रशियन युद्धनौका 'मॉस्कवा' बुडाल्याचे रशिया-युक्रेन युद्धावर काय परिणाम होतील?

फोटो स्रोत, MAX DELANY/AFP
रशियन युद्धनौका मॉस्कवाचं मोठं नुकसान होऊन ती काळ्या समुद्रात बुडाली. युद्धनौका बुडाल्याबाबत रशिया आणि युक्रेनचं एकमत आहे. पण युद्धनौका का बुडाली याबाबत मात्र दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत.
रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटल्याप्रमाणे, युद्धनौकेवर असलेल्या दारूगोळ्याला आग लागून युद्धनौकेच नुकसान झालं. त्यानंतर ती युद्धनौका बंदरावर आणताना वाटेतच बुडाली.
त्याचवेळी युक्रेनने दावा केलाय की, त्यांनी या युद्धनौकेवर नेपच्यून क्षेपणास्त्राने हल्ला चढवला. अमेरिकन अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर अमेरिकन माध्यमांना सांगितलंय की, त्यांना युक्रेनच्या या दाव्यात तथ्यं वाटतं.
विशेष म्हणजे रशियन युद्धनौकेवर 510 नौदल कर्मचारी तैनात होते. ही युद्धनौका युक्रेनविरुद्धच्या मोहिमेचं समुद्रमार्गे नेतृत्व करत होती. यामुळे ही युद्धनौका बुडणं लष्करी आणि प्रतीकात्मकदृष्ट्याही महत्त्वाचं आहे.
24 फेब्रुवारीला जेव्हा रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं, त्याच दिवशी मॉस्कवा प्रसिद्धीच्या झोतात आली. काळ्या समुद्रातील 'स्नेक' बेटाच्या संरक्षणात गुंतलेल्या युक्रेनियन सैनिकांच्या एका छोट्या गटाला या युद्धनौकेने आत्मसमर्पण करायला सांगितलं. मात्र त्यांनी तसं करायला नकार दिला. आणि उत्तरादाखल ते म्हटले, - 'खड्डयात जा'
दारूगोळ्याचा स्फोट की क्षेपणास्त्रांचा हल्ला?
मॉस्कवा बुडाण्यापूर्वी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं- "युद्धनौकेच गंभीर नुकसान झालं असून सर्व नौसैनिकांना वाचवण्यात यश आलंय."
गुरुवारी (14 एप्रिल) दुपारी रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे युद्धनौका आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली असून तिला बंदरात आणलं जात आहे.
यानंतर आणखी एक निवेदन प्रसिद्ध केलं गेलं की, समुद्रात वादळ सदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे युद्धनौका बुडाली. निवेदनानुसार, बंदरात आणताना "युद्धनौकेची संरचना बिघडली आणि तीच संतुलन ढासळलं"
शेवटी, रशियाने दारूगोळ्याला लागलेली आग युद्धनौका बुडण्यासाठी जबाबदार असल्याचं म्हणत कोणत्याही क्षेपणास्त्र हल्ल्याचा उल्लेख टाळला.

फोटो स्रोत, MAX DELANY/AFP
मात्र युक्रेनने या युद्धनौकेच्या बुडण्याची जबाबदारी घेतली. युक्रेनमध्ये बनवलेल्या 'नेपच्यून' क्षेपणास्त्रांनी या युद्धनौकेला लक्ष्य केल्याचा दावा त्यांनी केलाय.
युद्धनौका बुडाण्यापूर्वी युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी फेसबुकवरील एका पोस्टमध्ये म्हटलं होत की, युद्धनौकेवर होणारे स्फोट आणि खराब हवामानामुळे युद्धनौकेवरील क्रू मेंबर्सना बाहेर काढणं कठीण झालं होतं.
गेल्या शुक्रवारी युक्रेनच्या दोन नेपच्यून क्षेपणास्त्रांनी युद्धनौकेवर हल्ला केल्याचं अमेरिकन अधिकाऱ्यांनीही सांगितलं होत. मात्र या हल्ल्यात किती लोक जखमी झालेत याची माहिती दिलेली नाही. रशियाने मृतांच्या आकड्यांवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
बीबीसीनं या दाव्याची पडताळणी केली नाहीये.
शनिवारी, रशियन संरक्षण मंत्रालयाने एक व्हिडिओ फुटेज प्रसिद्ध केलं, यात मॉस्क्वा युद्धनौकेचे चालक दल असल्याचा दावा करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये सैनिक सेवास्तोपोल या क्रिमियन शहरातील परेडमध्ये सहभागी होताना दिसतायत.
मॉस्कवाचा इतिहास
ही युद्धनौका सोव्हिएत युनियनच्या काळात बांधण्यात आली. या युद्धनौकेने ऐंशीच्या दशकात आपली मोहीम सुरू केली. 2000 पासून ही युद्धनौका काळ्या समुद्रात रशियाच प्रतिनिधित्व करत आहे.
2014 मध्ये क्रिमिया रशियाला जोडल्यापासून काळा समुद्रावर रशियन सैन्याचं वर्चस्व आहे. काळ्या समुद्रात रशियाच्या नौदल ताफ्याचा नेहमीच दबदबा राहिलाय.

