रशिया - युक्रेन युद्धामुळे बुचा शहरात खरंच प्रेतांचा खच पडलाय का?- फॅक्ट चेक

बुचाचं उपग्रह छायाचित्र
    • Author, रिएलिटी चेक आणि बीबीसी मॉनिटरिंग
    • Role, बीबीसी न्यूज

सूचना : या लेखातले काही फोटो वाचकांसाठी विचलित करणारे ठरू शकतात.

रशियन सैन्यदलं किव्हमधून बाहेर पडल्यावर, या प्रांतामधल्या बुचा शहरातील रस्त्यांवर पडलेल्या मृतदेहांची छायाचित्रं प्रसिद्ध झाली आणि काही माध्यमांच्या प्रतिनिधींनीसुद्धा प्रत्यक्ष हे मृतदेह पाहिले. रशियन सैन्य शहरातून बाहेर पडण्याच्या 2 आठवडे आधीची ही छायाचित्रं आहेत.

रशियाने 'जाणीवपूर्वक जनसंहार' केल्याचा आरोप युक्रेनने केला आहे, तर आपली सैन्यदलं या भागातून बाहेर पडल्यानंतर हे मृतदेह 'ठेवण्या'त आल्याचा दावा रशियाने केला आहे. बुचासंदर्भातील छायाचित्रांबाबत रशियाने अनेक निराधार दावे केले आहेत.

दावा: 'बनावट मृतदेह'

रशियन दलं बाहेर पडल्यानंतर त्या भागातून जाणाऱ्या एका कारमधून चित्रीत करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये शहराच्या रस्त्यावर दुतर्फा मृतदेह पडल्याचं दिसतं. कॅनडातील रशियन दूतावासाने हा व्हीडिओ ट्विटरवर टाकला आणि 'किव्हजवळच्या बुचा शहरातील बनावट मृतदेह दाखवणारा खोटा व्हिडिओ' असं म्हटलं.

पण 19 मार्च रोजी म्हणजे रशियन सैन्यदलं बाहेर पडण्याच्या जवळपास दोन आठवडे आधी, उपग्रहाद्वारे टिपण्यात आलेल्या बुचा शहरातील छायाचित्रांमध्येसुद्धा रस्त्याच्या कडेला मृतदेह दिसतात. पहिल्यांदा 'न्यूयॉर्क टाइम्स'ने ही छायाचित्रं प्रसिद्ध केली आणि 'बीबीसी'ने त्यांची पडताळणीही केली.

आपली सैन्यदलं बाहेर पडल्यानंतर नाटकीपणे बनावट मृतदेह ठेवण्यात आल्याचा दावा रशियाने केला असला, तरी रशियन दलं तिथे होती तेव्हा त्याच रस्त्यावर, त्याच जागी मृतदेह पडलेले असल्याचं या उपग्रहांद्वारे टिपलेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट होतं.

रशियाचं समर्थन करणाऱ्या काही सोशल मीडिया अकाऊंट्सी याच व्हिडिओची एक संथ आवृत्ती प्रकाशित करत एका मृतदेहाचा एक हात हलत असल्याचा दावा केला आहे.

युक्रेन, बुचा

फोटो स्रोत, UKRAIN DEFENCE MINISTRY

हा व्हीडिओ काहीसा धूसर आहे, पण त्याची सूक्ष्म तपासणी केल्यावर लक्षात येतं की, तो तथाकथित 'हलणारा हात' म्हणजे प्रत्यक्षात गाडीच्या विंडस्क्रिनच्या उजव्या कोपऱ्यातली एक खूण आहे.

या व्हिडिओतील दुसऱ्या एका भागाविषयीसुद्धा रशियाने उलटा दावा केला.

लाल-पिवळे दगड असणाऱ्या आणि तपकिरी रंगाचं उद्ध्वस्त कुंपण असणाऱ्या फूटपाथजवळून कार जात असताना त्या फूटपाथशेजारी एक मृतदेह पडल्याचं व्हिडिओत चित्रीत झालं आहे. गाडी पुढे जाताना उजव्या बाजूच्या आरशात हा मृतदेह ओझरता दिसतो. ती व्यक्ती 'बसल्या'चा दावा रशिया समर्थक समाजमाध्यमी लोकांनी केला आहे.

पण, याच व्हिडिओचं संथ रूप पाहिलं, तर त्यात गाडीच्या आरशामध्ये दिसणारं मृतदेहाचं आणि पार्श्वभूमीवरच्या घरांचं प्रतिबिंब अस्पष्ट असल्याचं लक्षात येतं. इंटरनेटवर प्रसिद्ध झालेल्या गाडीच्या आऱशांच्या अशाच प्रकारच्या छायाचित्रांमध्येसुद्धा हेच दिसतं.

युक्रेन, बुचा

फोटो स्रोत, BBC/GETTY

2 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेला मृतदेहांचा व्हीडिओ आणि गेट्टी इमेजेस व एएफपी या वृत्तसंस्थांनी 3 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेली चांगल्या रिझोल्यूशनची छायाचित्रं, या दोन्हींची पडताळणी बीबीसीने केली.

व्हीडिओमध्ये पहिला मृतदेह एका फुटपाथच्या पांढऱ्या-पिवळ्या कडेजवळ पाठीवर पडलेला दिसतो. उजव्या बाजूच्या फूटपाथवरचा थोडा डांबरी भाग आणि थोडं गवत दिसतं. फूटपाथवर, पांढऱ्या कुंपणासमोर डिक्की उघडलेली एक कार दिसते. हीच कार, फूटपाथची कडा, फूटपाथ आणि कुंपण गेट्टी/एएफपी या वृत्तसंस्थांच्या छायाचित्रांमध्येसुद्धा दिसतात.

