रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 136 वा : रशियाचा युक्रेनच्या पूर्व-दक्षिण भागावर क्षेपणास्त्रांनी हल्ला

पूर्व युक्रेनमधील सिव्हर्स्क येथील एका इमारतीवर झालेला हल्ला

फोटो स्रोत, Getty Images

युक्रेन-रशिया युद्धाचा आज 136 वा दिवस आहे. गेल्या काही महिन्यात या युद्धात काय काय झालं आणि आज घडतंय याचे अपडेट्स.

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 136 वा : रशियाचा युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागावर क्षेपणास्त्रांनी हल्ला

युक्रेनमधील प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रशियन क्षेपणास्त्र आणि रॉकेट हल्ल्यांमुळे पूर्व आणि दक्षिण युक्रेनमधील शहरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.

डोनेस्टक प्रांतातील सिव्हर्स्क या शहरावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात चार नागरिकांचा मृत्यू झाल्याचं तिथल्या स्थानिक गव्हर्नर पावलो किरिलेन्को यांनी सांगितलंय.

त्याच प्रदेशातील ड्रुझकिव्हका येथील नागरी वसाहतींही या हल्ल्यात बळी पडल्या आहेत. इथलं एक सुपरमार्केट उध्वस्त झालं असून बाजूलाच मोठा खड्डा पडला आहे.

रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला

फोटो स्रोत, AFP

बीबीसीला रशियाने केलेल्या या हल्ल्याच्या तपशीलांची पडताळणी करता आलेली नाही.

उर्वरित डोनेस्टक प्रदेश ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात मागच्या 24 तासांत रशियन भूदलाने जे हल्ले केलेत त्यात मोठी प्रगती झालीय असं सध्या तरी दिसत नाही.

युक्रेनचय्या उत्तरेकडील खारकीव्ह, दक्षिणेकडील मायकोलायव्ह आणि मायकोलायव्हच्या उत्तर-पूर्वेकडील दक्षिणेकडील क्रिवी रिह या भागांवर रशियन क्षेपणास्त्र हल्ले झाल्याची माहिती युक्रेनियन अधिकार्‍यांनी दिली आहे.

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 135 वा : युद्धाचा निषेध केल्यानं रशियन नेत्याला 7 वर्षांचा तुरुंगवास

मॉस्कोचे काऊन्सिलर अलेक्झेई गोरिनोव्ह यांना 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालीय. त्यांचं गुन्हा एवढाच की, त्यांनी युक्रेनमधील रशियाच्या घुसखोरीचा निषेध व्यक्त केला.

रशिया

फोटो स्रोत, NATALIA KOLESNIKOVA/AFP

गोरिनोव्ह हे 60 वर्षांचे आहेत. ते मॉस्को शहराचे काऊन्सिलर आहेत. सिटी काऊन्सिल मिटिंगमध्ये त्यांनी युक्रेनमधील घुसखोरीचा निषेध केला होता. त्यानंतर एप्रिलमध्येच त्यांना अटक करण्यात आलं होतं.

युक्रेनमधील घुसखोरीला युद्ध म्हणण्यास रशियात बंदी आणण्यात आलीय. त्याऐवजी, विशेष लष्करी कारवाई (स्पेशल मिलिटरी ऑपरेशन) म्हणण्याचं व्लादिमीर पुतीन यांनी सांगितलं आहे.

गोरिनोव्ह यांची रशियातल्या नव्या कायद्याअंतर्गत पहिली अटक आहे, असं मानवाधिकार कार्यकर्ते पॉवेल चिकोव्ह यांचं म्हणणं आहे.

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 134 वा : UK चे मावळते पंतप्रधान जॉन्सन यांना झेलेन्स्कींचं अभिवादन

युक्रेनचे पंतप्रधान वोलोदिमीर झोलेन्स्की यांनी यूकेचे मावळते पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना अभिवादन केलं आहे. स्वपक्षातील मंत्र्यांनी एकामागोमाग एक राजीनामे दिल्यानं बोरिस जॉन्सन अखेर यूकेच्या पंतप्रधान पदावरून पायउतार झाले आहेत.

बोरिस जॉन्सन यांनी यूकेच्या पंतप्रधान पदावरून युक्रेनला पाठिंबा दिला, तसंच मदतही केली, त्यामुळे झेलेन्स्कींनी त्यांचे आभार मानत अभिवादन केलं.

झेलेन्स्की म्हणाले की, "आम्हाला यात काहीच शंका नाही की, ग्रेट ब्रिटन आम्हाला यापुढेही सहकार्य करत राहील. मात्र, बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्त्वामुळे युक्रेन-यूके संबंधात आणखी जवळीक निर्माण झाली होती."

झेलेन्स्की

फोटो स्रोत, PA Media

बोरिस जॉन्सन आणि माझ्यात रशियाच्या घुसखोरीनंतरच्या काळात मैत्रीचे संबंध निर्माण झाल्याचेही झेलेन्स्कीनं म्हटलं.

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 133 वा : युक्रेन करणार 21000 युद्धगुन्ह्यांची चौकशी

रशियाने युक्रेन वर हल्ला केल्यानंतर रशियाने केलेल्या 21000 युद्ध गुन्ह्यांची चौकशी करणार असल्याचं युक्रेनचं म्हणणं आहे.

युक्रेनचे वकील आर्यना वेनेडिक्टोव्हा यांनी बीबीसीला सांगितलं की त्यांना अशा प्रकारचे 200 ते 300 गुन्हे झाल्याच्या तक्रारी येत आहेत.

त्यातील अनेक प्रकरणं गुन्हेगारांच्या अनुपस्थितीत होणार आहेत. मात्र हा न्यायाचा प्रश्न आहे असं त्या पुढे म्हणाल्या.

युक्रेन

फोटो स्रोत, Reuters

रशियाने 24 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केला. रशियाने मात्र या गुन्ह्यांच्या आरोपाचा इन्कार केला आहे.

बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या की ज्या रशियन सैनिकांनी लोकांवर हल्ला केला, अत्याचार, बलात्कार केलेत, लोकांचं शिरकारण केलं आहे त्यांना कळेल की काही काळातच ते कोर्टात उभे दिसतील.

त्यांची टीम युक्रेनमधल्या विविध भागात या प्रकरणांची चौकशी करत आहे तरी इतक्या सगळ्या प्रकरणांची चौकशी योग्य पद्धतीने होणं काही लोकांमुळे आणि प्रदेशामुळे अशक्य आहे. कारण युक्रेनचा बराचसा भाग रशियाने बळकावला आहे.

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 132 वा : रशियाच्या हल्ल्याने युक्रेनमधला बाजार उद्ध्वस्त

रशियाचे युक्रेनवरचे हल्ले अजूनही थांबलेले नाहीत. युक्रेनच्या दोनेत्स्क प्रांतातल्या स्लोव्हॅस्क शहरात केलेल्या बॉम्ब हल्लायमुळे दोन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय.

"हा शुद्ध दहशतवाद आहे," दोनेत्स्क प्रांताचे प्रमुख पावलो किरीलेंको म्हणाले.

स्लोव्हॅस्क शहरातल्या बाजाराच्या ठिकाणी हा हल्ला झाला.

रशिया-युक्रेनच युद्धात स्लोव्हॅस्क आता फ्रंटलाईनवर आलं आहे त्यामुळे इथे होणारे हल्ले वाढले आहेत असं शहराचे महापौर वादिम लायख म्हणाले.

त्यांनी मंगळवारी, 5 जुलैला झालेल्या हल्ल्याचे फोटोही फेसबुकवर टाकले. त्यांनी म्हटलं की इथे जोरदार बॉम्ब हल्ले होत आहेत आणि लोकांनी घराबाहेर पडू नये.

युक्रेनच्या पूर्व दोनाबासमधले सगळे औद्योगिक भाग ताब्यात घेण्याचा रशियाचा प्रयत्न आहे.

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 131 वा : आक्रमण सुरूच ठेवण्याचे पुतीन यांचे आदेश

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी संरक्षणमंत्र्यांना युक्रेनवरील आक्रमण सुरूच ठेवण्याचे आदेश दिलेत. रशियानं लिन्सचान्स्क शहरावर ताबा मिळवल्यानंतर पुतीन यांनी हा आदेश दिलाय.

रशिया, युक्रेन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, हल्ल्याची दृश्यं

'आधीच ठरलेल्या योजनेनुसार' उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्याचं आवाहन पुतीन रशियन टीव्हीवर दिसले.

आता पूर्ण लुहान्स्क शहर रशियाच्या ताब्यात आला आहे.

या प्रदेशाचे युक्रेनियन गव्हर्नर म्हणाले की, आता पूर्ण प्रदेशच रशियाच्या ताब्यात गेल्यानं दूरवरून ते उद्ध्वस्त केले जाणार नाही.

रशिया युक्रेन संघर्ष दिवस 130 वा : युक्रेनला आणखी लष्करी सामग्री पुरवणार - ऑस्ट्रेलियन पंतप्रधान

युक्रेनला आणखी लष्करी सामग्री पुरवणार असल्याचं आश्वासन ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिझ यांनी दिलं. ते सध्या युक्रेनच्या दौऱ्यावर आहेत.

पंतप्रधान अल्बानिझ आणि युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांची किव्हमध्ये भेट झाली. अल्बानिझ यांचा युक्रेन दौरा अचानक ठरला होता. यापूर्वी त्यांनी बुचा आणि इर्पिनचा दौरा केला होता. त्यामुळे तिथं संघर्षामुळे झालेल्या स्थितीचंही वर्णन केलं.

ऑस्ट्रेलियानं 100 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर युक्रेनला मदत दिली. त्यात ड्रोन आणि 34 लष्करी वाहनांचा समावेश आहे.

त्याचसोबत, ऑस्ट्रेलियानं रशियाच्या आणखी 16 मंत्र्यांवर ऑस्ट्रेलियात प्रवासासाठी बंदी घातली.

रशिया युक्रेन संघर्षाचा दिवस 129: बेलगोरोडवर क्षेपणास्त्र दागल्याचा रशियाचा आरोप

युक्रेनने बेलगोरोडवर क्षेपणास्त्र दागल्याचा आरोप रशियाने केला. हे शहर युक्रेन सीमेनजीक आहे. या क्षेपणास्त्र हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक निवासी इमारतीही या हल्ल्याचं लक्ष्य ठरल्या आहेत.

नागरी भागात युक्रेनने ठरवून आक्रमण केलं आहे असं रशियाचा दावा आहे. युक्रेनने हे आरोप फेटाळले आहेत.

रशिया युक्रेन संघर्षाचा 128 वा दिवस : रशियाच्या मिसाईल हल्ल्यात ओडेसा प्रदेशात 21 जणांचा मृत्यू - युक्रेन

रशियाच्या मिसाईल स्ट्राईकमुळे युक्रेनच्या दक्षिणेकडील ओडेसा प्रदेशातील 21 लोकांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये एका चिमुकल्याचाही समावेश आहे. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

DSNS या युक्रेनच्या आपत्कालीन यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार, "नऊ मजली इमारतीवर रशियानं मिसाईल हल्ला केला. ही इमारती दक्षिणेकडील ओडेसा प्रदेशातील सेर्हियिव्हका गावात होती. यात 16 जणांचा मृत्यू झाला."

तर एका हॉलिडे रिसॉर्टवर केलेल्या आणखी एका मिसाई हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात एका लहान मुलाचा समावेश आहे.

रशियानं जवळपास डझनभर मिसाईल युक्रेनच्या विविध शहरांवर डागले.

मात्र, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी रशियानं युक्रेनमधील सर्वसामान्य नागरिकांना निशाणा बनवल्याचं फेटाळलं.

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 127 वा : इंयुक्रेनच्या या बेटावरून रशियाला माघार का घ्यावी लागली?

हे खडकाळ बेट काळ्या समुद्राच्या वायव्य भागात आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्याच्या पहिल्याच दिवशी ते रशियाच्या ताब्यात गेलं.

या बेटाचं नाव स्नेक आयलंड असं आहे. युद्धातही या बेटाने मोलाची भूमिका बजावली.

पण गेल्या चार महिन्यांपासून युक्रेनच्या सैन्याने सतत या बेटावर बॉम्बहल्ल केले आहेत, परिणामी रशियाने हे बेट रिकामं केलं आहे.

स्नेक आयलंड

फोटो स्रोत, PLANET LABS PBC

रशियाने म्हटलं की "सद्भावना दाखवत ते हे बेट रिकामं करत आहेत. याने सिद्ध होईल की ते युक्रेनचा धान्यसाठा रोखत होते. पण युक्रेनने हा दावा उडवून लावत म्हटलंय की मॉस्को अजूनही त्यांच्या धान्यसाठ्याच्या पुरवठ्यात अडथळे आणत आहे."

सैन्य तज्ज्ञांचे मते रशियाने हे बेट सोडलं कारण त्यांना स्वतःचा बचाव करता येत नव्हता. हे बेट हवाई हल्ल्यांच्या एकदम टप्प्यात आहे. जसे हल्ले करून रशियाने हे बेट ताब्यात घेतलं, तसेच हल्ले करत युक्रेनने रशियाला हे बेट रिकामं करायला भाग पाडलं.

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 126 वाः इंग्लंड युक्रेनला करणार 1 अब्ज पौंडाची मदत

युनायटेड किंग्डमने युक्रेनला देत असलेली मदत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. आता युके युक्रेनला 1 अब्ज पौंडाची लष्करी मदत करणार आहे.

