विदर्भ उल्कापात : अंतराळातला कचरा कसा साफ करणार?

अंतराळातला कचरा

फोटो स्रोत, Getty Images

पृथ्वीपासून जवळजवळ 300 किलोमीटर दूर एका अंतराळकेंद्रात तीन जणं काम करत आहेत. अचानक त्यांना एका अशा धोक्याचा अलर्ट येतो. एक मोठी वस्तू 48 हजार प्रति किमी तासाच्या वेगाने तरंगत त्यांच्या दिशेने येतेय, जी त्यांचा जीवही घेऊ शकते. त्यांच्याकडे वेळ आहे फक्त 90 मिनटं.

हे तिघं मिळून अतिशय शिताफीने त्या अंतराळ केंद्राचे बाहेर निघालेले सर्वं अंग आत घेतात, आणि शेकडो छोट्याछोट्या हालचाली करत त्या अंतराळ केंद्राचं लोकेशन बदलतात. त्या केंद्रातल्या सर्वांत सुरक्षित स्थळी हे तिघं श्वास रोखून बसून राहतात.

अखेर 90व्या मिनिटाला ती वस्तू त्या अंतराळ केंद्राजवळ येते आणि काही अंतरावरून निघून जाते. एक मोठा अपघात टाळला जातो आणि तिघेही सुटकेचा निःश्वास सोडतात.

ही घटना 2015मधली आहे. तेव्हा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये एक अमेरिकन आणि दोन रशियन astronautsनी हा प्रसंग अनुभवलाआणि ती वस्तू जी त्यांचा जीव घेऊ शकत होती, ती 1979 मध्ये लाँच झालेल्या एका weather सॅटलाईटचा एक लहानसा तुकडा होता.

तेव्हापासून आजवर अशा अनेक घटना टळल्या आहेत, कारण असे कित्येक लहानमोठे तुकडे अंतराळात तरंगत आहेत, ज्यांपासून धोका कायम आहे. अंतराळातल्या कचऱ्याचा हा प्रश्न मोठा आहे, कारण यामुळे मोठमोठे स्पेस मिशन्स संकटात सापडू शकतात.

शनिवारी (2 एप्रिल) संध्याकाळी आणि रात्री राज्याच्या विविध भागात आगीचे लोळसदृश आकाशात पहायला मिळाले.

हा उल्कापात आहे की उपग्रहाचे तुकडे आहेत? की विदेशी देशांनी भारतावर लक्ष ठेवण्यासाठी केलेली कूटमोहीम आहे? अशा अनेक शक्यतांविषयी सोशल मीडियावर चर्चा रंगली.

त्यामुळे मग अंतराळातल्या कचऱ्याविषयीचीही चर्चा सुरू झाली. या कचऱ्याची विल्हेवाट आपण लावू शकतो का, जेणेकरून भविष्यात असे धोके टाळता येतील? या प्रश्नांची उत्तरं आपण आता शोधणार आहोत. यासाठी आपल्यासोबत आहेत चार तज्ज्ञ.

उपग्रहांमधून धोक्याचा जन्म

आपले पहिले एक्सपर्ट आहेत डॉन केसलर. डॉन जेव्हा नासामध्ये काम करू लागले, तेव्हा असं मानलं जायचं की कुठल्याही अंतराळयानासाठी सर्वांत मोठा धोका नैसर्गिक वस्तूच असू शकतात, कुठलीही कृत्रिम किंवा manufactured गोष्ट नाही. तेव्हा पृथ्वीपासून चंद्रापर्यंतच्या वाटेवर कोणकोणते अडथळे असू शकतात, हे शोधायचं काम त्यांना सांगण्यात आलं.

तेव्हा त्यांनी उल्का एकमेकांवर आदळल्यावर काय होतं, याचा काही आकडेवारीच्या आधारे अभ्यास केला. त्यांच्या लक्षात आलं की, जसं उल्का एकमेकांवर आदळून स्फोट होऊ शकतात आणि त्यांचे आणखी लहानलहान तुकडे तयार होऊ शकतात, तसंच उपग्रहांच्या बाबतीतसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गोष्टीवर तोवर फारसं कुणी लक्षच देत नव्हतं.