फोटो स्रोत, Reuters
सध्याच्या संघर्षाच्या काळातही काळ्या समुद्रात असलेल्या या ताफ्यातून युक्रेनमध्ये कुठेही क्षेपणास्त्रे डागली जाऊ शकतात. याबरोबरच मारियोपोलला आपल्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांमध्ये या नौदल ताफ्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात दक्षिणेकडील 'मायकोलायव्ह' शहराजवळ मॉस्क्वा तैनात होती. रशियाने अलीकडेच या शहरावर जोरदार बॉम्बफेक केल्याची माहिती मिळते.
यापूर्वी रशियाने ही युद्धनौका सीरियातील युद्धात तैनात केली होती. या युद्धनौकेने सीरियात असलेल्या रशियन सैन्याला नौदल संरक्षण पुरवलं होत.
या युद्धनौकेवर 16 व्हल्कन अँटीशिप क्षेपणास्त्रांव्यतिरिक्त अनेक अँटी-सबमरीन आणि माइन-टॉर्पेडोसारखी शस्त्र असल्याचा दावा केला जातो.
अशी चर्चा आहे की, ही युद्धनौका युक्रेनने केलेल्या हल्ल्यात बुडाली असेल तर दुसऱ्या महायुद्धानंतर शत्रूने केलेल्या हल्ल्यानंतर बुडालेली ही सर्वात मोठी युद्धनौका असेल. या युद्धनौकेचे वजन 12,490 टन असल्याचं सांगण्यात येतय.
युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर रशियाने आपलं दुसर मोठ जहाज गमावलंय. याआधी मार्चमध्ये युक्रेनच्या हल्ल्यात सेराटोव लँडिंग जहाज बर्दियांस्क बंदरात उद्ध्वस्त करण्यात आलं होतं.
मॉस्कवा मजबूत होती
बीबीसीशी बोलताना इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजचे नौदल तज्ज्ञ जोनाथन बेंथम सांगतात की, मॉस्कवा ही स्लाव्हा श्रेणीतील युद्धनौका होती. ही युद्धनौका रशियाच्या सक्रिय फ्लीटमधील सर्वात सुरक्षित युद्धनौका मानली जात होती.
ही युद्धनौका ट्रिपल टियर एयर डिफेंस सिस्टमने सुसज्ज होती. या सिस्टीमचा योग्य वापर केल्यास नेपच्यूनच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्याच्या तीन संधी मिळू शकतात.
मीडियम आणि शॉर्ट-रेंज डिफेंस क्षमतांव्यतिरिक्त ही युद्धनौका सहा शॉर्ट-रेंज क्लोज-इन वेपन सिस्टम वापरू शकते.