मानवतेचया दृष्टिकोनातून युक्रेनला यापूर्वी 1.5 अब्ज पौंडाची मदतही करण्यात आली होती.

या मदतीनंतर युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युक्रेनच्या संरक्षण विभागाचा कायापालट होईल असं मत व्यक्त केलं आहे.

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 125 वा : तुम्ही जिंकणार नाही, नाटो नेत्यांनी पुतीन यांना ठणकावलं

नेटो परिषदेत उपस्थित असलेल्या नेत्यांनी युक्रेन-रशियाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. युद्धादरम्यान आपला युक्रेनला असलेला पाठिंबा कायम असेल, असं नेटो नेत्यांनी म्हटलं.

तसंच, तुम्ही कधी जिंकणार नाही, अशा शब्दात नेटो नेत्यांनी यावेळी पुतीन यांना ठणकावलं.

युक्रेन, रशिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की

या परिषदेचं यजमानपद भूषवत असलेल्या स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सँचेज म्हणाले, "रशिया हा नवीन धोरणात्मक संकल्पनेत मुख्य धोका म्हणून ओळखला जाईल. आम्ही पुतीन यांना स्पष्ट शब्दांत सांगू इच्छितो. तुम्ही जिंकणार नाही."

रशिया युक्रेन संघर्ष 124वा:लिसिचांस्क शहर सोडण्याचे आदेश

युक्रेनी अधिकाऱ्यांनी लिसिचांस्क शहरात राहाणाऱ्या नागरिकांना तात्काळ शहर सोडण्याचे आदेश दिले आहेत

लुहांस्कचे गव्हर्नर सर्हे हैदी म्हणाले, तिथली परिस्थिती अत्यंत कठीण आहे, तिथलं राहाणं खरंच धोक्याचं आहे.

लोकांनी छावण्यांमध्ये राहायला जावे असं सांगितलं. लिसिचांस्क शहर लुहांस्क प्रांतात आहे.

रशियन सैनिकांनी सतत काही आठवडे बाँबफेक केली आहे. त्यानंतर लिसिचांस्कजवळच्या सेवेरोदोनेत्स्क ताब्यात घेतलं आहे.

रशिया युक्रेन संघर्ष दिवस 124 वा : लिसिचांस्क शहर सोडण्याचे आदेश

फोटो स्रोत, Getty Images

रशिया युक्रेन संघर्ष 123वा: झेलेन्स्की G7 परिषदेत बोलणार

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्स्की आज G7 परिषदेला संबोधित करणार आहेत. ताकदवान शस्त्रं उपलब्ध करून देण्यासंदर्भात झेलेन्स्की उपस्थित देशांच्या प्रतिनिधींना आवाहन करण्याची शक्यता आहे.

या परिषदेची तयारी सुरू असतानाच कीव्हवर क्षेपणास्त्राने हल्ले होत आहेत.

गेल्या काही दिवसात रशियाने युक्रेनमधल्या कीव्ह शहरात जोरदार हल्ले केले होते. त्या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की ही मागणी करण्याची शक्यता आहे.

शस्त्रास्त्रांची रसद उशिरा पोहोचणं म्हणजे रशियाला आणखी आक्रमणासाठी खतपाणी घालण्यासारखं आहे असं झेलेन्स्की म्हणाले. एअर डिफेन्स सिस्टम आणि रशियावर नव्याने निर्बंध लागू करायला हवेत असं त्यांनी ऑनलाईन संवाद साधताना म्हटलं आहे.

मित्र देश खरंच आमचे मित्र असतील तर त्यांनी वेगाने कार्यवाही करायला हवी, नुसते निरीक्षक नकोत असा टोलाही त्यांनी लगावला.

जी7 परिषदेत रशिया-युक्रेन युद्ध या मुद्याभोवतीच चर्चा एकवटण्याची शक्यता आहे. युक्रेनमधील शहरांना जास्तीतजास्त रसद पुरवण्याचा प्रयत्न कसा वाढवता येईल यासंदर्भात चर्चा होणं अपेक्षित आहे.

रशिया युक्रेन संघर्ष दिवस 122 वा : रशियाचे कीव्हवर पुन्हा हल्ले

रशियावर अजून निर्बंध लादण्याच्या दृष्टिनं अनेक देश युरोपमध्ये दाखल झाले आहेत, तर दुसरीकडे रशियाने रविवारी (26 जून) युक्रेनची राजधानी कीव्हवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. डोनबास भागावर नियंत्रण राखण्याच्या दृष्टिने युक्रेनला हे हल्ले महागात पडू शकतात.

गेल्या काही आठवड्यात कीव्हवर पहिल्यांदाच असे हल्ले करण्यात आले आहेत.

याआधी शनिवारी (25 जून) युक्रेनच्या पूर्वेकडील सिविएरो दोनेत्सक हे शहर रशियन शहराच्या ताब्यात गेलं. युक्रेनसाठी हा मोठा धक्का होता.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

रॉयटर्स या वृत्त संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार सकाळी सेंट्रल कीव्हमध्ये चार स्फोट झाले. त्यानंतर दक्षिण भागात अजून दोन स्फोट झाले.

राष्ट्रपती कार्यालयाचे प्रमुख एंड्री एर्माक यांनी सांगितलं, "रशियाने कीव्हवर पुन्हा एकदा हल्ला केला आहे. रशियन क्षेपणास्त्रांनी एक अपार्टमेंट आणि शाळा उद्ध्वस्त केल्या आहेत."

युक्रेनचे पोलिस प्रमुख इहोर क्लिमेंको यांनी टीव्हीवर बोलताना सांगितलं की, या हल्ल्यात पाच लोक जखमी झाले आहेत.

दुसरीकडे G-7 देशांनी आपल्या बैठकीच्या आधी रशियातून होणाऱ्या सोन्याच्या आयातीवर निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे.

रशिया युक्रेन संघर्ष दिवस 120 वा : मोठे-मोठे ब्रँड्स सोडताहेत रशिया

मॅकडोनाल्डस आणि स्टारबक्स या अमेरिकन ब्रँड्स पाठोपाठ आता नाइके या प्रसिद्ध ब्रँडने रशियातून माघार घेणार असं घोषित केलं आहे.

शूज आणि स्पोर्ट्सवेअर बनवणाऱ्या या कंपनीने त्यांच्या ऑनलाईन ऑर्डर्स थांबवल्या आहेत आणि रशियातली दुकानंही बंद केली आहेत.

अर्थात स्थानिक भागीदारांसोबत सुरू केलेल्या दुकानांमधून विक्री सध्या सुरू राहील पण कंपनी त्यांच्यासोबतचे करार संपवण्याच्या मार्गावर आहे.

त्याआधी सिस्को या कंपनीने म्हटलं की ते त्यांचा रशिया आणि बेलारूसमधला कारभार थांबवतील.

युक्रेनवर हल्ला केल्यापासून अमेरिका आणि युरोपातल्या राष्ट्रांनी रशियाची चहुबाजूनी आर्थिक कोंडी करायला सुरुवात केली आहे.

पण रशियाही सध्या असा कायदा आणायच्या बेतात आहे ज्यामुळे रशिया सोडून जाणाऱ्या परदेशी कंपन्यांना शिक्षा देता येईल. एकदा हा कायदा संमंत झाला तर सरकार या कंपन्यांची संपत्ती जप्त करू शकेल आणि त्यांच्यावर खटले भरू शकेल असं रॉयटर्सने म्हटलं आहे.

रशिया युक्रेन संघर्ष दिवस 119 वा : 'येत्या थंडीत रशिया युरोपचा गॅस पुरवठा बंद करू शकतो, तयारीत राहा'

आंतरराष्ट्रीय उर्जा संस्थेच्या प्रमुखांनी युरोपला सांगितलं आहे की येत्या थंडीत रशिया युरोपचा गॅस पुरवठा बंद करू शकतं, तयारीत राहा.

नैसर्गिक गॅस

फोटो स्रोत, Reuters

आंतरराष्ट्रीय उर्जा संस्थेचे प्रमुख फतिह बिरोल म्हणतात, "रशिया पूर्णपणे गॅसचा पुरवठा बंद करेल असं नाही पण समजा तसं केलंच त्यांनी तर युरोपने तयारीत राहावं, आणि काहीतरी आपत्कालीन प्लॅन तयार ठेवावा."

युरोपियन देशांचं म्हणणं आहे की गेल्या काही महिन्यात त्यांना रशियाकडून अपेक्षेपेक्षा खूपच कमी गॅस मिळाला आहे.

रशियाचं म्हणणं आहे की हे मुद्दाम केलं नाहीये तर काही तांत्रिक कारणांमुळे असं घडतंय.

युक्रेनवर हल्ला होण्याच्या आधी युरोप त्यांच्या गरजेच्या साधारण 40 टक्के नैसर्गिक गॅस रशियातून आयात करायचा. पण आता ही टक्केवारी निम्म्यावर आली आहे.

बिरोल यांच्यामते हिवाळ्यात युरोपचा गॅसपुरवठा तोडणं हा रशियाचा धोरणाचा भाग असू शकतो, ज्यामुळे त्या काळात त्यांना युरोपवर वरचष्मा ठेवता येईल.

रशिया युक्रेन संघर्ष दिवस 118 वा : युक्रेनमधून पळालेल्या किशोरवयीन निर्वासितांना यूकेत प्रवेश मिळणार

युक्रेन युद्धातून जीव वाचवून पळालेल्या किशोरवयीन निर्वासितांना आता यूकेत प्रवेश मिळणार आहे. त्यासंबंधी नियमात बदल झाल्याची माहिती बीबीसीला मिळाली आहे.

जवळपास 1000 अल्पवयीन मुलांनी यूकेच्या निर्वासितांना आसरा देण्याच्या योजनेचा फायदा घेण्यासाठी युक्रेन सोडलं होतं, पण त्यांना यूकेत प्रवेश मिळू शकला नाही कारण या योजनेअंतर्गत अल्पवयीन मुलांसोबत कोणीतरी पालक/संरक्षक असणं गरजेचे होतं.

वाल्याने अनेक आठवड्यांपूर्वी आपलं घर सोडलं होतं
फोटो कॅप्शन, वाल्याने अनेक आठवड्यांपूर्वी आपलं घर सोडलं होतं

17-वर्षांच्या वाल्यानी अनेक महिने एका छोट्याशा खोलीत एकटीने काढले. दररोज आकाशातून रशियन सैन्य हल्ला करेल अशी भीती असायची.

तिला आता यूकेत प्रवेश मिळणार आहे. ती म्हणते की ती सुरक्षित आहे हे पाहून तिच्या आईवडिलांना आनंद वाटेल.

वाल्याचं घर दक्षिण युक्रेनमधल्या खेरशोन प्रांतात आहे. तिथे तीव्र हल्ले आणि रशिया-युक्रेन फौजांमध्ये तुंबळ युद्ध सुरू आहे. वाल्याने आपलं घर सोडलं कारण तिला आशा होती की यूकेत जाऊन एखाद्या स्पॉन्सर कुटुंबासोबत सुरक्षित राहू शकेल.

पण तिचं वय 18 पेक्षा कमी असल्याने तिचा व्हीसा ब्लॉक केला गेला होता. तिच्यासारखेच शेकडो युक्रेनियन किशोरवयीन मुलं व्हिसाची वाट पाहत होते. या सगळ्यांचा मार्ग सुकर होणार आहे.

रशिया युक्रेन संघर्ष दिवस 117 वा : 'युद्धामुळे आफ्रिकेत लाखोंचे भूकबळी जाण्याची शक्यता'

युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी सोमावारी, 20 जूनला आफ्रिकन यूनियनला संबोधित केलं.

यावेळी बोलताना ते म्हणाले की रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम आफ्रिकेला सहन करावे लागत आहे आणि त्यामुळे आफ्रिकेत खतांची तसंच अन्नधान्याच्या निर्याती थांबली आहे. यामुळे लाखो लोक भूकेच्या गर्तेत ढकलले जाऊन भूकबळी जाण्याची शक्यता आहे.

कुपोषण, भूकबळी

फोटो स्रोत, Getty Images

रशियाने युक्रेनच्या बंदरातून बाहेर जाणाऱ्या जहाजांची कोंडी केल्यामुळे कित्येक टनांच्या धान्याची निर्यात थांबली आहे. याचा सरळ परिणाम आफ्रिकन देशांवर होतोय.

पाश्चिमात्य देशांनी यावर तातडीने तोडगा काढण्याचं आवाहन रशियाला केलं आहे.

"या निर्यातबंदीमुळे आफ्रिकेत महागाई वाढली आहे. आमच्यावर युद्ध लादणाऱ्यांनी आफ्रिकेलाही वेठीस धरलं आहे," झेलेन्स्की म्हणाले.

ते पुढे म्हणाले की काळ्या समुद्रावर असलेल्या युक्रेनच्या बंदरात अडकलेलं हजारो टन धान्य सोडवण्यासाठी त्यांचं सरकार वाटाघाटी करत आहे.

दिवस 116 वा : रशियाचे युक्रेनवरचे हल्ले अधिक तीव्र होऊ शकतात : झेलेन्स्की

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलंय की येत्या काही दिवसात रशिया युक्रेनवरचे हल्ले अधिक तीव्र करेल कारण युक्रेन यूरोपियन यूनियनमध्ये सहभागी होऊ शकतो की नाही याचा निर्णय काही दिवसात येईल.

