅचसाठी 400 रुपये मिळायचे. या खेळाडूंनी पोलिसांना सहकार्य करण्याचं मान्य केलं आहे, अशी माहिती राठोड यांनी दिली.

"मी कधीच असा स्कॅम पाहिला नाही. या लोकांना एका खेडेगावातली पडीक जमीन साफ करून घेतली, तिथे मॅच खेळायला लागले आणि ती युट्यूबवर लाईव्ह दाखवली. सट्ट्याव्दारे पैसेही कमावले. इथल्या स्थानिक गावकऱ्यांनाही याबद्दल काही माहिती नव्हतं. या मॅचवर ज्यांनी सट्टा लावला त्या रशियन लोकांबद्दल तर आम्हाला फारच कमी माहिती आहे."

आणि प्रेक्षकांचं काय?

"तिथे कोणीच प्रेक्षक नव्हते."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)