युक्रेन, बुचा

फोटो स्रोत, BBC/GETTY

दुसऱ्या मृतदेहाच्या अंगावर काळं जॅकेट आहे आणि उजव्या हातावर रक्ताळल्यासारखं वाटणारं बँडेज आहे. उद्ध्वस्त झालेल्या एका तपकिरी कुंपणासमोर लाल-पिवळ्या फूटपाथशेजारी हा मृतदेह पडलेला आहे. यातलं काळ जॅकेट, बँडेज, फूटपाथ आणि कुंपण हे तपशील गेट्टी/एएफपी यांनी प्रकाशित केलेल्या छायाचित्राशी तंतोतंत जुळणाऱ्या आहेत.

दावा: मृतदेह 'ताठरलेले नाहीत'

रशियाच्या परराष्ट्र कामकाज मंत्रालयाने एका ट्वीटमध्ये म्हटलंय की, "किव्हमधील राजवटीने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमधील सर्व मृतदेह किमान चार दिवस तिथे पडून असतानासुद्धा अजून ताठरलेले नाहीत, हे विशेष चिंताजनक म्हणावं लागेल."

युक्रेनियन सैन्यदलांच्या म्हणण्यानुसार, 31 मार्चला पहाटे रशियन दलं तिथून बाहेर पडली, तर आपण 30 मार्चला किव्हमधून बाहेर पडल्याचं रशियाने म्हटलं आहे.

मरण पावल्यावर काही तासांनी मानवी शरीराला ताठरपणा यायला लागतो. या प्रक्रियेमध्ये स्नायू आकुंचन पावतात आणि कडक होत जातात.

चार दिवसांनी मृतदेह 'ताठरलेला' असणं अपेक्षित आहे का, अशी विचारणा आम्ही काही न्यायवैद्यक तज्ज्ञांकडे केली. यातील एक तज्ज्ञ कोसोवो आणि रवांडा इथे गुन्ह्यांच्या तपासामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी निनावी राहण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं की, चार दिवसानंतर मृतदेहाचा ताठरपणे 'सर्वसाधारणतः कमी झालेला असतो.'

'प्रेतांवर दिसणारे विशेष स्वरूपाचे डाग' या मृतदेहांवर दिसत नाहीत, असंही रशियाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

युक्रेन, बुचा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बुचामध्ये आढळलेले मृतदेह स्थानिक कर्मचारी 'बॉडी बॅग्स'मध्ये ठेवून नेताना.

या दाव्याचा अर्थ काय हे स्पष्ट होत नाही, पण वरील न्यायवैद्यक तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, बंदुकीच्या गोळीने किंवा इतर हिंसाचारामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह कसा दिसेल, हे हिंसेसाठी वापरलं गेलेलं शस्त्र कोणतं आहे आणि किती अंतरावरून गोळी झाडली गेली, इत्यादी गोष्टींवर अवलंबून असतं.

प्रत्येक वेळी खूप रक्त दिसतंच असं नाही, कारण कधी ते मृतदेहांच्या खाली पसरलेलं असतं किंवा जड वस्त्रांमध्ये ते शोषलं जातं. विशेषतः थंडीपासून संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या कपड्यांमध्ये रक्त शोषलं जाणं स्वाभाविक आहे.

मृत्यूनंतर रक्ताभिसरण थांबतं, त्यामुळे रक्त शरीराच्या खालच्या भागात साठत जातं, त्यातून त्वचेचा रंग लालसर किंवा गुलाबी होऊ शकतो. रशियाने केलेलं ट्विट कदाचित या संदर्भातील 'डागां'चा संदर्भ देणारं असेल. परंतु, कोणी आडवं पडलेलं असेल, तर खाली पडलेलं रक्त आणि त्वचेचा बदललेला रंग निव्वळ छायाचित्रांवरून लक्षात येईलच असं नाही.

दावा: 'हिंसक कारवाईत एकाही स्थानिकाचा जीव गेला नाही'

बुचा रशियन नियंत्रणाखाली होतं, पण तिथल्या 'एकाही स्थानिक रहिवाशाला हिंसक कारवाईला सामोरं जावं लागलेलं नाही', असा दावा रशियन संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

परंतु, रहिवशांच्या अगणित प्रत्यक्षदर्शी वृत्तान्तांशी या दाव्याचा ताळमेळ बसत नाही. एका स्थानिक शिक्षकाने 'ह्यूमन राइट्स वॉच'ला 4 मार्च रोजी सांगितलं की, रशियन सैनिकांनी पाच पुरुषांना रांगेत उभं केलं होतं आणि त्यातील एकाला तिथेच गोळ्या घालून ठार केलं.

शोधपत्रकारिता करणाऱ्या 'द इनसायडर' या रशियन संकेतस्थळाशी बोलताना इतर काही स्थानिक रहिवाशांनीसुद्धा अशाच प्रकारचं वर्णन केलं. "ते भयंकर दिवस होते. आपलं घर, घरासमोरचं अंगण, अगदी आपला जीवसुद्धा आपला नसल्यासारखी अवस्था होती. वीज नाही, पाणी नाही, गॅस नाही. घरातून बाहेर पडायला बंदी. आणि घरातून बाहेर पडलं तर गोळी घातली जात होती," असं बुचामधील स्थानिक रहिवासी क्रिस्तिना यांनी 'द इनसायडर'ला सांगितलं.

रशियन सैनिकांनी ठरवून फ्लॅट फोडले आणि आतल्या वस्तूंची लूटमार केली, लोकांना सक्तीने तळघरात बसायला सांगून घरातल्या मौल्यवान वस्तू आणि अन्नपदार्थही या सैनिकांनी चोरले, असं स्थानिकांनी 'बीबीसी'ला सांगितलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)