"माझ्यासाठी आकडेमोड फार सोपी गोष्ट होती, पण त्यातून जे लक्षात आलं ते भयंकर होतं. म्हणजे लवकरच अंवकाशात सॅटलाईट्सच्या धडकेमुळे अंतराळातले अपघात आणि कचरा दोन्ही वाढणार होते. अंतराळात जितक्या वस्तू वाढतील, तितकीच अपघातांची शक्यता आणि धोका वाढेल."

गोदु

हा पॉडकास्ट ऐकण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करा.

हा धोका म्हणजे, या कचऱ्यातला एक तुकडा दुसऱ्या एका वस्तूला जाऊन धडकेल, आणि मग त्या स्फोटातून आणखी लहानसहान कचरा तयार होईल, ज्याचे तुकडे इतरत्र जाऊन आदळतील. ही एक अनियंत्रित प्रक्रिया असेल आणि डॉन केसलर यांच्यामते यामुळे नवीन स्पेसक्राफ्ट आणि सॅटलाईट्सला धोका वाढलेलाच असेल. त्यांनी जगापुढे मांडलेल्या या सिद्धांताला सुरुवातीला कुणीही गांभीर्याने घेतलं नाही, पण आता यालाच केसलर Effect म्हणून ओळखलं जातं.

"याला विरोध करणाऱ्यांचं म्हणणं होतं की, अंतराळ अनंत आहे, त्यामुळे तिथे अशी समस्या उद्भवणार नाही. हे काही प्रमाणात खरंही ठरू शकतं, पण आपण पृथ्वीपासून शेकडो मैल दूर एका मर्यादित भागाबद्दल बोलत होते, जिथे सगळे सॅटलाईट होते. तिथे खूप गर्दी झाली आहे. याला आता Low earth orbit म्हटलं जातं."

डॉन केसलर यांनी या कचऱ्याच्या अगदी लहानशा तुकड्यांमुळे संभाव्य मोठ्या धोक्यांनाही जगापुढे मांडलं. नासाकडे यापूर्वी असलेल्या यादीत फक्त मोठ्या वस्तूंचा उल्लेख होता. डॉन सांगतात की अगदी एक मिलिमिटर आकाराचा तुकडासुद्धा एखाद्या स्पेसक्राफ्टचं नुकसान करू शकतो. फंडिंग आणि टीम मिळाल्यावर त्यांनी space missions पूर्ण करून परतलेल्या अंतराळयानांचं परीक्षण केलं.

या यानांचा बाहेरचा भाग ते जास्त निरखून पाहत होते, जिथे काही नुकसान झाल्याचं दिसत होतं. यातून काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आल्या. यातून हेसुद्धा स्पष्ट झालं की मानवाने तयार केलेल्या कृत्रिम वस्तूंपासून अशा spacecrafts ला आणि space missions ला खरोखरंच धोका आहे. सेनेच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याला आपला मुद्दा पटवून द्यायला डॉन यांनी एका स्पेसशटलच्या लहानशा खिडकीचा वापर केला.

"ते हे सगळं पाहून म्हणाले, हजारो लोकांच्या अंदाजांपेक्षा एका माणसाने मांडलेलं तथ्य जास्त महत्त्वाचं आहे."

डॉन यांनी 1996 साली नासा सोडलं. आता त्यांचं वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे, पण आजही याबद्दल ते उत्साहाने सांगतात.

आकाशातही कचरा

"माझं नाव मोरिबा जा आहे. मी टेक्सास विद्यापीठात aerospace engineering विभागात associate professor आहे."

पृथ्वीच्या अवतीभवती किती कचरा आहे? आणि तो कशाप्रकारचा आहे, याची माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत मोरिबा. ते सांगतात की यात फक्त सॅटेलाईट, स्पेसक्राफ्ट आणि रॉकेटचेच तुकडे नाहीय.