यूरोपियन यूनियनमध्ये समाविष्ट असलेले देश काही दिवसात युक्रेनला 'उमेदवार' हा दर्जा देऊ शकतात. असं झालं तर युक्रेनची यूरोपियन यूनियनमध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया सुरू होईल, पण ही प्रक्रिया पूर्ण होऊन यूक्रेनला सभासद दर्जा मिळण्यासाठी अनेक वर्षं जाऊ शकतात.

रशियाने हल्ला केल्यानंतर चारच दिवसात युक्रेनने EU मध्ये सहभागी होण्याचा अर्ज केला होता

फोटो स्रोत, OFFICE OF THE PRESIDNET OF UKRAINE

फोटो कॅप्शन, रशियाने हल्ला केल्यानंतर चारच दिवसात युक्रेनने EU मध्ये सहभागी होण्याचा अर्ज केला होता

पण झेलेन्स्कींच्या मते नुसता 'उमेदवार' दर्जा जरी मिळाला तरी रशिया हल्ल्यांची तीव्रता आणखी वाढवेल.

राजधानी किव्हमधून राष्ट्राला संदेश देताना ते बोलत होते. "आपलं सैन्य तयारीत आहे," असं त्यांनी नागरिकांना सांगितलं.

दिवस 115 वा : रशिया- युक्रेन युद्ध अनेक वर्षे सुरू राहू शकतं - नाटो प्रमुखांचा इशारा

रशिया- युक्रेन युद्ध अनेक वर्षांपर्यंत सुरू राहू शकतं, अशी शक्यता नाटोच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे. पश्चिमेकडील देशांना सावध करत ते म्हणाले आहेत की, युक्रेनला समर्थन कायम ठेवण्यासाठी तयार रहावं लागेल.

नाटोचे महासचिव जेंस स्टोल्टेनबर्ग यांनी सांगितलं की, युद्धाची किंमत मोठी आहे पण रशियाला त्यांचा लष्करी हेतू पूर्ण करू देण्याची किंमत त्याहून मोठी होऊ शकते.

नाटोचे महासचिव जेंस स्टोल्टेनबर्ग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नाटोचे महासचिव जेंस स्टोल्टेनबर्ग

जेंस स्टोल्टेनबर्ग यांच्यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनीही रशिया-युक्रेन युद्ध बराच काळ सुरू राहू शकतं असं म्हटलं होतं.

बोरिस जॉनसन आणि जेंस स्टोल्टेनबर्ग या दोघांनीही म्हटलंय की, अधिक शस्त्र पाठवल्यास युक्रेनच्या विजयाची शक्यता वाढेल.

नाटोच्या प्रमुखांनी जर्मन वृत्तपत्र बिल्डला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, "या युद्धला अनेक वर्षं लागू शकतात हे तथ्य आपल्याला मान्य करावं लागेल. युक्रेनला समर्थन देण्यापासून आपण मागे हटू नये. मग यासाठी कोणतीही किंमत आपल्याला चुकवावी लागली तरी चालेल. मग तो लष्करी पाठिंब्याचा विषय असेल किंवा वाढत्या तेल,गॅॅस आणि खाद्यपदार्थांच्या किंमतीचा विषय असेल."

पश्चिम देशांच्या लष्कर आघाडीचे नाटोचे प्रमुख म्हणाले की, युक्रेनला आधुनिक शस्त्र दिल्यास डोनबासला स्वतंत्र करण्याची शक्यता वाढेल.

या क्षेत्रातील मोठा भाग रशियाच्या नियंत्रणात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनचे सैनिक देशाच्या पूर्वेकडील भागांत आपली पकड मजबूत करण्यासाठी लढत आहेत. अलीकडच्या काळात रशिया या भागात वेगाने पुढे जात आहे.

रशिया युक्रेन संघर्ष दिवस 114: रशियावरील निर्बंध अविचारातून- पुतिन

पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेले निर्बंध अविचारी आणि वेडेपणाचे आहेत असं मत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्यक्त केलं. सेंट पीटर्सबर्ग इथे झालेल्या परिषदेत बोलताना पुतिन म्हणाले, रशियाच्या विरोधात ब्लिटक्रीग पद्धतीने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे प्रयत्न यशस्वी होणार नव्हते. रशियापेक्षा हे निर्बंध लागू करणाऱ्या देशांना हानीकारक आहेत असा इशाराही त्यांनी दिला.

पाश्चिमात्य देश रशियाला युक्रेनवरील आक्रमणासाठी शिक्षा देतानाच दुसरीकडे या युद्धाचा स्वत:च्या देशावर परिणाम कमीत कमी व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. रशियावर निर्बंध लागू केल्यामुळे युरोपियन युनियन 400 बिलिअन डॉलर्स गमावू शकतं असा दावा पुतिन यांनी केला.

युद्धामुळे युरोपीय देशांनी लागू केलेल्या निर्बंधामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो असं पुतिन यांच्याच अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं. रशियाच्या सेंट्रल बँकेचे गव्हर्नर एल्व्हिरा नबियुलिना यांनी सांगितल्याप्रमाणे देशाच्या जीडीपीपैकी 15 टक्क्यांना या निर्बंधाचा फटका बसू शकतो.

रशिया युक्रेन संघर्ष दिवस 113 : युक्रेनला सदस्य करून घेण्यास EU च्या नेत्यांचा पाठिंबा

फ्रान्स, जर्मनी, इटली आणि रोमानिया या देशांच्या नेत्यांनी युक्रेनला युरोपियन युनियनचा सदस्य करून घेण्यास पाठिंबा दिला असून, 'तातडीने' युक्रेनला सदस्याचा दर्जा देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

"युक्रेन युरोपियन कुटुंबाअंतर्गत येतं," असं जर्मन चॅन्सेलर ओलाफ शॉल्झ म्हणाले. कीव्हमध्ये संयुक्त परिषदेत ते बोलत होते.

मात्र, यावेळी त्यांनी हेही नमूद केलं की, युक्रेननं युरोपियन युनियनच्या सदस्यत्वासाठी आवश्यक अटींची पूर्तताही तातडीनं पूर्ण करायला हवी.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या मुद्द्यावर जोर दिला की, 27 सदस्यांची युरोपियन युनियन रशियाविरोधातील युद्ध युक्रेन जिंकत नाही, तोवर युक्रेनच्या मागे खंबीरपणे उभी राहील.

यावेळी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की हेही उपस्थित होते. त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला की, रशियाची युक्रेनमधील घुसखोरी ही 'संयुक्त युरोपविरोधातील युद्ध' आहे. रशियाविरोधात लढण्यासाठीचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे एकजूट.

युक्रेन

फोटो स्रोत, Getty Images

रशिया युक्रेन संघर्ष दिवस 112: सेवेरोदोनेत्स्कमध्ये हजारो लोक अडकले

युक्रेनमधील सेवेरोदोनेत्स्क या शहरात सध्या हजारो नागरीक अडकून पडले आहेत. तिथ अन्नधान्याचा तुटवडा पडला आहे. अडकलेल्या अनेकांनी बंकरमध्ये आश्रय घेतला आहे.

सेवेरोदोनेत्स्क शहरत प्रवेश करणारे सर्व पूल 3 दिवसांपूर्वीच तोडून टाकण्यात आले आहेत. तर हे शहर ताब्यात घेण्यासाठी रशियाकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. सध्या आसपासच्या सर्व शहरांवर रशियाचा ताबा आहे.

सेवेरोदोनेत्स्क अन्न आणि पाण्याच्या पुरवठ्याअभावी हजारो लोकांना आता फारकाळ टिकव धरणं कठिण जात आहे. अनेक लोक भुकेले आहेत, असं संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी विभागाच्या सॅवियानो एब्रु यांनी बीबीसीला सांगितलं आहे.

रशिया युक्रेन संघर्ष दिवस 111: अमेरिकेची आणखी 1 अब्ज डॉलरची मदत

युक्रेनसाठी आणखी एक अब्ज अमेरिकी डॉलरची मदत देण्याची घोषणा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केली आहे. डोनबास भागात रशियाला आव्हान देण्यासाठी शस्त्रास्त्र खरेदी आणि इतर गोष्टींसाठी युक्रेनला हा पैसा वापरता येणार आहे.

ब्रसेल्स मध्ये बुधवारी नाटोच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक झाली. त्याला अमेरिकचे संरक्षण मंत्रीदेखील उपस्थित होते. त्यात युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय झाला आहे.

रशिया युक्रेन संघर्ष दिवस 110: सेवेरोदोनेत्स्ककडे जाणारे पूल उद्ध्वस्त, नागरिकांचा संघर्ष

युक्रेनमधील सेवेरोदोनेत्स्क या महत्त्वाच्या शहराकडे जाणारे सर्व पूल रशियन सैन्याकडून उद्धवस्त करण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासकाकडून यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.

पूल तुटल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणं तसंच नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवणं आता अशक्य बनलं आहे, असं सेरी हैदी यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून सेवेरोदोनेत्स्कवर ताबा मिळवणं हे रशियाचं महत्त्वाचं लष्करी उद्दिष्ट बनलं होतं.

सेवेरोदोनेत्स्क आणि त्याला जोडूनच असलेल्या लिसचान्सक शहरावर ताबा मिळाला तर रशियाला लुहान्स्क भागावर ताबा मिळवता येईल. लुहान्स्क भागावर रशिया समर्थक फुटीरतावाद्यांचा ताबा आहे.

सेवेरोदोनेत्स्ककडे जाणारे तीनही पूल उद्ध्वस्त करण्यात आले असल्याचं हैदी यांनी टेलिग्रामवर पोस्ट केलं आहे. शहरांमध्ये जे नागरिक मागे राहिले आहेत त्यांना तगून राहण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतोय, असंही हैदी यांनी म्हटलंय.

ब्रिटनमधील लष्करी अधिकारी जॉर्डन गॅटली हे सेवेरोदोनेत्स्क चं रक्षण करताना मृत्यूमुखी पडल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी रविवारी (12 जून) सांगितलं.

या शहराच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या संघर्षातील जीवितहानीची आकडेवारी 'भयावह' आहे, असं युक्रेनचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलंय.

रशिया युक्रेन संघर्ष दिवस 109: लुहांस्कमध्ये केमिकल प्लांटला रशियाच्या बॉम्बहल्ल्यामुळे आग

रशियन सैन्याने युक्रेनमधील लुहांस्कच्या एका मोठ्या केमिकल प्लांटवर बॉम्बने हल्ला केला आहे. हा प्लांट सेवेरोदोनेत्स्क येथे आहे. याठिकाणई युक्रेन सैन्याच्या काही तुकड्या तैनात होत्या.

रशियाच्या लष्कराने या प्लांटला घेराव घातला आहे. हा प्लांट आम्ही उद्ध्वस्त करणार नाही असं ते सांगतायत.

बीबीसी न्यूजनुसार, एका अज्ञात अधिकाऱ्याने रशियाच्या इंटरफॉक्स न्यूज एजंसीला सांगितलं की, इथे तैनात असलेल्या युक्रने सैन्यासोबत चर्चा सुरू आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

याठिकाणी बंकरमध्ये 800 नागरिक आहेत. युक्रेनच्या सैनिकांना आत्मसमर्पण करण्यास सांगितल्याचं समजतं.

लुहांस्कचे राज्यपाल शेरी हैदी यांनी सांगितलं की, 800 नागरिकांनी इथे आश्रय घेतला होता आणि आता बॉम्ब हल्ल्यानंतर प्लांटमध्ये आग लागली आहे. यात कोणी जखमी किंवा जीवितहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

इंटरफॅक्सने दिलेल्या वृत्तानुसार, अजोत केमिकल प्लांटमधून काही युक्रेनी लोकांना पळून जाण्यात यश आलं आहे.

यापूर्वी मारियोपोल इथल्या स्टील प्लांटमध्ये युक्रेनच्या सैन्याने आश्रय घेतला होता. अनेक आठवडे याठिकाणी आश्रयाला असलेल्या युक्रेनी सैन्याला गेल्या महिन्यात आत्मसमर्पण करण्यास सांगितलं.

रशिया युक्रेन संघर्ष दिवस 108: 'युक्रेनला दारुगोळ्याची कमतरता भासतेय'

रशियन सैन्याचा सामना करता करता आता दारुगोळा संपत चालला आहे असं युक्रेनचे अधिकारी सांगतायत. दक्षिण सीमेवरील मायकोलाइव्ह क्षेत्राचे राज्यपाल विटाली किम म्हणाले की, युद्धात शस्त्रांच्या बळावर लढा दिला जात आहे.

रशिया युक्रेन संघर्ष

फोटो स्रोत, Getty Images

वृत्तसंस्था एएफपीच्या एका रिपोर्टनुसार, रशियन सैन्य खूप बलवान होतं आणि दुसऱ्या बाजूला युक्रेनच्या सैन्याला शस्त्रात्रांची कमतरता भासत होती.

त्यांनी आता आपल्या पश्चिम भागात तैनात असलेल्या सहकाऱ्यांकडून लांब पल्ल्याचे शस्त्रास्त्र आणि दारुगोळा लवकरात लवकर पोहचवा असं आवाहन केलं आहे.

राज्यपाल विटाली किम म्हणाले, "युरोप आणि अमेरिकेची मदत अत्यंत महत्त्वाची आहे."

शुक्रवारी (10 जून) युक्रेन सैन्याचे गुप्तचर विभागाचे उप-प्रमुख वादिम स्किबिट्स्की यांनी ब्रिटनच्या गार्डियन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतही हीच प्रतिक्रिया दिली आहे.

