रशिया युक्रेन संघर्ष दिवस 158 वा : युक्रेनमधील अणु उर्जा प्रकल्पाची स्थिती बिकट- संयुक्त राष्ट्र

फोटो स्रोत, AFP
युक्रेन-रशिया युद्धाचा आज 155 वा दिवस आहे. चार महिन्यांहून अधिक काळ धगधगत असलेल्या या युद्धातले हे रोजचे अपडेटस.
गेल्या चार महिन्यात काय काय झालं हे जाणून घ्यायचं असेल तर इथे क्लीक करा.
रशिया युक्रेन दिवस 158 वा- युक्रेनमधील अणु उर्जा प्रकल्पाची स्थिती बिकट- संयुक्त राष्ट्र
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या वेळी रशियाने एका अणूविद्युत केंद्रावर ताबा मिळवला होता. ते केंद्र आता पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेल्याचा दावा संयुक्त राष्ट्राच्या अणूउर्जा संघटनेच्या प्रमुखांनी केला आहे.
राफेल ग्रोसी यांनी असोसिएटेड प्रेसशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. या प्रकल्पाचं निरीक्षण आणि डागडुजी अत्यंत गरजेची असल्याचं त्यांनी सांगितलं.
"एखाद्या अणू प्रकल्पात काय काय होऊ नये ते सगळं इथे झालं आहे." ते पुढे म्हणाले.
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या वेळी रशियाने एका अणूविद्युत केंद्रावर ताबा मिळवला होता. ते केंद्र आता पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेल्याचा दावा संयुक्त राष्ट्राच्या अणूउर्जा संघटनेच्या प्रमुखांनी केला आहे.
राफेल ग्रोसी यांनी असोसिएटेड प्रेसशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. या प्रकल्पाचं निरीक्षण आणि डागडुजी अत्यंत गरजेची असल्याचं त्यांनी सांगितलं.
"एखाद्या अणू प्रकल्पात काय काय होऊ नये ते सगळं इथे झालं आहे." ते पुढे म्हणाले.
रशिया युक्रेन संघर्ष दिवस 157 वा : युद्धात अमेरिकेचा प्रत्यक्ष सहभाग - रशियाचा आरोप
युद्ध सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच रशियाने थेट आरोप केलाय की युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेचा प्रत्यक्ष हात आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की अमेरिकेच्या हिमार तोफा युक्रेनला दिलेल्या आहेत पण त्या तोफांचा मारा कुठे करायचा, त्यांचं लक्ष्य काय असेल हे अमेरिका सांगतंय.
लेफ्टनंट जनरल इगोर कोनाश्नेकोव्ह यांनी म्हटलं की त्यांनी युक्रेनच्या अधिकाऱ्यांचे फोन टॅप केलेत आणि त्यातूनही ही माहिती समोर आली आहे.
बीबीसी स्वतंत्रपणे या दाव्याची पडताळणी करू शकलं नाहीये.
याआधीही रशियाने अमेरिकेवर आरोप केला होता की ते युक्रेनच्या नावाखाली स्वतःच युद्ध लढत आहेत.
अमेरिकेचं संरक्षण खातं असलेल्या पँटागॉनच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की त्यांनी युक्रेनच्या सैन्याला 'सविस्तर, अचूक, वेळेत कारवाई करण्यासाठी माहिती दिलेली आहे. त्यामुळे त्यांना पुढे असलेले धोके लक्षात येतील आणि रशियाच्या हल्ल्यापुढे स्वतःच्या देशाचं संरक्षण करता येईल."
हिमार ही एक अशी यंत्रणा आहे ज्याव्दारे एकाच वेळेस अनेक रॉकेट डागता येतात. ते 70 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकतात. युक्रेनकडे आधी असलेल्या शस्त्रास्त्रांपेक्षा अमेरिकेने दिलेली हत्यारं खूपच उच्च दर्जाची आहेत.
रशियाच्या शस्त्रास्त्रांपेक्षा ही हत्यारं चांगली आणि अचूक आहेत.
रशिया युक्रेन संघर्ष दिवस 156 वा : युक्रेनहून धान्य घेऊन पहिलं जहाज निघालं
रशियाने युक्रेनची सागर कोंडी केली असल्यामुळे तिथून अनेक महिने कोणताही माल घेऊन जहाज बाहेर जाऊ शकली नाहीत.
युक्रेनच्या बंदरांवरून जाणाऱ्या जहाजांचा मार्ग रोखल्यामुळे कित्येक लाख क्विंटल धान्य गेल्या पाच महिन्यांपासून युक्रेनच्या बंदरावर पडून होतं.

