व्लादिमीर पुतिन यांच्या मृत्यूच्या बातम्यांमध्ये किती तथ्य? रशिया सरकार म्हणतं...

फोटो स्रोत, Getty Images
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या तब्येतीसंदर्भात अनेक उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होत असतानाच रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनीच आता त्यासंबंधी स्पष्टीकरण दिलं आहे.
पुतिन यांच्या तब्येतीसंदर्भात येत असलेल्या सर्व गोष्टी अफवा असल्याचं सर्गेई यांनी म्हटलं आहे.
एका फ्रेंच टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सर्गेई लावरोव यांनी म्हटलं की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष दररोज सार्वजनिक कार्यक्रमात दिसतात आणि कोणालाही त्यांच्याकडे पाहताना आजारपणाचं कोणतंही लक्षण दिसणार नाही.
काही माध्यमांमध्ये 70 वर्षीय पुतिन आजारी असून त्यांना कॅन्सर झालेला असू शकतो, अशाप्रकारच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत.
युक्रेनमधील डोनबास क्षेत्रात रशियाची आगेकूच होत असल्याच्या बातम्या येत असतानाच सर्गेई लावरोव यांनी ही मुलाखत दिली आहे.
सर्गेई लावरोव यांनी सांगितलं की, पूर्व भागाचं स्वातंत्र्य ही रशियाची प्राथमिकता आहे. त्यावर आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही.
पुतिन प्रशासनाचा जुना दावा
युक्रेनमध्ये रशिया नव नाझीवादी हुकूमशाहीविरोधात लढत आहे, याच आपल्या जुन्या दाव्याचा लावरोव यांनी आपल्या मुलाखतीत पुनरुच्चार केला.
राष्ट्राध्यक्ष पुतिन नियमितपणे सार्वजनिकरित्या दिसतात हे सांगताना लावरोव यांनी फ्रेंच टीव्हीसोबत बोलताना म्हटलं, "कोणत्याही सूज्ञ व्यक्तीला पुतिन यांच्यामध्ये कोणत्याही आजाराचं लक्षण दिसत असेल असं मला वाटत नाही."
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनानुसार त्यांनी सांगितलं की, तुम्ही पुतिन यांना स्क्रीनवर पाहू शकता. त्यांची भाषणं ऐकू आणि वाचू शकता.
"एखादी व्यक्ती कशी दिसतीये हे पाहण्या-समजण्याची संधी रोज मिळते. तरीही जे लोक या अफवा पसरवत आहेत, त्यांच्या सारासार विवेकबुद्धीवर मी इतर गोष्टी सोडून देतो."
पुतिन गंभीर आजारी आहेत असा दावा करणाऱ्या बातम्या ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्याने अनेक माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या.

फोटो स्रोत, Reuters
आपली निरोगी जीवनशैली आणि वेगवेगळ्या खेळांबद्दल रुचीसाठी ओळखल्या जाणाऱ्या व्लादिमीर पुतिन यांच्या आरोग्यासंबंधीच्या अफवा या आजच्या नाहीयेत. गेल्या काही काळापासून अनेकदा अधूनमधून त्यांच्या तब्येतीसंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या.
युक्रेनविरुद्धच्या युद्धात किती जीवितहानी झालीये या प्रश्नाचं उत्तर देताना रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलं की, जितकं शक्य आहे तितकं नागरी ठिकाणांवर हल्ले न करण्यासंबंधीचे सक्त आदेश रशियन सैनिकांना देण्यात आले आहेत.
रशियाच्या बॉम्ब हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झालेल्या युक्रेनमधील शहरांचे अनेक फोटो प्रसिद्ध होत आहेत. 24 फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ला केला.
संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टनुसार युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 4,031 नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि जवळपास 4735 लोक जखमी झाले आहेत.
1 कोटी 40 लाख लोक बेघर झाले आहेत. अनेक घरं आणि शहरं उद्ध्वस्त झाली असून तिथे केवळ इमारतींचे ढिगारे दिसत आहेत.
युद्धात नेमक्या किती सैनिकांनी प्राण गमावले याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाहीये.
डोनबास भागात तीव्र संघर्ष सुरू आहे. डोनेट्स्क आणि लुहान्स्क भागातील हे शहर खाणकामासाठी ओळखलं जातं. या दोन्ही भागांत सक्रीय असलेल्या फुटीरतावाद्यांचं रशियासोबत जुनं नातं आहे. 2014 मध्ये हे लोक युक्रेनपासून वेगळे झाले होते आणि आपल्या वर्चस्वासाठी रशियन सैनिकांसोबत मिळून लढत होते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