रशिया युक्रेन संघर्ष दिवस 107: सेवेरोडोनेत्स्क शहरात रस्त्यावर तीव्र लढाई सुरू - ब्रिटनचे संरक्षण मंत्री

सेव्हेरोडोनेत्स्क या पूर्वेकडील शहरामध्ये रस्त्यावरील तीव्र लढाई सुरू आहे. यामध्ये युक्रेनियन आणि रशियन दोन्ही बाजूंना मोठ्या संख्येने जीवितहानी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या ताज्या गुप्तचर अहवालात म्हटले आहे.

झेलेन्स्की

फोटो स्रोत, Getty Images

तरीही रशियन सैन्याने शहराच्या दक्षिणेकडे कूच केलेली नाही, असं संरक्षण मंत्री म्हणाले.

युक्रेनच्या संरक्षणास उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात रशिया आपल्या तोफखाना आणि हवाई क्षमतेचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहे.

ब्रिटनचे संरक्षण मंत्री म्हणाले की, रशियाकडे अधिक अचूक आधुनिक क्षेपणास्त्रांची कमतरता आहे. रशिया युक्रेनमधील जमिनीवरील लक्ष्यांवर जड अँटी-शिप क्षेपणास्त्रांचा वापर करत आहे. जे प्रामुख्याने आण्विक वॉरहेड वापरून विमान वाहक नष्ट करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

वॉरहेडसह ग्राउंड अॅटॅक केल्यास ते अत्यंत चुकीचे असतात. त्यामुळे महत्त्वपूर्ण अतिरिक्त नुकसान आणि नागरी जीवितहानी होऊ शकते.

मारियुपोलचे निर्वासित महापौर वाद्यम बोइचेन्को म्हणतात की, शहरात 'हगवण आणि कॉलराचा उद्रेक' झाला आहे. रशियन नियुक्त महापौर म्हणतात की, कॉलराची कोणतीही प्रकरणे नोंदली गेली नाहीत. त्यांच्या या दाव्याची बीबीसीने पडताळणी केली नाहीय.

रशिया युक्रेन संघर्ष दिवस 106: युक्रेनचे रोज 100 सैनिक मारले जात आहेत- झेलिन्स्की.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमिर झेलेन्स्की यांच्या एक ज्येष्ठ सहकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं की युद्धभूमीवर रोज 100 ते 200 सैनिक मारले जात आहेत.

हा आकडा मागे व्यक्त केलेल्या आकड्यांपेक्षाही मोठा आहे. युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनी दावा केला की युक्रेन रोज आपल्या 100 सैनिकांना गमावत आहे, तर 500 सैनिक जखम होत आहेत.

डोनबास भागात हल्ल्याला सडेतोड उत्तर द्यायचं असेल तर पाश्चिमात्य देशांकडून शेकडो तोफांची गरज आहे.

युक्रेन रशिया बरोबर शांततेच्या कोणत्याही चर्चा करण्यास तयार नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

युक्रेनच्या सैन्याला सातत्याने गोळीबार आणि बाँबहल्ला झेलावा लागत आहे. डोनबास मध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. रशियाचं सैन्य डोनबासवर नियंत्रण ठेवण्याचा पूरेपूर प्रयत्न करत आहे.

"रशियाच्या सैन्याने आण्विक शस्त्रं सोडून आतापर्यंत सर्व शस्त्रांचा वापर केला आहे. मग त्या भरभक्कम तोफा असो किंवा हवाई हल्ले" असं युक्रेनचे संरक्षणमंत्री मिखायलो पोदोलियाक म्हणाले.

युक्रेन सातत्याने पाश्चिमात्य देशांकडे शस्त्रास्त्रांची मागणी केली आहे. सध्या असलेल्या हत्यारांच्या असंतुलित प्रमाणामुळे युक्रेनची अशी स्थिती झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 105: 'मारियुपोलमध्ये पकडलेले युक्रेनच्या सैनिकांना रशियात नेलं आहे'

युक्रेनच्या मारियूपोल शहरात लढताना मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांचे मृतदेह किव्हला परत आले आहेत अशी माहिती या सैनिकांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

या कुटुंबियांचं म्हणणं आहे की रशियाच्या सैनिकांचे मृतदेह परत देऊन, युक्रेनच्या सैनिकांचे मृतदेह मायदेशी येत आहे. दोन्ही बाजूंना प्रत्येक 160 सैनिकांचे मृतदेह मिळणार आहेत. पण रशियाने यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

मारियुपोलच्या पोलाद कारखान्यात युक्रेनचे सैनिक अडकले होते. तुंबळ युद्धानंतर यातले अनेक सैनिक मारले गेले तर इतरांना रशियानी कैदी बनवलं.

मारियुपोलमध्ये पकडल्या गेलेल्या जवळपास 1 हजाराहून अधिक युक्रेनी सैनिकांना रशियात नेलं आहे. अजूनही काही जिवंत सैनिक रशियात पाठवले जातील अशी माहिती मिळते आहे.

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 104: रशियन सैनिक म्हणतात, आता युक्रेन नको...

युक्रेन युद्धाच्या सुरुवातीच्या काळातील अनुभवानंतर आता पुन्हा या युद्धात सहभागी होऊ नये असं रशियाच्या काही सैनिकांना वाटत असल्याचं रशियातील काही वकिलांना आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचं मत आहे. बीबीसीने अशाच एका रशियन सैनिकाशी चर्चा केली.

रशियन सैनिक (प्रातिनिधिक छायाचित्र)

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, रशियन सैनिक (प्रातिनिधिक छायाचित्र)

सर्गेई (नाव बदललं आहे) यांनी युद्धाचे पहिले 5 आठवडे जवळून पाहिले आहेत. ते म्हणतात, मी मरण्यासाठी किंवा मारण्यासाठी पुन्हा युक्रेनला जाऊ इच्छित नाही.

ते सध्या रशियातल्या आपल्या घरात आहेत. पुन्हा युद्धभूमिवर जावं लागू नये म्हणून ते कायदेशीर सल्ला घेत आहेत. युद्धात सहभागी व्हावं लागू नये असा निर्णय शेकडो सैनिकांनी घेतला आहे. सर्गेई त्यातलेच एक आहेत.

युक्रेनमध्ये घेतलेल्या अनुभवानंतर आपल्याला धक्का बसला आहे, सैन्याच्या सध्याच्या स्थितीबद्दल नाराज असल्याचं सर्गेई सांगतात.

ते सांगतात, "आम्ही आंधळ्या मांजराप्रमाणे लढत होतो. मला आपलंच सैन्य पाहून धक्का बसला. आम्हाला शस्त्रास्त्रं देण्यात अधिकचा खर्च करायचा नव्हता. पण असं का केलं गेलं नाही?"

रशियात 18 ते 27 वयोगटातील सर्वांना सैन्यात 1 वर्ष काम करणं अनिवार्य आहे. याच धोरणांतर्गत सर्गेई सैन्यात भरती झाले होते. सैन्यात काही काळ गेल्यावर त्यांनी 2 वर्षांचे प्रोफेशनल कॉन्ट्रॅक्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांना पगार मिळण्याची तरतूद होती.

जानेवारीमध्ये युक्रेनसीमेवर ज्या तुकडच्या पाठवल्या गेल्या त्यात सर्गेई यांचीही तुकडी होती. लष्करी कवायतीसाठी त्यांना तिथं पाठवल्याचं सांगण्यात आलं होतं.

त्यानंतर एका महिन्याने 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनविरोधात विशेष सैन्य मोहिमेची घोषणा केली. त्यावेळेस सर्गेई यांनी सीमा ओलांडून युक्रेनमध्ये जाण्यास सांगण्यात आले. काही वेळानंतर आपल्या तुकडीवर युक्रेन हल्ले करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

एप्रिलच्या सुरुवातीला सर्गेईना रशियातल्या एका तळावर पाठवण्यात आलं. उत्तर युक्रेनमधून रशियन सैन्य पूर्व युक्रेनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. त्या हल्ल्यासाठी त्यांना तयार करण्यात येत होतं. पुन्हा युद्धभूमीवर जायचं आहे असा आदेश आल्यावर आपण यासाठी तयार नाही असं त्यांनी कमांडरला सांगितलं.

त्यांनी याबाबतचा निर्णय तुमचा स्वतःचा असेल असं सांगितलं. कारण असं करणारे काही आपण पहिलेच नव्हतो असं त्यांना सांगण्यात आलं.

परंतु युद्धात परत जाण्यास नकार दिल्यास आपली तुकडी काय प्रतिक्रिया देईल याबद्दल काळजी वाटून सर्गेई यांनी कायदेशीर सल्ला घेण्याचं ठरवलं.

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 103 : स्फोटांनी किव्ह शहर हादरलं, युक्रेनच्या पूर्वेला युद्ध अधिक तीव्र

किव्हमध्ये पुन्हा स्फोट झाला आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, किव्हमध्ये पुन्हा स्फोट झाला आहे

युक्रेनची राजधानी असलेलं किव्ह हे शहर पुन्हा एकदा स्फोटांनी हादरलं आहे. अनेक आठवड्यांनी किव्हवर असा हल्ला झालेला आहे.

हा हल्ला केल्यानंतर रशियाने म्हटलंय की युरोपने दिलेले रणगाडे जिथे ठेवले होते, त्या जागेवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. पण युक्रेनचं म्हणणं आहे की या हल्ला ट्रेन दुरुस्त करणाऱ्या यार्डात झाला, तिथे कोणतेही रणगाडे नव्हते.

शहरावर धुराचे काळे ढग जमा झालेले दिसत आहेत आणि कमीत कमी एक व्यक्ती जखमी झाल्याची बातमी आहे.

गेल्या काही महिन्यात किव्हवर हल्ला झाला नाही कारण रशियन सैन्याचं सगळं लक्ष पूर्व युक्रेनमधल्या डोनाबास प्रदेशात केंद्रित झालं होतं.

युक्रेनच्या राजधानीत आयुष्य पूर्वपदावर येतंय असं वाटत होतं. बार आणि कॅफे उघडले होते, लोक रस्त्यावर फिरत होते पण तेवढ्यात हा हल्ला झाला.

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 102 : 'रशियाचा अपमान करायला नको,'इम्यॅन्युएल मॅक्रॉन असं म्हणाल्याने युक्रेनचा संताप

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटलंय की, आक्रमण करणं ही त्यांची चूक असली तरी 'रशियाला अपमानित करायला नको. पुतिन यांनी केलेल्या 'मूलभूत चुकीतून' बाहेर पडण्याचा मार्ग आहे.'

इम्यॅन्युएल मॅक्रॉन

फोटो स्रोत, LUDOVIC MARIN

फोटो कॅप्शन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

रशियाचा अपमान करू नये कारण हे प्रकरण आपल्याला सोडवण्याची किंवा त्यातून मार्ग काढण्याची शक्यता कायम राहील असंही मॅक्रॉन यांनी म्हटलंय.

त्यांच्या या वक्तव्यामुळे युक्रेनने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर टीका केलीय.

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा म्हणाले की मित्र राष्ट्रांनी, "रशियाला त्यांची योग्य जागा लक्षात आणून देण्यावर लक्ष केंद्रीत करावं. कारण ते स्वत:चाच अपमान करत आहेत."

कुलेबा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "रशियाचा अपमान करू नका असं सांगून त्यांनी फ्रान्सचा अपमान केला आहे. कारण रशियानेच स्वत:चा अपमान केला आहे. आपण रशियाला त्यांची योग्य जागा दाखवण्याकडे लक्ष केंद्रीत करायला हवं. यामुळेच शांतता प्रस्थापित होईल आणि लोकांची जीव वाचतील."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

युक्रेन आणि रशियाचे युद्ध थांबवण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी मॅक्रॉन सातत्याने पुतिन यांच्याशी फोनवरून संवाद साधत आहेत.

किव्हने म्हटलंय की, रशियाला भौगोलिक सवलती मिळू नयेत कारण रशियाने क्रूरपणे केलेल्या आक्रमणाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर निषेध नोंदवण्यात आला आहे.

यापूर्वी मॅक्रॉन यांनी फ्रेंच प्रादेशिक माध्यमांना माहिती दिली होती की, रशियाच्या नेत्याने 'स्वत:ला विलगीकरणात ठेवलं आहे.'

"मला असं वाटतं आणि मी त्यांनाही असं सांगितलं की त्यांनी त्यांच्या लोकांसोबत, स्वत:सोबत एक ऐतिहासिक आणि मूलभूत चूक केली आहे." असं मॅक्रॉन म्हणाले होते. तसंच स्वत:ला विलगीकरणात ठेवणं एक गोष्ट आहे पण त्यातून बाहेर पडणं कठीण मार्ग आहे असंही ते म्हणाले होते.

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 101: 'रशिया युक्रेन युद्धात आफ्रिकन देशांचा बळी'

रशिया आणि युक्रेनमधील युद्धात आफ्रिकन देशांचा विनाकारण बळी जातं असून रशियाने या राष्ट्रांच्या अडचणी कमी करण्यासाठी मदत करावी, असं आवाहन आफ्रिकन युनियनच्या प्रमुखांनी व्लादिमीर पुतीन यांना केलं आहे. रशियात पार पडलेल्या बैठकीत ते सहभागी झाले होते.

मॅकी सॅल आणि पुतिन

फोटो स्रोत, AFP

सोची येथे पार पडलेल्या बैठकीनंतर मॅकी सॅल म्हणाले की, "रशियन नेत्यांनी धान्य आणि खतांची निर्यात सुलभ करण्यासंदर्भात आश्वासन तर दिलं, मात्र याबद्दल पुरेशी माहिती दिलेली नाही."