फोटो स्रोत, Getty Images
हे धान्य आफ्रिका आणि मध्य-पूर्व आशियात जाणं अपेक्षित होतं, हे धान्य वेळेत न पोचल्यामुळे जगभरात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती.
आता पाच महिन्यांनी या प्रश्नावर तोडगा निघाला आहे आणि रशिया-युक्रेनमध्ये याप्रकरणी करार झाला आहे. या कराराअंतर्गत पहिलं धान्याचं जहाज युक्रेनच्या बंदरावरून निघालं आहे.
यामुळे जगभरातली धान्याची टंचाई कमी होऊन, धान्याच्या किंमतीही होतील आणि महागाईला आळा बसेल अशी अपेक्षा आहे.
रशिया युक्रेन संघर्ष दिवस 155 वा : रशियाचा युक्रेनच्या राजधानीवर हल्ला
युक्रेनने दक्षिणेकडील भाग पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर रशियानं मात्र युक्रेनची राजधानी कीव्ह शहराजवळील परिसरात धडक दिली आहे.

फोटो स्रोत, UKRAINE'S DSNS EMERGENCY SERVICE VIA REUTERS
मध्यवर्ती शहर क्रोपीव्नित्स्कीवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्यानं 5 जण ठार आणि २६ जखमी झाले, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पूर्वेकडील बाखमुत येथे 3 लोकांचा मृत्यू झाला.
कीव्ह जवळील लष्करी तळावर 15 लोक जखमी झाले आहेत. युक्रेनच्या उत्तर आणि दक्षिणेकडील प्रदेशांनाही या हल्ल्यांमुळे फटका बसला आहे.
देशाच्या दक्षिणेकडील रशियन सैन्याला तोडण्याचा प्रयत्न युक्रेन करत असताना हे घडलं आहे.
युक्रेनियन सैन्याने इशारा दिला आहे की, मॉस्को खेरसन प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी पूर्व युक्रेनमधून आपले सैन्य पुन्हा तैनात करत आहे.
रशिया युक्रेन संघर्ष दिवस 153 वा : युक्रेनच्या फुटीरवादी नेत्यांवर युकेकडून निर्बंध
युक्रेनच्या फुटीरवादी नेत्यांवर युकेकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. रशियाने पूर्व युक्रेनच्या दोनेत्स्क आणि लुहान्स्क प्रांतांना स्वतंत्र देशाचा दर्जा दिला होता. या प्रांतांचे प्रमुख म्हणून कामपाहणारे अनुक्रमे विताली खोतेसेन्को आणि व्लादिस्लाव्ह कुझनेत्सोव्ह यांच्या युके प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचं समर्थन करणाऱ्यांविरुद्ध युके अशाच प्रकारची कारवाई करत राहील, असा इशारा युकेच्या परराष्ट्र सचिव लिझ ट्रुस यांनी यावेळी दिला.
रशिया युक्रेन संघर्ष दिवस 152 वा : 'रशिया गॅसचा पुरवठा अडवून युरोपला वेठीला धरतंय'
युक्रेनने रशियावर आरोप केलाय की त्यांनी युरोपच्या विरोधात 'गॅस युद्ध' घोषित केलं आहे. त्यांनी युरोपला होणारा गॅसचा पुरवठा तोडला आहे आणि लोकांना 'वेठीला धरून दहशत माजवत आहेत.'