"यात काहीही असू शकतं. अंतराळवीरांचे ग्लोव्ह्स आहेत, नटबोल्ट आहेत, त्यांना कसायला लागणारे पाने आहेत. सॅटलाईटपासून वेगळे झालेली शीट आहेत. अधिकृतरीत्या हा मिशनशी निगडित कचरा मानला जातो, जो मिशन पूर्ण झाल्यावर मागेच राहून जातो."

सॅटेलाईट

फोटो स्रोत, ESA

फोटो कॅप्शन, अंतराळातील कचरा कमी करण्यासाठी नवे मार्ग शोधले जातायत.

पण या सगळ्या कचऱ्याची माहिती कोण ठेवतं? असं विचारल्यावर मोरिबा सांगतात की, अमेरिकेच्या स्पेस कमांडकडे अशा प्रकारच्या वस्तूंचा सर्वांत मोठा डेटाबेस आहे. अंतराळात तरंगणारी प्रत्येक वस्तू कुठे आहे, किती मोठी आहे, याची नेमकी माहिती गोळा करणं अवघड काम आहे. मग मोरिबा यांनी अंतराळातल्या ट्रॅफिक नियोजनाची सोय केली.

"ही एक वेबसाईट आहे Astriagraph. जगभरात कुणीही या वेबसाईटवर जाऊन पाहू शकतं."

या वेबसाईटवर पृथ्वीचा अंतराळातून घेतलेला फोटो दिसतो. यात निळ्या पृथ्वीभवती लाल, पिवळ्या, जांभळ्या, नारंगी, गुलाबी आणि राखाडी रंगाचे बारिकसारिक ठिपके. हे ठिपके त्या प्रत्येक वस्तूचं प्रतीक आहेत ज्यांनी पृथ्वीला Low earth orbitमध्ये वेढलंय. जेव्हा पहिल्यांदा हा फोटो पाहिला तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? हे विचारल्यावर मोरिबा सांगतात..

"मी रडू लागलो. माझ्या डोळ्यांत अश्रू वाहू लागले, कारण मला वाटलं की आपण पृथ्वी, समुद्र, हवा, पाण्यासोबत जे केलंय, तेच आपण अंतराळासोबत करतोय. अंतराळात ज्या सामानावर लक्ष ठेवलं जाऊ शकतं, त्यांची संख्या जवळजवळ 30हजार आहे. या वस्तूंचा आकार एखाद्या फोनएवढा असू शकतो किंवा एखाद्या स्पेस स्टेशन जितका. या 30 हजार वस्तूंपैकी सुमारे 3 हजार वस्तू अजूनही काम करत आहेत. बाकी सगळा कचरा आहे."

मोरिबा सांगतात की, जर तुम्ही एक मिलिमिटर आकाराचे तुकडे मोजायला गेलात तर हा आकडा 5 लाखांच्या घरात जाईल.

"आपल्याला दररोज लागणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या कामकाजात सॅटलाईटची भूमिका महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ, आपल्या मोबाईल फोनच्या कामासाठी, आपण जगात कुठे आहोत याच्या माहितीसाठी, एखादं बँकेचं transaction, हवामानाची माहिती आणि अशा असंख्य गोष्टी सॅटलाईटमुळे आज सहज शक्य होत आहेत. जर या स्पेसमधल्या कचऱ्यामुळे यापैकी काही सॅटलाईट्सचं नुकसान झालं आणि ते बिघडले, तर आपण अनेक दशकं मागे खेचले जाऊ शकतो."

मोरिबा यांच्यानुसार जर आपण आपल्या सवयी आणि कामाच्या पद्धती नाही बदलल्या तर पुढे मोठं नुकसान होऊ शकतं. आता प्रश्न हा आहे की हा धोका संपवायला किती कचरा साफ करायची गरज आहे. यावर मोरिबा सांगतात की आपण आजवर अंतराळात जो कचरा केलाय, आता आपल्याला त्यासोबतच जगायला शिकावं लागेल. पण हो, हा कचरा साफ करायचा प्रयत्नसुद्धा आता काही प्रमाणावर होताना दिसतोय.