युक्रेनियन बंदरांतून धान्य निर्यात करण्यात रशिया अडचणी निर्माण करत असल्याचा दावा पुतीन यांनी फेटाळला आहे. आफ्रिकेत 40% पेक्षा जास्त गहू रशिया आणि युक्रेनमधून निर्यात होतो.

मात्र जेव्हापासून युद्ध सुरू झालं आहे तेव्हापासूनचं काळ्या समुद्रातील युक्रेनच्या बंदरांवरील निर्यात मोठ्या प्रमाणावर रोखण्यात आली आहेत. युक्रेन आणि त्यांचे सहयोगी देश या नाकेबंदीसाठी रशियाला दोष देतायतं.

"जर बंदरांवरील निर्यात सुरू झाली नाही तर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होईल," असं संयुक्त राष्ट्रांचे संकट समन्वयक अमीन आवाद जिनिव्हा येथे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, धान्य टंचाईचा जगातील 1.4 अब्ज लोकांवर परिणाम होऊ शकतो. यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ शकते.

खराब हंगाम आणि असुरक्षिततेमुळे आफ्रिकेत आधीच अन्नधान्याची टंचाई आहे. या युद्धाने त्यात अजून भर घातली आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला करून 100 दिवस झाले आहेत. या काळात जगभरात अन्नधान्याच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

वर्ल्ड फूड प्रोग्रामचे प्रमुख माईक डनफोर्ड म्हणाले की, "आफ्रिकेत 8 कोटीहून अधिक लोक तीव्र अन्न असुरक्षेच्या टप्प्यात म्हणजेच तीव्र भुकेले आहेत. गेल्या वर्षी सुमारे 5 कोटींहून अधिक लोक या टप्प्यात होते. मात्र यावर्षीची ही संख्या जास्त आहे."

चाड या आफ्रिकन देशाने राष्ट्रीय अन्न आणीबाणी जाहीर केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार चाड लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकांना मदतीची आवश्यकता आहे. चाड सरकारने आंतरराष्ट्रीय मदतीसाठी आवाहन केले आहे.

सेनेगलचे अध्यक्ष मिस्टर सॅल, पुतीन यांना म्हणाले की, "आमचे देश, जरी या युद्धापासून दूर असले तरीही, या आर्थिक संकटाचे बळी ठरले आहेत" याची जाणीव ठेवावी.

रशियन फौजा

फोटो स्रोत, Reuters

ते म्हणाले की ते आशिया, मध्य पूर्व आणि लॅटिन अमेरिकेतील इतर देशांच्या वतीने बाजू मांडत आहेत.

यावर पुतिन म्हणाले की, रशिया त्याच्या नियंत्रणात असलेल्या अझोव्ह आणि काळ्या समुद्रावरील बंदरांद्वारे युक्रेनियन धान्याच्या सुरक्षित निर्यातीची हमी देण्यास तयार आहे. ते म्हणाले की, रशियाचा सहयोगी बेलारूसवरील निर्बंध उठवणे हा सर्वोत्तम उपाय असेल, जेणेकरून धान्य त्या मार्गाने पाठवता येईल.

काही विश्लेषक असा युक्तिवाद करतात की, क्रेमलिनला असं वाटतंय की वाढत्या अन्न संकटामुळे मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील अन्न-असुरक्षित देशांमधून निर्वासितांचे लोंढे युरोपकडे सरकतील. यामुळे पश्चिमेवर राजकीय दबाव येईल.

रशिया नेहमीच आफ्रिकेच्या बाजूने होती, असं वक्तव्य पुतिन यांनी शुक्रवारच्या बैठकीपूर्वी केलं. मात्र त्यांनी आफ्रिकेतील अन्न संकटाचा स्पष्टपणे उल्लेख करायचं टाळलं.

रशिया युक्रेन युद्धात कोणाची तरी एकाची बाजू घेण्याचं बर्‍याच आफ्रिकन देशांनी टाळलंय. सेनेगलने ही बाजू घेण्याचं टाळतं म्हटलंय की, अन्नधान्याचा पुरवठा हा पश्चिमेच्या निर्बंधांच्या 'बाहेर' असावा. या आठवड्याच्या सुरुवातीला मिस्टर सॅल युरोपियन कौन्सिलशी बोलले तेव्हा त्यांनी हा मुद्दा मांडल्याचं यावेळी सांगितलं.

अन्नधान्याच्या वाढत्या किंमतीसाठी पश्चिमी देश जबाबदार आहेत ही कल्पना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी मागच्या शुक्रवारी फेटाळून लावली.

"ही दरवाढ पुतिन यांच्यामुळे झाली आहे. युक्रेन आणि रशिया हे दोन्ही देश जगाचं गव्हाचं भांडार आहेत. जगभरातील अनेक खाद्यपदार्थांचे उत्पादन या धान्यापासून होतं. पण पुतिन यांच्या युद्धाच्या अट्टहासपायी अन्नधान्याच्या किंमती वाढल्या आहेत." असं ही ते म्हणाले.

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 100 :रशियाने युक्रेनचा 1/5 प्रदेश व्यापलाय - झेलेन्स्की

रशियाने युक्रेनवर आक्रमण करून आज 100 दिवस झालेत. याकाळात रशियाने युक्रेनच्या 20 टक्के प्रदेशावर ताबा मिळवल्याचं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलंय.

लक्झेमबर्गमध्ये बोलताना ते म्हणाले की, "युद्धरेषा 1000 किलोमीटर आत सरकलीये."

"यूकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी म्हटलं की रशियाच्या फौजा युक्रेनच्या सेवेरोदोन्स्क शहारावर मोठ्या प्रमाणावर हल्ले करत आहेत.

युक्रेन, रशिया

फोटो स्रोत, Reuters

यूकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी म्हटलं की या शहर जवळपास रशियाच्या ताब्यात गेलं आहे. ते रोज थोडा थोडा भाग बळकावत चालले आहेत. या शहरावर रशिया तोफगोळ्यांनी प्रचंड प्रमाणात हल्ला करतंय.

पण युक्रेनच्या सैन्य तुकड्या रशियाला प्रत्युत्तर देत आहेत, असंही झेलेन्स्की म्हणाले. "काही भागातून ते शत्रुला मागे ढकलत आहेत. अनेक जणांना ते अटकही करत आहेत."

शहराच्या रस्त्यांवर अशा लढाया होत असल्यामुळे लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत.

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 99 : 'युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवून अमेरिका युद्धात तेल ओततेय'

अमेरिकेला रशिया-युक्रेनचं युदध् थांबवायचं नाहीये असा आरोप रशियाने केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र देण्याची घोषणा दिल्यानंतर रशियाने ही प्रतिक्रिया दिली आहे.

अमेरिकेनी युक्रेनला दिलेली लांब पल्लयाची क्षेपणास्त्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेनी युक्रेनला दिलेली लांब पल्लयाची क्षेपणास्त्र

क्रेमलिनेचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटलं की, "अमेरिका जाणूनबूजून युद्धात तेलं ओतत आहे. अशा गोष्टी युक्रेनला दिल्या तर शांतता प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या विचारांवर परिणाम होऊ शकतो."

दरम्यान जर्मन सरकारनेही युक्रेनला हवेत मारा करू शकणारी शस्त्रास्त्रं देण्याचं वचन दिलं आहे. यामुळे युक्रेन रशियाच्या हल्ल्याविरूद्ध संपूर्ण शहराचं रक्षण करू शकेल असं जर्मनीचे चॅन्सलर ओलॉफ शोल्स यांनी म्हटलं.

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 98 :'15 हजाराहून जास्त युद्धगुन्हे युक्रेनमध्ये घडलेत'

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनमध्ये 15 हजारांहून जास्त युद्धगुन्हे (War crimes) घडलेत असं युक्रेनच्या चीफ प्रॉसिक्युटर इरीना व्हेनेडिक्टोव्हा यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणी 600 संशयितांची ओळख पटली आहे आणि 80 खटले दाखल झाले आहेत.

रशियाने मात्र सामान्य लोकांना लक्ष्य केल्याचा किंवा कोणत्याही प्रकारच्या युद्ध गुन्ह्यात सहभाग असल्याचा इन्कार केला आहे.

इरीना व्हेनेडिक्टोव्हा यांनी पुढे असंही म्हटलं की यातले सर्वाधिक गुन्हे पूर्वेच्या डोनाबास प्रदेशात घडले आहेत. इथे युक्रेन आणि रशियाच्या सैन्यात तुंबळ युद्ध सुरू आहे.

या कथित युद्धगुन्ह्यांमध्ये लोकांना जबरजस्ती रशियात पाठवणं, छळ, सामान्य लोकांच्या हत्या आणि सर्वसामान्यांच्या मालमत्तेचं नुकसान असे गुन्हे आहेत असं इरीना यांचं म्हणणं आहे.

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 97 : किशोरवयीन सैनिकाची कहाणी, 'तुमच्या डोळ्यादेखत मित्र मारले जातात'

मॅक्सिम लुनस्क त्याच्या वयापेक्षा मोठा दिसतो, गंभीर झालाय आणि आता हास्यविनोदही करत नाही. बीबीसी प्रतिनिधी जेरेमी बोवेन त्याला युद्ध सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी भेटले होते. त्यावेळी या 19 वर्षांच्या युवकाने त्याचं कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडलं होतं आणि सैन्यात दाखल झाला होता.

शाळकरी सैनिक

गेल्या आठवड्यात तो दोनबासच्या युद्धभूमीतून परत आला कारण त्याला त्याच्या युनिटसाठी सामान न्यायचं होतं. हा प्रवास सोपा नव्हता. रात्रीच्या वेळी तोफगोळे चुकवून, जीव वाचवत तो युक्रेनच्या मुख्यभूमी आला आणि त्याने जेरेमी बोवेन यांना भेटून सांगितलं की रशियाशी युद्ध लढण्याचा अनुभव कसा होता.

"नरकात सापडल्यासारखा अनुभव होतो तो. स्वतःला वाचवण्यासाठी तिथे काहीच नव्हतं. कधी आम्ही खंदकात लपायचो, कधी सोव्हियत काळात बांधलेल्या शेल्टर्समध्ये तर कधी एका फायर ब्रिगेडच्या बिल्डिंगमध्ये.

त्याच्या युनिटवर दिवसातून 25 वेळा तोफगोळ्यांनी हल्ला व्हायचा असं त्याने सांगितलं.

"माझ्या एका मित्राने माझ्या डोळ्यादेखत दम तोडला. 10-15 जण गंभीररित्या जखमी झाले होते."

मार्च महिन्यात त्याने बीबीसीला हसत हसत सांगितलं होतं की माझ्या आईवडिलांना कळतच नाही की सैन्याच्या गणवेशात काय करतोय.

"आता त्यांना पूर्णपणे कळलंय. ते मला मानसिक आणि आर्थिक पाठिंबा देतात. जेव्हा मला शक्य होतं मी त्यांना फोन करतो. माझ्या आईने काही गणवेश माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी पाठवले."

मॅक्सिमच्या वडिलांनी अर्धशस्त्र दलात सहभागी होण्याचा प्रयत्न केला, "पण ते 65 वर्षांचे आहेत आणि युद्ध लढण्याचं त्यांचं वय राहिलेलं नाही. त्यामुळे त्यांनी माझ्या वडिलांना सैन्यात घेतलं नाही. त्यादिवशी त्यांनी मला फोन केला आणि विचारलं की तुझ्या तुकडीत मला सहभागी घेऊन करशील का?"

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 96 : युद्धातल्या छळाच्या कहाण्या

बीबीसीच्या प्रतिनिधी कॅरोलिन डेव्हिस यांना ओलेक्झांडर गुझ यांनी आपल्या शरीरावर असलेल्या मारहाणीच्या खुणांचे फोटो दाखवले.

या जखमा रशियन सैन्याने केलेल्या मारहाणीमुळे झाल्यात असं ते म्हणतात.

"त्यांनी माझ्या डोक्यावर एक पिशवी बांधली आणि मला धमकी दिली की माझ्या शरीरातल्या किडन्या काढून घेतील."

बीबीसी खेर्सन प्रांतातल्या काही लोकांशी बोललं ज्यांनी आपला छळ झाल्याचा दावा केला होता.

युद्धातल्या छळाच्या कहाण्या
फोटो कॅप्शन, युद्धातल्या छळाच्या कहाण्या

ओलेक्झांडर खेर्सन प्रांतातल्या एका लहानशा खेड्यात राहात होते. तिथले उपसरपंच होते. ते आणि त्यांची पत्नी रशियाविरोधी होते. त्यांनी त्यांच्या गावात रशियाच्या सैन्याला येण्यापासून विरोध केला.

पण जेव्हा रशियाने त्यांच्या प्रांताचा ताबा घेतला तेव्हा रशियाचे सैनिक त्यांच्या शोधात आले.

"त्यांनी माझ्या गळ्याभोवती दोरी बांधली, आणि मनगटांनाही दोरी बांधली," ते सांगतात.

त्यांनी (सैनिकांनी) मला पाय फाकवून उभं राहायला सांगितलं असंही ते म्हणतात.

"मी जेव्हा उत्तर दिलं नाही तेव्हा त्यांनी माझ्या दोन्ही पायांच्या मध्ये फटका मारला. मी खाली पडलो, मला गुदमरल्यासारखं होत होतं. जसा मी उठायचा प्रयत्न करायचो, ते मला पुन्हा मारायचे आणि प्रश्न विचारायचे."