फोटो स्रोत, Reuters
युक्रेनने असा आरोप करण्याचं कारण म्हणजे रशियाचे उर्जा कंपनी गॅझप्रॉमने म्हटलं की ते नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईनच्या कामासाठी जर्मनीला होणापा गॅस पुरवठा कमी करत आहेत.
पण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं की ही कृती म्हणजे युरोपला 'ब्लॅकमेल' करण्यासाठी केलेली आहे.
गॅझप्रॉमने सोमवारी, 25 ऑगस्टला दिलेल्या पत्रकात म्हटलं की पाईपलाईनची डागडुजी करण्यासाठी ते त्यांचा नैसर्गिक वायूचा पुरवठा निम्म्याने कमी करत आहेत. पण जर्मन सरकारने म्हटलं की गॅसचा पुरवठा मर्यादित करण्यासाठी कोणतंही तांत्रिक कारण नव्हतं.
युरोपियन युनियनने आधीच आरोप केलाय की रशिया त्यांच्याकडून येणाऱ्या नैसर्गिक वायूच्या पुरवठ्याला शस्त्र म्हणून वापरत आहेत.
याआधीही मागच्या महिन्यात रशियाने युरोपात जाणारी नैसर्गिक वायुची पाईपलाईन 10 दिवस बंद केली होती.
रशिया युक्रेन संघर्ष दिवस 151 वा : 'जगभरातल्या अन्नधान्य टंचाईला रशिया जबाबदार नाही'
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लारोव्ह सध्या इजिप्तच्या दौऱ्यावर आहेत. तिथे बोलताना त्यांनी रशियामुळे जगात अन्नधान्याची टंचाई होतेय हे दावे फेटाळून लावले.

फोटो स्रोत, RUSSIAN FOREIGN MINISTRY/EPA
रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाने युक्रेनच्या काही बंदरांवर ताबा मिळवला आणि युक्रेनच्या सागरी मार्गांची कोंडी केली. युक्रेनकडून अरब राष्ट्र आणि आफ्रिकेत जाणारं कित्येक लाख टन धान्य या बंदरावर अडकून पडलं आहे.
त्यामुळेच जगभरातून आरोप होतोय की रशियामुळे जगात अन्नधान्याचा तुटवडा जाणवतोय.
कैरोत अरब प्रतिनिधींच्या सभेत बोलताना सर्गेई लारोव्ह म्हणाले की, "या युद्धामुळे जगाच्या अन्नधान्याच्या साखळीवर कसा परिणाम झालाय याबद्दल पाश्चिमात्य देश सत्य सांगत नाहीयेत तर सत्याची मोडतोड केली जातेय."
पाश्चिमात्य देश इतरांना नियंत्रणात आणू पाहात आहेत असा आरोपही त्यांनी केला.
"त्यांना सोयीचं ठरणाऱ्या धोरणालाच ते पाठिंबा देतात, भले प्रत्यक्षात परिस्थिती काहीही असो," सर्गेई म्हणाले.
रशिया युक्रेन संघर्ष दिवस 150 वा : रशिया 'रानटीपणा' करत असल्याची झेलेन्स्कींची टीका
युक्रेनमधील ओडेसा शहरावर रशियानं मिसाईल डागल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की संतापले आहेत. रशिया 'रानटीपणा' करत असल्याची टीका झेलेन्स्कींनी केलीय.
रशियानं या मिसाईल हल्ल्यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नाहीय.

फोटो स्रोत, Getty Images
रशियाच्या हल्ल्यानंतर खाद्यवस्तूंच्या किंमती वाढत आहेत. ओडेसामध्ये जवळपास 2 कोटी टन धान्य पडून आहे.
या पार्श्वभूमीवर रशिया-युक्रेनमध्ये या धान्यासंबंधी करार होऊ घातला होता. या करारानंतर युक्रेन धान्य निर्यात करू शकणार होता. या करारासाठी तुर्कस्थानने प्रयत्न केले आहेत.
मात्र, रशियाच्या मिसाईल हल्ल्यानंतर हा करार सुद्धा बारगळण्याच्या स्थितीत पोहोचलाय.
रशिया युक्रेन संघर्ष दिवस 148 वा : युक्रेन आणि रशियामध्ये 'या' विषयावर सहमती
युक्रेन आणि रशियामध्ये एका महत्त्वाच्या विषयावर सहमती झाली आहे. या निर्णयानुसार युक्रेन आता काळ्या समुद्राद्वारे धान्य निर्यात करू शकणार आहे.

