IPL 2022: आयपीएलसाठी खेळाडू पाठवून जगभरातले क्रिकेट बोर्ड मालामाल कसे होतात?

कागिसो रबाडा, पॅट कमिन्स

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, कागिसो रबाडा आणि पॅट कमिन्स
    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

आयपीएल ही बीसीसीआयतर्फे आयोजित होणारी स्थानिक स्पर्धा. मात्र यात मोठ्या प्रमाणावर विदेशी खेळाडू खेळतात. आपले खेळाडू भारतातल्या लीगमध्ये पाठवून त्यांना काय मिळतं?

इंडियन प्रीमिअर लीगचा पंधरावा हंगाम ऐन भरात आहे. यंदाच्या हंगामात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, बांगलादेश, अफगाणिस्तान अशा 8 देशांचे खेळाडू सहभागी झाले आहेत. आपल्या खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळायला पाठवून जगभरातील क्रिकेट बोर्डांना काय मिळतं? असा प्रश्न तुमच्या मनी दाटला असेल. ते क्रमाक्रमाने समजून घेऊया.

कोणत्याही देशाच्या खेळाडूला आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी त्याच्या बोर्डाकडून एनओसी मिळवावी लागते. एनओसी अर्थात ना हरकत प्रमाणपत्र. त्या विशिष्ट संघाचा आयपीएल काळात एखादी मालिका असेल, दौरा असेल किंवा आयपीएलनंतर मालिका असेल तर बोर्ड त्या खेळाडूला परवानगी नाकारू शकतं.

एखादा खेळाडू टेस्ट, वनडे, ट्वेन्टी-20 असे सगळे फॉरमॅट खेळत असेल तर वर्कलोड मॅनेजमेंटनुसार त्याला विश्रांती मिळणं आवश्यक आहे. अशावेळी एनओसी नाकारली जाऊ शकते. संबंधित बोर्ड आणि बीसीसीआय यांचे संबंध ताणलेले असतील तरीही खेळाडूला एनओसी मिळवताना अडचण निर्माण होऊ शकते.

एनओसी देण्याच्या बदल्यात बोर्डाला काय मिळतं?

प्रत्येक खेळाडूला आपल्या बोर्डाकडून एनओसी मिळवावी लागते. एनओसी मिळाल्यानंतरच त्या खेळाडूचा आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा होतो. एनओसी देण्याकरता संबंधित बोर्डाला बीसीसीआयकडून प्रति खेळाडू त्याच्या मानधनाच्या दहा टक्के रक्कम मिळते. एका उदाहरणाद्वारे हे समजून घेऊया.

यंदाच्या हंगामात दक्षिण आफ्रिकेचे 11 खेळाडू खेळत आहेत. आफ्रिकेकडून मार्को यान्सन (4.2 कोटी, हैदराबाद), एडन मारक्रम (2.65 कोटी, हैदराबाद), लुंगी एन्गिडी (50 लाख, दिल्ली), कागिसो रबाडा (9.25 कोटी, पंजाब), रासी व्हॅन डर डुसे (1 कोटी, राजस्थान), ड्वेन प्रिटोरस (50 लाख, दक्षिण आफ्रिका), डेव्हिड मिलर (3 कोटी, गुजरात), डेवाल्ड ब्रेव्हिस (3 कोटी, मुंबई), क्विंटन डी कॉक (6.25 कोटी, लखनऊ), फॅफ डू प्लेसिस (7 कोटी, बंगळुरू), अँनरिक नॉर्किया (6.5 कोटी, दिल्ली) हे खेळाडू सहभागी होत आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डाला प्रत्येक 11 खेळाडूंमागे 20 टक्के रक्कम मिळणार आहे. उदाहरणार्थ कागिसो रबाडाला पंजाब किंग्ज 9.25 कोटी रुपये देणार आहे. रबाडाला एनओसी देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डाला 1 कोटी 85 लाख रुपये मिळतील.

घसघशीत मानधन मिळणारे जेवढे खेळाडू जास्त तेवढा त्या बोर्डाचा आर्थिक फायदा जास्त असं हे समीकरण आहे. त्यामुळे आयपीएलसाठी खेळाडू पाठवणं ही जगभरातल्या क्रिकेट बोर्डांसाठी हक्काची बेगमी आहे.

किती देशांचे खेळाडू खेळत आहेत?

यंदाच्या आयपीएल हंगामात 77 विदेशी खेळाडू खेळत आहेत. या नऊ देशांच्या क्रिकेट बोर्डांनी एनओसी दिल्याने खेळाडूंचा आयपीएल खेळण्याचा मार्ग सुकर झाला.

आता या प्रत्येकाला वेगवेगळं मानधन संबंधित फ्रँचाईजींकडून मिळेल. कारण फ्रँचाइजींनी बोली लावून या खेळाडूंना ताफ्यात समाविष्ट केलं आहे. यापैकी काही संघांचे कर्णधारही आहेत.

आयपीएल, विदेशी खेळाडू

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, एबी डीव्हिलियर्स

मोठं मानधन मिळणाऱ्या खेळाडूंची संख्या जेवढी अधिक तेवढा संलग्न बोर्डाला फायदा अधिक. एनओसीकरता मिळणारी रक्कम ही आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या बोर्डांसाठी संजीवनी आहे.

भारतीय खेळाडूंना विदेशी लीगसाठी एनओसी नाही

विदेशी खेळाडू जसं आयपीएमध्ये खेळतात तसं भारतीय खेळाडूंना विदेशातील लीगमध्ये खेळण्यास परवानगी नाही. भारतीय खेळाडू अन्य देशातील लीगमध्ये खेळू लागले तर आयपीएलचं महत्त्व कमी होईल. गेली तेरा वर्ष भारतीय खेळाडू फक्त आयपीएल खेळतात. त्यामुळे या स्पर्धेला एक्सक्लुसिव्ह दर्जा राहतो.

आयपीएल, विदेशी खेळाडू

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, विराट कोहली

भारतीय खेळाडूंना विदेशातील लीगमध्ये खेळायचं असेल तर निवृत्तीनंतरच खेळता येतं. त्यानंतरही त्यांना सहभागी होण्यासाठी बीसीसीआयची एनओसी लागते. मुंबईकर प्रवीण तांबेला यंदा कोलकाता संघाने संघात समाविष्ट केलं होतं. परंतु प्रवीण कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये खेळल्याने त्याला केकेआरसाठी खेळण्यावर पाणी सोडावं लागलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)