फोटो स्रोत, REUTERS/DENIS SINYAKOV
बेंथम यांच्या म्हणण्यानुसार, मॉस्क्वामध्ये 360-डिग्री अँटी-एअर डिफेन्स कव्हरेज असायला हवं होत. ते म्हणतात, "क्लोज-इन वेपन सिस्टीम एका मिनिटात 5000 राउंड फायर करू शकते, ज्यामुळे या युद्धनौकेभोवती एक प्रकारचं संरक्षण कवच तयार होत. हे या जहाजाला शेवटच संरक्षण पुरवण्याच्या प्रकारासारखं आहे."
ते पुढे म्हणतात, "जर हा हल्ला एकाच क्षेपणास्त्राने केला असेल, तर रशियन सरफेस फ्लीटच्या आधुनिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. युद्धनौकेत पुरेसा दारूगोळा होता की त्यात अभियांत्रिकी त्रुटी होत्या हे प्रश्न निर्माण होतात. कारण ट्रिपल टियर एयर डिफेंस सिस्टम असल्यावर या युद्धनौकेवर हल्ला करणं खूप कठीण आहे."
नेपच्यून क्षेपणास्त्रांची वैशिष्ट्ये
युक्रेनने दावा केलाय की त्यांच्या दोन नेपच्यून क्षेपणास्त्रांनी रशियाच्या मुख्य युद्धनौकेला लक्ष्य केलंय.
2014 मध्ये क्रिमियाच्या विलीनीकरणानंतर रशियाचा काळ्या समुद्रात रशियाच्या वावर वाढला. नौदलाच्या वाढत्या धोक्याला प्रतिसाद म्हणून युक्रेनने ही क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली.
कीव्ह पोस्टच्या मते, 300 किमी पल्ल्याच्या नेपच्यून क्षेपणास्त्रांची पहिली खेप गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये युक्रेनियन नौदलाला मिळाली.
रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनला पाश्चात्य देशांकडून लष्करी मदत आणि शस्त्रे मिळत आहेत. या मदतीमध्ये 100 करोड यूएस डॉलरच्या किमतीची एंटी-एयरक्राफ्ट आणि एंटी टँक क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे. यूकेने ही सर्व मदत पाठवत असल्याचं गेल्याच आठवड्यात जाहीर केलंय.
संघर्ष वाढण्याची भीती
गेल्या 50 दिवसांपासून सुरू असलेल्या युक्रेन आणि रशिया यांच्या संघर्षात या युद्धनौकेच्या विध्वंसानंतर नवी ठिणगी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच कीव्ह आणि लवीववरील वाढते हल्ले त्याचंच उदाहरण मानता येईल.

फोटो स्रोत, Getty Images
रशियाने युक्रेनची राजधानी कीव्ह आणि लवीव इथे नुकत्याच केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनच्या अनेक लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलंय.
संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते आइगोर कोनशेन्कोफ यांनी सांगितलं की, आपलं लक्ष्य अत्यंत अचूक वेधण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रांनी 16 ठिकाणांवर हल्ला केलाय. या ठिकाणांमध्ये नेपच्यून क्षेपणास्त्र निर्मितीच्या कारखान्यांपासून ते शस्त्रास्त्रांचे कारखाने आणि गोदामांचा समावेश आहे.
त्याचसोबत, डेनिप्रोमधील बीबीसी प्रतिनिधी टॉम बेटमन यांनी दिलेल्या बातमीनुसार, रशिया येत्या सोमवारपासून मारियोपोल शहराबाहेर येण्याजाण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याच्या विचारात आहे.
मारियोपोलचे महापौर पेट्रो एंड्रीश्चेंको यांनी टेलिग्रामला सांगितलं की, 18 एप्रिलपासून लोकांना शहरात प्रवेश करण्यास आणि शहर सोडण्यास बंदी घालण्याची योजना रशियन सैन्याने आखली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ सॅम्युअल रमानी ट्विटरवर लिहितात की, मॉस्कवाच्या विनाशामुळे युक्रेनसोबत सुरू असलेल्या संघर्षाचं स्पेशल मिलिट्री ऑपरेशन हे नाव बदलून युद्धाचा औपचारिक दर्जा द्यावा अशी मागणी रशियामध्ये होत आहे.
रशियाने हा मार्ग पत्करला तर या युद्धात अधिक सैनिक भरती करण्यापासून ते मित्र राष्ट्रांची मदत घेण्यापर्यंतचे सर्व पर्याय खुले होऊ शकतात, अशी चर्चा आहे. मात्र, या मुद्द्यावर रशियाने कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