फोटो स्रोत, EPA
या करारासाठी तुर्कस्थानने प्रयत्न केले आहेत. त्यावर आज 22 जुलै रोजी तुर्कस्थानात इस्तंबूल येथे युक्रेन, रशिया, तुर्कस्थान आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस स्वाक्षरी करतील.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून जगभरात युक्रेनधून येणाऱ्या धान्यात कपात झाली. यामुळे जगात खाद्यसंकट निर्माण झालं.
रशियाच्या हल्ल्यानंतर खाद्यवस्तूंच्या किंमती वाढत आहेत. ओडेसामध्ये जवळपास 2 कोटी टन धान्य पडून आहे. या करारानंतर युक्रेन धान्य निर्यात करू शकेल.
रशिया युक्रेन संघर्ष दिवस 147 वा : युक्रेनवरील आक्रमण आणखी तीव्र करणार - लाव्हरोव्ह
केवळ युक्रेनच्या फक्त पूर्व भागावर कब्जा मिळवणं, असं रशियाचं धोरण राहिलेलं नसून आगामी काळात युक्रेन सैन्याचा आम्ही कडवा प्रतिकार करणार आहोत, असा इशारा रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी दिला आहे.
रशियाच्या सरकारी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सर्गेई म्हणाले, "पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला सातत्याने लांब पल्ल्याच्या शस्त्रास्त्रांचा पुरवठा होत आहे. त्यामुळे रशियाने आपलं युक्रेनसंदर्भातील धोरण बदललं आहे. स्वयंसंरक्षणाच्या दृष्टीने युक्रेनच्या सैन्याविरुद्ध आघाडी घेऊन कडवा प्रतिकार करण्याची आम्हाला आवश्यकता आहे."
रशिया युक्रेन संघर्ष दिवस 146 वा : रशिया युक्रेनच्या भूमीवर क्रायमियाप्रमाणेच कब्जा करू पाहातोय- अमेरिका
क्रायमियाप्रमाणे रशिया आता युक्रेनच्या भूमीवर आक्रमण करू पाहातोय असे अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले आहे.
रशियाने 2014 साली क्रायमियामध्ये सार्वमत चाचणी घेऊन ताबा घेतला होता. मात्र ते बेकायदेशीर असल्याचं म्हटलं गेलं.

