पुतिन परदेश दौऱ्यावर असताना खरंच त्यांची विष्ठा पॅक करून रशियात आणली जाते?

पुतीन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

गेल्या महिन्यात बीबीसीच्या एका माजी पत्रकाराचं ट्वीट व्हायरल झालं होतं. त्यामुळे जगात सगळ्यांच्याच भुवया आश्चर्याने उंचावल्या गेल्या.

आधी ते ट्वीट काय होते ते पाहू.

बीबीसीच्या माजी पत्रकार फरिदा रुस्तमनोवा मॉस्कोत पत्रकारिता करतात आणि तिथल्या लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत.

त्यांनी सविस्तर ट्वीट करत या प्रकरणाबद्दल माहिती दिली.

त्या लिहितात, "अनेक पत्रकारांचं म्हणणं आहे की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन जेव्हा परराष्ट्र दौऱ्यावर असतात तेव्हा एक खास पोर्टेबल टॉयलेट सोबत ठेवतात. पुतिन यांचे अंगरक्षक या पोर्टेबल टॉयलेटमधली त्यांची विष्ठा गोळा करून एका बॉक्समध्ये पॅक करतात आणि ती पुन्हा मॉस्कोला पाठवली जाते. माझ्यानुमते ही पद्धत थोडी वेगळी आहे."

पुढच्या ट्वीटमध्ये त्यांनी अमेरिकन अभिनेत्री ज्युलिया लुईस-ड्रेफस यांच्या एका मुलाखतीतला संदर्भ दिला आहे. एका मुलाखतीत या अभिनेत्रीने म्हटलं होतं की त्या, "व्हिएन्नाच्या एका संग्रहालयात गेल्या होत्या आणि त्याच्या काही तास आधी तिथे व्लादिमीर पुतिन यांनी भेट दिली होती. ज्युलिया म्हणाल्या की तिथल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की पुतिन स्वतःचं एक पोर्टेबल टॉयलेट सोबत घेऊन फिरतात. म्हणजे समजा त्यांना वॉशरूम वापरायचं असेल तर ते स्वतः सोबत आणलेल्या टॉयलेटमध्येच जातात."

ऐकून विचित्र वाटतंय ना?

पण फरिदा याचं सविस्तर विश्लेषण करतात. पुतिन यांच्या जवळच्या काही सूत्रांनी आपल्याला ही माहिती दिल्याचा त्या दावा करतात.

त्या म्हणतात, "परदेशात जाताना आपलं टॉयलेट सोबत नेण्याची प्रथा पुतिन यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी सुरू केली. खरंतर सत्तेत आले तेव्हापासूनच ते असं करतात. रशियातल्या रशियात फिरताना जर पुतिन यांनी दुसरं वॉशरूम वापरलं तर ते संपूर्ण स्वच्छ करण्याचं स्वातंत्र्य गार्ड्स घेऊ शकतात, ते कितीही वेळ तिथे थांबू शकतात. पण परदेशात त्यांना असं करता येत नाही."

बीबीसीच्याच जोनाह फिशर यांना पुतिन यांच्या 2019 सालच्या फ्रान्स दौऱ्याचा एक व्हीडिओ शेअर करत म्हटलं होतं, "मला इथे सहा गार्ड पुतिन यांच्यासोबत टॉयलेटपर्यंत जाताना दिसत आहेत."

पुतिन यांच्याबाबतीत असंही म्हटलं जातं की परदेशी असताना कोणत्याही कपातून पुतिन यांनी काहीही प्यायलं तर त्यांचे सुरक्षारक्षक तो कप कोणाच्याही हातात जाणार नाही याची काळजी घेतात.

तो एकतर स्वच्छ पुसला जातो, त्यावरच्या हाताच्या खुणा, बोटांचे ठसे पुसले जातात किंवा सरळ तो कप ताब्यात घेतला जातो.

पण गेल्या काही वर्षांत तर पुतिन स्वतःचाच कप घेऊन सगळीकडे फिरत असतात. 2019 साली झालेल्या G-8 परिषदेच्या जेवण समारंभाच्या टेबलवरही ते स्वतःचाच थर्मास कप घेऊन बसलेले दिसले होते.

