पुतिन स्वत:ची तुलना 18 व्या शतकातील झारशी का करतात?

फोटो स्रोत, UNIVERSAL HISTORY ARCHIVE/GETTY IMAGES
- Author, सारा रेन्सफर्ड
- Role, पूर्व यूरोप प्रतिनिधी
18 व्या शतकात रशियाचा जो झार होऊन गेला त्याचं व्लादिमीर पुतिन यांना कौतुक वाटतं, हे जगजाहीर आहेच. पण आता पुतिन सुद्धा स्वत:ला झारप्रमाणे महान समजू लागलेत.
ते आता स्वतःची तुलना रशियन साम्राज्याच्या झार, पीटर द ग्रेटशी करताना दिसतात. पुतिन यांनी तीन शतकांपूर्वी झालेल्या पीटरच्या विस्तारवादी युद्धांची तुलना रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाशी केली आहे. एकप्रकारे पुतिन यांनी कबूल केलंय की, त्यांनी पुकारलेलं हे युद्धही जमिनीसाठीचं आहे.
पुतिन यांच्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षेमुळे युक्रेनचं नुकसान तर झालंच आहे. पण एस्टोनियासारखे शेजारी देश सुद्धा रशियावर नाराज झाले आहेत. पुतिन यांनी केलेलं हे वक्तव्य कोणत्याही परिस्थितीत मान्य करता येण्याजोगं नाही असं एस्टोनियाने म्हटलंय.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युवा वैज्ञानिक आणि उद्योजकांच्या भेटीदरम्यान हे वक्तव्य केलं होतं.
माहिती प्रसारण आणि तंत्रज्ञानाच्या यशाबद्दल बोलण्यापूर्वी पुतिन राजकारण आणि सत्तेबद्दल बोलले. जागतिक प्रभाव निर्माण करण्यासाठी जे नवीन संघर्ष सुरू आहेत त्यावर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. समोर बसलेल्या काही निवडक लोकांसमोर बोलताना ते म्हणाले की, पीटर द ग्रेट हे एक अनुकरणीय व्यक्तिमत्त्व आहे आणि त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर आपण चाललं पाहिजे.
पीटरने कोणत्याही भूभागावर आक्रमण केलं नाही
पुतिन म्हणाले, "तुम्ही विचार करत असाल की ते स्वीडनशी लढत होते, त्यांच्या जमिनी ताब्यात घेत होते." 18 व्या शतकात उत्तरेकडे जी युद्ध झाली त्या संदर्भात पुतिन बोलत होते. 18 व्या शतकाच्या सुरुवातीला पीटर द ग्रेट रशियन साम्राज्याची स्थापना करत असताना ही युद्ध झाली.
यावर युक्तिवाद करताना पुतिन म्हणाले की, "त्यांनी कोणत्याही भूभागावर आक्रमण केलं नाही, तर त्यांनी तो भूभाग पुन्हा ताब्यात घेतला." या भागात शतकानुशतके गुलाम राहत असल्याचा युक्तिवाद ही पुतिन यांनी यावेळी केला.
पुतिन म्हणाले, "आता हे पुन्हा मिळवण्याची जबाबदारी आमच्यावर येऊन पडली आहे असं वाटतं." पुतिन यांच्या या वक्तव्यानंतर ते हे सर्व युक्रेनच्या संदर्भात बोलत होते यात कोणतीच शंका उरली नाही. त्यांनी यावेळी युक्रेनबाबत त्यांचे मनसुबेही जाहीर केले.
पुतिन म्हणाले की, "जेव्हा रशियाचा विस्तार झाला तेव्हाच ते साम्राज्य मजबूत झालं. पीटरची राजवट याचं मूर्तिमंत उदाहरण आहे."
पुतिन इतिहासात डोकावत आहेत
अलीकडच्या काही दिवसांत पुतिन रशियाच्या इतिहासाबद्दल बरंच काही बोललेत. अगदी सावधगिरी बाळगून ते फक्त अशाच गोष्टी सांगतात ज्यामुळे त्यांचे आत्ताचे उद्देश पूर्ण होतील.
युक्रेनवर हल्ला करण्याच्या काही महिने आधी त्यांनी एक लांबलचक निबंध लिहिला होता. त्यात त्यांनी युक्रेनच्या अस्तित्वाला कोणताच ऐतिहासिक आधार नसल्याचा युक्तिवाद केला होता.
24 फेब्रुवारीला जेव्हा रशियाने शेजारच्या युक्रेनवर हल्ला चढवला त्यावेळी पुतिन खोटं बोलले. त्यांनी या हल्ल्याला रशियन सैन्याचं विशेष अभियान असल्याचं म्हटलं.
रशियन सैन्याची ही कारवाई डोनबास प्रदेशापुरतीचं मर्यादित असेल. रशियाच्या सुरक्षिततेसाठी या भागांचं नाझी-नि:शस्त्रीकरण करणं हा आमचा उद्देश असल्याचं पुतिन म्हटले होते.