स्वच्छ अंतराळ अभियान

"एखाद्या गोष्टीविषयी भीती बाळगणं साहजिक होतं, खासकरून जेव्हा हे कळतं की यावर चार-पाच वर्षं काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पदरी निराशाच आलीय."

आपले तिसरे एक्सपर्ट आहेत रिचर्ड ड्यूक. सप्टेंबर 2018मध्ये ड्यूक त्यांच्या काही मित्रांबरोबर खूप उत्साहाने एक व्हीडिओ पाहायला पोहोचले. यात एका महत्त्वाच्या प्रयोगाचे निष्कर्ष दाखवण्यात आले होते. हा व्हीडिओ कचरा हटवण्याच्या एका महत्त्वाच्या मोहिमेचा होता.

यासाठी तयार करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय गटात अनेक विद्वान आणि कंपन्यांचा समावेश होता. याचं नेतृत्व इंग्लंडच्या सरी विद्यापीठातल्या सरी स्पेस सेंटरकडे होतं. रिचर्ड ड्यूक याच सरी स्पेस् सेंटरमध्ये स्पेसक्राफ्ट इंजिनिअर आहेत.

"आम्हाला हे तपासत होतो की जर सॅटलाईट निकामी झालंय तर त्याला हटवायचं कसं."

या टीमने काही असा कचरा तयार केला, ज्याला अंतराळात पाठवून परत आणणं शक्य होईल. हे एक लहानसं सॅटलाईट होतं, ज्यात काही मॉनिटरिंग डिवाईसेस लागलेली होती. या प्रयोगासाठी आणखी दोन वस्तू वापरल्या जात होत्या... हारपून किंवा एकप्रकारचा मोठा गळ आणि एक नेट किंवा जाळं.

"हा प्रोग्राम ऑटोमॅटिक आहे. एकदा सारंकाही सेट झालं की हा प्रोग्राम पुन्हा सुरू नाही करता येत. त्यामुळे पहिल्या प्रयत्नातच सगळं बरोबर होईल, याची खात्री करूनच काम करावं लागतं. हार्पून आणि नेटचा वापरही योग्यरीत्या होणं महत्त्वाचं आहे."

सॅटेलाईट

फोटो स्रोत, Getty Images

या प्रयोगाला बेस्ट अँगलने शूट करण्यासाठी Brtish std time नुसार रात्री दोनची वेळ निवडण्यात आली. रिचर्ड यामुळे नीट झोपू नाही शकले.

"दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही कामावर परतल्यावर व्हीडिओ पाहू लागलो. हे जाळं एखाद्या कोळ्याच्या जाळ्यासारखं दिसत होतं. त्याने कचऱ्याला आपल्यात कैद करून टाकलं, तेव्हा आम्हाला खात्री पटली की हे एक खूप मोठं यश आहे."

नंतर त्यांनी हा कचरा जाळून टाकला. काही आठवड्यांनी पुन्हा असाच एक व्हीडिओ तयार होता. यात हार्पूनचा वापर करण्यात आला होता. हार्पून फेकल्यानंतर तो आपलं लक्ष्य भेदू शकत होता.

कचरा हटवायला अशा अनेक प्रयोगांची चाचपणी आणि संशोधन आता अनेक स्पेस एजंसी करत आहेत. युरोपियन स्पेस एजंसीने स्वित्झर्लंडसोबत 860 लाख युरोंचा करार केलाय, ज्यानुसार 2025पर्यंत १०० किलो वजनी एका रॉकेटला हटवायचं आहे. जपानमध्येही एका स्टार्टअपने मार्च 2021मध्ये एक टेस्ट सॅटलाईट लाँच केला, जो चुंबकाच्या मदतीने कचरा गोळा करण्याचं काम करतोय.

नियम आणि कायदे

"अंतराळावर कुणा एकाची मालकी नाहीय. ही सर्वांची एक कॉमन जागा आहे."