युद्ध सुरू झाल्यानंतर लगेचच रशियाने खार्सन प्रांताचा ताबा घेतला. युक्रेनियन टीव्ही स्टेशन्स बंद करून रशियाचे सरकारी चॅनल्स चालायला लागले. पाश्चात्य उत्पादनं बंद करून त्या जागी रशियन उत्पादनं आली.

अनेक जणांनी सांगितलं की या काळात लोक गायब व्हायला लागले.

खार्सनमध्ये नक्की काय झालं हे सांगणं अवघड आहे, रशियाने जसजशी या भागाभोवती आपली पकड आवळली, लोक बोलायला घाबरू लागले.

जे या प्रांतातून निसटू शकले त्यांनीही आपल्या फोनमधून तिथले फोटो आणि व्हीडिओ भीतीने डिलीट करून टाकले. ओलेक्झांडर यांनीही आपले फोटो परदेशात असलेल्या आपल्या मुलाला पाठवले, म्हणून ते सुरक्षित राहू शकले.

दिवस 95 : मेलिटूपोल शहरात मोठा स्फोट, तुंबळ युद्ध सुरू

मेलिटूपोल शहरात मोठा स्फोट, तुंबळ युद्ध सुरू

फोटो स्रोत, AFP

मेलिटूपोल शहराच्या रशियाने नेमलेल्या प्रमुखांनी म्हटलं ती शहराच्या दक्षिण-पूर्व भागात एक मोठा स्फोट झाला आहे.

शहराच्या वरती धुराचे मोठेच्या मोठे ढग दिसत आहे. सोमवारी, 30 मेला सकाळी हा स्फोट झाल्याचं म्हटलं जातंय.

या स्फोटामुळे अनेक रस्त्यांवरच्या खिडक्या आणि भिंती हादरल्या असं मेलटूपोल शहराचे प्रमुख व्लादिमीर रोगोव्ह यांनी टेलिग्राम मेसेजिंग अॅपवर जाहीर केलेल्या संदेशात म्हटलं.

काही बातम्यांनुसार हा स्फोट अशा भागात झाला जिथे रशियाने नेमलेले 'झापोरीझाझीया भागाचे प्रमुख' येवजेंनी बाल्टिस्की राहातात.

या शहराचा ताबा रशियाने फेब्रुवारी महिन्यात घेतला असता तरी तिथे आजही तुंबळ युद्ध सुरू आहे.

दिवस 94 : सेव्हेरोडोनेत्स्क शहर युक्रेनच्या ताब्यातून जाण्याची शक्यता

युक्रेनच्या पूर्वेकडील सेव्हेरोडोनेत्स्क हे मोठं शहर युक्रेनच्या ताब्यातून रशियाकडे जाण्याची शक्यता आहे.

पूर्व युक्रेनवर रशियाचा जोरदार हल्ला

फोटो स्रोत, Getty Images

सेव्हेरोडोनेत्स्क शहराला रशियन सैन्याने सगळ्या बाजूंनी वेढलं आहे. त्यामुळे युक्रेन सैन्य या शहरातून माघार घेऊ शकतात, अशी माहिती एका युक्रेनियन अधिकाऱ्याने दिली.

लुहान्स्कचे गव्हर्नर सेरही हैदाई याविषयी सांगताना म्हणाले, रशियन लोकांनी शहराला वेढा घातल्याने येथून आम्हाला निघून जावे लागेल."

रशियाने संपूर्ण पूर्व डोनबास प्रांत ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरुवातीपासूनच सुरू केल्या होत्या.

रशियाच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी युक्रेनने अमेरिकेकडे लांब पल्ल्याच्या शस्त्रांची मागणी केली होती. पण अमेरिकेकडून अद्याप त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.

दिवस 93 : युक्रेनमधील 1 कोटी 30 लाख नागरिकांनी घर सोडलं

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेनमधील जवळपास 1 कोटी 30 लाख लोकांनी आपलं घरदार सोडल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) दिली आहे.

60 लाखांहून अधिक लोकांनी शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे. तर 80 लाख लोक युद्धग्रस्त देशातच विस्थापित झालेत.

हे निर्वासित कुठे जातायत?

युक्रेनचे नागरिक आजही शेजारील देशांमध्ये आश्रय घेत आहेत. पण निर्वासितांचा लोंढा पश्चिमेकडील देशात जास्त आहे.

संयुक्त राष्ट्रांनी सांगितल्याप्रमाणे, 24 मे अखेर 66 लाख नागरिकांनी युक्रेन सोडलं आहे.

युक्रेन

फोटो स्रोत, Reuters

पोलंडमध्ये 3,544,995 निर्वासितांनी आश्रय घेतला आहे. रोमानियात 9 लाख72 हजार 203, रशियात 9 लाख 45 हजार 7,

हंगेरीमध्ये 6 लाख 54 हजार 664, मोल्दोव्हा 4 लाख 73 हजार 690, स्लोव्हाकिया 4 लाख 46 हजार 755 तर बेलारुसमध्ये 12 मे पर्यंत 27 हजार 308 नागरिकांनी आश्रय घेतला. (मोल्दोव्हाहून रोमानियापर्यंत प्रवास केलेल्या लोकांना दोन्ही देशांच्या आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलं आहे).

युरोपियन युनियनच्या शेंजेन या भागासह पोलंड, हंगेरी आणि स्लोव्हाकिया या देशांच्या अंतर्गत सीमांवर कोणतंही नियंत्रण नाही. त्यामुळे या देशांमध्ये आलेल्या अनेक निर्वासितांनी नंतर इतर देशात आश्रय घेतला.

चेक रिपब्लिकने युक्रेनियन निर्वासितांसाठी 350,000 हून जास्त इमर्जन्सी व्हिसा मंजूर केले आहेत.

700,000 हून अधिक युक्रेनियन जर्मनीमध्ये आहेत. त्यांपैकी सुमारे 40% मुलं आहेत.

काही युक्रेनियन निर्वासितांनी पूर्वेकडील लुहान्स्क आणि डोनेस्तक या रशियन समर्थक भागातून रशिया गाठलं आहे.

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणतात की रशियन सैन्याने मारियुपोलमधून 140,000 नागरिकांना बाहेर पडण्यास मदत केली आहे. मात्र रशियामध्ये आश्रय घ्यावा म्हणून कोणावरही जबरदस्ती करण्यात आलेली नाही.

पण, रुबिकस आणि हेल्पिंग टू लीव्ह सारख्या स्वयंसेवक गटांचं म्हणणं आहे की, त्यांनी रशियामध्ये आश्रय घेतलेल्या शेकडो युक्रेनियन लोकांना रशियातून बाहेर पडून इतर देशांमध्ये आश्रय घेण्यासाठी मदत केली आहे.

या देशांमधून निर्वासितांना कोणत्या प्रकारची मदत मिळत आहे?

युरोपियन युनियनने युक्रेनियन लोकांना त्यांच्या 27 सदस्य देशांपैकी कोणत्याही देशात तीन वर्षांपर्यंत राहण्याचे आणि काम करण्याचे अधिकार दिले आहेत.

युक्रेन

फोटो स्रोत, Getty Images

जर निर्वासित त्यांच्या मित्रमंडळी किंवा नातेवाईकांसोबत राहू शकत नसतील तर त्यांना रिसेप्शन सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. तिथे त्यांना अन्न आणि वैद्यकीय सेवा आणि पुढील प्रवासाची माहिती दिली जाते.

त्यांना सामाजिक कल्याण निधी आणि निवास, वैद्यकीय उपचार आणि शाळांमध्ये प्रवेशाचा हक्क देण्यात आला आहे.

पोलंडमध्ये निर्वासितांची संख्या सर्वाधिक आहे. तर मोल्दोव्हा मध्ये निर्वासितांची संख्या तिथल्या लोकसंख्येहून अधिक आहे. या दोन्ही राष्ट्रांनी त्यांच्या या प्रयत्नांसाठी आंतरराष्ट्रीय समर्थनासह निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

निर्वासितांपैकी किती जण युक्रेनमध्ये परतलेत ? संयुक्त राष्ट्रसंघाच्या मते 24 मे पर्यंत 21 लाख युक्रेनियन युक्रेनमध्ये परतलेत. युक्रेनियन सीमा दलाच्या म्हणण्यानुसार, दिवसाला सुमारे 30,000 लोक युक्रेनमध्ये परतत आहेत.

यातील बहुतांश लोक युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्ह मध्ये आश्रय घेत आहेत. युद्धाच्या सुरूवातीला रशियन सैन्यामुळे या शहरात धोका निर्माण झाला होता. पण आता हे शहर अधिक सुरक्षित मानलं जात आहेत.

कीव्हचे महापौर विटाली क्लिट्स्को म्हणतात की, शहराची लोकसंख्या युद्धाच्या आधी जेवढी होती त्यातल्या दोन तृतीयांश पर्यंत परत आली आहे.

युक्रेनमध्ये राहिलेल्या लोकांनी कुठे आश्रय घेतला?

संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM) ने मे महिन्याच्या सुरुवातीला सांगितलं की, 80 लाखांहून अधिक लोक देशांतर्गत विस्थापित झालेत.

युक्रेन

फोटो स्रोत, EPA

इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनच्या म्हणण्यानुसार, 23% निर्वासित हे खारकीव्ह मधील आहेत, तर 20% लोक कीव्ह मधील तर 17% पूर्व युक्रेनमधील डोनेस्तक प्रदेशातील आहेत.

युद्धग्रस्त भागातील 27% लोकांनी त्यांचं नुकसान झाल्यामुळे, त्यांच्यावर हल्ले झाल्यामुळे स्वतःच घरदार सोडलं.

विस्थापित झालेल्या लोकांपैकी अर्ध्याहून अधिक महिला असाव्यात असा अंदाज आहे. यातील बऱ्याच जणी गर्भवती आहेत, काही अपंग आहेत तर काही हिंसाचाराला बळी पडल्या आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघ समाजसेवी संस्थांसोबत मिळून या लोकांना अन्न, पैसे आणि इतर गोष्टींचा पुरवठा करीत आहे.

युक्रेनियन निर्वासितांना मदत करण्यासाठी यूकेने काय केलंय?

ज्या युक्रेनियन लोकांच्या कुटुंबातील सदस्य यूकेमध्ये राहत आहेत त्यांच्यासाठी युकेने फॅमिली व्हिसा योजना सुरू केली होती.

पण त्यानंतर सरकारच्या या योजनेवर टीका झाली. त्यानंतर ज्यांचे यूकेमध्ये नातेवाईक नाहीत त्यांना स्थायिक होण्याची परवानगी देण्यासाठी होम्स फॉर युक्रेन ही योजना सुरू केली.

या योजनेंतर्गत युकेमधील लोक युक्रेनियन कुटुंब किंवा एखाद्या व्यक्तीला त्यांच्याबरोबर किमान सहा महिने विनाभाडे तत्वावर राहायला देतील.

या योजनेद्वारे युकेमध्ये येणारे निर्वासित तीन वर्षांपर्यंत राहण्यास आणि काम करण्यास सक्षम असतील. त्यांना युकेमधील आरोग्य सेवा, योजनांचा लाभ घेता येईल. शाळांमध्ये प्रवेश घेता येईल.

यासाठी अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन असते. यातील मालक आणि निर्वासित दोघांचीही तपासणी केली जाते. घरमालकाला सरकारकडून महिन्याला 350 युरो मिळतात.

यातल्या बऱ्याच घरमालकांनी ही प्रक्रिया अतिशय संथ आणि गुंतागुंतीची असल्याची तक्रार केली आहे.

24 मे अखेर पर्यंत, 135,600 अर्जांपैकी 115,000 युक्रेनियन लोकांना व्हिसा देण्यात आला असून, 23 मे पर्यंत 60,100 व्हिसाधारक यूकेमध्ये आले आहेत.

दिवस 92 : रशिया - युक्रेन युद्धामुळे जगभरात मंदी येईल - जागतिक बँक

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जगभरात वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. अन्न, ऊर्जा साधनं आणि खतांच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे येत्या काळात जगभरात मंदी येण्याची भीती जागतिक बँकेनं व्यक्त केली आहे.

जागतिक मंदी

फोटो स्रोत, EPA

त्यातच रशियाने युक्रेनच्या पूर्व भागातल्या 40 छोट्या-मोठ्या शहरांवर ताबा मिळवल्याचा दावा युक्रेननं केला आहे. त्यातच रशियाने ताब्यात घेतलेल्या भागातल्या युक्रेनच्या नागरिकांना सहजरित्या रशियान नागरिक होण्यासाठीच्या कायद्यावर व्लादिमिर पुतिन यांनी हस्ताक्षर केले आहेत.

शिवाय रशियानं त्यांच्या सैनिकांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ केली आहे.

दिवस 91: पूर्व युक्रेनवर रशियाचा जोरदार मारा

रशियाने युक्रेनमधील सेवरोडनट्स्क आणि लेसेशांस्क या शहरांवर जोरदार मारा सुरू केला आहे. जर या शहरांवर ताबा मिळवला तरं रशियाचं लुहान्स्क प्रांतावर नियंत्रण मिळवण्याचं लक्ष्य जवळपास साध्य होईल.

युद्ध थांबवण्याच्या दिशेने रशियाकडून कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.

रशियानं युक्रेनच्या तिन्ही बाजूंनी हल्ला चढवला असून गेल्या काही काळापासून पूर्वे भागात हल्ले वाढवले आहेत.