फोटो स्रोत, EPA
पण पुतिन जेव्हा त्यांचा उद्देश सांगत होते अगदी तेव्हाच त्यांच्या सैन्याने युक्रेनची राजधानी कीव्हला वेढा दिला. युक्रेनच्या पश्चिमेकडील भागांमध्ये घुसखोरी केली. युद्ध सुरू होऊन शंभर दिवस लोटले. आता युक्रेनचा जवळपास 20 टक्के भाग रशियाच्या ताब्यात आहे.
हा भाग रशियामध्ये विलीन व्हावा यासाठी जे सार्वमत घ्यावं लागेल त्यासाठी रशियाने त्या भागात नावाला प्रशासन स्थापन केलंय.
आता मात्र पुतिन रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाबाबत उघडपणे बोलू लागलेत. ते सांगतात, खरं तर हे लष्करी ऑपरेशनपेक्षा भूभागावरील आक्रमण जास्त होतं.
रशियन सैनिक आपल्या जमिनीसाठी ही लढाई लढत आहेत हे सत्य पाश्चात्य देश कधीतरी स्वीकारतील असा पुतिन यांना विश्वास आहे.
पुतिन म्हणाले, "ज्या भूमीवर पीटरने रशियाची नवी राजधानी सेंट पीटर्सबर्ग स्थापन केली, त्या भूमीवर रशियाचा हक्क आहे हे त्यावेळच्या कोणत्याही युरोपीय देशाने मान्य केलं नव्हतं. आता मात्र त्यांची मान्यता आहे."
पुतिन यांच्या या वक्तव्याने बाल्टिक देशही हादरले आहेत. पीटर द ग्रेटच्या नार्वावरील हल्ल्याच्या वक्तव्यावर, एस्टोनियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने रशियन राजदूताला बोलावून निषेध नोंदवलाय. रशिया आता आपले प्रदेश परत घेतोय आणि मजबूत करतोय. पण नार्वा एस्टोनियाचा भाग आहे.
मात्र, पुतिन आपल्या सोयीनुसार इतिहासाचा संदर्भ वापरताना दिसत आहेत.
पीटरने ज्ञानाच्या शोधात युरोपची सफर केली
पीटर द ग्रेट जरी निरंकुश हुकूमशहा असला, तरी तो पाश्चात्य कल्पना, विज्ञान आणि संस्कृतीचा महान प्रशंसक होता. त्याने सेंट पीटर्सबर्गची स्थापना 'युरोपसाठी असलेली खिडकी' म्हणून केली.
रशियाला आधुनिकतेकडे नेण्यासाठी पीटरने ज्ञानाच्या शोधात युरोपभर प्रवास केला.

फोटो स्रोत, Getty Images
पुतिन यांच्या वाढत्या दडपशाहीच्या राजवटीने युरोपकडे उघडणारी ही खिडकी हळूहळू बंद होत गेली. आता युक्रेन युद्धाने तर ही खिडकी क्षणार्धात बंद झाली. त्या काळात, झार पीटर द ग्रेटने ज्ञान आणि प्रेरणेसाठी हॉलंड आणि ग्रीनिचला भेटी दिल्या. पण आजच्या काळात पुतिन यांच्याकडून असा प्रवास होणं अशक्यकोटीतली गोष्ट वाटते.
पुतिन जेव्हा युवा वैज्ञानिक आणि तरुण उद्योजकांना 18 व्या शतकातील झारविषयी माहिती देत होते, तेव्हा त्यांच्या मागे तीन शब्द चमकत होते - भविष्य, आत्मविश्वास आणि विजय.
युक्रेन युद्धावरून पाश्चिमात्य देशांनी रशियावर जोरदार टीका केली. रशियावर कठोर निर्बंध लादले. मात्र यावर पुतीन अस्वस्थ न होता निश्चिंत दिसले. रशियाने या निर्बंधांना कोणतीही दाद दिली नाही.
पण, पुतिन यांच्यासाठी इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आणखी एक धडा लिहून ठेवलाय.
शेवटी पीटर द ग्रेटने बाल्टिकपासून काळ्या समुद्रापर्यंतचा प्रदेश ताब्यात घेतला. पण पुढे रशियाला उत्तरेकडील ग्रेट नॉर्दर्न वॉरला तोंड द्यावं लागलं. आणि हे युद्ध जवळपास 21 वर्ष चाललं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