फोटो स्रोत, Getty Images
युक्रेनमध्ये बळकावलेल्या प्रदेशाचा कारभार करण्यासाठी तसेच तो भाग रशियात समाविष्ट होण्याच्या दृष्टीने सार्वमताचे आयोजन करण्यासाठी रशियाच्या बाजूने झुकलेल्या अधिकाऱ्यांची बेकायदेशीररित्या नेमणूक केली जात आहे असं किर्बी म्हणाले.
त्याच्या निकालाचा वापर रशिया युक्रेनच्या सार्वभौम प्रदेशावर हक्क सांगण्यासाठी करेल असं किर्बी म्हणाले.
रशिया युक्रेन संघर्ष दिवस 144 वा : युक्रेनच्या गुप्तहेर खात्याच्या प्रमुखाचं झेलेन्स्कीनं केलं निलंबन
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिरी झेलेन्स्की यांनी गुप्तहेरगिरी यंत्रणेचे (Spy Agency) प्रमुख आणि महाधिकवक्त्यांचं निलंबन केलंय. देशद्रोहाचा आरोप करत झेलेन्स्कींनी ही कारवाई केलीय.
युक्रेनच्या रशियान-प्रशासित भागात 60 हून अधिक कर्मचारी हे युक्रेनविरोधात काम करत असल्याचा ठपका झेलेन्स्कींनी ठेवलाय.
देशातील महत्त्वाच्या दोन संस्थांच्या प्रमुखांकडून अशा प्रकारचा गुन्हा गंभीर असून, यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो, असं झेलेन्स्की म्हणाले.
रशिया युक्रेन संघर्ष दिवस 143वा: अंतराळ प्रकल्पावर हल्ला
रशियन लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्रांनी युक्रेनच्या मध्यवर्ती शहर डनिप्रोमध्ये स्पेस रॉकेट प्लॅंट आणि जवळच्या रस्त्यावर तीन जण ठार झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तर याच हल्ल्यामध्ये सुमारे 15 लोक जखमी झाले असून जवळपासच्या निवासी इमारतींचेही नुकसान झाले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
डॅनिप्रोचा युझमॅश प्लांटमध्ये उपग्रह देखील तयार केले जातात. त्यातील एक एलॉन मस्कच्या स्पेसएक्स या कंपनीने अवकाशात सोडला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, कारखान्यामध्ये युक्रेनियन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे भाग बनवले जायचे.
डॅनिप्रोच्या दक्षिणेस निकोपोल येथे डझनभर रशियन रॉकेट डागण्यात आल्याने त्या ठिकाणी अजून दोन लोक मरण पावले, असे स्थानिक नेत्याने सांगितले. उत्तरेकडील भागात खार्किव शहराजवळील चुहुइव्ह या गावात रशियन रॉकेटने रात्रभर निवासी भागावर हल्ला केला, ज्यात तीन लोक ठार झाले, असे खार्किवच्या गव्हर्नरने सांगितले.
रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 140 वा : एक रशियन आई घेतेय आपल्या बेपत्ता सैनिक मुलाचा शोध
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर बराच काळ लोटला आहे. हजारो युक्रेनी लोकांचे प्राण गेलेत, मालमत्तेची अतोनात हानी झाली आहे.
पण जे रशियन सैनिक हे युद्ध लढताहेत, त्यांच्या घरच्यांना काय वाटतं? आम्ही अशाच एका आईशी बोललो, जिचा मुलगा युद्धात बेपत्ता झालाय. या आईला वाटतं की हे युद्ध थांबायला हवं. रशियाने युक्रेनमधून माघार घ्यायला हवी.
त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची ओळख इथे जाहीर केलेली नाही.
वाल्या (बदललेलं नाव) या महिलेचा सैन्यात असणारा मुलगा मार्चपासून बेपत्ता आहे. म्हणजे रशियन सैन्याने तशी अधिकृत घोषण केलेली नाही पण या मुलाने मार्चपासून घरी फोन केलेला नाही.
त्याचं आणि त्याच्या आईचं शेवटचं बोलणं फेब्रुवारी महिन्यात झालं होतं.
वाल्या म्हणतात, "मार्च महिन्याच्या सुरुवातीला एका सार्जंटचा मला फोन आला. त्याने कदाचित सगळ्यांच पालकांना फोन केले असावेत. तो म्हणाला की मुलं व्यवस्थित आहेत. सुरक्षित आहेत, आमचा त्यांच्याशी रोज संपर्क होतो. संपूर्ण मार्च महिन्यात माझं त्या सार्जंटशी अनेकदा बोलणं झालं."
पण त्यानंतर वाल्याला त्याच्या मुलाचा मित्र म्हणणाऱ्या एका माणसाचा मेसेज आला. वाल्या त्याला ओळखत नव्हत्या. या माणसाने त्यांना सोशल मीडियावर शोधून काढलं आणि मेसेजमध्ये लिहिलं की त्यांच्या मुलाचा पाय बॉम्बस्फोटात निकामी झाला आणि तो मृत्यूमुखी पडला.
यानंतर वाल्या सैन्याधिकाऱ्यांकडे गेल्या, त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, अनेक फोन लावले, पत्रव्यवहार केला पण त्यांच्या पदरी निराशाच पडली.

शेवटी ज्या सार्जंटशी मी बोलत होते त्यांनी मला सांगितलं की, "तुमच्या मुलाशी आमचा शेवटचा संपर्क 23 फेब्रुवारीला झालाय."
म्हणजे महिनाभर ते वाल्याशी खोटं बोलत होते.
त्यांनी खूप पाठपुरावा केला तरी त्यांच्या मुलाच्या बेपत्ता होण्याबद्दल काहीच कळलं नाही. त्यांना इतकंच सांगण्यात आलं की तुमचा मुलगा 'स्पेशल ऑपरेशन्सचा' भाग होता आणि आता तो बेपत्ता आहे.'
रशिया-युक्रेन युद्धात रशियाचे किती सैनिक मारले गेलेत? सत्य परिस्थिती कोणालाच माहिती नाहीये. सरकारी आकड्यांपेक्षा वेगळे आकडे देणं रशियात मोठा गुन्हा आहे. आणि रशियन सरकारने 25 मार्चनंतर त्यांचे अधिकृत आकडे जाहीर केलेले नाहीत.
वाल्या म्हणतात, "आम्ही गरीब आहोत. या युद्धात आमची मुलं लढत आहेत, आमची मुलं मारली जात आहेत. मॉस्कोतल्या बड्या अधिकाऱ्यांची मुलं घरात सुरक्षित आहेत."
"किती आयांनी आपली मुलं गमावलीत. या सगळ्या आया एकत्र आल्या तर मॉस्कोला जड जाईल. आमच्या मुलांचं आयुष्य वाचवण्यासाठी ही लढाई थांबवा."
रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 139 वा : 'मला लढायचं होतं, त्यांनी मला गायला सांगितलं'
युक्रेनचे रॉक गायक स्लाव्हा वाकारचूक म्हणतात, 'आपल्याला राग आला पाहिजे.'