युद्धाला विरोध करत रशियन दुताचा राजीनामा

फोटो स्रोत, BORIS BONDAREV

फोटो कॅप्शन, बोरिस बोन्दारेव

दिवस 90: भाग युद्धाला विरोध करत रशियन दुताचा राजीनामा

रशियाच्या एका राजनयिक अधिकाऱ्याने पुतीन यांनी युक्रेनवर युद्ध लादण्याच्या 'मूर्ख' आणि 'रक्तरंजित' निर्णयाला विरोध करत राजीनामा दिला आहे.

बोरिस बोन्दारेव असं त्यांचं नाव असून त्यांच्या लिंकडिन प्रोफाईलवरील माहितीनुसार ते रशियाचे जीनिव्हास्थित यूएनमध्ये दूत आहेत. आता या निर्णयानंतर क्रेमलिन आपल्याला गद्दार म्हणेल असं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

अशी शक्यता असली तरी ते आपल्या विधानावर ठाम आहेत. या युद्धाला त्यांनी युक्रेनी नागरिकांविरोधात केलेला गुन्हा असं संबोधलं असून यावर रशियातले लोक बोलत नसल्याची खंतही व्यक्त केली आहे.

बोरिस यांच्या या निर्णयाबद्दल रशियन सरकारने अद्याप काहीही मत व्यक्त केलेले नाही.

दिवस 89: भूभाग सोडण्यास युक्रेनचा नकार

आपला भूभाग सोडून जाण्याचा उल्लेख असलेला रशियासोबतचा युद्धविराम करार मान्य नसल्याचं युक्रेनच्या सरकारनं म्हटलं आहे.

रशिया- युक्रेन युद्ध केवळ मुत्सद्देगिरीनं सोडवलं जाऊ शकतं, असं एका दिवसापूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता त्यांनी अशी कडक भूमिका घेतली आहे.

यामुळे रशियन आक्रमण आणखी मोठं आणि रक्तरंजित होईल, असं राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार मायखायलो पोडोल्याक यांनी म्हटलंय.

रशियाने पूर्वेकडील सेव्हेरोडोनेत्स्कचे रक्षण करणाऱ्या युक्रेनियन सैन्याला वेढा घालण्याचा प्रयत्न सुरू ठेवल्यानंतर त्यांची ही प्रतिक्रिया आली आहे.

दुसर्‍या घडामोडीत, पोलंडचे अध्यक्ष आंद्रेज डुडा हे कीव्हमधील संसदेला वैयक्तिकरित्या संबोधित करणारे पहिले विदेशी नेते ठरले आहेत.

केवळ युक्रेनियन लोकच त्यांचे भविष्य ठरवू शकतात, असं त्यांनी जाहीर केल्यानंतर त्यांना सभागृहात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

झेलेन्स्की आणि डुडा यांची भेट

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, झेलेन्स्की आणि डुडा यांची भेट

युक्रेनला युरोपियन यूनियनमध्ये सामील होण्यासाठी पोलंड सर्वतोपरी मदत करेल, असंही त्यांनी नमूद केलं.

असं असलं तरी फ्रान्सचे युरोपमधील मंत्री क्लेमेंट ब्यूने यांनी रविवारी एका रेडिओ मुलाखतीत सांगितलं की, युक्रेनला युरोपियन यूनियनचा सदस्य म्हणून स्वीकारण्यासाठी कदाचित 15 किंवा 20 वर्षे लागतील.

दिवस 88: लुहान्स्कची सीमा गाठण्याचा रशियाचा प्रयत्न

यद्ध चालू असताना युक्रेनियन सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफनं आपल्या दैनंदिन अपडेटमध्ये सांगितलंय की, रशियन सैन्याने देशाच्या पूर्वेकडील लुहान्स्क प्रदेशातील प्रशासकीय सीमा गाठण्यासाठी युक्रेनियन संरक्षण तोडण्याचा प्रयत्न केला.

लुहान्स्कचे प्रादेशिक गव्हर्नर सेर्ही हैदाई म्हणाले की, "रशियाने चार वेगवेगळ्या दिशांनी सेवेरोडोनेत्स्कमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता."

युक्रेन, रशिया

फोटो स्रोत, Reuters

टेलिग्राम मेसेजिंग अॅपवर लिहिताना ते म्हणाले की, रशियाचा प्रयत्न अयशस्वी झाले आहे. पण निवासी भागांवर गोळीबार सुरूच आहे.

ते पुढे म्हणाले की, शहराला जवळच्या लिसिचान्स्कशी जोडणारा पूल या हल्ल्यात नष्ट झाला आहे.

असं असलं तरी बीबीसी स्वतंत्रपणे या दाव्यांची पडताळणी करू शकलं नाहीये.

दिवस 87: मारियुपोल जिंकण्यात यशस्वी झाल्याचा रशियाचा दावा

युक्रेनचं शहर मारियुपोल जिंकण्यासाठी अनेक महिने चाललेल्या लढाईत यशस्वी झाल्याचं रशियानं म्हटलं आहे.

शहराच्या अझोव्हत्सल स्टील प्लांटचे रक्षण करणाऱ्या शेवटच्या सैनिकांनीही आता आत्मसमर्पण केलं आहे, असं मॉस्कोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अझोव्हत्सल प्लांट हा युक्रेनमधील सर्वांत मोठ्या स्टील प्लांटपैकी एक आहे.

हे सैनिक रशियाला मारियुपोल शहरावर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित करण्यापासून अनेक महिने रोखत होते.

अझोव्हत्सल प्लांट

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, अझोव्हत्सल प्लांट

शुक्रवारच्या त्यांच्या समर्पणानंतर युद्धातील सर्वांत विनाशकारी वेढा संपल्याचं समोर आलं आहे. मारियुपोल आता पूर्णपणे उध्वस्त झालं आहे.

531 युक्रेनियन सैन्यानं ही साईट सोडल्यानंतर शहर आणि स्टील प्लांट आता 'पूर्णपणे मुक्त' झाला आहे, असं रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

जिथे हे सैन्य लपले होते, तो भाग रशियन सशस्त्र दलांच्या पूर्ण नियंत्रणाखाली आल्याचंही मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलंय की, शेवटच्या उर्वरित सैन्य तुकडीला ही साईट सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

"आज त्यांना लष्करी कमांडकडून स्पष्ट संकेत मिळाला की, ते बाहेर पडू शकतात आणि त्यांचे प्राण वाचवू शकतात," असं झेलेन्क्सी यांनी शुक्रवारी युक्रेनियन टेलिव्हिजन वाहिनीला सांगितलं.

अनेक आठवड्यांपासून अझोव्हत्सल साइट रशियन सैन्यानं पूर्णपणे वेढली गेली होती.

युक्रेन, रशिया

फोटो स्रोत, Reuters

रशियन सैन्यानं तिथं सर्वप्रकारच्या मदतीला प्रवेश करण्यापासून रोखलं आणि हवेतून साइटवर बॉम्बवर्षाव केला. तसंच उर्वरित सैन्याला त्यांची शस्त्रे खाली ठेवण्याची मागणी केली.

आत अडकलेल्यांमध्ये महिला, मुले आणि वृद्धांसह अनेक नागरिक होते. या महिन्याच्या सुरूवातीस यूएन आणि रेड क्रॉस यांच्यात काही आठवडे चाललेल्या वाटाघाटीनंतर त्यांना पूर्णपणे बाहेर काढण्यात आले.

पण, साइटच्या शेवटच्या बचावकर्त्यांनी शरणागती पत्करण्यास सतत नकार दिल्यानं रशियाला मारियुपोल या धोरणात्मक बंदर शहरावर पूर्ण नियंत्रण ठेवता आलं नव्हतं.

दुसरीकडे अझोव्हत्सल बचावासाठी लढणारे लोक युक्रेनियन नागरिकांसाठी राष्ट्रीय नायक ठरले आहेत.

दिवस 86: 'रशियाने डोनबास भाग संपूर्णपणे उद्धवस्त केला'

रशियाने डोनबास भाग संपूर्णपणे उद्धवस्त केल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलिन्सिकी यांनी काल दिली.

तिथे नरकासारखी परिस्थिती आहे आणि यात अजिबात अतिशयोक्ती नाही, असंही ते पुढे म्हणाले.

तसंच अमेरिकेच्या संसदेने युक्रेनसाठी 40 बिलियन डॉलरची मदत केली आहे.

रशियाने आक्रमण केल्यापासून ही सगळ्यात मोठी मदत आहे. फिनलंड आणि स्वीडन ने नाटो च्या सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे. त्यालाही पाठिंबा असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सांगितलं.

दिवस 85: रशिया युक्रेन मुळे जगभरात अन्नसंकटाचा धोका- संयुक्त राष्ट्र

रशिया-युक्रेन युद्धामुळे येणाऱ्या काही महिन्यांत जगाला अन्न संकटाला सामोरं जावं लागू शकतं, असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे.

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटलं की, या युद्धानं अन्न संकटाची समस्या अधिक बिकट केलीये. धान्याच्या किमती वाढल्या आहेत आणि त्याचा परिणाम गरीब देशांवर अधिक होतोय.

आपल्या संबोधनात भूकबळींचा इशारा देताना त्यांनी म्हटलं, "युक्रेनकडून होणारी अन्नधान्याची निर्यात ही युद्धापूर्वी ज्या प्रमाणात व्हायची, त्या प्रमाणात झाली नाही तर जगाला कित्येक वर्षांपर्यंत भूकबळींचा सामना करावा लागेल.

रशियानं केलेल्या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील अनेक बंदरांचं नुकसान झालं आहे. त्याचाच परिणाम अन्नधान्याच्या निर्यातीवर झाला आहे.

युक्रेन मोठ्या प्रमाणावर खाद्य तेल, मका, गहू आणि इतर धान्यांची निर्यात करतो. युक्रेनमधून होणारी निर्यात घटल्यामुळे या अन्नधान्याच्या जागतिक साठ्याचं प्रमाण कमी झालंय. या गोष्टींना पर्याय ठरू शकणाऱ्या पदार्थांच्या किमती वाढल्या आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, धान्यांच्या जागतिक किमतींमध्ये यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत 30 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

दिवस 84 : मारियोपोलमध्ये अद्यापही अडकलेल्या सैन्याला प्रयत्न सुरूच

मारियोपोलमध्ये अडकलेल्या सैन्याला वाचवण्यासाठी रशिया निकराचे प्रयत्न करत आहे असं एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

संरक्षण उपमंत्री हन्ना मलियार म्हणाले की तिथे किती सैन्य अडकले आहेत याची माहिती युक्रेनकडे आहे मात्र ती संवेदनशील माहिती असल्याने सांगता येणार नाही.

सोमवारी (16 मे) गंभीर जखमी झालेल्या 264 सैनिकांना तेथून बाहेर काढण्यात आलं आणि रशियाचं वर्चस्व असलेल्या भागात नेण्यात आलं.

युक्रेन, रशिया

फोटो स्रोत, Reuters

मंगळवारी आणखी सात बसेस भरून सैनिकांना नेण्यात आल्याची बातमी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.

त्यानंतर हा ताफा पूर्व डोनबास भागात आला. रशियन प्रशासनाने सांगितलं की ते सगळ्या सैनिकांची चौकशी करतील. मात्र रशियन युद्धकैद्यांच्या मोबदल्यात युक्रेनला हे सैनिक परत हवे आहेत.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला रशियाने तिथे मारियोपोल शहरावर आक्रमण करायला सुरुवात केली. तेव्हापासून अनेक शेकडो सैन्य तिथे अडकले आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीला अनेक नागरिकांना तेथून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं होतं.

दिवस 83: मारियोपोलमध्ये युक्रेन सैन्याची मोठी वाताहत

मारियोपोल मध्ये रशियन सैन्याने त्यांचं मिशन पूर्ण केल्याची घोषणा केली आहे. अझोव्हत्सल स्टील प्लँटमधील सैन्याने आत्मसमपर्मण केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मारियोपोल मध्ये महिनोंमहिने चाललेल्या संघर्षाला पूर्णविराम लागण्याची चिन्हं आहेत. या स्टील प्लँटमध्ये रशियन सैन्याने निकराचा लढा दिला मात्र तो व्यर्थ ठरला. या हल्ल्यात 53 सैनिक जखमी झाले आहेत.

काही सैन्य अद्यापही तिथे अडकल्याची माहिती युक्रेनने दिली आहे.

किमान 260 सैनिकांना तिथून काडण्यात आलं आहे आणि रशियाचा ताबा असलेल्या ठिकाणी घेऊन गेले. रशियन कैद्यांच्या बदल्यात युद्धकैदी म्हणून तिथे नेलं जाणार आहे.

पाश्चिमात्य सैन्याच्या मते पुतीन आता युद्धात रोज लक्ष घालत आहे. जे निर्णय कनिष्ठ अधिकारी घेतात, ते आता पुतीन घेत आहेत.

दिवस 82:रशियानं युक्रेनवरील आक्रमणाची आखलेली योजना यशस्वी होणार नाही - नाटो

रशियानं युक्रेनवरील आक्रमणाची आखलेली योजना यशस्वी होणार नाही, असं नाटोनं म्हटलं आहे.

नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी म्हटलंय की, "युक्रेनमधील रशियाचे युद्ध नियोजित नाही आणि पूर्व डोनबास प्रदेश काबीज करण्याचा त्यांचा प्रयत्न ठप्प झाला आहे."

जेन्स स्टोल्टनबर्ग असेही म्हणाले की, युक्रेन हा संघर्ष जिंकू शकतो.

ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाचा (एमओडी) अंदाज आहे की, फेब्रुवारीमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने आपल्या जमिनीवरील सैन्यापैकी एक तृतीयांश कुमक गमावली आहे.