रशियातल्या दोन वरिष्ठ पत्रकारांनी फ्रेंच मासिक पॅरिस मॅचशी बोलताना म्हटलं होतं की, पुतिन यांचे सुरक्षारक्षक त्यांची विष्ठा, मलमूत्र एका विशिष्ट खोक्यात पॅक करतात आणि ते रशियाला पाठवतात. पण जेव्हा शक्य असेल तेव्हा त्यांची विष्ठा, मलमुत्र आहे त्याच देशाच नष्ट करण्याची जबाबदारी या लोकांची असते.

आता तुम्ही म्हणाल हा काय वेडेपणा. त्याआधी एक प्रश्न... समजा तुम्ही आजारी पडलात, शुगर वाढली किंवा आणखी काय त्रास होतोय तर डॉक्टर काय सांगतात? रक्त-लघवी तपासून घ्या. हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर.

विष्ठा किंवा मुत्राच्या तपासणीतून एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल, शारिरीक क्षमतेबद्दल, अगदी आजारीपणाबद्दल अनेक गोष्टी कळतात.

परदेशी गेल्यावर तिथले गुप्तहेर आपल्या मलमुत्रच्या चाचण्या करून आपल्या संबंधी माहिती मिळवतील हेच पुतिन यांना नको आहे.

पुतीन

फोटो स्रोत, Reuters

आणि म्हणूनच त्यांच्या मलमुत्राला कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात येतं. आपल्या शरीरातल्या जैविक गोष्टीं, जसं की रक्त, लाळ, मल, मूत्र, मधून डीएनएही मिळवता येतो. या डीएनएच्या आधारावर त्या व्यक्तीला आता असणारे आजार तर कळतातच, पण ते कोणती औषधं घेतात, त्यांना कोणती व्यसन आहेत, त्यांना भविष्यात होऊ शकणारे आजार, त्यांचे लांबचे नातेवाईक, इतकंच काय विवाहबाह्य संबंधातून झालेली मुलं अशी सगळी माहिती शोधता येते.

ही माहिती मग त्या नेत्याला ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा त्या नेत्यावर दबाव टाकण्यासाठी वापरता येऊ शकते. त्यामुळे जागतिक स्तरावरचे सगळेच मोठे नेते आपल्या जैविक गोष्टी इतर देशातल्या गुप्तहेरांच्या ताब्यात जाणार नाहीत यासाठी प्रयत्नशील असतात.

पुतिन यांच्या आजारपणाच्या चर्चा

आपली निरोगी जीवनशैली आणि वेगवेगळ्या खेळांबद्दल असणारी आवड यासाठी व्लादिमीर पुतिन ओळखले जातात. त्यांच्या आरोग्यासंबंधीच्या अफवा अनेकदा उठतात. गेल्या काही काळापासून अनेकदा अधूनमधून त्यांच्या तब्येतीसंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात.

याच वर्षी मे महिन्यात त्यांना कॅन्सर असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी त्यासंबंधी स्पष्टीकरण दिलं होतं.

एका फ्रेंच टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सर्गेई लावरोव यांनी म्हटलं की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष दररोज सार्वजनिक कार्यक्रमात दिसतात आणि कोणालाही त्यांच्याकडे पाहताना आजारपणाचं कोणतंही लक्षण दिसणार नाही.

"एखादी व्यक्ती कशी दिसतीये हे पाहण्या-समजण्याची संधी रोज मिळते. तरीही जे लोक या अफवा पसरवत आहेत, त्यांच्या सारासार विवेकबुद्धीवर मी इतर गोष्टी सोडून देतो."

पुतिन गंभीर आजारी आहेत असा दावा करणाऱ्या बातम्या ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्याने अनेक माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या.

पुतीन यांचं मानसिक आरोग्य

बीबीसीचे सुरक्षाविषयक प्रतिनिधी गॉर्डन कोरेरा यांनी आपल्या लेखात पुतिन यांच्या मनात काय चाललं आहे यांच सविस्त वर्णन केलं होतं.