स्लाव्हा वाकारचूक युक्रेनच्या सर्वात प्रसिद्ध रॉक बँडचे मुख्य गायक आहेत. जेव्हा रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू झालं तेव्हा त्यांनी गाणं सोडून सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज केला. पण सैन्याने त्यांना सांगितलं की तुम्ही लढू नका, गा.
स्लाव्हा याचा रॉकबँड रशिया आणि आधी सोव्हियत युनियनचा भाग असणाऱ्या देशांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. ते कायम युक्रेनियन भाषेत गाणी गातात.
त्यांचं एक जुनं गाणं, 'बोझू' फारच प्रसिद्ध आहे. ज्याचे ',संपूर्ण शक्तीनिशी लढल्याशिवाय शरणागती पत्कारू नका' असे काहीसे बोल आहेत. हे गाणं सध्याच्या काळात युक्रेनचं अनधिकृत राष्ट्रगीत बनलं आहे.
त्यांचा बँड ओशन इल्झी सध्या जगभरात दौर करत त्यांच्या फॅन्सच्या मनात युक्रेन युद्ध जागवत ठेवत आहेत.
रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 138 वा : रशियाला लढाऊ ड्रोन्स देणार इराण, अमेरिकेने दिला इशारा
रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 138 वा : रशियाला लढाऊ ड्रोन्स देणार इराण, अमेरिकेने दिला इशारा
कित्येक महिने चाललेल्या या युद्धासाठी इराणने रशियाला लढाऊ ड्रोन्स देण्याचा इरादा जाहीर केला आहे. इराण शेकडो असे ड्रोन्स मॉस्कोला देणार आहे असं एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
व्हाईट हाऊस नॅशनल सिक्युरिटी सल्लागार जेक सलिव्हन यांनी म्हटलं की अमेरिकेकडे आलेल्या माहितीनुसार इराण रशियन सैन्याला हे ड्रोन्स कसे वापरायचे याचं ट्रेनिंगही देणार आहे.
पण हे ड्रोन्स रशियाला पोहचले आहेत की नाही याबदद्ल स्पष्टता नाही असंही ते म्हणाले.
इराणने म्हटलं की रशियासोबत तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्याचं आमचं युद्धापूर्वीपासून आहे. असं म्हणताना त्यांनी रशियाला इराण लढाऊ ड्रोन्स देणार आहे याला ना दुजोरा दिला ना याचा इन्कार केला.
दोन्ही बाजुंकडून वापरल्या गेलेल्या ड्रोन्सनी या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 137 वा : 'रशियन रॉकेट्समुळे 15 लोकांचा मृत्यू'
पूर्व युक्रेनच्या चासिव यार या शहरातल्या एका रहिवासी कॉम्ल्पेक्सवर झालेल्या रॉकेट हल्लयात 15 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 20 लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले असण्याची शक्यता आहे, अशी माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली.

फोटो स्रोत, PAVLO KYRYLENKO/REUTERS
ढिगाऱ्याखाली दबलेल्या काही लोकांना जिवंत बाहेर काढण्यात आलेलं आहे. मृतांचा आकडा युक्रेनच्या बचावकार्य मोहिमेतल्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
या पाच मजली इमारतीची एक बाजू पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. चासिव यार हे शहर दोनेत्स्क भागात आहे. याच भागावर रशियाला पूर्ण नियंत्रण मिळवायचं आहे.
या भागाचे गव्हर्नर पावलो किरिलेंको म्हणाले की रशियाच्या उरगान रॉकेट्सनी या इमारतीवर हल्ला झालेला आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांचं म्हणणं आहे की रहिवासी इमारतींवर रशिया मुद्दाम हल्ले करतंय.
"प्रत्येक रशियन खून्याला शिक्षा होईल," असं आपल्या व्हीडिओत झेलेन्स्की म्हणताना दिसत आहेत.
रशिया-युक्रेन संघर्षासंदर्भातले सर्व जुने अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लीक करा.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