युक्रेनच्या जोरदार प्रतिकारामुळे रशियन आक्रमणास अडथळा निर्माण झाला आहे. त्याचे सुरुवातीचे उद्दिष्ट संपूर्ण देश काबीज करणे आणि युक्रेनियन सरकार पाडणे हे असल्याचं दिसून आलं होतं.

युक्रेनची राजधानी कीव्ह ताब्यात घेण्यात अपयश आल्यामुळे रशियानं त्या भागातून माघार घेतली आहे. रशियानं एप्रिलच्या मध्यापासून पूर्वेकडील दोन प्रांतांवर आपले लक्ष केंद्रित केलं आहे.

युक्रेनच्या दुसऱ्या शहरात खारकीव्हमध्ये रशियन सैन्याने सीमेवरून माघार घेतली आहे आणि रहिवासी परतत आहेत, असं अधिकारी सांगत आहेत.

"युक्रेनमधील रशियाचे युद्ध मॉस्कोनं ठरवल्याप्रमाणे होत नाही," असं स्टोल्टनबर्ग म्हणाले.

"ते कीव्ह घेण्यास अयशस्वी झाले आहेत. ते खारकीव्हच्या भागातून माघार घेत आहेत. डोनबासमधील त्यांचं मोठं आक्रमण थांबलं आहे. रशिया आपलं धोरणात्मक उद्दिष्टं साध्य करताना दिसत नाहीये," नाटोच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत स्टोल्टनबर्ग बोलत होते.

दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे नाटोला रशियाच्या सुरक्षेसाठी धोका म्हणून पाहत आले आहेत. तसंच त्यांनी नाटोमध्ये सामील होण्यापासून रोखण्यासाठी युक्रेनवर आक्रमण केले आहे.

दिवस 81: युक्रेनची नाकेबंदी हा रशियाने हेतूपुरस्सरपणे केलेला कट - वोलोदिमीर झेलेंस्की

युक्रेनची नाकेबंदी हा रशियाने हेतूपुरस्सरपणे केलेला कट आहे. रशियाकडून शस्त्र म्हणून अन्न संकाटाचा वापर करण्यात येत आहे, असा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी केला आहे.

शुक्रवारी सायंकाळी राष्ट्राला संबोधून केलेल्या भाषणात झेलेंस्की यांनी रशियावर सडेतोड शब्दांत टीका केली.

वोलोदिमीर झेलेंस्की

फोटो स्रोत, President of Ukraine

फोटो कॅप्शन, वोलोदिमीर झेलेंस्की

युक्रेनने युद्ध सुरू होण्यापूर्वी जगातल्या देशांना मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादनांची निर्यात केली होती. आता जगात अन्न संकट निर्माण होण्याचा इशारा रशियन अधिकाऱ्यांकडून दिला जात आहे. जगात अराजकता माजण्यासाठीच युक्रेनची नाकेबंदी केली जात आहे, असं झेलेंस्की म्हणाले.

दिवस 80:संयुक्त राष्ट्र रशियाने केलेल्या नरसंहाराची चौकशी करणार

फिनलँडच्या नेत्यांनी नाटोचं संरक्षण मिळावं यासाठी तातडीने अर्ज करावा अशी मागणी केली आहे. असं केलं तर रशियालाही कारवाई करावी लागेल अशी धमकी रशियाने दिली आहे.

दरम्यान रशियाने युक्रेनमध्ये जो मानवसंहार केला आहे त्याची चौकशी करण्याचा ठराव संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार समितीने मंजूर केला आहे. तसंच, अमेरिकेच्या चार खासदारांनी यूट्यूब, टिक टॉक, ट्विटर, आणि फेसबुक च्या सीईओंना विनंती करण्यात आली आहे की रशियाने केलेल्या अत्याच्याराचे पुरावे जतन करावेत. जेणेकरून ते रशियाच्या विरुद्ध भविष्यात वापरता येतील.

रशिया युक्रेन

फोटो स्रोत, Getty Images

रशियन फौजांकडून खारकीव्हचा उत्तर आणि उत्तर पूर्व भाग परत मिळवल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियन फौजांना सीमेवर परत पाठवल्याचा दावाही युक्रेनने केला आहे. यामुळे युद्धाचं चित्र पूर्णपणे पालटू शकतं आणि रशियाचे मनसुबे उधळले जाऊ शकतात. बीबीसी प्रतिनिधी क्वेंटिन सोमरव्हिले युक्रेनियन फौजांबरोबर असून या घडामोडी अनुभवत आहेत.

रशिया खारकीव्हवर सातत्याने हल्ले करत आहे. तिथे सध्या पाणी, खाद्यपदार्थ, इंटरनेट या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. ते इथले लोक शहरापासून दुरावले आहेत.

रशियन सैन्याला पिटाळून लावण्याठी युक्रेनचे सैन्य कसोशीने प्रयत्न करत आहेत.

दिवस 79:पुतिन यांची दीर्घकालीन युद्धाची तयारी

व्लादीमिर पुतीन दीर्घकालीन युद्धाची तयारी करत आहेत अशी माहिती काल अमेरिकेच्या गुप्तचर खात्याने दिली हे. त्यामुळे पूर्वेकडे चालणारं युद्ध इतक्यात संपण्याची चिन्हं नाहीत.

सध्या रशिया पूर्व भागात तुफान हल्ले करत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही माहिती समोर आली आहे. रशियाने डोनबास भागावर ताबा मिळवण्याचा पुन्हा प्रयत्न सुरू केला आहे.

तरीही सध्या जैसे थे स्थिती आहे अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.

फेब्रुवारी महिन्यात हल्ले सुरू करण्यापूर्वी रशियाचे सैनिक ज्या स्थितीत होते परत जाणार असतील तरच वाटाघाटी स्वीकारू असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.

बीबीसी प्रतिनिधी फ्रँक गार्डनर यांनी झेलेन्स्की यांना वाटाघाटींसंदर्भात विचारलं तेव्हा ते म्हणाले, "23 फेब्रुवारीला रशियाचं सैन्य जिथे होतं तिथे त्यांनी परत जावं".

असं होण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान डावपेचात्मक पातळीवर चर्चा होणं आवश्यक आहे. आम्ही चर्चेचे सगळे मार्ग बंद केलेले नाहीत. झेलेन्स्की यांनी क्रीमियाचा उल्लेख केला नाही. 2014मध्ये रशियाने क्रीमियावर कब्जा केला होता. झेलेन्स्की यांचा शांततेच्या मार्गाचा स्वीकार रशियाच्या क्रीमियावरील नियंत्रणाला मान्यता दिल्यासारखं आहे.

युक्रेनमधल्या दोनेत्स्क आणि लुहान्स्क या प्रदेशांसाठी नेमकं काय बदलेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मारियुपोलसंदर्भात झेलेन्स्की म्हणाले, "तिथे केवळ लष्करी हल्ला झालेला नाही. लोकांना क्रूर पद्धतीने वागवलं जात आहे".

युक्रेनच्या दोनेत्स्क आणि लुहान्स्कच्या पूर्वेकडे रशियाचे हल्ले सातत्याने सुरू आहेत. येथील अझोवस्तल प्लांटचा ताबा घेण्याचा रशिया प्रयत्न करत आहे, असा आरोप युक्रेन प्रशासनाने केला आहे.

अझोवस्तल परिसर लोह आणि स्टीलच्या प्रकल्पांचा परिसर म्हणून ओळखला जातो. युक्रेन सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफने याबाबत एक अहवाल दिला आहे.

रशियन सैन्याने सुरुवातीला मारियोपोल भागावर आक्रमण केलं होतं. यानंतर अझोवस्तल भागात रशियाकडून युक्रेनची नाकेबंदी सुरू करण्यात आली होती. रशियाने अझोवस्तल प्लांटवर ताबा मिळवण्यासाठी हल्ले सुरू केले आहेत, असं युक्रेनने म्हटलं आहे.

रशियन सैन्याने काही दिवसांपूर्वी युक्रेनच्या पूर्व भागातील दोनेत्स्क आणि लुहान्स्क प्रांतांकडे आपलं लक्ष केंद्रीत केलं होतं.

युक्रेन

येथील परिसरावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न रशियाकडून सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी रशिया आपली हवाई संरक्षण प्रणाली तयार करत होता. रशियन सैनिकांकडून युक्रेनच्या तब्बल 400 वैद्यकीय ठिकाणांवर हल्ले करण्यात आले, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, आपण सुमारे 300 रशियन सैनिकांना जखमी केल्याचा दावाही युक्रेनने केला आहे. या सैनिकांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं.

रशिया-युक्रेन

युक्रेनियन सैन्याने दोनेत्स्कच्या लायमन शहराच रशियन ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यात हे सैनिक जखमी झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या माहितीची पडताळणी बीबीसी स्वतंत्रपणे करू शकलेलं नाही.

संयुक्त राष्ट्र संघाकडून बचावसत्र सुरू

रशिया-युक्रेन युद्धात होरपळणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचं बचावसत्र संयुक्त राष्ट्र संघटनेकडून सुरू आहे. मारियोपोल आणि परिसरात अडकलेल्या 500 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं.

येत्या काही काळात तिसरं बचावसत्र सुरू केलं जाणार आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आणीबाणी विभागाचे प्रमुख मार्टिन ग्रिफिथ्स यांनी सांगितलं.

रशियन लोक आम्हाला मारू शकतात पण आम्हीही त्यांना जिवंत सोडणार नाही- झेलेन्स्की

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की युरोपीय देशांवर आरोप लावताना म्हणाले की, "जे देश अजुनही रशियाकडून तेल खरेदी करत आहेत ते लोकांच्या रक्तातून मिळालेल्या पैशातून कमाई करत आहेत."

बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी जर्मनी आणि हंगेरीवर टीका केली. ते म्हणाले की, त्यांच्यामुळे रशियावर तेल खरेदीसाठी लागलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी अडचणी येत आहेत. या निर्यातीमुळे रशियाला या वर्षी 326 अरब डॉलरचा फायदा होऊ शकतो, असं ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांत जर्मनीच्या नेत्यांबद्दल युक्रेनच्या नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. जर्मनीने रशियावर घातलेल्या निर्बंधांचं स्वागत केलं आहे मात्र तेल खरेदीबाबत कडक पावलं उचलण्याचं पूर्णपणे समर्थन केलेलं नाही.

युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये एका सिच्युएशन रुममध्ये गुरुवारी (14 एप्रिल) झेलेन्स्की म्हणाले, "आमच्या काही मित्र देशांना ही बाब समजली आहे की काळ आता आधीसारखा राहिलेला नाही. आता हे प्रकरण पैशाचं नाही. हा अस्तित्वाचा संघर्ष आहे."

रशियाला कठोर प्रत्युत्तर देता यावं यासाठी युक्रेनला अधिकाधिक शस्त्रास्त्रं देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार झेलेन्स्की यांनी केला आहे.

ते म्हणाले, "अमेरिका, ब्रिटन आणि अन्य काही युरोपीय देश आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मदत करतही आहेत. मात्र आम्हाला लवकरात लवकर आणखी मदतीची गरज आहे."

रशिया-युक्रेन युद्धामुळे 'या' वस्तू महागणार

केवळ पाश्चात्य निर्बंधांमुळेच नव्हे तर युक्रेनवरील रशियन हल्ल्यांमुळे तसंच पुरवठा साखळीच्या समस्या इत्यादी कारणांमुळे कमॉडिटी मार्केटमध्ये वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर त्या भागातील धातू आणि धान्यांचा पुरवठा खंडित झालाय. अनेक पाश्चात्य देशांनी आधीच रशियन तेल आणि वायू आयातीवर निर्बंध लादले आहेत.

खरंच, रशिया आणि युक्रेनची जगातील कमॉडिटी मार्केटमध्ये मोठी धोरणात्मक भूमिका आहे.

दोन्ही देश मूलभूत कच्च्या मालाचे प्रमुख निर्यातदार आहेत. गहू, तेल, वायू, कोळसा यांच्या व्यतिरिक्त ते इतर मौल्यवान धातूंचे मोठे पुरवठादार आहेत.

मात्र रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे या वस्तूंचा पुरवठा खंडित होत आहे. यामुळे कोव्हिडमधून सावरत असलेल्या जगाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झालीये.

तरीही अशा चार गोष्टी आहेत, ज्यांचा पुरवठा दीर्घकाळ खंडित झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेला अडचणी येऊ शकतात.

तज्ज्ञांचं म्हणणे आहे की, या युद्धामुळे तेल आणि वायूच्या किंमती वाढू शकतात कारण, रशिया दररोज पाच दशलक्ष गॅलन तेलाची निर्यात करतो. पुरवठा थांबल्यामुळे जागतिक बाजारपेठेत त्याची भरपाई करणं कठीण आहे.

युक्रेन हा सूर्यफूल तेलाचा सर्वांत मोठा उत्पादक आहे. रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. S&P ग्लोबल प्लॅट्सच्या म्हणण्यानुसार, या दोघांचा मिळून सूर्यफूल तेलाच्या उत्पादनात 60 टक्के वाटा आहे. पण युद्धामुळे काही फ्युचर्स एक्स्चेंजमधील वस्तूंच्या किमती 14 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्याय.

या युद्धामुळे अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे पुरवठा विस्कळीत झाला तर आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किंमती दुपटीनं वाढू शकतात.

तुर्कस्तान आणि इजिप्त त्यांच्या गरजेच्या 70 टक्के गहू रशिया आणि युक्रेनमधून आयात करतात. युक्रेन हा चीनचा मुख्य मक्याचा पुरवठादार आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)