रशियन राष्ट्राध्यक्ष वेडसर झाले आहेत का? हा प्रश्न पाश्चात्त्य राष्ट्रांमधील अनेकांनी विचारला आहे. पण अशा प्रश्नातून फार काही साध्य होईल, असं बहुतेकांना वाटत नाही. याबाबतीत काही गृहित धरणं चुकीचं होईल, कारण युक्रेनवर आक्रमण करण्यासारखा निर्णय घेणारा माणूस 'वेडा' आहे असं मानून आपल्याला या निर्णयाचा अर्थ लावता येणार नाही, असं एक मानसशास्त्रज्ञ म्हणतात.

सीआयएच्या एका विभागातले सदस्य परदेशी निर्णयकर्त्या मंडळींचं 'नेतृत्वविषयक विश्लेषण' करतात. हिटलरच्या मानसिकतेचा अंदाज बांधण्यापासून ही परंपरा सुरू झालेली आहे. हे लोक संबंधित नेत्याची पार्श्वभूमी, नातेसंबंध आणि आरोग्य इत्यादी पैलूंचा गोपनीय गुप्तचर माहितीच्या आधारे अभ्यास करतात.

पुतीन

फोटो स्रोत, Getty Images

इतर काही जण मानसिक घटकांकडे लक्ष वेधतात- रशियाच्या संरक्षणासाठी किंवा रशियाची थोरवी पुन्हा प्राप्त करण्यासाठी नियतीने आपल्यावर सोपवलेली कामगिरी पूर्ण करायला आता पुरेसा वेळ नसल्याचं जाणवल्यामुळे पुतिन अस्वस्थ असावेत, असा अंदाजही बांधला जातो. कोव्हिडच्या जागतिक साथीदरम्यान पुतिन यांनी स्वतःला इतरांपासून पूर्णतः तोडून घेतलं होतं.

"पुतिन मनोरुग्ण असण्याची शक्यता फारशी नाही किंवा ते बदललेसुद्धा नसावेत. पण या वेळी त्यांना घाई जास्त आहे आणि बहुधा अलीकडच्या वर्षांमध्ये ते अधिक एकटे पडले असावेत," असं अमेरिकी सरकारचे माजी फिजिशियन आणि मुत्सद्दी केन डेक्लेव्हा यांनी म्हटलं आहे. सध्या ते जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश फाउंडेशन फॉर यू.एस.-चायना रिलेशन्स या संस्थेत सिनिअर फेलो म्हणून कार्यरत आहेत.

मॅडमॅन थिअरी

आपण धोकादायक वा अविवेकी आहोत, अशी प्रतिमा स्वतः पुतीन जोपासताना दिसतात (याला इंग्रजीत मॅडमॅन थिअरी असं संबोधलं जातं). अण्वास्त्रांचा वापर झाल्याने सर्वच नष्ट होण्याची शक्यता असली, तरी आपण या अस्त्रांचा वापर करण्याइतके वेडसर आहोत, अशी प्रतिस्पर्ध्याची खात्री पटवून देण्याचा प्रयत्न अण्वास्त्रसज्ज देशाचा नेता करतो, तेव्हा 'मॅडमॅन थिअरी' लागू पडते.

पुतीन यांचे हेतू आणि मनस्थिती समजून घेणं हे पाश्चात्त्य गुप्तहेरांसाठी आणि धोरणकर्त्यांसाठी आज सर्वांत महत्त्वाचं आहे. धोकादायक प्रतिक्रिया उद्भवणार नाही याची काळजी घेत पुतीन यांच्यावर किती आणि दबाव वाढवता येईल, हे ठरवण्यासाठी त्यांच्या मनस्थितीचा तसंच आरोग्याचा अंदाज असणं खूप महत्त्वाचं आहे.

आणि याची कल्पना आहे म्हणूनच पुतीन आपली विष्ठाही त्यांच्या हाती लागू देत नाहीत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)