आजच्या आपल्या चौथ्या तज्ज्ञ आहेत व्हिक्टोरिया जॉन्सन. त्या Secure World Foundation च्या Washinton कार्यालयाच्या Director आहेत. त्या सांगतात की, अंतराळातल्या कचऱ्याचा प्रश्न सोडवायला कोणतेच जागतिक नियम-कायदे तयार करण्यात आलेले नाहीत, पण याबाबतीत काही गाईडलाईन्स नक्कीच आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर काही सामंजस्य करारसुद्धा झालेत.

"आपल्याकडे Orbital Debris Mitigation guidelines आहेत. याबाबत वेगवेगळ्या स्पेस एजंसींमध्ये अंतराळाच्या योग्य वापराबाबत एकमत तयार झालंय. त्यानुसार कुठल्याही मोहिमेत कचरा कमीत कमी निर्माण होईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. सोबतच जर सॅटलाईटचं काम झालं असेल तर त्याला परत आणण्याचेही प्रयत्न व्हायला हवे."

अंतराळ

फोटो स्रोत, ESA

याशिवाय आणखी एक गाईडलाईन आहे - ज्यानुसार lower earth orbit मध्ये असलेल्या सॅटलाईटला त्याची मोहीम संपल्यानंतर 25 वर्षांत नष्ट करायला हवं.

"या गाईडलाईन्सचं पालन 40 ते 60 टक्केच पाळल्या जातात. हे बरोबर नाहीय."

पण या गाईडलाईन्सचं उल्लंघन केल्यावर कुठलीही शिक्षा किंवा दंडाची तरतूद आहे का, असं विचारल्यावर व्हिक्टोरिया सांगतात की सध्या तरी असा कुठला नियम नाहीय. पण जर राष्ट्रीय पातळीवर याला विरोध करण्यात आला, तर त्याचा फायदा होऊ शकतो.

अंतराळाच्या साफसफाईसाठी एका जागतिक फंड गोळा करण्याबद्दलची विचार सुरू आहे. पृथ्वीवर जर तुम्ही कचरा करता तर त्यासाठी तुम्हाला टॅक्स किंवा दंड भरावा लागतो. पण अंतराळाच्या बाबतीत सध्या तरी असं काही नाहीय.

मात्र या बाबतीत काहीच नाही होऊ शकतं, अशातला भाग नाहीय. पण सगळे देश अंतराळ स्वच्छता अभियानासाठी एकत्रितपणे काम करू शकतात का?

"तुम्ही तीन मोठया Space powersकडे पाहा - अमेरिका, रशिया आणि चीन. यांच्यात अनेकदा एखाद्या मुद्द्यावरून एकमत नसतंच. असं असतानाही तुम्ही International Space Station चं उदाहरण घ्या. राजकीय diplomacy मध्ये हा एक वेगळाच प्रयोग होता. जे देश कधीच एकत्र येताना दिसत नाहीत, ते आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमांमध्ये एकत्र येऊन काम करतात. मला वाटतं हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी ठरलाय. आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमत तयार व्हायला वेळ लागतो, पण हे अशक्य अजिबात नाहीय."

आता आपण आपल्या आजच्या प्रश्नावर पुन्हा एकदा विचार करू या.. की आपण खरंच अंतराळातला कचरा साफ करू शकतो का? या समस्येचं समाधान शोधायचं कसं?

अंतराळातला कचरा ही समस्या तर आहेच, पण त्यासोबत काही आशासुद्धा आहेत. काही ठराविक काळाने कचरा साफ करण्याचं काम कंटाळवाणं असू शकतं. या कामासाठी होणारा खर्च आणि याची जबाबदारी, दोन्ही मोठी आव्हानं आहेत. पण असं करणं सर्वांत जास्त महत्त्वाचं आहे, कारण अंतराळात आता खासगी कमर्शियल कंपन्या आपला नवीन धंदा सुरू करू पाहतायत. Space Tourism आता एक नवीन उद्योग म्हणून उदयास येतोय. अशात अंतराळ साफ ठेवणं ही सर्वांसाठीच मोठी गरज आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)